Sunday 2 October 2022

माझे सविनय कायदेभंगाचे प्रयोग

या वर्षी १५ ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त समाज माध्यमातून फिरलेल्या देशभक्तीच्या पोस्ट्स, विविध चॅनेल्सवर दाखवले गेलेले देशभक्तीपर कार्यक्रम, मा. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरून केलेले भाषण, विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया/लेख, इ. वाचून आणि पाहून अस्मादिकांना (सोप्या भाषेत - मला) देशभक्तीचे जे काही स्फुरण चढले की काही विचारू नका, बाहू नुसते फुरफुरायला लागले. काहीतरी करण्याची जबरदस्त हुक्की आली. पण काय करावे सुचत नव्हते.


मग आम्ही सूक्ष्मात जाऊन बराच विचार केला, विचाराअंती अस्मादिकांना लहानपणापासून शिकवल्या गेलेल्या महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीची आठवण झाली. तशी गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा तत्वांची पण आठवण झाली होती, पण सत्य तर काय आम्ही सोयीनुसार बोलतच असतो, आणि आमच्याकडे पाहून आम्ही किडे-मुंग्यांची पण हिंसा करू शकू असे आमच्या मोठ्यात मोठ्या शत्रूला पण वाटणार नाही, त्यामुळे आम्ही जन्मजातच अहिंसक तेंव्हा आम्हाला गांधीजींच्या अहिंसा तत्वाचे कौतुक ते काय? म्हणून मग आम्ही ठरवले की आजचा पूर्ण दिवस हा गांधीजींनी सांगितलेल्या सविनय कायदेभंगाचे पालन करून देशसेवा करायची. 


घरून दुचाकीवर निघालो, म्हात्रे पुलाकडे जायचे होते. खूप गर्दी होती, वाहनांची रांग अभिषेक हॉटेलपर्यंत आली होती. लक्षात आले की रांगेतच खूप वेळ जाणार. शॉर्ट कट मारायचे ठरवले, पण road divider आडवा (की उभा?) आला, पण आम्ही आज ठरवलेच होते कि काहीही झाले तरी कायदेभंग करायचाच, मग काय, गेलो road divider च्या उजव्या बाजूने थेट सिग्नल पर्यंत सुसाट, आणि उजवीकडे म्हात्रे पुलाच्या दिशेने वळलो. चौकात एका पोलीस मामाने अडवायचा प्रयत्न केला पण आम्ही त्याच्याकडे बघून, स्मित हास्य करून, पूर्ण नम्रपणे त्याला चुकवून वळलोच! पुढे एके ठिकाणी उजवीकडे वळायचा सिग्नलच नव्हता, आम्हाला भयंकर राग आला पोलिसांचा. का बरे हे निष्पाप लोकांना उजवीकडे वळू देत नाहीत? आम्ही संधी साधून समोरून येणाऱ्या वाहनांना चुकवून, त्यांच्या मालकांच्या अपशब्दांकडे अतिशय विनम्रतेने दुर्लक्ष करून उजवीकडे वळूनच दाखवले. 


थोड्या वेळाने आम्ही सातारा रोडवर पोचलो. तर तिथे ही गर्दी (नेहमीचेच आहे)! आम्ही तर प्रचंड घाईत होतो. मग आता यातून कसा मार्ग काढायचा हा विचार करत असतानाच समोर BRT मार्ग दिसला. झाले! घुसलो बिनधास्त, कोणाची, कशाची फिकीर केली नाही, आज कायदेभंग म्हणजे कायदेभंग! BRT मधून सुसाट मार्गस्थ झालो आणि जिथे जायचे होते तिथे वेळेच्या आधीच पोचलो. असा मोकळ्या रस्त्यातून गाडी चालवण्याचा अनुभव दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात घेतला होता, पण रस्त्यावर फुल्ल गर्दी असताना रस्ता मोकळा मिळणे यातील आनंद काही औरच! काहीतरी भन्नाटच फीलिंग येत होते. एरवी सर्व नियम पाळून वैतागलेले आम्ही आज एका अनोख्या अनुभवाचा आनंद घेत होतो. 


पण नेमके नको तेच घडले! एका सिग्नलला अस्मादिक लाल सिग्नल तोडून जात असताना पोलीस मामांनी पकडले. (मनातल्या मनात स्वतःला शिव्या घातल्या - पोलीस सिग्नलला उभे असतानाच नियम पाळायचे हे तमाम शिस्तप्रिय पुणेकरांचे तत्वच मुळी आम्ही गुंडाळून ठेवले होते!) मामांनी license, insurance, pollution certificate इ. कागद मागितले, हेल्मेट घातलेले नव्हते हे जाणवून दिले, आणि घसघशीत दंड ठोठावला. ती रक्कम ऐकून पोटात गोळाच आला. एवढे पैसे खिशातच काय पण बँक खात्यात पण नव्हते. मग काय करता? मामांना बाजूला घेतले, मांडवली करा अशी विनंती केली, आणि थोडक्यात मांडवली करून कशीबशी सुटका करून घेतली. गांधीजींच्या कायदेभंगाची थोडीशी किंमत ही चुकवावीच लागते ना! पण एका सर्वसामान्य गरीब निष्पाप पुणेकरासारखा वागल्याचा अभिमानही वाटला.


नंतर गेलो थेट महापालिकेत. एका खात्यात काम होते. गेले ६ महिने माझी फाईल रखडलेली होती. कोणीही नीट उत्तर देत नव्हते. काही अनुभवी मित्रांनी असा सल्ला दिला होता की त्यांच्या चहा-पाण्याचे बघितले की लवकर काम होते. मला त्या महापालिका कर्मचाऱ्यांकडे बघवत नव्हते, केवढा कामाचा लोड दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर! काम करून करून बिचारे थकून गेले होते, शिवाय संसाराची, पोरा-बाळांची चिंता स्पष्ट दिसत होती. अधून मधून साहेबाचे बोलावणे, कधी कधी जेवायला सुद्धा फुरसत मिळायची नाही. १० चे ऑफिस असायचे म्हणून नाईलाजाने १०:३० पर्यंत यायलाच लागायचे. जरा चहा पिऊन फ्रेश होतायत तोवर ११ वाजलेपासून जे काम सुरु व्हायचे ते १२ वाजेपर्यंत अगदी मान मोडून काम करायला लागायचे. १२ वाजले की जेवायचे वेध लागायचे, १ ते २ जेवणाची हक्काची सुट्टी, मग २:३० ते ४ पुन्हा तेच ते आणि तेच ते! ४ वाजता थकून भागून एक अर्धा तास चहा-सिगरेट मारून आले की मग शेवटचा तास-दीड तास कसा छान जायचा. तर अशा त्या थोर महापालिकेत भिंतीवरच्या गांधी-आंबेडकर यांच्या फोटोंना नमस्कार करून आम्ही त्या कर्मचाऱ्यांची वाट बघण्यात १ तास घालवला. शेवटी एकदाचा तो आला. फाईल बाबत विचारल्यावर साहेबांकडे असेल म्हणाला. साहेबांना भेटायचे असे सांगितले तर साहेब आठवडाभर सुट्टीवर आहेत असे कळले. मग मात्र मित्रांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे त्या कर्मचाऱ्याला चहा-पाण्याचे विचारले. लाजत लाजत त्याने एक आकडा सांगितलं, नशिबाने तेवढे पैसे होते. ते दिल्यावर लगेचच त्याने फाईलची पूर्ण कुंडली सांगितली, आणि काळजी करू नका, २-४ दिवसात काम फत्ते होईल असे सांगितले, त्यामुळे अस्मादिक जाम खुश झाले. आपल्या कायदेभंगामुळे एखाद्याच्या पोटा-पाण्याची व्यवस्था झाली ही चांगलीच गोष्ट झाली, नाही का?


जिथे संधी मिळेल तिथे कायदेभंगाची चोख अंमलबजावणी करत होतो. मग नो पार्किंग मध्ये गाडी लावणे, लक्ष्मी रोडला पाहिजे असलेल्या दुकानासमोर इंडिकेटर लावून चार चाकी उभी करणे, One Way मधून उलट्या दिशेने गाडी हाकणे, रस्त्यावर ट्रॅफिक जॅम असले तरी मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे, रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर त्याच्या समोर गाडी लावून मनसोक्त खाणे, आपल्याजवळचा कचरा रस्त्यावर फेकून देणे, रात्री-अपरात्री चित्रविचित्र हॉर्न मोठ्याने वाजवत इतरांची जराही फिकीर न करता गाडी चालवणे, बँकेत/पोस्टात गर्दी असली तरीही रांगेच्या मध्ये घुसून प्रसंगी आरडाओरडा, भांडण करून आपले काम लवकर करून घेणे इ. अशी अनेक कामे कायदेभंगाच्या तत्वामुळे यशस्वी झाल्यामुळे जबरदस्त खुश झालो होतो. मनातल्या मनात गांधीजींना धन्यवाद दिले.


आता पुढील २६ जानेवारीला गांधीजींच्याच "एका गालावर थप्पड बसली तर दुसरा गाल पुढे करावा" याचा प्रयोग करावा असे मनात आहे, पण धाडस होत नाही. त्यापेक्षा चाचा नेहरूंच्यासारखी शांततेची कबुतरे उडवून भडका उडण्याआधीच तो विझवणे सोप्पे नाही का? 


शेवटी थोर थोर नेत्यांच्या अशा तत्वांना follow केले तर ती एक मोठी देशसेवाच ठरेल हे आम्हाला मनोमन पटले आहे.  


जयहिंद.