भूमिका
नमस्कार मित्रहो. आपला भारत देश स्वतंत्र होऊन येत्या १५ ऑगस्टला म्हणजे १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण होतील. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार करताना भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांचा आणि त्यांना तत्कालीन भारतीय समाजाने केलेल्या प्रतिकाराचा विचार केला पाहिजे. ग्रीक, शक, हूण, मुघल, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रजांनी आपल्या देशावर असंख्य आक्रमणे केली. इतिहासाच्या अभ्यासकांनी या विविध आक्रमणांचा अभ्यास करून प्रत्येक आक्रमणामागे अमर्याद सत्ताकांक्षा, धर्म/संस्कृतीचा प्रसार, आणि संपत्तीची लूट या तीनपैकी एखादा मुख्य हेतू असल्याचे दाखवून दिले आहे. तरीही, आजही दोन/अडीच हजार वर्षांनंतर येथील संस्कृती जिवंत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या-त्या वेळच्या समाजाने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष. या संघर्षाची गाथाही खूप जुनी आहे.
२३ मे १७५७ रोजी प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा विजय झाला व बंगालमध्ये त्यांनी पाय रोवले, पण दिल्लीचे तख्त जिंकण्यासाठी मात्र इंग्रजांना १८०३ पर्यंत वाट पाहावी लागली. पुण्यातील शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवायला १८१८ साल उजाडावे लागले. १८२६ मध्ये भरतपूरला जाट झुंजले. तर १८२६ ते १८३२ या सहा वर्षांच्या काळात स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला जाहीरनामा प्रकाशित करणाऱ्या राजे उमाजी नाईकांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. "चाळीसगाव डांगण" परिसरात असाच एक लढा १८१८ ते १८३७ या काळात महादेव कोळी समाजातील लोकांनी इंग्रजांविरुद्ध लढला. पंजाब मध्ये १८४८ पर्यंत शीख इंग्रजांशी झुंजत होते. या सर्व लढ्यांचा उत्कर्षबिंदू १८५७ च्या स्वातंत्र्यसमराने गाठला. या समराचे वैशिष्ट्य म्हणजे हा काही फक्त एका प्रांतात किंवा प्रदेशात नाही तर संपूर्ण देशात लढला गेला, यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण देश/समाज इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एकत्रित झाला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपले बलिदान दिले, पण आत्तापर्यंत आपल्याला शिकवल्या गेलेल्या इतिहासात फक्त काहीच थोर नेते व क्रांतिकारकांची नावे समोर आली आहेत. बऱ्याच लोकांचा असाही समज आहे की आपल्याला आझादी बिना-खडग बिना-ढाल मिळाली आहे. या सर्व थोर नेत्यांचे आणि क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान बहुमूल्य आहे याबद्दल वादच नाही, त्याकरिता त्यांना वंदनच आहे; पण प्रत्यक्षात भारतीय स्वातंत्र्याची कथा ही लक्षावधी भारतीयांच्या अदम्य धैर्याची, पिढ्यानपिढ्यांच्या कठोर संघर्षाची, अपरिमित त्यागाची आणि अतुलनीय शौर्याची कथा आहे. म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्या सर्व नाम-अनाम वीरांचे स्मरण करणे, त्यांच्याप्रती आपली संवेदना व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.
या उद्देशाने भारतीय विचार साधना, पुणे या संस्थेने "स्वराज्य ७५" हा उपक्रम दीड/दोन वर्षांपासून हाती घेतला. या अंतर्गत विविध क्षेत्रातील सामान्य आणि असामान्य व्यक्तींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेमके काय योगदान दिले याचा धांडोळा अनेक पुस्तके, हस्तलिखिते, स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्रे आणि इतर उपलब्ध साधने यांच्या मदतीने घेतला गेला/जात आहे. ही क्षेत्रे आहेत - १) चित्रपट, २) रंगभूमी, ३) कला, ४) साहित्य, ५) भक्ती संप्रदाय, ६) राष्ट्रीय कीर्तन, ७) महिला, ८) रा.स्व. संघ योगदान, ९) जनजाती, १०) क्रांतिकारक, ११) प्रति सरकार, १२) पत्रकार, १३) राष्ट्रीय दैनिके, १४) शिक्षण, १५) राष्ट्रीय कवी, १६) विज्ञान, १७) उद्योग आणि तंत्रज्ञान, १८) कृषी, १९) सहकार, २०) आर्थिक, २१) मुस्लिम भूमिका, २२) ख्रिश्चन भूमिका, आणि २३) कम्युनिस्ट भूमिका. या प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा मागोवा घेऊन त्यातून तयार झालेल्या लेखांच्या पुस्तिका तयार करण्यात आल्या/येणार आहेत. या पुस्तिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचे काम येत्या १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. याचबरोबर सर्व लेख इंटरनेट वर एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचीही योजना आहे.
प्रस्तुत लेखामध्ये मराठी रंगभूमीशी संबंधित कलाकारांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हा विषय प्रामुख्याने मांडला आहे. मी या उपक्रमाशी डिसेंबर २०२१ मध्ये जोडला गेलो. मी रंगभूमी हा विषय निवडला होता. वेळेच्या मर्यादेमुळे तसेच करोनाच्या बंधनांमुळे थोड्याफार उपलब्ध संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन फक्त मराठी नाटककारांचे योगदानच तपासता आले. रंगभूमीशी संबंधित इतरही कलाकार असतात जसे की संगीतकार, अभिनेते, नेपथ्यकार, इ.; परंतु वर उल्लेख केलेल्या मर्यादांमुळे आणि यासंबंधी काहीही संदर्भग्रंथ न मिळाल्याने नाटककार सोडून इतरांचे योगदान या लेखात समाविष्ट करता आलेले नाही, त्या अर्थाने हा लेख अपूर्ण आहे. काही गोष्टींचा मी जरूर उल्लेख करू इच्छितो. प्रथम म्हणजे मी संशोधक नाही, त्यामुळे हा लेखही संशोधन नाही तर वेगवेगळ्या संदर्भग्रंथांत उपलब्ध असलेल्या माहितीचे फक्त संकलन आहे. त्या ग्रंथांची यादी लेखाच्या शेवटी दिली आहे. तसेच माझा आतेभाऊ मिलिंद सबनीस आणि मित्र निनाद जाधव यांनी दिलेल्या पुस्तकांमुळे ही सर्व माहिती बसल्या जागी मिळाली, या दोघांनी केलेल्या बहुमूल्य सूचनांमुळे लेखातील माहिती बऱ्याच प्रमाणात अचूक होऊ शकली.
आपल्याला या लेखाचा उपयोग विषय समजून घेण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी होईल अशी आशा करतो. आपण हा लेख वेळात वेळ काढून जरूर वाचावा व आवडल्यास आपल्या मित्रमंडळींबरोबर जरूर शेअर करावा अशी आग्रहाची विनंती. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.
मराठी रंगभूमीचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान समजून घेण्याआधी मराठी नाटकांचा जन्म कसा झाला, त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती काय होती हे थोडक्यात जाणून घेणे आवश्यक आहे.
मराठी नाटकाचा उगम विविध लोककलांपासून झाला. त्या त्या काळातल्या लोकजीवनाच्या प्रभावाने नाटकांचे विषय बदलत गेले, नाट्यसादरीकरणाची पद्धत बदलत गेली म्हणून प्रत्येक काळातले नाटकही बदलत गेले. मागच्या नाटकांमधल्या काही गोष्टींचे अनुकरण करत, काही नाकारत तर काही गोष्टी नव्याने सामावत त्या त्या काळातले नाटक सिद्ध होत गेले. अशा प्रकारे नाटकाच्या इतिहासाचा एक अखंड प्रवाहच निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. मराठी नाटकांच्या एका महत्त्वाच्या प्रवाहाचा उल्लेख करायलाच पाहिजे.
|
तंजावरचे राजे सर्फोजी भोसले |
महाराष्ट्रापेक्षा लांब, तामिळनाडूमधील
तंजावर
येथे सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात मराठीतून काही नाटके लिहिली गेली आणि सादरही झाली.. त्यांना मराठी भाषेतील आद्य नाटके म्हणावी लागतील. तंजावरातील भोसले घराण्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर नाट्यलेखन केले. स्थानिक थेरूकुतू, भागवतमेळ्यासारख्या लोकनाटकांचा त्याच्या सादरीकरणावर बराच प्रभाव होता. नाटकांचे प्रयोग राजदरबारात सादर होत असत आणि दरबारातील मानकरी, सरदार, उमराव हेच बहुधा प्रेक्षक असत. शहाजी भोसले, प्रतापराव भोसले आणि सर्फोजी भोसले ह्या तीन राजांनी विपुल नाट्यलेखन केलं. बहुतेक सर्व नाटकांचे विषय देव-देवतांच्या विवाहांचे होते. सीताकल्याण, लक्ष्मीनारायणकल्याण. श्रीकोर्वंजी ही त्यातली काही महत्त्वाची नाटके होत.या नाटकांनी इतिहास घडविला. १८५५ मध्ये इंग्रजांनी तंजावरवर वर्चस्व मिळवले आणि भोसले घराण्याची राजसत्ता गेली. त्यानंतर तिथे फारसे नाट्यलेखन वा सादरीरकण झाले नाही. तंजावरी नाटकांचा प्रवाह हा तिथेच लुप्त झाला.१८४२ साली कर्नाटकातील करकी या गावातून भागवतमेळा नावाचा नाट्यसंघ यक्षगानाचे खेळ करण्यासाठी सांगलीत आला. तो खेळ सांगलीचे तत्कालीन राजे श्री. चिंतामणराव पटवर्धन यांनी पाहिला. त्यातील तीन गोष्टी त्यांना आवडल्या असाव्यात - पहिले म्हणजे, त्यात स्वधर्मातील कथांची गौरवशाली मांडणी होती, त्यामुळे ख्रिश्चन धर्मप्रसाराला विरोध करता येणार होता. दुसरे म्हणजे, या कलाप्रकारातून त्यावेळच्या भ्रष्ट समाजाला नैतिक मूल्यांचे दर्शन घडविता आले असते. आणि तीन, तत्कालीन समाजाला तमाशापासून दूर नेऊन सांस्कृतिकतेकडे नेणे शक्य झाले असते.
|
विष्णुदास भावे |
विष्णुदास भावे हे सांगली संस्थानचे
राजे चिंतामणराव पटवर्धन
यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे यांचे पुत्र. विष्णुदास भावे हे स्वतः अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा अशी त्यांची इच्छा होती. परंतु तत्पूर्वी, भागवतमेळ्याच्या यक्षगान खेळाच्या धर्तीवर खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. १८४३
साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर
हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील मोठ्या 'दरबार हॉल’मध्ये
दि. ५ नोव्हेंबर १८४३
रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला 'ग्रांट रोड थिएटर' येथे 'इंद्रजित वध' पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले.
१८५७च्या सुमारास जसा पहिला स्वातंत्र्यलढा झाला तसेच भारतात आधुनिक पाश्चात्य शिक्षण देणारी विद्यापीठे स्थापन झाली. या विद्यापीठातून इंग्रजी साहित्य प्रसृत होऊ लागले. १८३५ साली मेकॉले याने आखलेल्या भारतीयांना "काळे इंग्रज" बनवण्याच्या योजनेचा हा एक भाग होता. पण याचा परिणाम व्यामिश्र झाला. भारतीय समाज वसाहतवादाच्या विरोधात उभा ठाकला. १८५७ पासून अनेक संस्कृत नाटकांची मराठी आणि इंग्रजीत भाषांतरे झाली. पुढे १९१० पर्यंत अनेक ऐतिहासिक, अपौराणिक नाटके लिहिली गेली. यातून देशभक्तीची, पूर्व-पराक्रमाची व गौरवशाली कालखंडाची आठवण करून दिली जात असे, त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीची भावना वाढीस लागण्यास मदत होत असे.
|
दीनबंधू मित्र |
ब्रिटिश राज्यात नाटकांवर सेन्सॉरशिप लादणारा कायदा सर्वप्रथम आला तो १८७६ मध्ये. Dramatic Performance Act असं त्या कायद्याचं नाव होतं. १८६० साली श्री. दीनबंधू मित्र यांनी अनामिक नावाने "नीलदर्पण" हे बंगाली नाटक लिहिले. १८६१ मध्ये त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर जेम्स लांग यांच्या सांगण्यावरून मायकेल मधुसूदन दत्त यांनी केले. १८७२ साली
विठ्ठल मोरो वाळवेकर यांनी हे नाटक मराठीत आणले. वाळवेकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मित्र, सहकारी आणि सत्यशोधक समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते. बंगाल प्रांतात निळीच्या मळ्यावरील कामगारांनी १८५९-६० साली शोषणाविरोधात एक मोठा सत्याग्रह केला होता, निळीच्या मळ्यांचे मालक हे बहुतांश इंग्रज होते, ते आपल्या कामगारांचे कसे शोषण करतात हा "नीलदर्पण" नाटकाचा विषय होता. त्याचे इंग्रजीत भाषांतर झाल्यावर भारतातील ब्रिटिश सरकारविरुद्ध खुद्द इंग्लंड मधेही बराच रोष उफाळला. तेथील मजूर पार्टीने कामगारांच्या शोषणाविरोधात आवाज उठविला.
याबरोबरच आणखी काही नाटकांवर ब्रिटिश सरकारने बंदी घातली. ती म्हणजे बंगालीतील "चोका दर्पण" (चहा मळ्यांचा आरसा) आणि मराठीतील नारायण बापूजी कानिटकर यांचं "मल्हाररावाचे नाटक" हे नाटक जे बडोद्याचे तत्कालीन महाराज वसाहतवाद विरोधी मल्हारराव गायकवाड यांच्याशी संबंधित होते.
१९०७ साली "स्वजन हितैषी नाटक मंडळी"ने ब्रिटिशविरोधी भावना जागृत होतील अशा पद्धतीने नाटकाचे पडदे तयार करायला सुरुवात केली. नाटकाचं नाव होतं "राष्ट्रीय संक्रात" आणि लेखक होते कृष्णाजी आबाजी गुरुजी. पडद्यांच्या वरच्या भागात स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केलेले असे. हे पडदे जप्त केले गेले.
या काळातलं जवळपास प्रत्येक नाटक राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सजग होतं. प्रत्येकाच्या जीवनात जे घडत होतं - उदा. चळवळीच्या माध्यमातून, विचारधारेतून, कायद्यांमुळे किंवा एखाद्या घटनेमुळे - त्याचे पडसाद लगेचच नाटकात उमटत. त्या काळातल्या खालील नाटकांची नुसती नावे पाहिली तरी हे लक्षात येईल.
- अधिकारदान विवेचना अथवा स्थानिक स्वराज्याविषयी वाटाघाट - लेखक शंकर मोरो रानडे - १८८२
- टिळकांचे सहकारी, बडोद्याच्या क्रॉफर्ड प्रकरणात यांनी टिळकांची साथ दिली आणि त्यावर "न्यायविजय" हे नाटकही लिहिले
- भारतीय मॅजिस्ट्रेटला ब्रिटिश नागरिकावर खटला चालवता येत नसे, हा वांशिक भेद नाहीसा करण्यासाठी जेंव्हा Ilbert Bill आले तेंव्हा त्याला ब्रिटिश मळेवाले आणि अँग्लो इंडियन यांच्याकडून जोरदार विरोध झाला, तेंव्हा रानड्यांनी "गौरन्यायमीमांसा अथवा ज्युरिसडिक्शनल बिल" हे नाटक लिहिलं
- राणा भीमदेव - लेखक वा. र. शिरवळकर - १८९२
- रणसिंह व बकुळा - भा. ह. पटवर्धन - १८९३
- या नाटकातील नायक रणसिंह हा जुलमी राजाच्या अन्यायाविरुद्ध लढा देतो व त्याला शेवटी कैद करून "प्रजासत्ताक" राज्याची स्थापना करतो असे नाटकात दाखवले आहे. अशीच इच्छा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही बोलून दाखवली होती.
- संगीत स्वराज्यसुंदरी - अनंत हरी गद्रे (पुणे) - १९१९
- सत्तेचे गुलाम - मामा वरेरकर - १९२२
- तुरुंगाच्या दारात - मामा वरेरकर - १९२३
- संगीत संन्याशाचा संसार - मामा वरेरकर - १९२०
याशिवाय खालील राजकीय / सामाजिक नाटकेही त्या काळात लिहिली गेली/प्रदर्शित केली गेली.
- स्वातंत्र्य आले घरा
- स्वदेशहितचिंतक
- स्वदेशी चळवळ
- संगीत बंधविमोचन
- विजयाचा टिळा
- वंदे मातरम
- लोकमतविजय अथवा सुष्ट दुष्ट मनोविकारांचा एक विचित्र खेळ
संदर्भ: "मराठी रंगभूमीच्या तीस रात्री (एक सामाजिक-राजकीय इतिहास) खंड पहिला - लेखक मकरंद साठे - पान नं. १३९
अशा रीतीने स्वातंत्र्यपूर्व काळात नाटक हे साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध वापरायचं एक हत्यारच झाले होते. अनेकांच्या मनात नाटक आणि देशाचं स्वातंत्र्य यांचा संबंध पक्का जोडला गेला होता असं लक्षात येतं.
आता आपण मराठी रंगभूमीवरच्या स्वातंत्र्यलढ्यातील शिलेदारांचे योगदान बघणार आहोत.
(जन्म: २३ जुलै १८५६ - मृत्यू: १ ऑगस्ट १९२०)
लोकमान्य टिळक यांची नाट्य आणि संगीत यांच्याकडे पाहण्याची दृष्टी संकुचित नव्हती. लोकमान्य टिळकांचा मराठी नाटकाशी संबंध अनेक पातळ्यांवर होता. जातिवंत कलाकार आपल्या गान-अभिनय या कलेच्या माध्यमातून राष्ट्रहिताचे कार्य करू शकल्यास नाट्यकला ही राष्ट्रकार्याला उपयुक्त अशी कला ठरेल असेच लोकमान्यांचे मत होते. १८८० ते १९२० पर्यंतचे मराठी नाटकही पूर्ण टिळकमय झालेले होते. अनेक नाटकांचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नायक टिळक हेच होते. अनेक नाट्य-लेखक हे टिळकांचे अनुयायीच होते. उ. दा. गोपाळ गोविंद सोमण यांचे "राजकोपहर" आणि "बंधविमोचन" ही नाटके प्लेग, रँड आणि दुष्काळातील टिळकांची भूमिका यावर होती. धुंडिराज जोशी यांचं "खरोखर स्वप्नदर्शन" हे नाटक चहा ग्रामण्यावर होतं. नाटकाची राजकीय संदेश देण्याची, लोकं एकत्र जमवण्याची ताकद टिळकांनी ओळखली होती. टिळकांना राजकीय खटले लढण्यासाठी जे पैसे लागत ते गोळा करण्यास नाटकवाल्यांनी अनेकदा मदत केली आहे. "संयुक्त संगीत मानापमान" चा प्रयोग दि. ८ जुलै १९२१ रोजी गांधीजींनी टिळकांसाठी काढलेल्या स्वातंत्र्यफंडासाठी केला गेला. अशा टिळकमय वातावरणात मराठी नाटक हे तत्कालीन राजकारणाचं एक हत्यार झालं. थोर नाटककार मामा वरेरकर यांच्या शब्दात सांगायचे तर "मराठी रंगभूमी स्वातंत्र्यलढ्यासाठी खर्ची पडली".
नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
(जन्म: २३ नोव्हेंबर १८७२ - मृत्यू: २७ ऑगस्ट १९४८)
एक श्रेष्ठ मराठी नाटककार, संपादक, राजकीय प्रश्नांचे चिकित्सक, अध्यात्मवादी. जन्म व शालेय शिक्षण सांगली येथे. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे फर्ग्युसन आणि डेक्कन महाविद्यालयांमध्ये. हे टिळकांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातले होते. १८९६ मध्ये त्यांनी केसरीत ‘राष्ट्रीय महोत्सव’ हा लेख लिहिला. १८९७ मध्ये ते केसरीत दाखल झाले. लोकमान्यांच्या स्वराज्यवादी जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत काम केले. अध्यात्मनिष्ठ राष्ट्रवाद टिळकांप्रमाणे त्यांनीही पुरस्कारिला. आपल्या प्रखर राजकीय विचारांच्या समर्थनार्थ नाट्यलेखनाचाही आश्रय घेतला. १९०१ मध्ये ‘गनिमी काव्याचे युद्ध’ ही लेखमाला लिहिली. लॉर्ड कर्झनच्या जुलमी राजवटीत खाडिलकरांना टिळकांनी शस्त्रनिर्मितीचा अभ्यास करण्यासाठी नेपाळला पाठवले होते. हे जेंव्हा ब्रिटिशांना कळलं त्यानंतर ब्रिटिश पोलिसांची खाडिलकरांवर व त्यांच्या नाटकांवर विशेष नजर असे. त्यांच्या काही नाटकांवर ब्रिटिशांनी बंदीसुद्धा आणली होती. "कीचकवध" हे खाडिलकरांचे राजकीयदृष्ट्या सर्वात गाजलेलं नाटक. ते आलं १९०७ साली. तोपर्यंत पुण्यात प्लेगने थैमान घातले होते, रँडचा खून झाला होता. १९०५ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली होती. लॉर्ड कर्झनच्या जुलमी राजवटीबद्दल जनतेत संताप उसळला होता. "कीचकवध" नाटकातला कीचक म्हणजे लॉर्ड कर्झन, भीम म्हणजे जहालवादी नेते लोकमान्य टिळक, संयम, सबुरी इत्यादींचे सल्ले सतत भीमाला देणारा युधिष्ठिर म्हणजे मवाळवादी नेते गोपाळकृष्ण गोखले आणि द्रौपदी म्हणजे भारतमाता हे नाटकातील संवादातून प्रकाशाइतके स्वच्छ लोकांना दिसत होते. वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला घालणारा प्रेस ऍक्ट या नाटकानंतर मंजूर झाला इतके हे नाटक प्रभावी होते. ब्रिटिश सरकारने अखेरीस या नाटकावर बंदी घातली.
गोविंदराव सदाशिव टेंबे
(जन्म : सांगवडे, कोल्हापूर जिल्हा, ५ जून, १८८१; - मृत्यू: ९ ऑक्टोबर, १९५५)
प्रख्यात हार्मोनियम वादक व संगीतकार गोविंदराव टेंबे स्वतः गांधीवादी होते ते म्हणायचे "खादी वापरायची, देशभक्ताचा वेष घालायचा पण हातून काही कार्य झाले नाही तर मग तो वेष कसला?". या विचारातून त्यांनी "संगीत पट-वर्धन" नावाचे नाटक द्रौपदी हे मुख्य पात्र डोळ्यासमोर ठेऊन लिहिले. "पट" म्हणजे वस्त्र, आणि "वर्धन" म्हणजे वाढवणे. "पट-वर्धन" म्हणजे दुःशासनाने पांडवांच्या द्यूतामधील पराभवाचा फायदा घेऊन द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केल्यावर तिच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन कृष्णानं वाढवलेलं वस्त्र. टेंब्यांसाठी हे वस्त्र म्हणजे खादीच्या प्रसाराचं एक निमित्त होतं. या नाटकातून टेंब्यांनी स्वदेशीचा प्रचार केला.
राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम)
(जन्म: नवसारी, गुजरात, २६ मे १८८५ - मृत्यू: सावनेर, २३ जानेवारी १९१९)
हे प्रख्यात नाटककार, कवी आणि विनोदी लेखक होते. गडकऱ्यांची लोकमान्य टिळकांवर भक्ती होती, त्यांनी पाठराखण केलेल्या नाटक कंपनीचे नावही "बळवंत संगीत मंडळी" असे होते. १९०८ ते १९१० या दोन वर्षात गडकऱ्यांनी "गर्वनिर्वाण" हे नाटक लिहिले, ते नाटक कर्झनशाहीच्या विरोधात होते. ब्रिटिश दडपशाहीच्या धाकामुळे त्यांनी ते नाटक फाडून/जाळून टाकले असे म्हणतात. त्या वेळी किर्लोस्कर नाटक कंपनीने हे नाटक करण्यासही घेतले; गणपतराव बोडस हे दिग्दर्शनाबरोबरच ‘हिरण्यकश्यपू’ची, बालगंधर्व ‘कयाधू’ची म्हणजे प्रल्हादाच्या आईची, तर जोगळेकर ‘लोकपाला’ची भूमिका करणार होते. पण यात काम करणार्या गडकऱ्यांच्या एका हितशत्रू मित्र नटाने, त्या वेळच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात निनावी लिहिले होते की, ‘‘जॅक्सनच्या खुनामुळे राजद्रोहाचा आरोप करून, पुरावा या दृष्टीने किर्लोस्कर मंडळी गर्वनिर्वाण हे राजकीय नाटक बसवत आहे.’’ ‘किर्लोस्कर’वर ब्रिटिशांची वक्रदृष्टी होतीच; पण या पत्राने आगीत तेल ओतले गेले. कलाकारांमध्येही अनेक कारणांनी सुंदोपसुंदी वाढली. अशा रीतीने १९१० मध्ये ते नाटक मंचावर येणे रद्द झाले. नंतर १९१४ मध्ये हे नाटक करायचे ठरले. या नाटकाची रंगीत तालीमही झाली. परंतु ब्रिटिश सत्तेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घातल्याने आणि नाटक कंपनीतील कलहामुळे नाटक सादर होऊ शकले नाही.
भार्गवराम विठ्ठल वरेरकर ऊर्फ मामा वरेरकर
(जन्म: चिपळूण, २७ एप्रिल १८८३; - मृत्यू: २३ सप्टेंबर १९६४)
हे मराठी नाटककार, कादंबरीकार आणि लेखक होते. वरेरकरांचे पहिले नाटक "कुंजविहारी" आले होते १९०६ साली आणि शेवटचे नाटक आले होते १९५५ साली. जवळपास ५० वर्षांच्या कारकिर्दीत वरेरकरांनी अंदाजे ४० नाटके, ११ एकांकिका, ४० कादंबऱ्या/दीर्घकथा, ६० अनुवादित कथा आणि ८ ललित पुस्तके लिहिली. जेंव्हा ब्रिटिश राज्यात राजकीय विषयांवर नाटकांतून थेट लिहिलं की नाटकांवर बंदी घातली जायची, त्यावेळी वरेरकरांच्या असे लक्षात आले की तमाशावर सेन्सॉरशिप नाही, त्यामुळे वरेरकरांनी कोकणात लोकप्रिय असलेल्या खजिनदार तमाशाला झाशीची राणी आणि वासुदेव बळवंत फडके अशा देशभक्तांबद्दल संवाद लिहून त्यांचे तमाशातून सादरीकरण केले होते. या प्रयोगातून दूरदूरच्या छोट्याशा गावांतून स्वातंत्र्या
बद्दलची जागृती निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य वरेरकरांनी केले. जेंव्हा ब्रिटिश सरकारने नाटकांवर कर आकारणी सुरु केली त्यानंतर वरेरकरांनी "करग्रहण" नावाचे नाटक लिहून त्याचा निषेध केला. "
संन्याशाचा संसार" हे नाटक इंग्रज घडवत असलेल्या ख्रिश्चन धर्मांतराविरोधात हे नाटक होते. यातील एका पात्राच्या तोंडी सर्व संवाद/विचार विवेकानंदांसारखे आहेत.
विनायक दामोदर सावरकर
(जन्म: भगूर, जिल्हा नाशिक, २८ मे १८८३ - मृत्यू: मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६)
भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, कवी व लेखक होते. स्वातंत्र्यलढ्यासाठी सावरकरांचे योगदान एवढे मोठे आहे की त्यांना रंगभूमी कलाकारांचे स्वातंत्र्यलढ्यातील मेरुमणी म्हटले तरी वावगे होणार नाही.
ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना
ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र
ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता
भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. या काळातले सावरकरांचे प्रमुख कार्य म्हणजे मित्रमेळ्याची स्थापना. सावरकरांच्या राजद्रोही तत्वज्ञानावर उभे राहून मित्रमेळ्याने "स्वातंत्र्यलक्ष्मी की जय"चा नारा प्रथम घुमविला. म्हसकर आणि पागे या आपल्या मित्रांच्या साथीने सावरकरांनी "राष्ट्रभक्त समूह" नावाच्या गुप्तसंस्थेचा प्रारंभ केला, तिचेच उघड स्वरूप म्हणजे मित्रमेळा. कालांतराने याचे रूपांतर "अभिनव भारत" या संघटनेत झाले. इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर
' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज
इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश
शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. १८९८ साली चापेकर बंधू यांना रँडच्या वधाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा झाल्यावर सावरकरांनी "चापेकर फटका" ही काव्यकृती लिहिली. त्यातील दोन ओळी अशा :-
भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे।
गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥
सावरकरांनी एकूण ३ नाटके लिहिली. "संगीत अुःशाप" (१९२७), "संन्यस्त खड्ग" (१९३१) आणि "संगीत अुत्तरक्रिया" (१९३३).
|
Photo Courtesy: Savarkarsmarak.com |
संन्यस्त खड्ग - या नाटकाचा काळ इ.स. पूर्वी ६व्या शतकातील आहे. अहिंसेच्या अतिरेकापेक्षा दुष्ट शत्रूचे निर्दालन करणेहेतू प्रसंगी शस्त्रही हाती धरायला पाहिजे हा संदेश सावरकर नाटकातून देऊ इच्छितात. इथे त्यांचा रोख हा गौतम बुद्धाच्या जीवनतत्वाविषयी आदर व्यक्त करतानाच समकालीन गांधी तत्व आणि त्यातील त्रुटीवर टीका करणे असा स्पष्ट आहे. गौतम बुध्दांच्या सांगण्यावरून 'शाक्य' सेनापती विक्रमसिंह शस्त्रत्याग करून संन्यासी होतो. बुध्दांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने प्रभावित होऊन 'शाक्य' जनता शस्त्रत्याग करते व त्यामुळे त्यांचे राज्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते. जेव्हा शेजारील कोसल राजा 'शाक्य' राज्यावर आक्रमण करतो तेव्हा विक्रमसिंहाचा पुत्र वल्लभाच्या सेनापतीत्वाखाली असलेले शाक्य सैन्य परराज्याचे आक्रमण रोखण्यास असमर्थ ठरते. विक्रमसिंहाची
सून सुलोचना सैनिकी
वेष धारण करून रणांगणात उतरते. पण दोघांचाही शेवट सारखाच होतो. शेवटी त्रस्त शाक्य भूतपूर्व सेनापती विक्रमसिंहाकडे जातात. गौतम बुध्दाशी
अहिंसा व नैतिकता ह्यावर
वाद-विवाद केल्यानंतर विक्रमसिंह त्याग केलेली तलवार (संन्यस्त खड्ग) उपसून शाक्यांना विजयी करतो.
संगीत अुत्तरक्रिया - पानिपतच्या पराभवानंतर खचलेल्या मराठ्यांना एक वेडी महिला "मला पानिपतची उत्तरक्रिया करायची आहे, त्यासाठी मला दळभार (सैन्य) दे" अशी विनंती करून परत एकदा मुघल साम्राज्याविरुद्ध लढायचे स्फुरण देते हा आशय घेऊन सावरकरांनी हे अप्रतिम नाटक लिहिले आहे. या नाटकामुळे त्या काळातील अनेक लोकांना ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढायची प्रेरणा मिळाली.
वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी)
(जन्म: अमरावती, १८ मार्च १८८१ - मृत्यू: अमरावती, ३ जून १९५६)
हेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील
स्वातंत्र्यसैनिक असून मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे
ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. वीर वामनराव जोशी यांनी इ.स. १९२० ते १९४२ या काळात अनेकवेळा तुरुंगवास भोगला. महात्मा गांधींच्या
चळवळीतही त्यांचा सहभाग होता. १९२१ साली भरलेली नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या संमेलनात ठराव पास झाला की "नाट्यकला राष्ट्रीय व्हावी आणि नाटककारांनी आपली नाटके राष्ट्रोन्नतीला पोषक होतील अशी करावीत". देशभक्ती ही वामनरावांची जीवननिष्ठा होती. मायभूची पूजा आणि त्यासाठी सर्वस्वाचे बलिदान ही त्यांची ध्येयधारणा होती. वामनरावांच्या काव्यरचनाही त्याचे हे जीवनविषयक तत्वज्ञान सांगून जातात. उदा.
चाटता पाय परक्यांचे
धर्म काय हा तुमचा ।। धृ ।।
शत्रूचे गुलाम बनता
शत्रूला सलाम करता
मायदेश ठार करता ।। १ ।।
आप्तधन खुशाल हरता
शत्रूच्या घरात मरता
श्वानसे जनात फिरता ।। २ ।।
वामनराव गांधीजींचे अनुयायी होते, तरीसुद्धा पारतंत्र्यावर आघात करून देश स्वतंत्र करण्याचे क्रांतिकारी मार्ग त्यांना आवडत.
वाजला रणाचा डंका
हरहर महादेव बोला ।। धृ ।।
मारू अथवा मरू रणी
या निर्धार पथ चाला
हिंद भूमीच्या जयजयकारे
आरिपरी चढवा घाला ।। १ ।।
वामनराव विदर्भात ठिकठिकाणी फिरत व देशभक्तीचा प्रचार करीत.त्यांची कन्या सौ. मथुताई भिडे यांनी हिंदबाला मेळा सुरु केला होता, त्यातील बव्हंश संवाद व गीते वामनरावांची होती.
वामनरावांनी एकूण ५ नाटके लिहिली - १) राक्षसी महत्वाकांक्षा (१९१३), २) संगीत रणदुंदुभी (१९२७), ३) धर्मसिंहासन (१९२९), ४) झोटिंग पादशाही (१९३३) आणि ५) शीलसंन्यास
राक्षसी महत्त्वाकांक्षा - जनतेच्या आकांक्षांपुढे व्यक्तिगत राक्षसी महत्वाकांक्षेचे महत्व नसते. सर्वसामान्य जनतेचे सुख महत्वाचे, राज्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील असावेत. शासनाच्या संरक्षकांनी राष्ट्राशी, जनतेशी इमान राखलं पाहिजे. हा विषय वामनरावांनी या नाटकात समर्थपणे हाताळला आहे. या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
|
Photo Courtesy: ePustakalay.com |
संगीत रणदुंदुभी - १९२७ साली वीर वामनरावांनी त्यांचे "संगीत रणदुंदुभी" हे नाटक लिहिले. हे नाटक म्हणजे एका अर्थाने वीरांचे तत्त्वज्ञानच होते. पारतंत्र्यातील विलासापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढताना येणारे मरण हे कैक पटींनी श्रेष्ठ आहे. स्वातंत्र्यासाठी तरुण मने पेटून उठली पाहिजेत. जनता सुखी व्हायची असेल तर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य याखेरीज दुसरा मार्ग नाही. रणदुंदुभी सतत गर्जत ठेवल्या की शत्रूला तुमच्यावर मात करण्याची हिम्मत होत नाही. हे सगळं "
रणदुंदुभी" हे नाटक प्रेक्षकांच्या मनावर बिंबवून जाते.
नाटकाची नायिका तेजस्विनी ज्या राज्यात राहत असते त्या राज्याचा राजा स्वातंत्र्यासाठी लढत नाही म्हणून बंड करून उठते. तिच्या तोंडी या नाटकातील अत्यंत गाजलेले पद आहे:
परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला ।।
सजिवपणी घडती सारे | मरण भोग त्याला ।। धृ ।।
असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ।। १ ।।
सौख्य-भोग इतरां सारे । कष्ट मात्र त्याला ।। २ ।।
मातृभूमी त्याची त्याला । होत बंदिशाला ।। ३ ।।
एकंदरीने स्वातंत्र्याचे स्फूर्तिदायक चित्रण "रणदुंदुभी" त आहे. सशस्त्र लढ्याच्या कृतीला बौद्धिक चर्चा अथवा वैचारिक आधार देणारे नाटक आहे.
धर्मसिंहासन - राज्यकर्त्यांपेक्षा जनता श्रेष्ठ. वैफल्य, नैराश्य, आणि दौर्बल्य जनतेत येता कामा नये, त्यासाठी धर्माचे अधिष्ठान स्वातंत्र्यलढ्याला लाभले पाहिजे. धर्मकारण आणि राजकारण एकत्र नांदले पाहिजेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात संन्याशांनीही मागे राहता कामा नये. धर्माने सर्वत्र सुख, शांती आणि स्वातंत्र्य नांदेल यासाठी लढले पाहिजे. यासाठीच राजसिंहासनाप्रमाणेच धर्मसिंहासनाचेही जनतेप्रती कर्तव्य आहे असा संदेश वामनरावांनी या नाटकाद्वारे दिला.
विष्णू वामन तथा तात्यासाहेब शिरवाडकर
(जन्म: नाशिक, २७ फेब्रुवारी १९१२ - मृत्यू: नाशिक, १० मार्च १९९९)
हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या
सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग
होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. कुसुमाग्रज हे नाटककार होते
त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. संगीत नाटक हा मराठी
रंगभूमीचा एक अमोल वारसा आहे. संगीतकाराच्या सुप्रमाण, कल्पक व प्रयोगशील योजनेने तो अधिक संपन्न करता येईल.
शब्दार्थाचे फारसे साहाय्य न घेता, केवळ स्वररचनेच्या प्रभावाने
संवादी वातावरणाचा शामियाना उभा करण्याचे संगीतात सामर्थ्य असते, असे ते म्हणत.
कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्तर कृष्णराव
(जन्म: २० जानेवारी १८९८ - मृत्यू: २० ऑक्टोबर १९७४)
हे हिंदुस्तानी संगीत
पद्धतीतील गायक व मराठी संगीत नाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. त्यांनी
रचलेले 'झिंजोटी/झिंझोटी' रागातील
सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. 'वंदे मातरम्' हे गीत
बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट
वाटले. वंदे मातरम् अनेकानेक विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी
त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेऊन व
त्यांच्यासमोर संसदेत प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
नेहरूंनी आधीच 'जन गण मन ' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर
कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्' ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत
म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध
केलेल्या वंदे मातरम् ची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक
वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना
सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता
मास्तर कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता.
डॉ. गजानन यशवंत चिटणीस
(जन्म: २० सप्टेंबर १९०० - मृत्यू:
२२ ऑगस्ट १९४९)
हे रॉयवादी विचारसरणीचे मराठी लेखक होते. हे नाट्यमन्वंतर संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते. वर्तक, अनंत काणेकर, नारायण काळे प्रभृतींसमवेत चिटणीस यांनी नाट्यमन्वंतर द्वारे रंगभूमीवर लेखक श्रीधर विनायक वर्तक यांचे आंधळ्यांची शाळा हे नाटक आणले. या नाटकात त्यांनी भूमिकाही केली.
अभिनेत्री लीला चिटणीस त्यांची पत्नी होती. त्यांच्या विवाहाचे वेळी लीला नगरकरांचे वय १६ वर्षे होते. डॉ.ग.य.चिटणीस यांच्यामुळेच लीला चिटणीसांचा नाटकांशी आणि पुढे चित्रपटांशी संबंध आला.
डॉ. ग.य.चिटणीस आणि लीला चिटणीस यांचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता. मार्क्सवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांना घरी आश्रय दिल्याबद्दल ते दोघे अटक होताहोता वाचले.
अशा रीतीने अनेक मराठी नाटककारांनी व इतर कलाकारांनी आपापल्या परीने स्वातंत्र्यलढ्यात आपले बहुमूल्य योगदान दिलेले दिसते. ज्याचा दृश्य परिणाम ब्रिटिशविरोधी जनमत तयार करण्याकरता आणि अंतिमतः स्वातंत्र्य प्राप्त करण्यात झाला.
अशा सर्व ज्ञात आणि अज्ञात कलाकारांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त्ताने मनःपूर्वक अभिवादन. जयहिंद!
मेळे
नाटकाच्या "मर्यादित" व्याख्येत न बसणारा हा
लोकप्रबोधन आणि मनोरंजनाचा एक प्रकार स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय लोकप्रिय होता.
यात मुख्यतः एकत्र म्हटलेली गाणी,
छोट्या नाटिका किंवा संवाद असत. मेळा ही लोकांनी
स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने चालवलेली चळवळ होती,
त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकमाध्यम होतं. लोकमान्य
टिळकांनी सुरुवात केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातून मेळ्याचा जन्म झाला. पुण्यातील
टिळकभक्तांचा "सन्मित्र समाज
मेळा" किंवा "हिंदू समाज मेळा" आणि नाशिकमधील सावरकरांचा
"मित्रमेळा" हे त्याकाळातील प्रमुख गाजलेले मेळे होते. सन्मित्रचे "कर्झन काव्य" राम गणेश गडकरींना अतिशय आवडे असे म्हणतात. १९०४ च्या
मेळ्यात हे "कर्झन काव्य" प्रथम गायले गेले. १९०५ च्या मेळ्यात बहिष्कार
आणि स्वदेशी यावर पदे होती. उदा. "होमरूल" नावाचे मेळापद असे होते:
दक्खनची गर्जना श्री टिळकांची वाजे रणभेरी ।।धृ।।
होमरूलाची प्राणप्रतिष्ठा करावयासाठी ।
कष्ट जिवास कितिक पडले भूतें लागता पाठीं ।।१।।
वदें निश्चये 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क' ।
अलम दुनियेला निरोप ऐसा कळवि छातीठोक ।।२।।
कोर्टामाजी किंमत ठरली 'स्वराज्य' शब्दांची।
चळवळ करुनी बंद पाडिली टुरटुर कोल्ह्यांची ।।३।।
संदर्भ: वरील लेख लिहिताना मला खालील पुस्तके आणि इंटरनेट यांचा
अतिशय उपयोग झाला. त्या सर्व लेखकांचे आभार व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे.
१) मराठी रंगभूमीच्या तीस रात्री (एक
सामाजिक-राजकीय इतिहास) खंड पहिला - लेखक श्री. मकरंद साठे - पॉप्युलर प्रकाशन
२) कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके
- समीक्षा व संहिता - लेखक डॉ. मधुकर आष्टीकर - प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य
आणि संस्कृती मंडळ, मुंबई
३) जन्मदा दीपोत्सवी स्मरणिका - मराठी
संगीत रंगभूमी विशेषांक २००४ - संपादक श्री. मिलिंद प्रभाकर सबनीस - प्रकाशक
जन्मदा प्रतिष्ठान
४) प्रयोगक्षम मराठी नाटके (वर्णनात्मक
सूची) - संपादक डॉ. मु. श्री. कानडे - प्रकाशक विदर्भ साहित्य संघ
५) बहुरूपी - लेखक श्री. चिंतामण गणेश
कोल्हटकर - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
७) सर्व फोटो इंटरनेट वरून साभार
खूप अभ्यासपूर्ण लेख आहे..खूप खूप अभिनंदन .काही उल्लेख राहिलेले आहेत.. विशेषतः बळवंत नाटक मंडळी की ज्यांनी संन्यस्त खड्ग ,रणदुंदुभी यासारखी नाटके रंगमंचावर आणले आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि कोल्हापुरे या मालकांनी त्यासाठी पुढाकार घेतला ..त्याचा उल्लेख अवश्य करावा ही विनंती
ReplyDeleteधन्यवाद सर. नाव कळले नाही.
Deleteमर्यादित वेळ असल्याने फक्त नाटककारच cover करू शकलो. चिंतामणरावांचे "बहुरूपी" हे आत्मचरित्र वाचले, पण काही सापडले नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर जरूर शेअर करा. धन्यवाद.
नमस्कार. लेख सविस्तर व चांगला लिहिला आहे. एक दुरुस्ती करावी.
ReplyDeleteपरवशतापाश दैवे ज्याच्या गळा लागला ।।
व
मातृभूमि त्याची त्याला होत बंदिशाला ।।
शक्यतो अचूकता यावी म्हणून लिहिलं आहे.
धन्यवाद मधुवंती ताई. आपले म्हणणे बरोबर आहे, आज दुरुस्ती करतो.
ReplyDelete