Tuesday, 31 March 2020

एक थी मीना कुमारी...



आज ३१ मार्च २०२०. मीना कुमारीला जाऊन बरोबर ४८ वर्षे झाली. तिची जन्मतारीख होती १ ऑगस्ट १९३३. महिन्याच्या पहिल्या तारखेला जन्म आणि शेवटच्या तारखेला मृत्यू असा विचित्र योगायोग फार कमी जणांच्या वाट्याला येत असेल. पण मीना कुमारीच्या बाबतीत असे विचित्र योगायोग पुढे तिच्या आयुष्यात अनेकदा आले. किंबहुना वैयक्तिक आयुष्यात सुखापेक्षा दुःखाचेच क्षण तिच्या वाट्याला जास्त आले. कदाचित म्हणूनच इतर कलाकारांना दुःखाच्या प्रसंगात अभिनय करायला लागतो तिथे मीना कुमारी स्वतःच्या जीवनाचे वास्तव किती सहज मांडायची पडद्यावर! जणू काही "हे दुःख तर मी किती तरी वेळा भोगलंय" हा अनुभवच तिच्या देहबोली आणि संवादातून प्रकट व्हायचा. १९५० आणि १९६० च्या दशकातील भारतीय स्त्रियांच्या दुःखाचे प्रतीकच होती ती! त्यामुळेच तिला हिंदी चित्रपटाची "ट्रॅजेडी क्वीन" हा यथार्थ खिताब मिळाला.

महजबीन बानो म्हणून जन्मलेली मुलगी, घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी १९३९ साली "बेबी महजबीन" म्हणून "Leather Face" नावाच्या विजय भट्ट यांनी निर्मिती केलेल्या सिनेमात कॅमेऱ्यासमोर उभी राहिली. त्या सिनेमात तिने सिनेमाचा नायक  पी. जयराज यांच्या मुलीची भूमिका केली होती. पुढे वर्षभरात तिचे आणखीन ३ सिनेमे आले - अधुरी कहानी(१९३९), पूजा(१९४०) आणि एक ही भूल (१९४०). याच दरम्यान तिचे नाव बदलून "बेबी मीना" असे ठेवण्यात आले. १९४१ ते १९४४ दरम्यान बेबी मीनाने एकूण ६ चित्रपटात काम केले. १९४६ मध्ये आलेल्या "बच्चों का खेल" या चित्रपटात ती प्रथम मीना कुमारी या नावाने दिसली. बेबी मीनाचा गळा गोड असल्याने  अभिनयाबरोबरच तिला चित्रपटात गायचीही संधी मिळत होती. अशा तऱ्हेने बेबी मीना आपल्या घरासाठी पैसे कमावत राहिली आणि त्यातच तिचे बालपण कोमेजून गेले.

With Kamaal Amrohi
त्यानंतर साधारण १९५२ पर्यंत मीना कुमारीने विविध पौराणिक चित्रपटात काम केले उ. दा. "वीर घटोत्कच"(१९४९), "गणेश महिमा"(१९५०), "हनुमान पाताळ विजय"(१९५१). त्याचबरोबर काही Multi-Starer चित्रपटातही तिने नायिकेचे काम केले उ.दा. "मगरूर" (१९५०), "हमारा घर" (१९५०), "मदहोश"(१९५१) आणि "तमाशा"(१९५२). यातील मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या "मदहोश" ची "मेरी याद में तुम ना आंसू बहाना", "हमे हो गया तुमसे प्यार बेदर्दी बालमा" यांसारखी गाणी प्रचंड गाजली. पण दुर्दैवाने एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला  नाही. "तमाशा" च्या सेटवर मीनाकुमारीची भेट कमाल अमरोही यांच्याशी झाली. आणि लवकरच म्हणजे १४ फेब्रुवारी १९५२ रोजी दोघांनी रीतसर लग्न केले.


Image courtesy : Flickr.com
एका पाठोपाठ एक अपयशी चित्रपटांच्या गर्तेतून मीना कुमारीला बाहेर काढले ते तिचे प्रथम निर्माता/दिग्दर्शक विजय भट्ट यांनी. त्यांनी तिला १९५२ साली "बैजू बावरा" चित्रपटात नायिकेच्या प्रमुख भूमिकेसाठी निवडले, आणि नंतर घडला एक इतिहास जो हिंदी चित्रपटसृष्टीच्या चरित्रात नक्की लक्षात घेतला जाईल.


"बैजू बावरा" पासून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीचा आलेख उंचावतच गेला. तिने एकूण १०२ चित्रपटात काम केले. त्यातील काही गाजलेले चित्रपट :


१९५३ - परिणीता, दो बिघा जमीन,       १९५५ - आझाद,      १९५७ - शारदा,      १९५८ - यहुदी, सहारा,     १९५९ - चिराग कहाँ रोशनी कहाँ,      १९६० - दिल अपना और प्रीत पराई,
१९६२ - साहिब, बीबी और गुलाम, मैं चूप रहूंगी, आरती,      १९६३ - दिल एक मंदिर,      १९६४ - चित्रलेखा,
१९६६ -  फूल और पत्थर,       १९७१ - मेरे अपने,      १९७२ - पाकीजा


या यादीकडे नुसती नजर टाकली तरी मीना कुमारी ही त्याकाळची सुपरस्टार का होती हे लक्षात येते. एकूण १२ वेळा फिल्मफेअर पारितोषिकासाठी नामांकन आणि त्यात ४ वेळा उत्कृष्ट अभिनेत्रींचे पारितोषिक [बैजू बावरा (१९५४), परिणिता (१९५५), साहिब, बीबी और गुलाम (१९६३) आणि काजल (१९६६)]. यातील "साहिब, बीबी और गुलाम" मधील छोटी बहू ही व्यक्तिरेखा मीना कुमारीच्या अभिनयाचा कळस म्हणावा लागेल. तिला एका मुलाखतीत जेंव्हा विचारले होते की तुमच्या दृष्टीने सर्वात अवघड भूमिका कुठली होती तेंव्हा तिने छोटी बहूचा उल्लेख केला होता.


कालांतराने पती कमाल अमरोही यांच्याबरोबर झालेल्या घटस्फोटाने ती एकाकी पडली. त्यातूनच तिने दारूला जवळ केले ते इतके की ती त्याच्या आहारी गेली. त्यानंतर तिच्या आयुष्यात गुलझार, धर्मेंद्र आणि सावनकुमार टाक या व्यक्ती आल्या, पण यांच्यापैकी कोणीच तिला तिच्या शेवटात साथ दिली नाही असे म्हणतात. आपला शेवटचा चित्रपट "पाकिजा" तिने प्रकृती बरी नसतानाही पूर्ण केला; पण दुर्दैवाने त्याचे यश पूर्णपणे पाहण्याआधीच ती हे जग सोडून गेली होती.


 टपोऱ्या डोळ्यांची, छोट्या कमनीय बांध्याची, थोड्याशा बसक्या आवाजाची पण दमदार अभिनयाची देणगी लाभलेली ही अभिनेत्री स्वतः एक गायिका होती, आणि एक कवी/शायर पण होती. तिने लिहिलेल्या काही गझला कालांतराने गुलझार यांनी प्रकाशित केल्या. दुर्दैवाने एक गायक व शायर म्हणून तिचे काम जगासमोर म्हणावे तितके आले नाही.

आज इतके वर्षांनंतरही मीनाकुमारी आपल्याला आठवते, तिची गाणी, तिचा अभिनय आपल्याला भारून टाकतो. तिने अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात किती मोठे काम करून ठेवले आहे याची जाणीव आपल्याला होते.

मीनाकुमारीच्या अभिनयाला आणि कर्तृत्वाला सलाम करून तिची २ गाणी येथे सादर करत आहे.

१) पहिले गाणे आहे "तमाशा" या १९५२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातले. हे गाणे मीना कुमारीच्या अनेक दर्दभऱ्या गाण्यांपैकी एक आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर देव आनंद आणि अशोक कुमार होते. चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांनी दिले आहे - हे या गाण्याचे वैशिट्य. आणि जोडीला आहे लताजींचा सुमधुर, भावविभोर करणारा आवाज.


२) दुसरे गाणे आहे १९५५ साली आलेल्या "आझाद" या चित्रपटातील. इथे तिचा सहकलाकार होता दिलीप कुमार. संगीतकार सी. रामचंद्र. आणि आवाज आहे लताजींचा. असं म्हणतात की या चित्रपटातील सर्वच्या सर्व म्हणजे १४ गाणी सी. रामचंद्रांनी एका महिन्यात रेकॉर्ड केली होती. हे गाणं निवडण्याचं कारण म्हणजे यात मीना कुमारी चक्क चांगल्या आनंदी मूड मध्ये दिसत आणि नाचत आहे, जे तिच्या त्यानंतर झालेल्या "ट्रॅजेडी क्वीन" या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध आहे.

आशा आहे की तुम्हाला ही दोनही गाणी आवडतील.



मीना कुमारी विषयी अप्रतिम माहिती देणाऱ्या काही लिंक्स खाली देत आहे. वेळ काढून जरूर बघा. धन्यवाद.

1) https://en.wikipedia.org/wiki/Meena_Kumari

2) Programme on Meena Kumari on Rajyasabha TV

3) Meena Kumari's interview

7 comments:

  1. नेहमी प्रमाणेच अभ्यासपूर्ण आणि अतिशय उत्तम लेख.

    ReplyDelete
  2. खूप छान धनंजय, पुढच्या लेखाची वाट पहात आहे... मयुरेश.

    ReplyDelete
  3. खूप छान ! नवीन माहिती ! ...keep it up !

    ReplyDelete
  4. फारच छान, धनंजय! माहितीपूर्ण आणि सहजसुंदर शब्दांकन!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रशांत. तुझी प्रतिक्रिया आत्ता बघितली.

      Delete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.