दि. ३१ जानेवारी
२०१७. माझे बाबा – कै. रघुनाथ बाळकृष्ण सप्रे – यांना जाऊन आज ८ महीने उलटून गेले.
जवळपास ५० वर्षे लाभलेला त्यांचा सहवास, त्यांचा पाठिंबा व मार्गदर्शन त्या दिवशी
थांबले; पण त्यांच्या आठवणी थांबत नाहीत, त्यापैकीच काही शब्दबद्ध करण्याचा हा
प्रयत्न.
बाबांचा जन्म सातारा
जिल्ह्यातील कराड येथील, साल १९३३. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने
अर्थार्जनासाठी आजोबा-आजी व सारे कुटुंब (म्हणजे ५ मुले व 2 मुली) सातारा येथे
स्थायिक झाले होते. आजोबा एका दुकानात नोकरी करायचे व त्यातून कसाबसा घर-संसार
चालवायचे. बाबांचे शालेय शिक्षण साताऱ्याच्या दगडी शाळेत म्हणजे न्यू इंग्लिश
स्कूल मध्ये झाले. लहानपणापासून त्यांच्या अंगात चित्रकला होती, ती त्यांनी
आयुष्यभर जोपासली. शाळेत असताना त्यांनी नखचित्रांच्या स्पर्धेमध्ये एक मोठा
गालिचा काढला होता; त्याला बक्षीस मिळाले होते. पुढे त्यांनी गांधीजी, टिळक आदींची
नखचित्रे काढली, ती आजही आमच्या संग्रही आहेत.
१९४८ साली
गांधीवधानंतर झालेल्या दंगलीत सातारा जिल्ह्यातील अनेक ब्राह्मणांची घरे जाळली
गेली त्यात आमचा बोरखळ, सातारा येथील वाडा होता. १९५७ साली झालेल्या कुळकायद्याने
उरलीसुरली जमीनही गेली. त्यामुळे आजोबांच्या तुटपुंज्या पगाराव्यतिरिक्त कुठलाही
आर्थिक स्रोत राहिला नाही. नाईलाजास्तव थोरले काका व बाबा यांना वयाच्या विसाव्या
वर्षीच नोकरी शोधण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडावे लागले. बाबा साधारण १९५१-५२
साली पुण्यात आले. त्यांच्या चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांना खरे तर मुंबईला J. J. School of Arts मध्ये जायचे होते; पण आर्थिक कारणाने जमले नाही.
पुण्याला आल्यावर ते
त्यांचे मावसभाऊ – श्री. वासुदेवराव गोळवलकर उर्फ वासूनाना – यांचे शनिवार पेठेतील
छोट्याशा घरात जवळपास ४ वर्षे राहिले. वासूनानांचे घर लहान होते शिवाय त्यांचा
स्वतःचा संसार. असे असूनही त्यांनी व सुमतीकाकुनी बाबांना अपार मायेने सांभाळले.
वासूनानांकडे राहत
असताना बाबांना रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक पू. श्री. गुरुजी यांचा थोडा काळ सहवास लाभला. श्री. गुरुजी हे
वासूनानांचे सख्खे चुलतभाऊ. त्यामुळे ते पुण्यात आले की वासूनानांकडे त्यांची चक्कर
ठरलेलीच. वासुनानांच्या लग्नाचे आदले दिवशी रात्री उशिराने गुरुजी पुण्यातील सुयोग
मंगल कार्यालयात आले होते व १०:३०/११ चे पुढे सर्वांसाठी त्यांनी स्वहस्ते चहा
बनवला होता अशी आठवण बाबा सांगत. तसेच एकदा बाबा पूजा करत असताना गुरुजी तिथे आले
व काय रे सयंत्र पूजा करतोस की समंत्र असे विचारून समंत्र करत जा असे सांगून गेले.
बाबांचा रा. स्व.
संघाशी संबंध लहानपणापासूनच आला. सातारा येथील प्रताप सायं शाखेचे ते स्वयंसेवक
होते. त्यामुळे शिस्त व देशभक्ती याचे बाळकडू त्यांना तेथूनच मिळाले. घराची
जबाबदारी व आर्थिक परिस्थिती यामुळे त्यांना पूर्ण वेळ संघाचे प्रचारक म्हणून काम
करता आले नाही; ती कसर त्यांनी पुढे अनेक वर्षे विविध सामाजिक कामे करून भरून
काढली.
डेक्कन कॉलेजमधे
बाबांना डॉ. ह. धी. सांकलिया, डॉ. म. श्री. माटे, डॉ. म. के. ढवळीकर, इरावती
कर्वे, डॉ. राजगुरू, डॉ. मिश्रा इ. पुरातत्व व इतिहास विषयातील विद्वानांबरोबर काम
करण्याची संधी मिळाली. बाबांचा प्रामाणिकपणा, निस्पृहतेने काम करण्याची वृत्ती,
निर्व्यसनीपणा, तसेच कामातील कौशल्य यामुळे या सर्वांचेच ते लाडके होते.
कामानिमित्त बाबा वर्षातून २-३ महिने बाहेरगावी उत्खननासाठी जायचे. त्यावेळेस 5 स्टार हॉटेल्सची सोय नव्हती. जंगलात तंबूमध्ये राहावे लागायचे. १९६९ साली इनामगाव येथील उत्खनन खूप गाजले. बाबांचा फोटो व नाव दै. सकाळ मधे छापून आले होते. इनामगावाबरोबरच दौलताबाद, भीमबेटका, मध्य प्रदेश इ. ठिकाणी उत्खनने होत. त्यामुळे बाबांचे घराबाहेर २-३ महिने राहणे नित्याचेच होते.
पुढे १९६४ साली
आई-बाबांचे लग्न झाले. आई L. I. C. मधे नोकरी करायची; त्यामुळे डेक्कन कॉलेज क्वार्टर्स मधून
नोकरीकरता रोज गावात लक्ष्मी रोडला येणे लांब पडू लागले. म्हणून त्यांनी लक्ष्मी
रोडला वैद्य नानल यांच्या वाड्यात (सध्या गाडगीळ सराफांचे दुकान आहे त्याच्या
बरोबर समोर – आज तेथे नानल सदन म्हणून ४ मजली इमारत आहे) २ खोल्या भाड्याने
घेतल्या. माझा जन्म १९६६ सालचा तिथलाच. त्या काळात गणेशोत्सवाची मिरवणूक सोडली तर
लक्ष्मी रोड खूप शांत असायचा. तिथून बाबा रोज १०-१२ कि. मी. वर असलेल्या डेक्कन
कॉलेजला सायकलने जायचे. त्यांनी त्यावेळेस प्रसिद्ध Raleigh कंपनीची २७ इंची
सायकल घेतली होती.
पुढे काही कारणांनी
लक्ष्मी रोडची जागा सोडावी लागली. १९७० साली आम्ही सहकारनगर येथील श्री. नातू
यांच्या बंगल्यात ६ महिने भाड्याने राहिलो व नंतर एरंडवणे येथील स्वरूप सोसायटी
(सध्याच्या म्हात्रे पूल सिग्नलच्या चौकात) येथे २ खोल्या भाड्याने घेतल्या. तेथे
जवळपास वर्षभर राहून १९७२ ला आम्ही शनिवार पेठ येथील ओक वाड्यात (सध्याच्या
मुरलीधर अपार्टमेंट शेजारी – सुयोग मंगल कार्यालयासमोरील गल्ली) राहावयास आलो.
तिथे आमचा मुक्काम ४ वर्षे होता. इथेच माझे व माझ्या बहिणीचे – शुभाचे – सर्व
बालपण गेले आहे.
शनिवार पेठ परिसर
खूपच शांत होता. आई-बाबा दोघेही नोकरी करत असले तरी ६ वाजेपर्यंत घरी यायचे.
त्याकाळात T. V., Internet, Mobile आदी गोष्टी नसल्याने रोज सायंकाळी आई-बाबांचा हात धरून लांब
फिरून येणे हा कार्यक्रम नित्याचाच होता. कधी बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी बाग, तर
कधी कुमठेकर रोडवरचे स्वीट होम, सुजाताची मिसळ. आई-बाबा दोघेही आमच्यासाठी खूप वेळ
काढत असत. आमच्या दोनच खोल्या होत्या. बाहेरच्या खोलीत जुना Valve चा रेडीओ होता, तो आईला स्वयंपाकघरात ऐकता यावा
म्हणून बाबांनी एक Speaker आणून तो जोडला होता. सकाळी ६ वाजलेपासून ते रात्री १०
वाजेपर्यंत अखंड रेडीओ व गाणी यांनी आमचे बालपण समृद्ध केले.
१९७५ साली आणीबाणी
आली. पुढे १९७७ साली लोकसभा निवडणुका झाल्या. त्यावेळेला बाबांचा हात धरून शनिवार
वाड्यावरील सर्व प्रमुख सभांना गेल्याचे आठवते. पु. ल., राजनारायण, मधु दंडवते,
सुब्रमण्यम स्वामी, वाजपेयी यांच्या सभा अजूनही आठवतात. आमच्या बालवयात बाबांनी
आम्हाला उत्तमोत्तम नाटके व चित्रपट दाखवले. १९७९ साली गोव्याला सहलीसाठी गेलो
असताना पणजी येथील चित्रपटगृहात जाऊन अमर-अकबर-अँथनी चित्रपट पाहिल्याचे अजूनही
स्मरते. त्यांच्यामुळे मॅजेस्टीक गप्पा व पुस्तके वाचायची आवड लागली. त्या काळात
बाबांनी प्रकाशक रा. ज. देशमुख यांच्या पुस्तक योजनेतून स्वामी, ययाती, व्यक्ती
आणि वल्ली, इ. पुस्तके खरेदी केली होती. ही पुस्तके आजतागायत किती वेळा वाचून
काढली आहेत याची गणतीच नाही.
माझी शाळा भांडारकर
रोडवरील बाल शिक्षण मंदिर. बाबा मला रोज सायकलने शाळेत सोडायचे व संध्याकाळी
शाळेशेजारीच राहात असलेल्या माझ्या आजीकडे मला घ्यायला यायचे. रोजची जवळपास २० ते
३० कि. मी. सायकलची रपेट करूनसुद्धा पुन्हा संध्याकाळी आम्हाला घेऊन फिरायला
न्यायचा उत्साह त्यांच्यामध्ये होता. आज मी स्वतः बाबा झाल्यावर यामागचे कष्ट मला
जाणवतात.
पुढे १९७६ मध्ये
आई-बाबांनी पटवर्धन बाग, एरंडवणे येथे 1 BHK Flat विकत घेतला. तेथून आमच्या
जीवनाने एक वेगळेच वळण घेतले. वाडा संस्कृतीतून Flat संस्कृतीमध्ये स्थलांतर
व्हायला थोडा वेळ लागला. पण तोपर्यंत जरा आर्थिक स्थैर्य आले होते. त्यामुळे १९८०
चे सुमारास घरात पहिला Black & White
TV आला. तसेच Lambretta स्कूटर पण आली.
आर्थिक स्थैर्य आले
म्हणून म्हणा किंवा तोपर्यंत दोन्ही मुले जराशी स्वतंत्र झाली म्हणून असेल,
बाबांना जरा वेळ मिळू लागला, पण त्यामुळे स्वस्थ बसतील तर ते बाबा कसले? आतमध्ये
असलेली सामाजिक कामाची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे त्यांनी पटवर्धन
बागेत विवेकानंद केंद्राची शाखा १९७८ ला सुरु केली व सलग ५-६ वर्षे एकट्याने
चालवली. रोज संध्याकाळी व रविवारी सकाळी १ तास शाखा असे. त्यात मैदानी खेळ,
व्यायाम, सूर्यनमस्कार, देशभक्तीपर गाणी, अधून मधून मोठ्या व्यक्तींच्या
भेटी/भाषणे असा कार्यक्रम असे. आसपासच्या परिसरातील जवळपास ३०-४० मुले नियमित
शाखेत येत. त्यांच्यात देशभक्तीची/समाजसेवेची बीजे रोवण्याचे मोठे काम बाबांनी मन
लावून केले. या कार्यात त्यांनी अनेक मोठ्या व्यक्तींना जोडून घेतले होते.
१९७९ च्या सुमारास
नवसह्याद्री/कर्वेनगर येथे एक Convent School सुरू करण्याचा घाट घातला जात आहे असे
त्यांना कळले. Convent शाळेत मिळणारे इंग्रजी माध्यमातील शिक्षण हे आपल्या
माती/संस्कृतीपासून मुलांना दूर नेते व त्यांना काळे साहेब बनवते अशी बाबांची ठाम
धारणा होती. त्याला उत्तर म्हणून आपणच आपल्या संस्कृतीचे शिक्षण देणारी इंग्रजी
माध्यमातील शाळा का सुरू करू नये या विचाराने काही मित्रांना बरोबर घेऊन १९७९ साली
ज्ञानदा प्रतिष्ठान ही संस्था सुरु केली. जागा मिळवण्यासाठी महानगरपालिकेत असंख्य
खेटे घातले, देणग्या गोळा करण्यासाठी घरोघरी जाऊन अतोनात परिश्रम घेतले.
नवसह्याद्री सोसायटी मधील एका मित्राच्या सहकार्यातून त्यांच्याच बंगल्यात चालू
केलेली २ वर्गांची शाळा आज ३८ वर्षानंतर पूर्ण १० वी पर्यंत कार्यरत आहे. शाळेचा
विद्यार्थी वर्ग हा प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील असावा या
उद्देशाने सुरु केलेली ही शाळा. त्याचा १० वी चा निकाल गेली कित्येक वर्षे ९०%
किंवा अधिक लागत आहे.
१९७९-९४ अशी १५
वर्षे ज्ञानदा संस्थेचे काम करून बाबा थांबले. पुढे पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष
म्हणूनही काही वर्षे त्यांनी काम केले. बाबांच्या कल्पनेतून साकारलेल्या विविध
कल्पना शाळेत यशस्वीरीत्या राबवल्या गेल्या. त्यांचे अखंड परिश्रम पाहून एक
विना-अनुदानित शाळा उभी करणे व ती चालवणे हे किती जिकीरीचे काम आहे ते कळले.
विशेषतः आर्थिक सोंग आणता येत नाही. मग Convent शाळा इतकी वर्षे बिनबोभाट कशा काय
चालतात या कोड्याचा उलगडा झाला.
ज्ञानदा शाळेच्या
निमित्ताने बाबांनी अनेक मोठी माणसे शाळेच्या/संस्थेच्या कामाशी जोडली. त्यात
उद्योगपती M. K. मेहेंदळे, डॉ. वर्तक, रमणबाग प्रशालेचे माजी मुख्याध्यापक राजाभाऊ लवळेकर हे होते. तसेच शाळेच्या
इमारतीच्या भूमीपूजनाला १९८० साली रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्री.
बाळासाहेब देवरस स्वतः आले होते. चांगल्या व्यक्तींच्या जोडण्यामुळे एक चांगली
संस्था उभी राहू शकते हे बाबांनी दाखवून दिले.
हे सर्व करत असताना
त्यांच्यातला कलाकार त्यांनी सतत जागा ठेवला. १९७८ साली पटवर्धन बागेतील गणेशोत्सव
मंडळाच्या देखाव्यासाठी अवघ्या ३ दिवसात त्यांनी Water Colour मध्ये अष्टविनायक
काढून दिले. आठही गणपतींचे रंग एकसारखे आहेत. ज्यांना चित्रकलेमधील ज्ञान आहे
त्यांना हे किती अवघड आहे हे लक्षात येईल. माझ्याकडून परमेश्वरानेच हे करून घेतले
अशी त्यांची भावना होती.
१९८० च्या दशकात
त्यांनी Screen Printing ही कला शिकून घेतली. अनेक लोकांच्या लग्नपत्रिका/Visiting
Cards हाताने Design करून Screen Printing च्या माध्यमातून छापल्या. त्यासाठी
लागणारी शाई, साहित्य ते स्वतः पारखून घ्यायचे. घेतलेले काम वेळेत पूर्ण करून
देण्यासाठी झोकून देऊन काम करायचे. आमची मदत फक्त पत्रिका/कार्ड्स वाळत घालणे व
वाळल्यावर उचलून गठ्ठा करणे एवढेच असे पण त्याबद्दल त्यांनी कधी तक्रार केली नाही.
त्यांना इतर
कलांविषयी खूप प्रेम व आस्था होती. त्या कला जाणून घेण्यासाठी ते धडपड करायचे.
उ.दा. सुतार, गवंडी, Plumber, Electrician या सर्व लोकांच्या कामामागचे कौशल्य /
Engineering त्यांना भारून टाकायचे. त्यामुळे आमच्या सोसायटीतील पंप बिघडला किंवा
दिवे गेले की लोक बाबांना बोलवायचे व बाबाही तत्परतेने मदत करायचे. पण या
मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याइतका मनाचा मोठेपणा सोसायटीतील सभासदांकडे
नव्हता.
त्यांना चित्रकलेची
मनापासून आवड होती. त्यामुळे कुठल्याही कलाकाराचे एखादे चांगले चित्र दिसले की ते
संग्रह करून ठेवायचे. त्यांच्यामुळे आम्हाला दिनानाथ दलाल, आचरेकर, बेंद्रे,
भय्यासाहेब ओंकार, रविवर्मा यांच्याबद्दल माहिती झाली. दलालांच्या चित्रांचे तर ते
भोक्तेच होते. दीपावली मासिकाची अनेक मुखपृष्ठे आजही आमच्या संग्रही आहेत.
डिसेंबर १९९९ साली बाबांची Angioplasti झाली. त्यानंतर बरोबर ६ महिन्यांनी ते माझ्याकडे Ipswich, London इथे आले होते. जवळपास ४ महिने त्यांचा मुक्काम होता. त्यात ते एका Travel कंपनीतर्फे पॅरिस बघून आले. पण मोनालिसाचे जगप्रसिद्ध चित्र असलेले Louvre Museum काही त्यांना बघता आले नव्हते. त्यामुळे ते अस्वस्थ होते. मग मी व बाबा शुक्रवारी रात्री लंडनहून बसने पॅरिसला गेलो. शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत Louvre Museum फिरून बघितले. त्यावेळेला त्यांना झालेला अपार आनंद मी आजही विसरू शकत नाही. ते सतत ६ तास फिरत होते व अक्षरशः झपाटल्यासारखे प्रत्येक चित्र बघत/अभ्यासत होते. त्यानंतरही आम्ही २-३ Museums बघितली व संध्याकाळीच्या बसने रविवारी सकाळी लंडनला परत आलो. अवघ्या ६ महिन्यांपूर्वी झालेल्या हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर एकूण ४० तासांचा कार्यक्रम त्यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर पार पाडला होता!
Ipswich, London ला
असताना सुद्धा ते स्वस्थ बसले नव्हते किंबहुना त्यांचा तो स्वभावच नव्हता. माझ्या
मुलाला – नचिकेतला (तो त्यावेळी २ वर्षांचा होता) फिरायला नेणे, त्याच्याबरोबर
खेळणे हा त्यांचा रोजचा कार्यक्रम होता.
त्यावर्षीच्या गणेशोत्सवात आम्ही MBT मधील सर्व मराठी मंडळी जमलो असताना बाबांनी तुमच्या Ipswich च्या ग्रंथालयात मराठी पुस्तके का नाहीत असा विषय काढला. त्यातून सर्वांनी काही वर्गणी जमा करून जवळपास २०० पौंड बाबांकडे दिले. बाबा पुण्यात आल्यावर अप्पा बळवंत चौकात जाऊन आम्ही दिलेल्या यादीनुसार सर्व पुस्तके खरेदी केली व ती MBT मार्फत Ipswich ला पाठवली. आज तेथील ग्रंथालयात जवळपास २०० पेक्षा अधिक मराठी पुस्तके आहेत व पुढील सर्व पिढ्यांना ती वाचायला उपलब्ध आहेत याचे सर्व श्रेय बाबांनाच जाईल.
त्यावर्षीच्या गणेशोत्सवात आम्ही MBT मधील सर्व मराठी मंडळी जमलो असताना बाबांनी तुमच्या Ipswich च्या ग्रंथालयात मराठी पुस्तके का नाहीत असा विषय काढला. त्यातून सर्वांनी काही वर्गणी जमा करून जवळपास २०० पौंड बाबांकडे दिले. बाबा पुण्यात आल्यावर अप्पा बळवंत चौकात जाऊन आम्ही दिलेल्या यादीनुसार सर्व पुस्तके खरेदी केली व ती MBT मार्फत Ipswich ला पाठवली. आज तेथील ग्रंथालयात जवळपास २०० पेक्षा अधिक मराठी पुस्तके आहेत व पुढील सर्व पिढ्यांना ती वाचायला उपलब्ध आहेत याचे सर्व श्रेय बाबांनाच जाईल.
माझे व माझ्या
बहिणीचे शिक्षण उत्तर रीतीने पूर्ण व्हावे म्हणून आई-बाबा दोघांनी अपार कष्ट
घेतले. आम्हाला शिकत असताना घरातील एकही काम करावे लागले नाही. त्यांच्या भरभक्कम
पाठिंब्यामुळेच मी माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू शकलो. पुढे माझे लग्न होऊन
मुले झाल्यावर सुद्धा दोन्ही नातवंडांना ग्राउंडवर नेणे, त्यांच्याबरोबर खेळणे,
आम्ही दोघेही नोकरीवरून घरी येईपर्यंत त्यांना सांभाळणे इ. कामे आई-बाबा दोघांनी
अनेक वर्ष केली. त्याचे मोल आम्हाला आज कळते आहे.
बाबा म्हणजे चिरंतन
उत्साह, भरपूर Positivity आणि प्रचंड आशावाद यांचे सुंदर मिश्रण होते. कुठल्याही
कामात पुढाकार घेऊन झोकून देण्याची त्यांची वृत्ती खरोखर वाखाणण्याजोगी आणि
अंगीकारण्याजोगी होती. ते दिवसाच्या कुठल्याही वेळी कुठलेही काम करायला सदैव तयार
असायचे. स्वयंपाक हा त्यांचा आणखी एक हातखंडा आवडीचा विषय. पाव-सँपल (मटार उसळ) ते
अप्रतिम बनवायचे. शिवाय विविध उसळी, पोळ्या, कांद्याची आमटी, भजी इ. पदार्थही
चांगले बनवायचे व इतरांना खाऊ घालायचे. सकाळचा पहिला चहा व दुपारच्या
विश्रांतीनंतरचा चहा हा त्यांच्या हातचा प्यायची मजा काही औरच असायची.
जवळपास १०
वर्षांपूर्वी म्हणजे वयाची सत्तरी ओलांडून गेल्यावर त्यांनी एका संस्थेचे काम
करताना त्यांच्या सभासदांची माहिती संगणकावर भरता यावी म्हणून MS Excel शिकून घेतले होते. व
साधारण ७००-८०० सभासदांची माहिती स्वतः भरली होती.
त्यांचा नातू – नचिकेत – हा नुकताच NDA मध्ये भरती झाला आहे; त्याला पुढे Armyत जायचे आहे. त्यासाठी त्याला आम्ही ११-१२वी औरंगाबाद येथील Services Preparatory Institute मध्ये घातला होता. तिथे राहून त्याने ११वी/१२वी च्या शिक्षणाबरोबरच लष्कराचेही शिक्षण घेतले आहे. या गोष्टींचे बाबांना खूप कौतुक होते. त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा २-३ वेळा ते आमच्या बरोबर नचिकेतला भेटायला औरंगाबाद येथे आले होते व पूर्ण दिवस हिंडून-फिरून त्यांनी सर्व पाहिले. नचिकेत अजून ४ वर्षांनी शिक्षण पूर्ण करून जेंव्हा लष्करात भरती होईल ते बघायला बाबा नसतील; पण त्यांचे देशभक्तीचे गुण त्यांनी आपल्या नातवाच्या रूपाने पुढे नेले आहेत असे आम्हाला वाटते.
Atishay sundar. sapre kakanna anekwela bhetle tevha tyanchya vyaktimatwat jya jya goshti janawlya, tya khasac ya lekhat utaralya ahet.kuthalyahi vayachya vyaktishi julanara asa ek sahaj "maitra" tyanchya madhe hotac. je mi pan anubhavlela ahe.
ReplyDeleteThanks for sending this to me.
धन्यवाद शिल्पा.
Deleteमी फडतरे. तुझ्या वडलांचे निधन झाल्या चे मला समजले. खूपच वाईट वाटले. मी,निलेश तुझ्यकडे यायचो. वडिल तसे मितभाषी. तुझ्या वडिलांनी खडतर परिस्थितीतून खूपच उल्लेखनीय वाटचाल केली. भावपूर्ण श्रद्धांजली.
ReplyDeleteधन्यवाद सुहास
DeleteWonderful writing. I was not lucky enough to meet him but while I was reading this, an image formed in my mind and by the time I finished reading, felt, I knew him.
ReplyDeleteThanks for writing this and sharing.
Thanks. Sorry did not get your name from your user id.
Delete"बाबा" या एका शब्दातच बरंच काहि सांगून जातं.
ReplyDeleteअतिशय सुंदर रित्या लिखाण व मांडणी नमूद करून ती शेअर केल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद धनंजय..!
जर का बाबांची प्रत्येकक्ष्यात भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेता आले असते तर.. बरें झालें असते. आम्हीं जाणतो बाबांच्या जाण्याने जी काही पोकळीनिर्माण झाली आहे ती भरुन काढणे अशक्यच.
बाबांना भावपुर्ण श्रध्दांजली ..!🙌🌺🙏🌺🙌🌺🙏