India during Diwali - courtesy NASA |
मित्रांनो,
नमस्कार. तुम्ही कधी रात्रीच्या अंधारात आकाश पाहिलेत का हो? नसले तर जरूर पहा. विशेषतः शहरापासून दूर एखाद्या शांत खेड्यात जाऊन. आणि ते सुद्धा अमावस्येच्या रात्री. मग तुम्हाला कळेल की ते नभांगण कित्येक असंख्य तार्यांनी उजळून टाकले आहे ते! त्यातील काही तारे स्वयंप्रकाशित तर काहींनी उसना प्रकाश घेतलेला. पण सर्वांच्या अप्रतिम टीम वर्कने संपूर्ण आकाशाला जणू चंदेरी झळाळी प्राप्त होते. आपले हे कर्तृत्व त्या तार्यांना समजत असेल का? नक्कीच नाही, तरीही ते रोज प्रकाशतात व आसमंत उजळून टाकतात, एखादे झाड जसे प्रवाशाला अखंड सावली निस्वार्थीपणाने देते ना, अगदी तसेच.
आपल्या पृथ्वीवरही भारतामध्ये असे असंख्य तारे आहेत. काही खूप प्रसिद्ध तर काही तुलनेने कमी प्रसिद्ध. पण काही मात्र प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांचे काम अनेक वर्षे करत आहेत, व भारतरूपी नभांगण आपल्या कामाच्या शुद्ध प्रकाशाने उजळून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना भेटलात तर तुम्हाला लक्षात येईल की ते करत असलेल्या कामामध्ये ते प्रचंड आनंदी व समाधानी आहेत, जणू त्यांच्या कामाचे फलित हेच त्यांच्यासाठी एक मोठे पारितोषिक आहे. आजकालच्या व्यावहारिक/भौतिकवादी (materialistic) जगात एखादे व्रत घेऊन, सर्व मान-सन्मान, प्रसिद्धी, पैसा, कुटुंब इ. गोष्टींपासून दूर राहून आपले इप्सित ध्येय गाठण्यासाठी अखंड परिश्रम करत राहणे आणि ते सुद्धा कोणाविषयी तक्रार न करता, ही अतिशय अवघड गोष्ट आहे.
इथे मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील एक प्रसंग वाचलेला आठवतो. सावरकर अंदमानात तुरुंगात असताना त्यांच्या पत्नी - माई - त्यांना भेटायला गेल्या. सावरकरांचे हाल बघून त्या हेलावून गेल्या व त्यांचे डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. तेंव्हा सावरकर त्यांना म्हणाले की अगं माई, रडू नको, संसार काय चिमण्या-कावळे पण करतात, आपल्याला अभिमान वाटायला हवा की आपण आपला संसार या भारतभूसाठी सत्कारणी लावत आहोत.
आपण ज्या लोकांची ओळख या सदरातून करून घेणार आहोत ते सर्व जण एका अर्थाने जीवनव्रतीच आहेत.
आधी म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये असे असंख्य तारे आहेत उ. दा. डॉ. अब्दुल कलाम, कै. बाबा आमटे, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. माशेलकर, श्री. बाबासाहेब पुरंदरे, श्री. बिंदुमाधव जोशी, इ. पण या सर्वांबद्दल खूप लोकांनी याआधीच इतके लिहून ठेवले आहे की मी आणखी वेगळे काय लिहिणार?
मग मनात आले की मी ज्यांना व्यक्तीशः ओळखतो आणि ज्यांची जगाला नगण्य किंवा अतिशय थोडी माहिती आहे अशांबद्दल लिहावे. माझे परमभाग्य की मी या लोकांचे कार्य गेले काही वर्षे अतिशय जवळून बघितले आहे. त्यांची कामावरची अविचल निष्ठा, त्यासाठी वाट्टेल तितके परिश्रम करण्याची तयारी आणि निस्वार्थी भावना या गुणांनी मी स्तंभित झालो आहे.
या लोकांकडे बघताना मला एका गीताच्या खालील ओळी आठवतात:
तन समर्पित, मन समर्पित, और यह जीवन समर्पित, चाहता हूँ मातृभू तुझको अभी कुछ और भी दूं !
आणि मग ठरवले की आपण आपल्या मर्यादित मित्रपरिवाराला त्यांची ओळख करून द्यायची, म्हणून हे सदर. आणि याकरता वर्षप्रतिपदेसारखा दुसरा मंगल दिवस तो कोणता?
तेंव्हा उद्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या सदरातील पहिले पुष्प सादर करीत आहे.
त्यांची ओळख झाल्यावर तुम्हालाही कदाचित वाटेल की किती सार्थ आहेत वरील ओळी या लोकांसाठी. यातून आपल्या सर्वांना थोडे अंतर्मुख होऊन समाजासाठी/देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली तर माझ्या लिखाणाचे सार्थक झाले असे मला वाटेल.
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. धन्यवाद.
धनंजय, स्तुत्य उपक्रम आहे. बऱ्याच वेळेस Role model म्हणले की शिवाजी महाराज, बाबा आमटे इत्यादी नावे डोळ्यासमोर ठेवतो. मग लक्षात येते की आपल्यात आणि त्यांच्यात फार मोठे अंतर आहे. आणि पुन्हा आपल्या routine मध्ये व्यस्त होतो. मधले मधले टप्पे देखील आहेत आणि त्या टप्प्यांवर सुद्धा अनेक role models आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. किंबहुना आपल्या नजरेत पटकन असे कुणी येत नाही.
ReplyDeleteसमीर, तू जे लिहीले आहेस ते १००% खरे आहे. धन्यवाद.
ReplyDeleteIt would be really interesting to know about the real heroes in life.
ReplyDeleteThanks Amit.
ReplyDelete