Friday 15 February 2019

पुलवामा : क्रियाशील अतिरेकी, निष्क्रिय समाज!!

पुलवामा : क्रियाशील अतिरेकी, निष्क्रिय समाज!!



काल १४  फेब्रुवारी २०१९ रोजी जेंव्हा भारतीय तरुणाई व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने बेभान होऊन आकंठ प्रेमात बुडून गेली होती, नोकरदार आणि व्यावसायिक जेंव्हा आपापल्या उद्योगात मग्न होते, गृहिणी जेंव्हा घरकामात व्यस्त होत्या, ज्येष्ठ नागरिक जेंव्हा दुपारची विश्रांती घेत होते, बहुसंख्य भारतीय जेंव्हा Whatsapp, Facebook, Twitter, Instagram इ. माध्यमांवर पडीक होते, बिनकामी आळशी लोक जेंव्हा कट्ट्यावर बसून मोठमोठ्या गप्पा मारत होते, पत्रकार आणि माध्यमकर्मी जेंव्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या खमंग चर्चा घडवून आणायचे बेत आखत होते, विद्यार्थीवर्ग जेंव्हा आपापल्या शाळा/कॉलेज मध्ये शिकत होता, तेंव्हा दुपारी ३:३० च्या सुमारास काश्मीर खोऱ्यातील पुलवामा इथे जैश-ए-मोहम्मद च्या अतिरेक्याने भ्याड आत्मघाती हल्ला करून ४० पेक्षा आधी CRPF च्या जवानांना ठार मारले.

हे तेच जवान होते जे आपली सुट्टी संपवून पुन्हा कामावर रुजू व्हायला चालले होते, हे तेच जवान होते जे डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र कडाक्याची थंडी, कडक ऊन, अथवा तुफान पाऊस वा बर्फवृष्टी कशाची तमा न बाळगता आपल्या सीमांचे आणि पर्यायाने आपले रक्षण करतात. तुम्ही कधी काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या सीमावर्ती प्रांतात गेलात तर "उनसे कहो की आपके कल के लिये हमने अपना आज कुर्बान कर दिया" अशा पाट्या दिसतील. अर्थात हा संदेश तुमच्यात काही संवेदनशीलता शिल्लक असेल तरच तुम्हाला भिडेल अन्यथा तुम्ही आजपर्यंत आहात तसेच तुमच्या मौज-मस्तीत जगत रहाल.

कालच्या हल्ल्यानंतर सरकार व लष्कर त्यांना काय करायचे आहे ते करतीलच, पण आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की आपल्यापेक्षा अतिरेकी हे जास्त क्रियाशील आहेत, आणि ते दुर्दैवी आहे. ते क्रियाशील आहेत कारण त्यांना एक ध्येय दिले आहे (जरी ते वाईट आणि चुकीचे असले तरीही). पण एक व्यक्ती किंवा समाजाचा एक घटक म्हणून तुमच्यासमोर देशासाठी/समाजासाठी काही करण्याचे कुठलेच ध्येय नाही त्यामुळे आपण निष्क्रिय झालो आहोत. 

IT क्षेत्रात असे म्हणतात की Virus तयार करण्याचा प्रोग्रॅम लिहिणारे हे Antivirus तयार करणाऱ्यांपेक्षा जास्त हुशार असतात आणि काही अंशी ते खरेच आहे, कारण Antivirus प्रोग्रॅम लिहिणे ही फक्त प्रतिक्रिया असते, मात्र नवीन Virus हा मुळापासून लिहायला लागतो! दुर्दैवाने अतिरेकी हे Virus लिहिणारे आहेत आणि आपण सर्वजण फक्त प्रतिक्रिया देणारे आहोत! :-(

पुढील काही दिवस राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत राहतील, वाहिन्या जोरदार चर्चा घडवून आणतील, पुरोगामी विचारवंत/कलावंत/साहित्यिक यात सरकारचे कसे चुकले आहे ते सांगतील, सिने-नाट्य कलावंत आपापल्या Twitter handle वरून शोकसंदेश देतील, आपण सर्व जण हे सर्व बघत राहू आणि काही दिवसांनी सारे कसे शांत शांत होईल.

या घटनेपासून आपण काय धडा घेणार आहोत? सर्वसामान्य नागरिकांचे आत्तापर्यंतचे वर्तन बघा. मी, माझे कुटुंब, माझे नातेवाईक या पलीकडे बघायला लोक तयारच नाहीत. अहो साधं आपण जिथे राहतो तो परिसर स्वच्छ ठेवणे, आसपासच्या झाडांना पाणी घालणे, वाहतुकीचे नियम पाळणे, आपले कुठलेही काम एकही पैसा लाच म्हणून न देता अथवा न घेता करणे, सार्वजनिक ठिकाणी वागण्याचे समाजमान्य अलिखित संकेत पाळणे यापैकी काहीही आपण करत नाही.  तुम्ही दुसऱ्या माणसांना वेळ देता का, त्यांच्यासाठी काही करता का, याचे उत्तर काही अपवाद वगळता नाही असेच येईल. Whatsapp, Facebook वरून देशभक्तीचे, वाढदिवसाचे, सणासुदीला शुभेच्छांचे संदेश पाठवले म्हणजे झाले असे होत नाही. हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात बसून डोसा-चहा खाता-खाता किंवा दोन पेग मारता-मारता आपला देश कसा वाईट आहे आणि काय सुधारायला पाहिजे यावर गप्पा ठोकणारे खूप जण असतात, क्रिकेट मॅच जिंकल्यावर उन्मादाने नाचणारेही बरेच दिसतात. पण हे लोक देशासाठी/समाजासाठी वेळ काढा म्हटले की कारणे द्यायला लागतात.

लोकशाहीने आम्हाला फक्त आमचे हक्क मागायला शिकवलेत, जबाबदारी नाही. आपण कितीही म्हटले की आमचा देश संतांचा आहे तरी वास्तविक आम्ही अजूनही जाती-पातीत अडकलो आहोत. एकीकडे जाती-पाती नष्ट करा म्हणायचे आणि जातीवर आधारित आरक्षणासाठी लढायचे! जिथे सोयीचे असेल तिथे भ्रष्टाचार करायचा. ज्या अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र विषयाला १०० पैकी ५-१० मार्क असतील त्या देशात सुजाण, सजग आणि कार्यशील नागरिक तयार होतीलच कसे?

सुशिक्षित लोकांबद्दल तर पुरता अपेक्षाभंग झालाय. हा वर्ग साधं मतदान पण करत नाही, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच्या दिवशी भटकायला जाणे, वीकेंडचे प्लॅन्स आखणे आणि मौज-मजा करणे यातच यांचे आयुष्य सरते आणि वर त्याची खंतही वाटत नाही. अन्याय नुसता बघत राहतात आणि सहन करतात. पुण्यातल्या प्रश्नांविषयी शेकडो लोक रोज खाजगीत तक्रारी करत असतात; पण अधिकृतपणे तक्रार नोंदवून, तिचा पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेला भाग पडण्याची कोणाची तयारी नसते. शिवाजी अजूनही दुसऱ्याच्या घरात जन्मावा अशी लोकांची अपेक्षा असते. स्वतःला काहीही त्रास न होता दुसऱ्या कोणी काम करून दिले तर हवेच असते. असली निर्लज्ज मनोवृत्ती आपल्या समाजाची झाली आहे.

  • कधी व्यावसायिक लोक प्रामाणिकपणे व्यवहार करणार आणि कर भरणार?
  • कधी वकील आणि सी. ए. लोक आपल्या अशिलांना कायद्याप्रमाणे वागायला भाग पाडणार?
  • कधी शिक्षक/प्राध्यापक लोक विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे/तळमळीने शिकवणार? आणि क्लास ऐवजी शाळा/कॉलेज मधेच चांगले शिक्षण देणार?
  • कधी नोकरदार वर्ग प्रामाणिकपणे, सचोटीने आणि मन लावून काम करणार?
  • कधी विद्यार्थी वर्ग आपली संध्याकाळ एखाद्या हॉटेलात मौज-मजा न करता काही वेगळे चांगले काम करणार?
  • कधी पालक आपल्या मुलांना अधिक वेळ देऊन, त्यांना चांगलं/वाईट याची समज देऊन एक चांगला नागरिक घडवणार?
  • कधी डॉक्टर आपल्या पेशंटना न लुटता प्रामाणिकपणे औषधोपचार करणार?
  • कधी सिने-नाट्य अभिनेते आपल्या खाजगी आयुष्यात चांगले काम करून समाजापुढे चांगला आदर्श ठेवणार?
  • कधी आपण सर्व जण आपला Gadgets वरील वेळ कमी करून तो चांगल्या विधायक कामासाठी वापरणार?
  • कधी Service Industry मधले लोक ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देणार?

वरील प्रश्नांच्या उत्तरात आपले भविष्य दडलेले आहे. फक्त सरकारवर अवलंबून राहण्याची वृत्ती सर्वप्रथम सोडावी लागेल. स्वतःला एखाद्या चांगले काम करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी, 'स्व'-रूपवर्धिनी, वंचित-विकास, चिंचवड येथील गुरुकुलम, रामकृष्ण आश्रम, विवेकानंद केंद्र, सजग नागरिक मंच, ग्राहक मंच, पर्यावरण क्षेत्रातील संस्था, यांसारख्या संस्थेशी जोडून घ्यावे लागेल, त्यासाठी अतिरिक्त वेळ काढावा लागेल.

या देशाचे, समाजाचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची सर्वात जास्त जबाबदारी पालकांनी स्वीकारली पाहिजे असे मला वाटते. मुलांनी कुठली Gadgets वापरावीत, त्यावर कुठल्या गेम्स खेळव्यात यावर पालकांचे नियंत्रण असलेच पाहिजे. मुलांना मैदानी खेळाची आवड लावण्याची जबाबदारी पालकांनी घेतलीच पाहिजे. त्यासाठी पालकांनी आपले स्वतःचे वर्तन कसे आहे हे तपासून बघितले पाहिजे. आज संकट कोसो दूर आहे पण उद्या ते तुमच्या घरात येऊ शकते. 

स्वातंत्र्यवीर सावरकर एकदा त्यांच्या पत्नीला म्हणाले होते की संसार काय कावळे-चिमण्या पण करतात, आपण असे काहीतरी केले पाहिजे की लोक आपले कार्य आपल्या मरणानंतरही लक्षात ठेवतील. 

आज ३७० कलमामुळे आपण एक नागरिक म्हणून एका मर्यादेपलीकडे काश्मीर साठी काही करू शकत नाही. पण खालील गोष्टी तुम्ही नक्की करू शकता.

तुम्ही बँकेत, LIC त अथवा Financial Company मध्ये किंवा सरकारी कचेरीत काम करत असाल तर लष्करातील जवानांचे काम सोपे आणि लवकरात लवकर होईल असे करा जेणेकरून त्यांना खेपा माराव्या लागणार नाहीत. काश्मीरमध्ये सहलीसाठी गेलात तर तिथल्या स्थानिकांची ओळख करून घ्या व परत आल्यावरसुद्धा त्यांच्याशी संपर्क ठेवा. लष्करातल्या जवानांना हर प्रकारे मदत करा जेणेकरून त्यांची बुद्धी आणि शक्ती व्यर्थ गोष्टीत न दवडता योग्य ठिकाणी खर्च होईल.

तेंव्हा चला, आज आपण सारे मिळून प्रतिज्ञा करू या की मी स्वतः उत्तम नागरिक बनून माझ्या देशासाठी/समाजासाठी सर्वतोपरी काम करेन तसेच माझ्या मुलांनी उद्याचा उत्तम नागरिक बनावे म्हणून प्रयत्न करेन. 

एका कवितेत म्हटले आहे - कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. 


जयहिंद!

© धनंजय रघुनाथ सप्रे - १५ फेब्रुवारी २०१९