Wednesday, 15 November 2023

दशकपूर्ती "'सप्रे'म भेट"ची / Ten years of Blogging

English version of this blog follows the Marathi version below.

नमस्कार मित्र/मैत्रिणींनो.

सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि आजच्या भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाची तुमची दिवाळी छान जात असेल अशी आशा करतो.

आजच्या दिवशी बरोबर १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ च्या भाऊबीजेला मी माझ्या " 
'सप्रे'म भेट " या ब्लॉगचा शुभारंभ केला होता. त्याला आज दहा वर्षे पूर्ण झाली. आजपर्यंत मी सामाजिक विषय, १९४० ते १९७० या काळातील हिंदी चित्रपट संगीत, संगीतकार आणि चित्रपट तारका या विषयांवर एकूण ५४ ब्लॉग्स लिहिले. याव्यतिरिक्त माझ्या Facebook भिंतीवर आणि WhatsApp च्या माध्यमातून विडंबन कविता, प्रासंगिक लिखाण आणि गेल्या १०-११ महिन्यांपासून दर शनिवारी एक सुवचन (गंमतीशीर Quotes) असा उपक्रम राबवत आहे. 

माझ्या ब्लॉगचे Home Page आहे:  https://dhananjayrsapre.blogspot.com/

आपण जरूर भेट द्या. आवडले तर Follow/Like/Forward करा ही नम्र विनंती. धन्यवाद.

कुठलेही काम चालू केले की त्यात १० वर्षे हा महत्वाचा आणि मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर तुम्हाला मागे वळून पाहता येते आणि एक प्रकारे आपल्याच कामाचे सिंहावलोकन करता येते. हेच आजच्या ब्लॉगचे प्रयोजन. आजचा हा ५५वा ब्लॉग. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने मी इथपर्यंत पोहोचू शकलो त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. 

मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो माझ्या २ अगदी जवळच्या मित्रांचा - अद्वैत धर्माधिकारी आणि विश्वास करंदीकर. अद्वैत आणि विश्वास दोघेही माझ्या ब्लॉग प्रवासात कायम बरोबर होते/आहेत. दोघांनीही मला वेळोवेळी उपयुक्त सूचना केल्या आहेत, तसेच सदैव प्रोत्साहन दिले आहे.

आजच्या दशकपूर्तीनिमित्ताने " 'सप्रे'म भेट " नवीन रूपात (Look & Feel) सादर करत आहे. याचबरोबर माझ्या ब्लॉगचा नवीन लोगो (चिन्ह) सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा लोगो माझी Architect भाची - सौ. पल्लवी शिधये-अभ्यंकर - हिने डिझाईन केला आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.


मी कधी लिहायला सुरुवात केली हे आता नक्की आठवत नाही. आयुष्यात कधी माझ्या हातून काही लिखाण होईल असे शाळा-कॉलेजात असताना कोणी सांगितले असते तरी त्यावर मी स्वतःच विश्वास ठेवला नसता. ७वी पर्यंत मराठी माध्यमातून आणि त्यानंतर सेमी-इंग्रजी माध्यमातून शिकल्यानंतरही मराठी भाषा ही आयुष्यात कायमच Higher राहिली, पण इंग्रजी मात्र आजही Lower च राहिलेली आहे. त्या काळात मराठी वाचनही खूप झाले. शाळेतील मराठीचे शिक्षक, मराठी साहित्य, मॅजेस्टिक गप्पा आणि वसंत व्याख्यानमाला यांसारखी मराठी विचारपीठे, मराठी नाटके, चित्रपट आणि संगीत यांनी माझे आयुष्य समृद्ध केले. 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि आई-वडिलांच्या संस्कारांनी स्वतःच्या पलीकडचेही जग बघायला शिकवले. माझ्या बाबांचे आयुष्य, फिरतीची नोकरी असतानाही सामाजिक काम करण्याची 
त्यांची धडपड, आणि अथक प्रयत्नातून त्यांच्या मनासारखी संस्था/शाळा उभी राहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेले अतीव समाधान/आनंद यामुळे आपणही आयुष्यात समाजासाठी जमेल तसे काहीतरी सतत केले पाहिजे ही भावना वाढीस लागली.
 
१९८० नंतर देशात उलथापालथ होणाऱ्या अनेक घटना बघत होतो, त्याविषयी वाचत होतो. हे सर्व होत असताना निष्क्रिय, स्वतःमध्ये मश्गुल असलेला समाज, बेशिस्त, अप्रामाणिक, चारित्र्यहीन, भ्रष्टाचारी माणसे बघून संताप व्हायचा. याचा परिणाम असा झाला की मी मला जे वाटते ते कुठल्यातरी माध्यमातून व्यक्त करायचे ठरवले. याची सुरुवात मित्र/नातेवाईकांना पत्र, ई-मेल लिहून झाली. २००३ साली राजदीप सरदेसाई, वीर संघवी यांच्या लेखांवर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर वर्तमानपत्रांना पत्र लिहायला लागलो. २००५ ते २०१० या काळात "सकाळ", "लोकसत्ता" यांसारख्या मराठी वृत्तपत्रात माझी काही पत्रे छापूनही आली. पण तरीही त्या लेखनाचे स्वरूप त्या त्या घटनांपुरतेच मर्यादित राहिले. 
 
२०१३ सालच्या ऑगस्ट महिन्यात डॉ. नरेंद्र दाभोळकरांची दुर्दैवी हत्या झाली. त्याच दिवसापासून अनेक मराठी वृत्तपत्रे आणि TV Channels मधून तथाकथित निःष्पक्ष पत्रकार हे कुठलाही पुरावा हातात नसताना हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करायला लागले. एवढेच नव्हे तर डॉ. दाभोळकरांच्या श्रद्धांजली सभेतील सर्व वक्त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. हे सर्व बघून मी या सर्व पुरोगाम्यांचा बुरखा फाडणारा एक छोटासा लेख लिहिला आणि काही वृत्तपत्रे आणि मासिकांना पाठवून दिला, पण एकानेही तो छापला नाही. ते अपेक्षितच होते. त्यामुळे अंतिमतः मी माझा स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याचे ठरवले. २०१३ सालच्या भाऊबीजेला "'सप्रे'म भेट" चा आरंभ केला.

 
सामाजिक विषयांवर लिहीत असताना माझा रोख कायम समाजातील लोकांवर राहिलेला आहे. कारण फक्त व्यवस्था आणि राजकारणी यांना शिव्या देऊन परिस्थितीत बदल होत नसतो असे मला वाटते. शिवाय संघाच्या संस्कारांनी मला हे शिकवले आहे की ज्या बदलाची आपण अपेक्षा करतो तो बदल प्रत्येकाने स्वतःपासून सुरु केला पाहिजे. या भावनेतून "आपण सगळेच काचेच्या घरातील सहवासी?", "तुम्हाला हेच हवे आहे काय?", "बाप्पांच्या आगमनाच्या निमित्ताने", "पुलवामा : क्रियाशील अतिरेकी, निष्क्रिय समाज!!" आणि "अप्रूपाचे अप्रूप" हे लेख लिहिले.
 
आयुष्याच्या विविध टप्प्यांवर काही सामाजिक कार्यकर्त्यांशी परिचय झाला, त्यांचे काम, त्यांची तळमळ जवळून बघण्याचे भाग्य लाभले. आजूबाजूला इतकी विपरीत परिस्थिती असतानाही हे कार्यकर्ते कुठली प्रेरणा घेऊन अविरतपणे समाजासाठी काम करतात हे मला कायम पडलेले एक कोडे आहे. त्यांची भेट, त्यांच्याशी झालेला/होणारा संवाद हे मला कायम प्रेरणा देतात. भोवतालच्या नकारात्मक वातावरणात एका दृढ निश्चयाने ठराविक विषय/उद्दिष्ट घेऊन अविरत सकारात्मक काम करणाऱ्या, आणि तरीही अंधारात राहणाऱ्या या कार्य-दीपांची ओळख माझ्या मित्र-परिवाराला व्हावी या उद्देशाने मी "वसुंधरेवरील तारे" ही मालिका सुरु केली. आजपर्यंत फक्त २ ताऱ्यांची ओळख करून देऊ शकलो - वसुंधरेवरील तारे - मिलिंद प्रभाकर सबनीस  (वंदे मातरम चे अभ्यासक) आणि वसुंधरेवरील तारे - डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी (भोर तालुक्यातील रावडी गावात १९८३ सालापासून अविश्रांत मेहनत घेऊन शाळा सुरु करणारे डॉक्टर). भविष्यात अजूनही काही जणांवर लिहिण्याचा मानस आहे.
 
माझे बाबा हे माझे आदर्श होते, आहेत आणि राहतील. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांचे संपूर्ण आयुष्य हे कष्टाचे आणि अतिशय तळमळीने केलेल्या सामाजिक कामांचे होते. जानेवारी २०१७ मध्ये ते गेल्यानंतर मला त्यांच्यावर लिहावेसे वाटले. सप्टेंबर २०१७ मध्ये मी त्यांच्यावर "बाबा...." हा प्रदीर्घ लेख लिहिला. माझ्याही नकळत त्यांचा संपूर्ण जीवनपट मला माहिती होता हे मला लेख लिहून झाल्यावर लक्षात आले! आजपर्यंतचा माझा हा सर्वाधिक लोकप्रिय (१७३९ views) ब्लॉग ठरला यात नवल नाही!! 😊

जानेवारी २०२२ मध्ये मला लिखाणाची एक अनोखी संधी मिळाली. पुण्यातील भारतीय विचार साधना प्रकाशनाने भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त "स्वराज्य @७५" या उपक्रमाअंतर्गत "मराठी रंगभूमी कलाकारांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान" या विषयावर लिहिण्याची संधी मला दिली. तो एक वेगळा पण छान अनुभव होता. 
 
सामाजिक विषयांवर फक्त गंभीर स्वरूपाचेच नाही तर उपरोधिक लिहूनही विषय पोहोचवता येतो असे वाटल्याने २ लेख त्या स्वरूपाचे लिहिले - "मोदीजी, तुम्हारा चुक्याच!" आणि "माझे सविनय कायदेभंगाचे प्रयोग". यातील पहिल्या लेखाला ३३८ views मिळाले!

जसे सामाजिक विषय मला जवळचे आहेत तसेच संगीत, विशेषतः चित्रपट संगीत, गायक, संगीतकार हेही माझे आवडीचे विषय आहेत. गाण्याची आवड मला लहानपणापासूनच होती, हे गुण माझ्यात माझ्या आईमुळे आले. आईलाही गाण्याची आणि गाणी म्हणण्याची अतिशय आवड आहे. सुरुवातीला म्हणजे १९८०च्या दशकात मीही इतरांसारखा विविध भारती ऐकायचो. सवाई गंधर्व महोत्सवाला दर वर्षी हजेरी लावायचो, पण शास्त्रीय संगीत मला फार कळले नाही व भावलेही नाही, आजही ते कळत नाही. साधारण १९८५-८६ साली शिरीष कणेकर यांची "गाये चला जा" आणि "यादों की बारात" ही दोन पुस्तके वाचली व रेडिओवर ऐकू येतात त्यापेक्षाही वेगळी, चांगली गाणी आहेत हे कळले. 

मग ही जुनी गाणी (म्हणजे १९४०-७० च्या काळातील) जिथून मिळतील तिथून जमवण्याचा, ती ऐकण्याचा छंदच लागला. रेडिओवर सतत ऐकू येणारे लक्ष्मीकांत-प्यारेलाल, R. D. बर्मन, S. D. बर्मन, मदनमोहन, कल्याणजी-आनंदजी, बप्पी लाहिरी, नौशाद, ओ. पी. नय्यर, सी. रामचंद्र यांच्याशिवायही अनेक गुणी संगीतकार आणि त्यांच्या गाण्यांची ओळख कणेकरांच्या पुस्तकातून झाली. याशिवाय माधव मोहोळकर यांचे "गीतयात्री" हे पुस्तक, राजू भारतन यांची पुस्तके आणि इसाक मुजावर यांचे लेख वाचून हिंदी चित्रपटसृष्टीविषयी अधिक माहिती झाली.

इंटरनेटवरही अनेक लोकांनी चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर प्रचंड काम करून ठेवले याची अभ्यास करताना जाणीव झाली. उदा. https://www.hindilyrics4u.com/ या संकेतस्थळावर हिंदी गाण्यांची प्रचंड यादीच आहे, आणि ती यादी संगीतकार, गीतकार, चित्रपट, गायक अशा विविध वर्गवारीनुसार तुम्ही शोधू शकता, तर Songs of Yore - Old Hindi film songs या संकेतस्थळावर १९३०-१९६० या काळातील चित्रपट आणि संगीतावर अनेक लोकांनी अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखन करून ठेवले आहे. याशिवायही अनेक चांगली संकेतस्थळे आहेत. मला ब्लॉग्स लिहिताना या सर्व संकेतस्थळांचा खूप उपयोग होतो याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

सध्या रेडिओ आणि TV Channels वर लागणारी धांगडधिंग्याची गाणी आणि सुमार चित्रपट बघून वाटले की का नाही जुन्या काळातील चांगले चित्रपट किंवा गाणी एकही चॅनेल लावू शकत? १९८० नंतर जन्मलेल्या पिढीला १९४० ते १९६५ या हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळाची ओळख करून दिली नाही तर त्यांना कळणार कसे की चांगले चित्रपट, चांगले संगीत हे काय आहे? 

या भावनेतून त्या अद्भुत काळाची, त्यातील संगीतकारांची आणि त्यांच्या गाण्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने मी "अनमोल रतन" ही एक भाग-एक गीत या संकल्पनेवर आधारलेली मालिका चालू केली. आजपर्यंत "अनमोल रतन" च्या १६ भागातून १६ उत्कृष्ट गाण्यांची ओळख करून दिली. त्या त्या गाण्यामागची पार्श्वभूमी, संगीतरचनेचे आणि गायनाचे वैशिष्ट्य इ. पैलूंवर प्रत्येक भागातून थोडासा प्रकाश पाडत असतो. प्रत्येक गाण्याचे काही ना काही वैशिष्ट्य होते. उदा. लता आणि किशोर कुमार यांचे पहिले द्वंद्वगीत, उस्ताद अल्लारखाँ (उस्ताद ज़ाकिर हुसैन यांचे पिताजी) यांनी संगीतबद्ध केलेले एक गीत, लताजींनी गायलेले एक सुमधुर बंगाली गाणं, इ.

चित्रपट संगीत या विषयावर लिहीत असताना माझा भर हा कायम अप्रसिद्ध, अंधारात राहिलेल्या संगीतकारांवर असतो. कारण सचिनदेव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, R. D. बर्मन, मदनमोहन यांच्याबद्दल अनेक जणांनी अनेक वेळा लिहिलेले आहे, त्यामुळे मी वेगळे काय लिहिणार? पण यांचेच समकालीन अनेक संगीतकार होते जे यांच्याइतकेच किंबहुना काकणभर सरसच होते, पण तरीही आज त्यांची नावे व गाणी फारशी ऐकू येत नाहीत. त्यामुळे मी अशाच कलाकारांवर लिहायचे ठरवले आहे.

या कारणास्तव "अनमोल रतन" या मालिकेतून मी संगीतकार विनोदजयदेवजमाल सेन आणि पं. रविशंकर यांची कारकीर्द व त्यांनी संगीतबद्ध केलेली सुमधुर गाणी सादर केली. 

तसेच विस्मृतीत गेलेल्या/माहिती नसलेल्या अनेक संगीतकारांवर आवर्जून लिहिले. उदा. ज्यांनी हिंदी चित्रपटात पार्श्वसंगीत आणले असे रायचंद (R. C.) बोराल, ज्यांनी हिंदी चित्रपटसंगीताची पंजाबी शैलीचे संगीत देऊन बदलून टाकली असे मास्टर गुलाम हैदर, "लाहोर", "बाजार" सारख्या चित्रपटातून अप्रतिम संगीत देणारे श्यामसुंदर, हिंदी चित्रसृष्टीतील पहिली संगीतकार जोडी हुस्नलाल-भगतराम आणि हिंदी व बंगाली दोन्ही भाषांमधील चित्रपटातून स्वतंत्र प्रतिभेचे संगीत देणारे संगीतकार हेमंतकुमार.

याचबरोबर मी सुलोचना चव्हाण (पूर्वाश्रमीच्या कदम) आणि मन्ना डे यांच्यावरही दोन लेख लिहिले, पण ते माझ्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या लोकांना माहित नसलेल्या पैलूंवर. उदा. सुलोचना चव्हाण यांची हिंदी चित्रपटगीते आणि मन्ना डे यांची संगीतकार म्हणून कारकीर्द.
 
काही मित्र-मैत्रिणींच्या आग्रहावरून २ अभिनेत्रींवर स्वतंत्र भाग लिहिले - वहिदा रेहमान यांच्यावर "हमारी वहिदा" (६९१ views) आणि स्व. मीनाकुमारी यांच्यावर "एक थी मीनाकुमारी..." (१८० views). दोनही भागातून या तारकांची काही सर्वोत्कृष्ट गाणीही सादर केली. दोन्ही लेखांना चांगला प्रतिसाद मिळाला.
 
माझे सर्वाधिक आवडते दोन संगीतकार म्हणजे सज्जाद हुसैन आणि अनिल विश्वास. यापैकी सज्जादना त्यांच्या माहीम, मुंबई येथील घरी प्रत्यक्ष भेटण्याचे भाग्य मला मार्च १९९५ मध्ये लाभले, त्यावर मी "Sajjad Hussain - The Inimitable Maestro - Part 2" या ब्लॉगमध्ये अतिशय विस्ताराने लिहिले. हा ब्लॉग लिहिताना मला स्वतःला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. 

लता मंगेशकर हे माझे दैवत आहे, जरी मी नास्तिक असलो तरी! फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने त्यांची ३० सर्वोत्कृष्ट दुर्मिळ गाणी मी ३ भागात सादर केली त्या गाण्यांच्या वैशिष्ट्यांसह - "गाए लता, गाए लता - एकल गाणी", "गाए लता, गाए लता - द्वंद्वगीते" आणि "गाए लता, गाए लता - इतर भाषांतील गाणी". तीनही भागांना उत्तम प्रतिसाद मिळाला. 
 
माझा पन्नासावा ब्लॉग मी हिंदी चित्रपट संगीताचे भीष्म पितामह अनिल विश्वास यांच्यावर लिहायचा हे आधीपासूनच ठरवले होते, पण त्यांची ३० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द एका भागात मांडणे शक्य नव्हते म्हणून ४ भागात सादर केले - "जीवन आणि कारकीर्द", "अनिलदांनी स्वरबद्ध केलेली पुरुष गायकांची गाणी", "सर्वोत्कृष्ट द्वंद्वगीते" आणि "अनिल विश्वास-लता यांची गाणी". या चारही भागांनी मला अतीव समाधान दिले. आपण हे चारही भाग आणि त्यातील गाणी आवर्जून बघावीत अशी माझी आपल्याला विनंती आहे.
 
गेल्या १० वर्षात मी एकूण ५४ भाग लिहून प्रदर्शित केले! त्यांना आजपर्यंत एकूण १२,४३३ Views मिळाले! थोडेसे विश्लेषण खाली देत आहे:
 


याशिवाय मी थोडेफार ब्लॉग-बाह्य लिखाण Facebook आणि WhatsApp वर केले. उदा. २०१९ मध्ये "संत ज्ञानेश्वर आणि सामाजिक समरसता" या विषयावरील लेख, २५ जुलै २०२३ रोजी शिरीष कणेकर यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर लिहिलेला छोटासा लेख, पुण्यातील रात्री-अपरात्री होणाऱ्या तोडफोडीच्या घटनांवर "रात्रीस खेळ चाले, या षंढ टोळक्यांचा" हे विडंबनगीत, रोज न चुकता WhatsApp Forward करणाऱ्यांना उद्देशून केलेले "सावर रे सावर रे" हे विडंबनगीत, पितृपंधरवड्यावर केलेली कविता, माझ्या पहिल्यावहिल्या परदेश प्रवासाचे वर्णन, इ. हे सर्व तुम्हाला माझ्या Facebook Wall वर बघायला मिळेल. 
 
माझे ब्लॉग्स खूप मोठे असतात अशी अनेक जणांची तक्रार आहे, आणि ती मला १००% मान्य आहे. मी थोडक्यात लिहू शकत नाही हा माझा सर्वात मोठा दोष आहे. यावर तोडगा म्हणून मी साधारण ८-१० मिनिटांचा ब्लॉग-वाचनाचा Audio काही ब्लॉग्समध्ये टाकून पाहिला; पण फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. याकरता केलेल्या प्रयत्नांच्या मानाने प्रतिसाद अत्यल्प होता, त्यामुळे नंतर तो सोडून दिला.
 

यावरच
 आणखीन एक उपाय म्हणून एक वेगळा लेखन-प्रकार (Genre) मी डिसेंबर २०२२ पासून सुरु केला. छोटी-छोटी Quotations, ज्याला मी मराठीत "सुवचने" असे नाव दिले. धकाधकीच्या जीवनाने रंजल्यागांजल्या चेहऱ्यांवर थोडेसे हसू आणावे हाही उद्देश "सुवचने" चालू करण्यामागे होता. साधारणतः दर शनिवारी एक सुवचन पाठवायचे धोरण ठेवले, त्याशिवाय काही खास दिवशी प्रसंगानुरूप सुवचनेही लिहिली. आत्तापर्यंत एकूण ६१ सुवचने लिहून झाली आहेत. किमान १०० सुवचने लिहायची इच्छा आहे. पण ब्लॉग्स मोठे असतात म्हणून वाचत नाही अशी तक्रार करणारे चार ओळींची सुवचनेही वाचत नाहीत अथवा फॉरवर्ड करत नाहीत असा अनुभव आहे.

मी काही फार मोठा, अभ्यासू, विद्वान किंवा सिद्धहस्त लेखक नाही, तसेच माझ्या लेखन मर्यादांची मला जाणीव आहे. ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, रत्नाकर मतकरी, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, मर्ढेकर  यांच्या १%  प्रतिभा सुद्धा माझ्याकडे नाही. गो.नी. दांडेकर, अनिल अवचट, आनंद यादव, गिरीश प्रभुणे, अच्युत गोडबोले, दुर्गा भागवत, शांता शेळके, इ. सारखा जीवनाचा वैविध्यपूर्ण आणि विस्तृत अनुभवही माझ्याकडे नाही. हे सर्व मान्य करूनही माझ्या विचारांशी प्रामाणिक राहून आणि तद्वत वागून माझे विचार आणि जे काही चांगले आहे - मग ते सामाजिक असो अथवा संगीत - ते समाजापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या लेखनातून करत असतो.
 
माझे लेखन मी Facebook आणि WhatsApp च्या माध्यमातून जवळपास २००-२५० लोकांना पाठवत असतो. काही निवडक मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक हे बहुतेक वेळा छान प्रतिसाद देतात, त्यांचा मी मनापासून आभारी आहे.😊 पण हे वगळता एकूणच माझ्या सर्वच उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे, तो खचितच उत्साहवर्धक नाही. आपल्याच एका मित्राने स्वतः लिहिलेले वाचावे, प्रतिक्रिया द्यावी किंवा कमीतकमी like/forward  करावे असे या २००-२५० पैकी कित्येकांना वाटत नाही!? ४ ओळींच्या ६१ सुवचनांमधले एकही सुवचन आजपर्यंत "Forwarded Many Times" झालेले नाही याचे मला राहून राहून आश्चर्य आणि दुःख वाटते. माझे सर्वच लिखाण उत्कृष्ट असते असा माझा दावा नाही. पण इतकेही टुकार मी खचितच लिहीत नाही; तरीही असे का होते हे कोडे मला पडले आहे. नक्कीच माझंच काहीतरी चुकत असेल असे वाटते, त्याशिवाय लोकांना माझे ब्लॉग्स वाचावेत व फॉरवर्ड करावेत असे वाटत नाही. 
 
इथे मला साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या एका गीतातील ओळी आठवतात:
 

तरीही जोपर्यंत नवनवीन सुचत राहील तोपर्यंत मी लिहीत राहणार आहे. कारण समाजात वाईट गोष्टी पटकन रुजतात, चांगल्या गोष्टी रुजायला वेळ लागतो यावर माझा विश्वास आहे. "वो सुबह कभी तो आयेगी" ही आशा आहे, आणि आशेवरच माणूस जगत असतो हे सत्य आहे.
 
भविष्यात ब्लॉगच्या बाबतीत अजून काही नवीन प्रयोग करण्याचे डोक्यात आहे. कदाचित ते तुम्हाला आवडतील. बऱ्याच गुणी पण विस्मृतीत गेलेल्या संगीतकारांवर लिहायचे आहे. काही गायकांवरही लिहायचे आहे. बघू या कसे जमते ते.
 
हा दशकपूर्तीनिमित्त घेतलेला आढावा कसा वाटला ते नक्की कळवा. ब्लॉगमध्ये Comment टाकणार असाल तर आपले नाव जरूर टाका म्हणजे मला कळेल कोणी Comment दिली आहे ते. 

आपले प्रेम/आपुलकी आहेच, ती वाढावी ही अपेक्षा. धन्यवाद. 🙏🙏

=================================================

Namaskar friends,

To begin with, I wish you all a very Shubh, Healthy, Peaceful and Prosperous Diwali. Hope you had a great time.

Exactly 10 years back on this auspicious Bhaibeej day of Diwali, I had started my own blog viz. "Saprem Bhet". I have written 54 blogs so far on various social issues, Hindi film music from the period 1940-1970, Music Composers and few actors. Apart from the Blog, I have also written Satires, small articles and 2-4 line quotations (what I call as सुवचन) on my Facebook wall and WhatsApp.


Please do visit my blog. If you like it, please Follow/Like/Forward it. Thanks.

10 years is an important milestone in any journey be it professional or personal, as it gives you an opportunity to look back and introspect about your own performance. Today's 55th blog is only for this purpose. I could reach this milestone because of your love, affection and support. I acknowledge and thank you for the same. 🙏🙏

I would like to specifically mention two of my close friends - Advait Dharmadhikari and Vishwas Karandikar - who have been in this journey right from the beginning and have been providing valuable feedback regularly along with encouraging words. 

On this occasion, you will hopefully be delighted to see my blog in its new Look & Feel. I also want to share good news today. I am extremely pleased to release a new Logo for my blog. It's been designed by niece - Mrs. Pallavi Shidhaye-Abhyankar - who is an Architect herself. Hope you would appreciate and like it.

I do not remember exactly when I started writing. If anyone would have told me while I was studying that I would be writing a blog in future, I would not have believed that person then. Until Std 7th, my education medium was Marathi. However, in spite of learning in Semi-English/English medium after 7th, my Marathi still remained a notch higher than my English. In those days, I used to read lots of Marathi books. The Marathi subject teachers at my school, Marathi literature, Literary forums like Majestic Gappa and Vasant Vyakhyanmala (Lecture series), Marathi theatre, films and music have all enriched my life so far, which I cherish whole-heartedly.

The Sanskars that I inculcated from my parents and the teachings of the RSS enabled me to look beyond myself and my family. My father's entire life journey, his job that required to travel, and in spite of this his dedication to work for the society, and the tremendous happiness and satisfaction I witnessed on his face after the Educational Institute/School which he had dreamt of bare fruits, was something that inspired me to contribute in whatever way in the nation building.

While witnessing the events within our country after 1980, I could see many people in our society were being selfish, insensitive, dishonest, corrupt, undisciplined and I used to get very angry. As a result, I started feeling to express myself in some form and forum. I started writing letters/emails to relatives and friends. In 2003, I reacted to articles by Rajdeep Sardesai and Veer Sanghvi. Then I started writing letters to the newspapers. Between 2005 and 2010, some of my letters were printed in Marathi newspapers like "Sakal", "Loksatta". Yet the nature of the writing remained limited to those events.

In August 2013, Dr. Narendra Dabholkar was tragically murdered. From the same day onwards, many Marathi newspapers and TV channels started blaming Hindutva organizations without any evidence in hand. Not only that, all the speakers at Dr. Dabholkar's condolence meeting took potshots at the Hindutvadis. Seeing all this, I wrote a short article tearing the veil of all these so-called progressive liberals and sent it to few newspapers and magazines, but none of them printed it, which was expected. So finally, I decided to start my own blog. And at the auspicious occasion of Bhaubeej day of Diwali in 2013, I started "Saprem Bhet".

While writing on social issues, my focus has always been on people in the community. Because I don't think the situation will change just by abusing the system and politicians. Moreover, the Sangh's values have taught me that the change we expect in the society should start with ourselves first. In this spirit, I wrote few blogs - "Don't Thank God, I am in minority!", "What can we do for our country?", "Not Being Human!". Another blog "The Roasted Society" was a result of a program "Roasted Roadies" which was hosted by Ranveer Singh, Arjun Kapoor and Karan Johar, which had used extremely filthy and foul language, it left me wondering whether people should watch it with their families/kids.

I got to know some social workers at different stages of my life, had the privilege of seeing their work and their passion up close. One of the puzzles I've always had is what inspiration these activists take and work tirelessly for the community despite so many adversities around them. Meetings and interactions with them always inspired me. I then decided to start a series "वसुंधरेवरील तारे" to introduce few such dedicated social workers to my circle of friends and relatives. So far, I have managed to write about only 2 of them, but it's in Marathi only.

My father was, is and will always be my role model. As mentioned at the outset, his entire life has been one of hard work and passionate social work. After he died in January 2017, I wanted to write about him. In September 2017, I wrote a long obituary on him viz. "बाबा....".This is again in Marathi only since I could not express my feelings about my father better in any other language. While writing this article, I realized that unknowingly I had come to know his entire life journey! No wonder this was my most popular (1739 views) blog to date!

Like social issues, the music, especially film music, singers, musicians, is also my favorite subject. I used to like singing since my childhood. I have inherited this quality from my mother who herself was fond of music. In the early 1980s, I too used to listen to Vividh Bharati. I used to attend the Sawai Gandharva Festival every year, but I did not understand and like classical music very much. Even today I hardly understand it. But in 1985-86, I read 2 books by Shirish Kanekar, "Gaye Chala Ja" and "Yaadon Ki Baaraat", and realized that there are better songs than what you hear on the radio. 

I started collecting and listening to these old songs (i.e. from the 1940s and 1970s) from wherever they could be found. On Radio, one could always hear songs of Laxmikant-Pyarelal, R. D. Burman, S. D. Burman, Madanmohan, Kalyanji-Anandji, Bappi Lahiri, Naushad, O.P. , Nayyar, C. Ramchandra, etc. However, through Kanekar's books I realized that there are many other talented musicians. Apart from this, reading Madhav Moholkar's book "Geetyatri", Raju Bharatan's books and Isaak Mujawar's articles gave lot of information about the Hindi film industry.

Even on the internet, I realized that a lot of people have done some great work on the subject of film and film music. E.g. "https://www.hindilyrics4u.com/" website has a huge list of Hindi songs, and you can search songs based on composer, lyricist, film, singer, etc. Another good website is  "Songs of Yore - Old Hindi Film Songs" has very informative and scholarly articles on film and music of the period 1930-1960. Apart from this, there are many good websites which provide quality content on this subject.

When one listens to today's Radio and TV channels, one finds that there is no channel which airs great films and music from the golden era of Hindi cinema i.e. 1940-1965. In such a case, how will the generation born after 1980 will come to know about that era?

For this reason, I felt the need to introduce my friends and family to this wonderful golden period of Hindi films, its musicians and their songs. Thus, the one-part song series "Anmol Ratan" was born. To date, 16 episodes of "Anmol Ratan" have introduced 16 of the best songs. Each episode sheds a little light on the background behind the song, the composition and its peculiarities. 

When writing on the subject of film music, my focus has always on the composers who are unknown, in the dark. So, I decided to write about them. E.g. Pt. Ravishankar, Jaidev, Jamal Sen and Vinod

I have also written at length about some of the finest music composers of yesteryears. E.g. the first composer to introduce playback singing in Hindi films Raichand (R. C.) Boral, the composer who changed the style of Hindi film music through his Punjabi style compositions Master Ghulam Haider, another great composer Shyamsundar, the first Music composer duo Husnlal-Bhagatram and a composer who parallelly composed music for Bengali and Hindi films and still produced wonderful yet different compositios - Hemant Kumar. These are some of my best blogs till date.

I also happened to write on Sulochana Chavan (Kadam) and Manna Dey, however as per my logic, have focused on their lesser-known qualities. E.g. Sulochana Chavan's Hindi songs (She was a famous Marathi Laavani Singer) and Manna Dey's music compositions.

Few of my friends urged me to write on yesteryear actresses. Owing to their requests I came up with blogs on Waheeda Rehman viz. "हमारी वहिदा" (691 views) and on Meena Kumari viz. "एक थी मीनाकुमारी..." (180 views). I presented few of the best songs picturized on them. It evoked a good response.

Late Sajjad Hussain and Late Anil Biswas have been my most favorite music composers. I was fortunate enough to meet Sajjad saab at his residence in March 1995. I have penned a very emotional blog on "My Rendezvous with Sajjad Hussain".

The legendary singer Lata Mangeshkar has been my idol since childhood. I simply adore her voice and her singing. In Feb 2023, on the occasion of her first death anniversary, I presented 30 of most wonderful melodious songs through 3 blogs viz. "Lata - Solo", "Lata - Duets" and "Lata - Non-Hindi".

I had decided to write my 50th blog and dedicate it to the Bhishma-Pitamah of Hindi film music Anil Biswas. However since he had a long 30-year career, I could not summarize it in one blog, hence presented his work through 4 blogs viz. "Anil Biswas - Life", "Anil Biswas - Male Singers", "Anil Biswas - Finest Duets" and "Anil Biswas - Lata".

In the last 10 years, I completed writing 54 blogs which generated around 12,433 views! Sharing below a brief analysis:

 
People generally complain that my blogs are very lengthy and hence they cannot spare time to read them. I completely agree with them. My biggest weak point is that I cannot write in brief. To overcome this, I tried giving an 7-8 min. audio file (mp3) which was a read-out of my blog text, with an expectation that people will listen to the audio and then watch/listen to the songs presented in the blog. However, it evoked no response at all, hence I had to drop the idea; since creating an audio file, embedding it into the blog, etc. became too much of an overhead for me with no visible benefits.

Alternately, I started coming up with a 2-4 liner funny Quotations (सुवचन mostly in Marathi) and published one Quote every Saturday. Unfortunately, people who complained about lengthy blogs did not respond to the smallest of the quotes as well!

I am not a born writer, neither I have studied any subject deeply, nor I have vast and varied experience of life. I know my limitations very well. However, whatever I do/write, I do it very passionately and with utmost honesty. I share my blogs and other writings on my Facebook wall and through WhatsApp to a group of 200-250 people mostly consisting of my relatives and friends. There are few relatives and friends who regularly share their feedback, I would like to thank them wholeheartedly.

But, barring these, no one bothers to read/respond to the creative, original work that I post. This has been a huge disappoint for me and have forced me to think about quality of my writings.

Following lines from the famous song writer Sahir Ludhiyanvi portray my feelings aptly:


Having experienced this, I would still continue writing because it gives me great satisfaction. I believe that the society accepts bad things very easily, while good things take lot of time for the people to adopt. However, since I am an eternal optimist, I believe in "वो सुबह कभी तो आयेगी". 

In future, I am planning to come up with new things, new experiments with the blog, want to write about many unknown composers, want to present real gems from the golden era of Hindi film music. Hope you will like and appreciate it.

I would appreciate if you can share your feedback on this particular blog with your valuable suggestions for improvement. Please remember to share my blogs within your circles. 

Thank you for your time. 🙏🙏

15 comments:

  1. नेहमप्रमाणेच तू सडेतोड उस्फुर्त पणे लिहिलंआहेस,विश्वास पानिपतावर गेला हेही खोडून काढले, बऱ्याच विषयावर सखोल व मार्मिक टिप्पणी हि तर तुझी शैली च आहे, प्रत्येक प्रामाणिक माणसाला पाठीवर थाप मिळेलच असे नाही, अमिताभ बच्चन यांच्या एकला चलो गाण्याप्रमाने तू आपले मत व्यक्त करत जा, बूँद बूँद से बनता है सागर या उक्ती प्रमाणे चांगल्या प्रयत्नांना यश मिळतेच, तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुनील मोरे

      Delete
  2. Sundar lekh. 10 warsha ha ek milestone nakkich ahe. Lekh nehmi mahiti purna astat. Ek suchana ashi ki may be instead of writing everything in one post create series of posts. That maintains the interest. Also there are now tools where you can schedule when the post should get published. As far as sharing is concerned tyalahi kahi tools, sementation karun te achieve karta yeil. But dont get discouraged. Keep wroting. Tuze satatya hi far changli ani kautukspad goshta ahe.
    So congratulations on 10 years of writing.
    Happy writing.

    ReplyDelete
  3. सर्वप्रथम ब्लॉग लिखाणाच्या दशकपूर्तीबद्दल हार्दिक अभिनंदन!! तुझे लिखाण अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असते. पुढच्या ब्लॉग मध्ये काय असेल, याची उत्सुकता असते. यापुढे ही असाच लिहीत राहा. तू म्हटल्याप्रमाणे चांगल्या गोष्टी रुजायला वेळ लागतो पण रुजल्या की त्यांची सुमधुर फळे सर्वांना चाखायला मिळतात, म्हणूनच तू लिहीत राहा.

    ReplyDelete
  4. Hearty congratulations DR Sapre for 10th year anniversary! BraVo! Please continue the good work of educating people! हार्दिक अभिनंदन!

    ReplyDelete
  5. Congratulations on the 10th anniversary of your blogging!!! It is an achievement particularly to be able to preserve despite not getting much response.
    As I have said privately, let that not discourage you. It is not a reflection of your abilities in any way. It takes a lot of analysis and creativity to produce meaningful and worthwhile content particularly in today's age. Sadly, it has become difficult to complete for people 's attention or rather most are victims of their attention and time getting sucked away into superficial and catchy content that social media generates that they are unaware of.
    Hope one day that will change for the better.
    Best

    ReplyDelete
  6. धन्यवाद विश्वास.

    ReplyDelete
  7. खूप छान!! अभिनंदन !!

    ReplyDelete
  8. खुप छान..! अभिनंदन! असेच व्यक्त होत रहा ! आम्हा सर्वांना विचार करण्यास एक नविन दृष्टिकोन मिळतो...


    श्रीपाद जोशी...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रीपादजी. माफ करा, आत्ता तुमची comment पाहिली आणि छान वाटले तुम्ही दखल घेतल्याबद्दल.

      Delete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.