नमस्कार मित्रांनो. आज माझा ५०वा ब्लॉग तुमच्यासमोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. गेल्या दहा वर्षात मी पन्नास ब्लॉग कसे लिहू शकलो ह्याचे माझे मलाच आश्चर्य वाटते! असो.
आजच्या ब्लॉगमध्ये मी ज्यांना हिंदी चित्रपटसंगीताचे भीष्म पितामह म्हटले जाते अशा अनिल विश्वास यांचा परिचय करून देणार आहे. अनिल विश्वास हे माझे अत्यंत आवडते संगीतकार आहेत. त्यांच्याबद्दल लिहावे असे बऱ्याच दिवसांपासून मनात होते, शेवटी आज योग आला. १९३२ साली हिंदी चित्रपटात संगीत आल्यापासून सुरुवातीच्या काळातले संगीत हे मोजक्या वाद्यांवर आधारित एका ठराविक धाटणीचे होते, त्याला अनिल विश्वास यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून एक वेगळे उत्तम स्वरूप दिले.
अनिल विश्वास यांना त्यांचे रसिक अनिलदा या नावाने ओळखतात, त्यामुळे उर्वरित ब्लॉगमध्ये मी त्यांना अनिलदा नावानेच संबोधणार आहे. अनिलदांची संपूर्ण ३० वर्षाची कारकीर्द एका लेखात मांडणे अशक्य आहे. त्यामुळे मी त्याचे ४ भाग करायचे ठरवले आहे.
भाग १ - यात अनिलदांचे जीवन आणि एकूण संगीत कारकीर्द याचा आढावा घेणार आहे. तसेच त्यांची काही गाणी सादर करणार आहे.
भाग २ - यामध्ये प्रामुख्याने अनिलदांचे लाडके पुरुष गायक - मुकेश, तलत, मन्ना डे आणि किशोर कुमार यांची गाणी सादर करणार आहे.
भाग ३ - या भागात मी अनिल विश्वास यांनी स्वरबद्ध केलेली अप्रतिम द्वंद्वगीते सादर करेन.
भाग ४ - हा भाग संपूर्णतः फक्त आणि फक्त लता मंगेशकर यांनी गायलेल्या अनिलदांच्या संगीत रचनांवर आधारित असेल.
मला खात्री आहे की चारही भाग आपल्याला आवडतील. चला तर मग, भाग १ ची सुरुवात करू या.
साल : १९६०. स्थळ : अमेरिकेतील एक अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओ. भारतातील एक अनुभवी आणि प्रसिद्ध संगीतकार तेथील सर्व आधुनिक यंत्रसामुग्री पाहत असतो. ती पाहून झाल्यावर स्टुडिओतील माणूस त्या संगीतकाराला नम्रपणे म्हणतो की तुमच्यासारख्या मोठ्या संगीतकाराला हे सर्व माहिती असेलच. त्यावर तो संगीतकार त्याला म्हणतो "हो, मला माहिती आहे, पण या अत्याधुनिक सोयींशिवाय आम्ही हाच परिणाम साधू शकतो".
असा आत्मविश्वास ज्यांनी आपल्या संगीत रचनांमधून निर्माण केला त्या महान संगीतकाराचे नाव होते अनिल विश्वास. (बंगाली भाषेत "व" हे अक्षर नसल्याने ते "बिस्वास" असं संबोधतात)
आपल्या संगीतामध्ये विविध प्रयोग करण्याबद्दल १९६० नंतर जन्मलेल्या पिढीतील लोकांना R. D. बर्मन उर्फ पंचम हेच एकमेव नाव प्रामुख्याने माहिती आहे. त्यांच्यावर, त्यांच्या संगीत रचनांवर अनेक जणांनी लिहून ठेवलंय, अनेक लोक कार्यक्रम करत असतात. पण पंचमदांच्या कितीतरी आधी म्हणजे किमान दोन दशके आधीपासून अनिल विश्वास यांनी हिंदी सिनेसंगीतात विविध प्रयोग केले आहेत. त्यांनी केलेल्या प्रयोगांवर स्वतंत्र अभ्यास आणि लेख लिहावा लागेल. हिंदी सिनेसंगीतात सर्वप्रथम १२ वाद्यांचा वाद्यवृन्द (Orchestra) आणण्याचे श्रेय संपूर्णतः अनिलदांना जाते.
अनिलदा हे पहिले संगीतकार होते ज्यांनी हिंदी चित्रपट संगीतात Counter Melody चा यशस्वी प्रयोग केला. Counter Melody म्हणजे मुख्य गायक गाणे म्हणत असताना दुसऱ्या गायकाने वेगळ्या सुरात समांतर गाणे म्हणणे किंवा background ला समांतर वाद्यसंगीत वाजवणे. असे केल्याने गाण्याचे माधुर्य वाढते. ही पद्धत नंतर Sebastian D'Souza या प्रसिद्ध संगीत-संयोजकाने शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, सलील चौधरी या ख्यातनाम संगीतकारांबरोबर काम करताना वापरली.
Courtesy: Archisman Mozumder |
अनिल विश्वास यांनी सुधा मल्होत्रा यांना प्रथम गाण्याची संधी दिली त्यांच्या १९५१ सालच्या "आरजू" या चित्रपटात. याशिवाय तलत महमूद आणि मुकेश यांना गायक म्हणून घडवण्यात अनिलदांचा सिंहाचा वाटा आहे. लता मंगेशकर यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात नूरजहाँ यांच्या प्रभावाखालून बाहेर काढून त्यांच्या स्वतःच्या स्वरप्रतिभेची ओळख करून देण्याचे संपूर्ण श्रेयसुद्धा अनिलदांना जाते. हे कसे ते आपण पुढील भागात विस्ताराने पाहणार आहोत.
७ जुलै १९१४ रोजी तेंव्हाच्या पूर्व बंगाल (आता बांगला देश) मधील बारिसाल या गावात अनिल विश्वास यांचा जन्म झाला. बारिसाल ही तत्कालीन सुप्रसिद्ध क्रांतिकारक अश्विनीकुमार दत्त यांची कर्मभूमी होती. त्यांचे वडील जगदीशचंद्र विश्वास सरकारी नोकर होते. तर आई यामिनीदेवी यांना संगीतात गोडी होती, त्या उत्तम भजन गायच्या. १९१४ साली पहिल्या महायुद्धाचे वारे भारतातही पसरले होते. तसेच १९०५ साली इंग्रजांनी केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे त्यांच्याविरुद्ध लोकांत रोष होता. या सर्व वातावरणामुळे लहान वयातच अनिल विश्वास यांच्या मनात क्रांतीची बीजे पेरली गेली होते. त्यांनी शाळेत असताना काही काळ स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला, व यासाठी त्यांना ५-६ वेळा तुरुंगवासही भोगायला लागला होता. अखेरीस त्यांना त्यांच्या आईच्या भक्तिसंगीताने क्रांतीच्या मार्गाकडून संगीताच्या मार्गाकडे वळवले.
आई यामिनीदेवींनी लहानग्या अनिलला संगीताची शिकवणी लावली. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी अनिल तबला पारंगत झाले. याशिवाय त्यांनी शास्त्रीय संगीतातील ख्याल, ठुमरी, दादरा हे प्रकारही शिकून घेतले. बंगालमध्ये प्रचलित असलेले श्यामा संगीत आणि कीर्तन यातही त्यांनी प्राविण्य मिळवले. आईबद्दल अनिलदा कायम ऋणी राहिले, आईबद्दल बोलताना अनिलदा कबीरांच्या एका दोह्याचा उल्लेख करत तो असा:
सात समंद की मसि करौं, लेखनि सब बनराई ।
धरती सब कागद करौं, तऊ हरि-गुन लिख्या न जाई ।।
(सात समुद्रांतील पाण्याची शाई केली, सर्व वनांतील झाडांची लेखणी केली,
संपूर्ण धरतीचा कागद केला, तरी हरी म्हणजे परमेश्वराचे गुणवर्णन केले जाऊ शकत नाही.)
१९३० साली अनिलदांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मात्र अनिलदांनी कलकत्ता येथे जाण्याचा आणि आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. कलकत्यामध्ये त्यांची भेट बंगालमधील सुप्रसिद्ध कवी-संगीतकार काज़ी नजरूल इस्लाम तसेच मंजू खाँ साहेब मुर्शिदाबादी यांच्याशी झाली. या दोघांच्या सहवासात अनिलदांना गज़लचे वेड लागले.
कलकत्त्याला आल्यावर अनिलदा जिथे संधी मिळेल तिथे गात होते, अभिनय करत होते, गाण्यांना चाली लावत होते. कलकत्त्यामध्ये राहून अनिलदांनी रंगमहल थिएटर साठी " थेङक", "महानिशा", "पतिव्रता", "बांग्लार मेये" आणि "अशोक आणि रावण" ह्या नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले, त्यासाठी गाणी लिहिली, अभिनय केला आणि नृत्य सुद्धा केले! याशिवाय "कजरी" नावाच्या बॅलेची कल्पना, रचना आणि त्यात अभिनय केला. बंगाली रंगमंचावर झालेला हा पहिलाच बॅले होता.
त्यानंतर थोडा काळ अनिलदांनी हिंदुस्थान म्युझिकल कंपनीत काम केले. त्यावेळेस त्यांच्याबरोबर कुंदनलाल सहगल आणि सचिनदेव बर्मनही तिथेच काम करत होते! एके दिवशी तिथे कलकत्त्यातील प्रसिद्ध संगीतकार हिरेन बोस आले, त्यांनी अनिलदांची गाणी ऐकली होती, त्यामुळे हिरेन बोस यांनी अनिलदांना "माझ्याबरोबर मुंबईला येतोस का?" असे विचारले. मुंबईला जाण्याचा प्रस्ताव म्हणजे अनिलदांना नवीन क्षितिज खुणावते आहे असे वाटले व ते लगेच तयार झाले. पण प्रश्न होता मुंबईला जाऊन संगीतामध्ये आपली वेगळी ओळख कशी काय निर्माण करणार? अनिलदा म्हणाले की मुंबईच्या हिंदी चित्रपटांमध्ये तोपर्यंत वाद्यवृंद वापरत नव्हते, आपण आपला वाद्यवृंद घेऊन जाऊ आणि अशी नवीन गाणी करू की जी आजपर्यंत लोकांनी ऐकली नसतील. त्यांनी चार वादक शोधले की जे विविध वाद्ये वाजवण्यात निपुण होते - १) डिक्रूज - व्हायोलिन आणि पियानो, २) मिस्टर पॉवर - हवाईयन गिटार, ३) मिस्टर आबेल - गोवा संगीत निपुण, ट्रम्पेट आणि व्हायोलिन, आणि ४) लिनू अथैय्या - मेंडोलिन, व्हायोलिन आणि चेलो. अशा एकूण ६ लोकांच्या चमूने १७ डिसेंबर १९३४ रोजी मुंबईच्या धरतीवर पाऊल ठेवले. त्यानंतर घडला तो हिंदी चित्रपटसंगीताचा सुरेल, सुमधुर इतिहास!
थोड्याच दिवसांत अनिलदांना राम दरयानी यांच्या अजंठा स्टुडिओज (Eastern Art Syndicate) मध्ये नोकरी मिळाली. आणि १९३५ साली प्रदर्शित झालेल्या "धर्म की देवी" या चित्रपटाने अनिलदांचा संगीतकार म्हणून हिंदी चित्रसृष्टीत प्रवेश झाला. दिग्दर्शक होते त्यांचे मित्र हिरेन बोस. अनिलदा यांनी या चित्रपटात एका फकिराची भूमिका पण केली होती. "धर्म की देवी" मध्ये एकूण ३ गाणी होती, त्यातील पहिले गाणे "कुछ भी नहीं भरोसा, दुनिया है आनी जानी" हे अनिलदांनी एका सिंधी लोकगीताच्या चालीवर तयार केले होते. आणि योगायोग म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचे गाणे १९६५ मधील “छोटी छोटी बातें” या चित्रपटातील “अंधी दुनिया, मतलब की दुनिया, हाय रे दुनिया” हेही गाणे एका सिंधी गाण्याच्या प्रकारावरून रचलेले होते. त्यामुळे अनिलदा असं गंमतीने म्हणायचे की “माझं सर्व चित्रपट संगीत दोन सिंधी गाण्यांच्या मध्ये सँडविच झाले होते!” 😀😂
Ashalata Biswas |
Mehboob Khan |
"जागिरदार" च्या यशानंतर अनिलदांनी सागर मूव्हीटोन बरोबर आणखीन काही चित्रपटांचे स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन केले. १९३९ मध्ये सागर मूव्हीटोन ही कंपनी नॅशनल स्टुडिओज या कंपनीत विलीन झाली. तिथे अनिलदांनी एकूण ९ चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी २ चित्रपट त्यातील गाण्यांमुळे खूप गाजले. "औरत" (१९४०) आणि "रोटी" (१९४२) हे ते चित्रपट होत. "रोटी" मध्ये अख्तरीबाई फैजाबादी या प्रमुख भूमिकेत होत्या, ज्या पुढे बेग़म अख़्तर म्हणून प्रसिद्ध गायिका आणि गज़ल सम्राज्ञी म्हणून ओळखल्या गेल्या.
१९४२ च्या शेवटी अनिलदांनी बॉम्बे टॉकीज येथे काम सुरु केले. १९४३ साली प्रदर्शित झालेला "किस्मत" हा अशोककुमार, मुमताज शांती यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रचंड गाजला, त्याबरोबरच त्यातील गाणीही. अमीरबाई कर्नाटकी यांनी गायलेली २ गाणी "धीरे धीरे आ रे बादल धीरे आ रे" आणि "घर घर में दिवाली है" तसेच अनिल विश्वास यांची बहीण पारुल घोष (सुप्रसिद्ध बासरीवादक पं. पन्नालाल घोष यांची पत्नी) यांनी गायलेले "पपीहा रे मेरे पिया से कहियो जाय" ही गाणी आजही रसिकांना आवडतात. याच चित्रपटातील "दूर हटो ऐ दुनियावालों हिंदुस्तान हमारा है" या गाण्याने जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत फुलवली. "किस्मत" चित्रपट भारतीय चित्रसृष्टीतीतील पहिला चित्रपट ठरला ज्याने त्या काळात १ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि जो कलकत्त्यातील रॉक्सि सिनेमा थिएटर मध्ये तब्बल १८७ आठवडे चालला. हा विक्रम "शोले" चित्रपट येईपर्यंत अबाधित होता!
१९४४ मध्ये आलेल्या "ज्वार भाटा" या दिलीप कुमार याच्या पहिल्या चित्रपटाला अनिलदा यांचेच संगीत होते. तसेच १९४५ मधील "पहली नज़र" या चित्रपटात अनिलदांनी मुकेश माथूर या नवोदित गायकाला चित्रपट गीत गायनाची प्रथम संधी दिली.
१९४७ मध्ये अनिलदांनी बॉम्बे टॉकीज सोडली आणि स्वतंत्र संगीतकार म्हणून काम करायचे ठरवले. स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केल्यानंतर अनिलदांच्या प्रतिभेने पुढील दहा वर्षात अशी काही झेप घेतली ज्यातून निर्माण झाले "अनिलदा युग". या युगाची सुरुवात झाली १९४८ मध्ये आलेल्या "अनोखा प्यार" या चित्रपटाने. याच चित्रपटाद्वारे अनिल विश्वास आणि लता मंगेशकर या सिनेसंगीतातील बहु-प्रतिभाशाली जोडीची सुरुवात झाली. अनिलदांनी एके ठिकाणी म्हटलंय "लता चित्रपट संगीत क्षितिजावर आली आणि आम्हा संगीतकारांना जणू काही संगीताचे विविध प्रयोग करण्याचे भले मोठे दालन खुले झाले कारण तिचा कोवळा पण धारदार आवाज, तिची रेंज आणि मुख्य म्हणजे तिची शास्त्रीय संगीताची जबरदस्त तयारी". याविषयी अधिक जाणून घेऊ या शेवटच्या म्हणजे चौथ्या भागात.
१९४९ सालच्या "आरजू" चित्रपटातून अनिलदांनी आणखीन एका नौजवान पण होतकरू गायकाला संधी दिली, आत्मविश्वास दिला, त्याचे नाव होते तलत महमूद.
१९५४ साली अनिल विश्वास आणि आशालता यांचा घटस्फोट झाला. पुढे १९५९ साली अनिलदांनी त्यांची १९४८ मधील "अनोखा प्यार" चित्रपटापासूनची गायिका मीना कपूर हिच्याशी विवाह केला.
१९४८ ते १९५९ या बारा वर्षात अनिलदांनी खालील २३ चित्रपटातून २०१ एक-से-एक सुमधुर,लाजवाब आणि अजरामर गाणी रसिकांना दिली. यातील प्रत्येक गाणं म्हणजे बावनकशी सोनं आहे.
अनिल विश्वास यांनी त्यांच्या १९३५ ते १९६५ अशा तब्बल ३१ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण ९४ चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी मी संकलित केलेल्या यादीनुसार एकूण ७४ हिंदी चित्रपटातून ५७९ गाणी आहेत. १९३५ ते १९४७ या काळात विविध कंपन्यांमध्ये संगीतकार म्हणून नोकरी करत असताना अनिलदांनी एकूण २७ चित्रपटात २१८ गाणी स्वरबद्ध केली होती. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीच्या ३५% चित्रपट आणि ३७% गाणी त्यांनी पहिल्या १२ वर्षातच दिली!
अनिलदांनी एकूण ७५ गायकांना आपली गाणी गाण्याची संधी दिली. त्यातील २२% गाणी एकट्या लताने म्हटली आहेत!
ज्याला "अनिल विश्वास संगीत शाळा" (Anil Biswas School of Music) असे म्हणता येईल, त्यातून रोशन, मदनमोहन, सी. रामचंद्र आणि ओ. पी. नय्यर अशा अनेकांनी प्रेरणा घेऊन, शिकून पुढे स्वतःची दैदिप्यमान कारकीर्द घडवली. म्हणूनच ९०च्या दशकातील एका कार्यक्रमात नौशाद आणि ओ. पी. नय्यर यांनी अनिलदांना "हिंदी चित्रसंगीताचे भीष्म पितामह" अशी उपमा दिली.
अनिलदांना १९८६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. पण या महान संगीतकाराला इतक्या वर्षांनंतरही प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार मिळू शकला नाही याची खंत रसिकांना वाटत राहील.
१९६५ साली आलेला "छोटी छोटी बातें" हा अनिलदांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर अनिलदा चित्रपट दुनियेतून स्वतःहून बाजूला झाले. १९६३ ते १९६५ अनिलदा All India Radio च्या राष्ट्रीय वाद्यवृंदाचे संचालक होते. १९८४ साली दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका "हम लोग" याचे संगीतही अनिलदांनीच दिले होते.
असा हा महान, प्रतिभावान संगीतकार ३१ मे २००३ रोजी आपल्याला सोडून गेला. अनिलदांचे "ऋतू आये ऋतू जाये" हे चरित्र ज्यांनी लिहिले आहे त्या शरद दत्त यांना मुलाखत देताना अनिलदांनी त्याचा शेवट खालील कविता ऐकवून केला होता. आज आपण त्यांचे स्मरण त्याच कवितेतून करू या.
अफ़सोस अजल ले चली मैखाने से
बन जाएँगे कुछ देर में अफ़साने सें |
मेरे गीत बेवजह गर याद आ जाएँ
छलका देना इक जरा पैमाने सें ||
(माझा मृत्यू मला या मधुशालेतून घेऊन चालला आहे,
याचे मला दुःख आहेच
आता काही वेळातच यावर गीते बनतील.
जर माझी गीते विनाकारण आठवली
तर तुमच्या प्याल्यातून जरा ती हिंदकळू देत)
आजच्या भागात मी अनिलदांनी स्वरबद्ध केलेली ६ गाणी सादर करणार आहे जी त्यांचे प्रमुख गायक/गायिका सोडून इतरांनी गायली आहेत.
१) काहे करता देर बाराती - औरत (१९४०) - गायक स्वतः अनिल विश्वास आणि समूह - गीतकार डॉ. सफदर आह
या चित्रपटात एकूण १४ गाणी होती, त्यापैकी ६ गाण्यांना अनिलदांनी आपला आवाज दिला आहे. या चित्रपटातील हे सर्वात प्रभावी गीत. चित्रपटाची कथा शेतकरी आणि कुटुंबाची असल्याने अनिलदांनी यातील गाणी करताना भारतीय शास्त्रीय संगीताला लोकसंगीताची जोड दिली. पुढे १९५७ साली याचाच रिमेक "मदर इंडिया" आला, बाकी सर्व तेच होते, फक्त त्यात अनिल विश्वास नव्हते.
२) दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा है - किस्मत (१९४३) - अमीरबाई कर्नाटकी, अरुणकुमार, प्रदीप आणि अनिल विश्वास - गीतकार कवी प्रदीप
डाव्या विचारांचा लहानपणापासून असलेला प्रभाव, त्यातून निर्माण झालेली इंग्रजांविषयीची चीड या सर्वांचा उपयोग अनिलदांनी या गाण्यातून केला आहे. प्रचंड ताकदीचे हे समूहगीत आहे. या गाण्यांतून जोश निर्माण करण्यासाठी अनिलदांनी लष्कराच्या बँडच्या धर्तीवर स्वररचना केली आहे.
३) मैं उनकी बन जाऊं रे - हमारी बात (१९४३) - पारुल घोष - गीतकार पं. नरेंद्र शर्मा
अनिलदांनी स्वरबद्ध केलेले हे आणखी एक गोड गीत. त्यांच्या बहिणीच्या म्हणजे पारुल घोष यांच्या आवाजात. यातील तालवाद्य ऐकताना बंगाली रवींद्र संगीताचा भास होतो.
४) दूर पपीहा बोला रात आधी रह गयी - गजरे (१९४८) - सुरैय्या - गीतकार गोपाल सिंग नेपाली
सुरैय्याने अनिलदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या एकूण १४ सोलो गीतांपैकी हे सर्वात गाजलेले सुरेल गाणे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मोतीलाल आणि सुरैय्या होते.
५) ले जा उसकी दुवाएं ओ, जो तेरा हो ना सका - हीर (१९५६) - मोहम्मद रफ़ी - गीतकार मजरूह सुलतानपुरी
रफींनी अनिलदांकडे फक्त ४ सोलो गाणी म्हटली आहेत. त्यातील हे एक दर्दभरे गीत. अनिलदा आणि रफी ही जोडी का जमली नाही हे एक रसिक म्हणून मला पडलेलं कोडंच आहे. रफी साहेबांनी या गाण्यात नेहमीप्रमाणे आपला जीव ओतलाय.
६) कच्ची है उमरिया कोरी है चुनरिया - चार दिल चार राहें (१९५९) - मीना कपूर - गीतकार साहिर लुधियानवी
ख्वाजा अहमद अब्बास या साम्यवादी दिग्दर्शकाने या चित्रपटातून तत्कालीन भारतीय समाजात घडणारे बदल चार वेगवेगळ्या कथांमधून दाखवले आहेत. या चित्रपटात राज कपूर, शम्मी कपूर, मीना कुमारी, अजित, निम्मी, अन्वर हुसेन, नाना पळशीकर अचला सचदेव आणि डेव्हिड अशी तारकांची मांदियाळी होती. हे मीना कपूर यांनी गायलेले, मीना कुमारीवर चित्रित झालेले आणि तुफान गाजलेले गीत. या गाण्यात मीनाकुमारी एक आदिवासी अस्पृश्य मुलगी दाखवली आहे. ती राहत असलेल्या आदिवासी पाड्यावर हे गीत सादर होते, त्यामुळे अनिलदांनी लोकसंगीताचा खुबीने वापर करून वातावरण निर्मिती छान केली आहे. गाण्याचा वेग आणि कोरस यांनी गाण्याला उठाव येतो.
अनिलदांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. आशा आहे की आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल. आपली प्रतिक्रिया ब्लॉगच्या खाली जरूर नोंदवा. धन्यवाद.
संदर्भ:
१) ऋतू आये ऋतू जाये - संगीतकार अनिल विश्वास यांचे चरित्र - मूळ लेखक शरद दत्त - मराठी अनुवाद शरयू पेडणेकर - प्रथम आवृत्ती पद्मगंधा प्रकाशन
२) विकिपीडिया
३) लता मंगेशकर - एका गायिकेचा प्रवास - मूळ लेखक राजू भारतन - मराठी अनुवाद सौ. लीना सोहोनी - द्वितीय आवृत्ती मेहता पब्लिशिंग हाऊस
४) सर्व फोटो इंटरनेट वरून साभार
५) गाण्यांची यादी https://m.hindilyrics4u.com/music_director/anil_biswas.php?page=59 वरून साभार
६) Biography of Anil Biswas by David Courtney https://chandrakantha.com/biodata/Anil_Biswas.html
७) Tribute - Anil Biswas https://ywgh.wordpress.com/2022/07/05/tribute-anil-biswas/
Great, as always!
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण लेख. त्याला मधुर संगीताची जोड. दूर पपीहा आणि मोहे भी रंग देता जा ही माझी अतिशय आवडती गाणी आज खूप वर्षांनी ऐकायला मिळाली, तसेच इतरही गाणी फार अवीट गोडीची आहेत. पुढील भाग वाचण्याची आणि ऐकण्याची उत्सुकता वाढली आहे.
ReplyDeleteखुप छान, माहितीपूर्ण लिखाण
ReplyDeleteरंजक लिखाण
ReplyDeleteछान माहितीपूर्ण लेख. - निनाद
ReplyDelete