Monday 31 March 2014

वसुंधरेवरील तारे - मिलिंद प्रभाकर सबनीस

काही माणसांची नावे समोर आली की लगेच आपल्यासमोर ज्यामुळे ते ओळखले जातात तो विषय येतो, इतकी ती माणसे आणि त्यांचा विषय हे एकरूप झालेले असतात. उ.दा. डॉ. माशेलकर म्हटले की आपल्याला हळदीच्या किंवा बासमतीच्या पेटंटची लढाई आठवते. डॉ. वर्गीस कुरियन म्हटले की अमूल आठवते. 

आज मी आपल्याला ज्याची ओळख करून देणार आहे त्या मिलिंद प्रभाकर सबनीसचे नाव घेतले की वन्दे मातरम हे ओघानेच येते. गेली २० वर्षे मिलिंद ज्या तन्मयतेने आणि परिश्रमपूर्वक वन्दे मातरम या गीताचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे मिलिंद आणि वन्दे मातरम हे जणू काही synonym च झाले आहेत. 

पण मिलिंदच्या एकूण आयुष्यावर नजर टाकली तर असे लक्षात येईल की अवघ्या ४५ वर्षांच्या आयुष्यात त्याने किती विविध कामे केली आहेत. नुसते चाकोरीबद्ध जीवन न जगता काहीतरी विशेष निर्माण केले आहे आणि म्हणून त्याच्या या ओळखीनेच माझ्या "वसुंधरेवरील तारे" या मालिकेची सुरुवात करत आहे. 

मिलिंदचा जन्म पुण्यातल्या नारायण पेठेतला. वडील - प्रभाकरपंत - व काका - मनोहरपंत - दोघेही उत्तम भजन गायक, आजोबांनी सुरु केलेले श्री भक्त भजनी मंडळ, काकांनी १९५० साली सुरु केलेले संगीत भजन मंदिर यामुळे घरात संगीताचे वातावरण कायमच असायचे. अशा वातावरणात मिलिंदवर संगीताचे संस्कार झाले नसते तरच नवल. बाबा व काकांच्या शेजारी बसून त्यांची भजने ऐकताना मिलिंद स्वतःच गाऊ कधी लागला हे त्याचे त्यालाच कळले नाही. आणि तो इ. तिसरीत असताना एके दिवशी त्याने आपले पहिले कीर्तन सादर केले. भजनाच्या निमित्ताने अनेक मोठी मंडळी त्यांच्या घरी यायची व त्यामुळे त्यांचा सहवास मिळायचा. पुढे २००० साली त्याचे बाबा गेल्यावर त्याने भजनाची परंपरा पुढे सुरु राहावी म्हणून भजने शिकवायला सुरुवात केली ती आजतागायत चालू आहे. 

मिलिंदचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील नवीन मराठी शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण रमणबाग शाळेतून झाले. शालेय जीवनात मिलिंदला खेळाचा ओढा कमी व पुस्तकांचा जास्त होता. त्यामुळे मिलिंदचा बराचसा वेळ हा ग्रंथालयातच जायचा. त्याची पुस्तकांची आवड बघून शिक्षकांनी मिलिंदला ग्रंथालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सोपविली. त्यामुळे अनेक पुस्तकांचा खजिना मिलिंदला सहज उपलब्ध झाला. मग त्याने "समग्र सावरकर" इ. ९ वीतच वाचून काढले. याशिवाय घरी भजनाशी संबंधित पुस्तके होती ती सुद्धा मिलिंद वाचत असे. १० वी नंतर Technical line ला न जाता मिलिंदने Art Teacher Diploma केला. आणि पुढे G. D. Arts झाला. शिक्षणाच्या या वेगळ्या वाटेवर आई-वडिलांचा संपूर्ण पाठिंबा त्याला मिळाला. 

शिक्षणाचे शेवटचे वर्ष चालू असतानाच मिलिंदला ज्ञानदा प्रतिष्ठानच्या शाळेत कला-शिक्षक म्हणून नोकरी लागली. शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती नलावडे बाईंनी मिलिंदमधील कला-शिक्षकाला पूर्ण मोकळीक दिली त्यामुळे मिलिंदला आपले कला-गुण जोपासून शिक्षकाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडता आली. अनेक आंतरशालेय स्पर्धांतून मिलिंदच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाटक, नृत्य इ. विभागात भाग घेतला. जिल्हा नाट्य स्पर्धेत शाळेच्या नाटकाचे पूर्ण नेपथ्य मिलिंदने उभे केले. या कामातून मिलिंदने अनेक विद्यार्थी घडवले जे आजही मिलिंदशी एका भावनिक नात्याने बांधले गेले आहेत. त्याचा एक विद्यार्थी आज एका Professional Recording Studio मध्ये महत्वाच्या पदावर काम करतो आहे. मिलिंदच्या या सर्व कामाची पावती ज्ञानदा प्रतिष्ठान संस्थेने त्याच्या वन्दे मातरमच्या कामाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देऊन व्यक्त केली. 

मिलिंद आज ज्या "वन्दे मातरम" मुळे ओळखला जातो त्याची सुरुवात १९९४ साली त्या गीताचे जनक बंकिमचंद्र यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त शाळेतील मुलांसमोर बोलण्याच्या निमित्ताने झाली. त्या वेळेस मिलिंदने श्री. अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेल्या वन्दे मातरम वरील पुस्तकाचा आधार घेतला. श्री. गाडगीळ यांची इच्छा होती की "वन्दे मातरम" चा कोष तयार करावा; पण १९९४/९५ साली त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने ती अपूर्ण राहिली. कर्मधर्मसंयोगाने त्यांनी केलेले "वन्दे मातरम" विषयावरील सर्व काम - टिपणे, चित्र प्रदर्शन वगैरे - मिलिंद कडे चालून आले. तेंव्हा श्री. अमरेंद्र गाडगीळ यांनी सुरु केलेले "वन्दे मातरम" कोषाचे अर्धवट राहिलेले काम मिलिंदने पूर्ण करावे असाच जणू संकेत मिळाला. आणि मग मिलिंदने "वन्दे मातरम" या गीताविषयी नवीन-नवीन माहिती मिळवण्याचा चंगच बांधला व त्या दृष्टीने जवळपास ५ वर्षे अखंड काम केले. त्यातून "वन्दे मातरम - एक शोध" हे पुस्तक जन्माला आले. 

१९९९ साली "वन्दे मातरम" गीताला १२५ वर्षे पूर्ण होत होती, या निमित्ताने मिलिंद काम करत असलेल्या ज्ञानदा प्रतिष्ठानने ते वर्ष "वन्दे मातरम" शतकोत्तर रौप्य-महोत्सवी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले. ते निमित्त साधून मिलिंदचे पुस्तक मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करावे अशी सूचना मा. श्री. मोरोपंत पिंगळे यांनी केली व त्या कार्यक्रमासाठी स्वतःहून सर्वतोपरी मदत केली. मिलिंदला लाल-बाल-पाल यांच्या नातवांचे पत्ते देणे असो, त्यांना पत्र लिहिणे असो नाहीतर भाई महावीर यांचे नाव सुचवणे असो, अशा प्रकारची सर्व मदत मा. मोरोपंतांनी केली. ज्ञानदा प्रतिष्ठानच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम यशस्वी केला. आपल्या शाळेतील एका साध्या कला-शिक्षकाने लिहिलेल्या पुस्तकाला एवढे मोठे नाव मिळवून दिले हीच त्या संस्थेने मिलिंदच्या कामाला दिलेली पावती होती. 

"वन्दे मातरम" गीताच्या या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षाचा समारोप पुण्यातील ६५ शाळांतील विद्यार्थ्यांच्या सामुहिक "वन्दे मातरम" गीताने करावा अशी कल्पना पुढे आली. आणि आश्चर्य म्हणजे सर्वात चांगला प्रतिसाद अँग्लो-उर्दू शाळेतून मिळाला; त्या शाळेतून जवळपास १२५ विद्यार्थीनी कार्यक्रमात सामील झाल्या. मुख्य कार्यक्रम नेहरू स्टेडीयम येथे झाला. ६५ शाळांतील जवळपास ११००० विद्यार्थ्यांनी सामुहिक संपूर्ण वन्दे मातरम गीत म्हटले. हा एक अभूतपूर्व असा कार्यक्रम होता ज्याचे कौतुक विविध स्तरांतून झाले. 

मिलिंदला आजपर्यंत काही पुरस्कार मिळालेले आहेत. उ. दा. कै. राम शेवाळकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मे २००९ मधे मिळाला. गुरुवर्य ल. ग. देशपांडे आदर्श शिक्षक पुरस्कार २०१२ मधे मिळाला. या वर्षी जानेवारी २०१४ मध्ये कै. इंदिरा अत्रे (श्रीमती प्रभा अत्रे यांच्या आई) पुरस्कार मिळाला. 

प्रख्यात नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद - जे मूळचे चित्रकला शिक्षक - त्यांना मिलिंद गुरुस्थानी मानतो. त्यांच्या चित्रांचे आणि टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात मिलिंदचा मोठा हात होता. मुळगुंद सरांच्या सहवासामुळे मिलिंद नाट्यसंस्कार संस्थेत दाखल झाला. मुळगुंद सरांनी लिहिलेली २ बालनाट्ये मिलिंदने उभी केली. त्याशिवाय इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी असलेली भालबा केळकर नाट्य-स्पर्धा आणि दिवाकर नाट्य-छटा स्पर्धा या दोन्हींचे आयोजन मिलिंदने १९९० पासून सलग ९ वर्षे यशस्वीपणे केले. या स्पर्धांमध्ये तोचतोचपणा येऊ नये म्हणून मिलिंदने शिक्षक व पालकांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून नवीन नाट्य-छटा लिहून त्या सादर करून घेतल्या. पुढे जाउन या नाट्य-छटांचे पुस्तक संपादनाचे कामही केले. आणि हे सर्व कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न बाळगता केवळ कलेवरच्या प्रेमापोटी मिलिंदने केले. 

मिलिंदचे नाट्य-प्रेम इथेच संपले नाही. "नांदी ते भरतवाक्य" अशा पद्धतीचे नाटक त्याने प्रथमच शालेय रंगभूमीवर आणले. गेली २५ वर्षे मिलिंदने पुरुषोत्तम करंडकाची अंतिम फेरी पाहणे चुकवलेले नाही. १९९५-९६ मध्ये नाट्य-संस्कार संस्थेतर्फे राज्य-स्तरीय नाट्य स्पर्धेत "तक्षकयाग" हे २ अंकी नाटक निर्मित केले ज्यात आजचा प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने काम केले होते. या नाटकाचे ३ प्रयोग मिलिंदने केले. या नाटकाला कामगार कल्याण नाट्य-स्पर्धेत नाटकाला तिसरे, नेपथ्य, प्रकाशयोजनेला पहिले आणि अभिनयाला तिसरे अशी एकूण ४ पारितोषिके मिळाली. जेंव्हा १९९९ मध्ये मिलिंदने "वन्दे मातरम"च्या विषयाला झोकून द्यायचे ठरवले त्यावेळी कुठलीही कटुता न आणता तो नाट्य-चळवळीतून बाहेर पडला. 

१९९९ मध्ये "वन्दे मातरम" गीताच्या शतकोत्तर रौप्य-महोत्सवानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमासाठी ज्ञानदा प्रतिष्ठान संस्थेचे खूप मोठे सहकार्य मिळाले होते; पण एक शैक्षणिक संस्था म्हणून मिलिंदच्या नियोजित "वन्दे मातरम"च्या शोधकार्याला सहकार्य देणे संस्थेला शक्य नव्हते. म्हणून काही समविचारी मित्रांनी एकत्र येउन "जन्मदा प्रतिष्ठान" नावाची संस्था सुरु केली. या संस्थेचे उद्दिष्ट होते - "वन्दे मातरम" विषयाशी निगडीत कार्यक्रम सादर करणे, त्याच्याशी संबंधित वस्तू, हस्तलिखिते, इ. दुर्मिळ गोष्टींचा संग्रह करणे, इ. याचाच एक भाग म्हणून कै. वसंत पोतदार यांचे "वन्दे मातरम" या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले. जन्मदा प्रतिष्ठानने २००३ पासून सलग ५ वर्षे दिवाळी अंक काढले त्यातील २००७ चा अंक हा इंटरनेट वरून प्रसिद्ध केला. २००३ ला "धर्म आणि राजकारण", २००४ ला "काश्मीर", २००५ ला "शाकुंतल ते शापित गंधर्व" आणि २००६ ला "भारतीय भाषांतील सांस्कृतिक कथा" असे विशेष दिवाळी अंक अतिशय मेहनत घेऊन काढले. २००३ च्या पहिल्याच अंकाला का. र. मित्र पुरस्कार मिळाला. दुर्दैवाने दिवाळी अंकाना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

हे सर्व करत असताना "वन्दे मातरम" विषयीची माहिती मिळत होती व त्याच्या संकलनाचे काम मिलिंद करत होता. १९९४ साली शाळेत बोलण्याच्या निमित्ताने मिलिंदचा "वन्दे मातरम"चा प्रवास सुरु झाला. श्री. अमरेंद्र गाडगीळ यांच्या पुस्तकाने त्याला भारून टाकले. मोगुबाई कुर्डीकर आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी गायिलेल्या "वन्दे मातरम" गीताने तो मंत्रमुग्ध झाला. मास्तर कृष्णराव यांनी "वन्दे मातरम" हे राष्ट्रीय गीत व्हावे म्हणून पंडित नेहरू यांच्याबरोबर जो सांगीतिक लढा दिला त्यावर मिलिंदने एक लेख लिहिला. त्या लेखामुळे त्याची भेट मास्तरांचे चिरंजीव श्री. राजाभाऊ फुलंब्रीकर यांच्याबरोबर झाली. हळूहळू जशी ओळख वाढत गेली तशी राजाभाऊ यांनी  मिलिंदला मास्तरांच्या खजिन्यातील "वन्दे मातरम"शी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून दिली. "वन्दे मातरम" च्या शोधानिमित्ताने मिलिंदने मे १९९९ मध्ये गीताचे जन्मस्थळ नैहाटी (कोलकाता) येथे भेट दिली. याचबरोबर मिलिंदने "वन्दे मातरम" गीताच्या ध्वनिमुद्रिकाही जमवायला सुरुवात केली. आज त्याच्याकडे या गीताच्या १७५हून अधिक ध्वनिमुद्रिका आहेत.

त्यानंतर मिलिंदने भारताच्या राष्ट्रध्वजाच्या प्रवासाचा सखोल अभ्यास करून "राष्ट्रध्वज - प्राचीन ते अर्वाचीन" हे पुस्तक लिहीले. ह्या पुस्तकाद्वारे त्याने आपल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेतला. मिलिंदने राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रगीताचाही शोध घेऊन "जनमनातील जन-गण-मन" हे पुस्तक प्रसिद्ध केले. या दोन्ही पुस्तकांचे वाचकांनी भरपूर कौतुक व स्वागत केले.


सध्या मिलिंद "समग्र वन्दे मातरम"हा माहिती कोश काढायच्या कामात पूर्ण बुडून गेला आहे. या कोशामध्ये "वन्दे मातरम" चा विविध अंगाने केलेला विचार तो मांडणार आहे. त्यात "वन्दे मातरम" वर गेल्या १२५ वर्षात जे लेख प्रसिद्ध झाले त्याची सूची आहे, तसेच जवळपास ३०० लेखातील २५ लेख समाविष्ट केले आहेत, यातील संगीत विभागात "वन्दे मातरम" च्या ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती आणि ध्वनिचित्रमुद्रण यांची सूची आहे, अनेक दुर्मिळ कागदपत्रे, प्रसाराकांची माहिती, "वन्दे मातरम" च्या अनुषंगाने भारतमातेची विविध चित्रकारांनी काढलेली चित्रे अशी असंख्य माहिती दोन खंडात लवकरच प्रकाशित होणार आहे. या कामाने मिलिंद आणि त्याची पत्नी - शिल्पा - दोघेही प्रचंड झपाटून गेले आहेत. 

मिलिंदच्या कामाची दखल वर्तमानपत्रांनीसुद्धा घेतली आहे:





तर असा हा मिलिंद. ज्या वयात इतर आकर्षणांकडे ओढला जाण्याची शक्यता असते, त्या वयात केवळ "वन्दे मातरम" चा ध्यास घेऊन तेच आयुष्याचे ध्येय बनवलेला, पैसा, प्रतिष्ठा इ. मिळवून आरामात आयुष्य व्यतीत करण्याच्या असंख्य संधी सोडून देऊन एका राष्ट्रीय कामाला स्वतःला वाहून घेणारा आणि हे सर्व करत असताना सदैव हसतमुख, प्रसन्न आणि प्रचंड समाधानी असणारा मिलिंद.

अशी माणसे आजकाल खूप दुर्मिळ झाली आहेत. म्हणूनच मिलिंद हा आपल्या जगातला एक महत्वाचा तारा आहे. 

9 comments:

  1. Dhyas and talmal hya done goshti ase ghadaun antat , me bharaun gelo, Dhanjay lekh uttam and mandani hi surekh. lihit raha.

    ReplyDelete
  2. khupach chaan lekh zalal ahe. Bhashetli sahajata he tuza vaishishitya ahe. Samanyancha asamanyatva asa hya lekahcha shirshak hou shakel. keep it up!

    ReplyDelete
  3. धन्यवाद आशिष आणि MindJogger (sorry, cannot guess who you are)

    ReplyDelete
  4. Dhananjay... Uttam lekh... Kharokharach ashi mahiti lokansamor yena garajecha aahe.... ya sagalya taryanna aamchya pudhe gheun yenara tu ek tara aahes....

    ReplyDelete
  5. Very nice Dhananjay.. Lekhmalechi concept khupach chaan aahe. looking forward to next blog

    ReplyDelete
  6. धन्यवाद आनंद आणि निलेश

    ReplyDelete
  7. Very nice article Dhananjay..this work surely provides inspiration to readers. Keep posting blogs....Many Thanks

    ReplyDelete
  8. This is very very inspiring for all of us. People like Milind not only prove their concern about nation but also inspire us to do so...

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.