Saturday 24 May 2014

"सीतामाई ते जशोदाबेन" च्या निमित्ताने….

नमस्कार मित्रांनो,

खूप दिवसांनी पुन्हा लिहावयास घेतले आहे. मध्यंतरी कामाच्या गडबडीत मनात अनेक विषय घोळत असूनही लिखाण जमले नाही. 

दै. लोकसत्ताची शनिवारची "चतुरंग" आणि रविवारची "लोकरंग" ह्या पुरवण्या म्हणजे वाचनाची आवड असणार्यांकरता खजिनाच असतो. 

शनिवार दि. १० मे २०१४ च्या "चतुरंग" पुरवणीमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून २ लेख प्रसिद्ध झाले होते. 

त्यातील पहिला "सीतामाई ते जशोदाबेन" हा लेख प्रसिद्ध लेखिका आणि महिलावादी कार्यकर्त्या नीरजा यांनी लिहीला होता. लेखाचा सूर एकूण पुरुष लोक स्त्रियांवर अन्याय कसा करतात आणि तरी सुद्धा स्त्रिया पुरुषांची वाट बघत किंवा त्यांचे वर्चस्व मान्य करण्यात धन्यता का मानतात असा होता. मला तो लेख खूप एकांगी वाटला व म्हणून मी लोकसत्ताला पत्र लिहिले आहे. ते खाली देत आहे. लोकसत्ता केंव्हा छापेल किंवा छापेल की नाही हे माहिती नाही म्हणून शेवटी मी ते इथे देण्याचे ठरवले. 

याच अंकात दुसरा लेख "हिच्यापोटी जन्म असावा…" हा सौ. माधवी कुंटे आणि त्यांचे पती श्री. मोरेश्वर कुंटे यांनी त्यांच्या विकलांग मुलाला कसे वाढवले व स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली त्यावर आहे. लेख अप्रतिम आहे. तो आपण सर्वांनी जरूर वाचावा. 

मूळ लेख इथे वाचा: "सीतामाई ते जशोदाबेन"

या लेखावरील लोकसत्ताला पाठवलेली माझी प्रतिक्रिया खाली देत आहे… 

========================================================================
मा. संपादक,
दै. लोकसत्ता
पुणे 

संदर्भ :- दि. १० मे २०१४ च्या चतुरंग पुरवणीमधील "सीतामाई ते जशोदाबेन" हा लेख

महोदय,

वरील लेख वाचला. दुर्दैवाने लेख अतिशय एकांगी आहे.  

नीरजा बाईंनी उल्लेख केलेले राम, लक्ष्मण, परशुराम, रामदास आणि ज्ञानेश्वर हे काही या जगात आता नाहीत, त्यामुळे त्यांच्या कृत्यांचे स्पष्टीकरण वा समर्थन ते करू शकणार नाहीत. त्यामुळे तर त्यांच्यावर टीका करणे अधिकच सोपे आहे. ही उदाहरणेच मुळी इतकी जुनी आहेत की त्या त्या वेळच्या परिस्थितीकडे आताच्या काळाचा चष्मा लावून बघणे चूक आहे. आज समाजमान्य असलेल्या काही प्रथांवर अजून १०० वर्षांनी टीका होऊ शकेल पण आज तरी त्या प्रथा समाजमान्य आहेत ना? 

उदा. आज घरातील कार्याच्या निमित्ताने मित्र-मंडळी, नातेवाईक, इ. बोलाविण्याची प्रथा आहे, कदाचित भविष्यकाळात आपला समाज अजून आधुनिक, तंत्रावलंबी (technology driven) झाल्यामुळे नातेसंबंध हे विरून जातील व आजची ही प्रथाही त्यावेळेस वेडेपणाची वाटेल, कोणी सांगावे?

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, कॉम्रेड डांगे या थोर पुरुषांनी आपापल्या बायकांवर अन्याय केला असे नीरजा बाई म्हणतील काय? 

मुद्दा असा आहे की नवरा आणि बायको यामध्ये जो जास्त कर्तृत्ववान असतो त्याची ओळख जगाला जास्त होते, त्यात बाई किंवा पुरुष असा भेद नसतो; पुढे त्यांचा मुलगा किंवा मुलगी अधिक कर्तृत्ववान निघाली तर त्या मुलाचे किंवा मुलीचे आई-बाबा म्हणून जग त्यांना ओळखायला लागते. उदा. ज्या रमेश तेंडुलकरांना सुरुवातीला स्वतःची ओळख होती, पुढे सचिन कर्तृत्वाने मोठा झाल्यावर त्यांची ओळख सचिनचे बाबा म्हणूनच झाली. या मध्ये त्यांना किंवा सचिनच्या आईना कमीपणा कसा येतो?

इतिहासात सुद्धा आपणा सर्वांना आठवण राहते ती झाशीच्या राणीची, त्यांच्या पतीची नाही. तसेच सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, इंदिरा गांधी, चंदा कोच्चर, इंद्रा नूयी, किरण बेदी, इ. अनेक स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या पतींपेक्षा जास्त लोकप्रिय होत्या/आहेत. मग त्यांच्या पतींवर त्यांनी अन्याय केला असे म्हणता येईल का? स्त्री-मुक्तीवादी कार्यकर्त्यांनी या अशा पतींना समाजासमोर का आणले नाही? 

नवरा-बायकोतील संबंध हा खरे तर संपूर्ण त्या दोघांमधला खाजगी प्रश्न आहे. जशोदाबेन या साठी ओलांडलेल्या बाई काही अडाणी नाहीत, त्यांनी स्वतःच्या बुद्धीनुसार मुलाखत दिली. मग नीरजा बाई किंवा या देशातले तथाकथित विचारवंत जे त्यांच्यावर टीका करतात, ते जशोदाबेन यांच्या व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्यावर घाला घालत नाहीत का?

आजच्या आधुनिक युगात जिथे नवरा-बायको दोघेही नोकरी करतात तिथे अनेक घरात दोघेही जबाबदार्या वाटून घेऊन पार पाडतात. समाजात आपणाला अपेक्षित बदल हा केवळ टीका करून होत नाही तर त्याला सकारात्मक उदाहरणांचीही जोड द्यावी लागते हे लक्षात घ्यावे अशी नम्र विनंती.

तेंव्हा महिला/मातृदिनाचे निमित्त साधून आपल्या मनातील स्त्रीजातीच्या अहंकाराचे दर्शन एकांगी लेख लिहून करू नये, लिहायचेच असल्यास दोघांना न्याय मिळेल अशी उदाहरणे समाजासमोर आणावीत. त्याचे आमच्यासारखे वाचक निश्चितच स्वागत करतील.

जाता-जाता: त्याच अंकात "हिच्यापोटी जन्म असावा..." या लेखातील सौ. माधवी कुंटे यांना त्यांच्या असीम त्याग, धैर्य, परिश्रम याबद्दल शतशः वंदन. तसेच त्यांचे पती श्री. मोरेश्वर कुंटे यांना पण शतशः प्रणाम. पण मातृदिनी हा लेख छापला गेल्याने श्री. मोरेश्वर यांच्या त्यागाची, परिश्रमाची आणि त्यांनी बायकोला दिलेल्या साथीची योग्य तेवढी दखल लेखात घेतली गेली नाही असे वाटले. हा लेखिकेचा दोष म्हणायचा की मातृदिनाचा?

माझे पत्र आपण छापावेत ही आपणाला नम्र विनंती. धन्यवाद. कळावे. 

आपला,
धनंजय सप्रे
========================================================================