लेखाचे शीर्षक बघून चक्रावलात का? पण थोडे थांबा! कारण लेख वाचताना शीर्षकामागचा अर्थ कळेल. :-)
जे मराठी माध्यमात शिकलेले नाहीत त्यांच्यासाठी - "अप्रूप" या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. उ. दा. दुर्मिळ, दुर्लभ, अप्राप्य, नवल, अपूर्वाई, कौतुक वगैरे वगैरे, यालाच इंग्रजीत rare, novel, scarce, unusual इ. म्हणतात.
यातील "अपूर्वाई" हा शब्द जरा अधिक ओळखीचा वाटेल कारण त्या नावाचे पु. लं. चे प्रवासवर्णनाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे.

तेव्हापासून प्रकाशाचा प्रवास हा लाकूड जाळून, मेणबत्ती पेटवून ते एडिसनने बल्बचा शोध लावला त्या प्रत्येक वेळी लोकांना त्या गोष्टींचे अप्रूपच वाटत होते.

माझे आई-वडील दोघेही सातारचे, घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे रोजच्या जेवणात भाजी-भाकरीच असायची. गोडधोड आणि पोळी फक्त सणासुदीलाच असायचे. त्यामुळे त्याचे केवढे अप्रूप होते त्यांना त्या वेळी.


१९८० पासून दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने दाखवायला सुरुवात झाली. सकाळी ९:४५ वाजलेपासून दूरदर्शनवर दिसणाऱ्या मुंग्या (पांढरे-काळे ठिपके) बघत कधी एकदा १० वाजतायत आणि गावस्कर बॅटिंगला येतोय असे होऊन जायचे. नंतर १९८० ची विम्बल्डन मधील बोर्ग-मॅकेन्रो यांची अंतिम मॅच, १९८२ चे एशियाड त्यावेळी आलेला रंगीत TV , १९८३ चा भारताने जिंकलेला विश्वचषक, १९८६ चा मॅराडोनाच्या अर्जेंटिनाने जिंकलेला फुटबॉल विश्वचषक हे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने बघितल्याचे आठवतात.

![]() | |
|
त्याकाळात पुण्यात संगीत विषयक कार्यक्रमांची रेलचेल नसायची. एक सवाई गंधर्व महोत्सव डिसेंबर मध्ये व्हायचा. याव्यतिरिक्त अधून मधून संगीताचे कार्यक्रम असायचे. त्यामुळे मोठमोठ्या कलाकारांना बघणे/ऐकणे हे तसे दुर्मिळच होते. अनूप जलोटा, गुलाम अली यांचे कार्यक्रम बहुदा कॅम्प मधेच व्हायचे, लता मंगेशकर, आशा भोसले यांचे कार्यक्रम पुणे शहरात व्हायचे. आम्ही संगीतप्रेमी मित्र या कार्यक्रमांना आवर्जून जायचो.
![]() |
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे |
चित्रपट, नाटके ही सुद्धा वर्षातून ५-६ वेळाच बघितली जायची, त्यामुळे गणेशोत्सवात रीळ लावून रस्त्यावरील पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचे आम्हाला अप्रूप असायचे, व कोण आनंद मिळायचा त्यातून! फारसे Promotion न करताही चित्रपटगृहात गर्दी व्हायची आणि अनेक आठवडे/महिने चित्रपट चालायचे कारण चित्रपट घरात आले नव्हते!
टेलीफोनचेही तसेच. साधारण १९८५ नंतर हळूहळू लोकांकडे टेलीफोन यायला सुरुवात झाली. साध्या लोकल फोनचेही कोण कौतुक असायचे. परदेशात फोन करण्यासाठी टेलिफोन कंपनीकडे बुकिंग करायला लागायचे, तो महागही असायचा.

गेल्या २०-२५ वर्षांमध्ये आपले जीवनमान प्रचंड बदलले आहे. पूर्वी असलेली एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. प्रत्येकाचे स्वतःचे घर झाले. नवरा-बायको दोघेही नोकरी करू लागले, त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवणे भाग पडले. घरी कामाला मोलकरणी आल्या. प्रत्येक घरात TV आला, फोन आला, फ्रीज आला, वॉशिंग मशीन आले, Music Systems आल्या, Broadband आले, Smart Phones आले, Online TV Games आल्या, विविध Gadgets आली. कित्येक घरात कार आली. निदान शहरात तरी या सर्व सुख-सुविधा अनेक घरातून आल्या. २००० नंतर जन्मलेली मुले जन्मापासूनच ह्या गोष्टी पाहतच मोठी झाली. एकूण जीवन अतिशय गतिमान झाले. त्यामुळे कित्येक घरात बाहेरून डबा येणे सुरु झाले. आणि वीक-एन्ड म्हणून बाहेर हॉटेलात जेवणे सुरु झाले. Buy 1 Get 1 Free सारख्या योजनांमुळे गरजेपेक्षा जास्त खरेदी होऊ लागली. सगळेच कसे सहज, न मागता आणि मनात आले की मिळू लागले, म्हणतात ना Everything at a Finger tip तसे झाले, त्यामुळे त्याची किंमत कळेनाशी झाली.
शहरात मोठे मोठे मॉल्स उभे राहिले, सर्व वस्तू कुठेही आणि केंव्हाही मिळू लागल्या. दिवाळीचा फराळ जो माझ्या लहानपणी दिवाळीतच आणि तो सुद्धा आईने केलेला मिळायचा तो आता वर्षभर कुठल्याही दुकानात मिळतो. पूर्वी सुट्टीच्या दिवशी घरी केली जाणारे इडली-वडा सांबार आता जागोजागी असलेल्या हॉटेलात मिळते. Netflix, Amazon यासारख्या कंपन्यांनी करमणूक घरात आणून ठेवली. सर्व काही आयते मिळू लागले आणि ते सुद्धा मनात आले की. त्यामुळे दुर्दैवाने आज कुठल्याच गोष्टीचे अप्रूप राहिले नाही (अपवाद इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा त्यातील नवनवीन तंत्रज्ञानामुळे). गेल्या १०-२० वर्षात जन्मलेल्या मुला-मुलींना आईच्या हातच्या जेवणाचा आनंद काय असतो माहिती नाही, एखाद्या गोष्टीची वाट बघण्यातील आनंद आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर झालेला आनंद याला ते मुकले आहेत. मराठी नाटकातील आणि मराठी पुस्तकातील आनंद माहिती नाही, त्यांना त्याचे काही दुःख आहे असेही दिसत नाही. Globalization मुळे सर्व जग इतके जवळ आले आहे की आता परदेशात जाण्याचेही अप्रूप राहिले नाही. Whatsapp, Duo, Skype, विविध Messengers यामुळे परदेशातील व्यक्तींशी सहज आणि म्हटले तर रोजही बोलता येते ते सुद्धा त्यांना प्रत्यक्ष पाहत असताना, एका अर्थाने हे चांगलेच आहे पण त्याचा बरेच वेळा अतिरेक होतो.
सारांश काय, तर आज तुम्हा-आम्हाला अप्रूपाचेच अप्रूप आहे. एखादी गोष्ट न मिळण्यामागची हुरहूर आणि ती मिळाल्यानंतरचा आनंद हा आता दुर्लभ झाला आहे. जोपर्यंत आपण उपलब्ध असलेल्या सुखसुविधांचा मर्यादित उपभोग घेत नाही, तोपर्यंत आपण अतिरेकाच्याच वाटेवर वाटचाल करत राहणार. हे सर्व कुठे जाणार याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. तो होईल आणि त्यानंतर योग्य ती Corrective Action आपण घेऊ अशी आशा करू या. त्यासाठी शुभेच्छा.
Great journey down memory lane
ReplyDeleteछान आढावा मागील दशकांचा ...
ReplyDeleteधनंजय, अप्रतिम लेख! खूप आवडला!
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete