Saturday 16 November 2013

विवेकवादी आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना अनावृत्त पत्र

भूमिका: खालील लेख हा साधारण ३०-३१ ऑगस्टच्या सुमारास लिहिलेला आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची भ्याड आणि दुर्दैवी हत्या झाली; त्यानंतर बहुतांश समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी काबीज केलेल्या विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांमध्ये कोण जास्त दाभोलकरप्रेमी आहे हे दाखवण्याची जणू अहमहमिकाच लागली. या दुर्दैवी घटनेचे भांडवल करून कुठलेही पुरावे नसताना आपल्या वैचारिक विरोधकांना झोडपण्याची एकही संधी यांनी सोडली नाही. निःपक्षपातीपणाची अपेक्षा असलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून या प्रकारचे वार्तांकन हा एक प्रकारे समाजवादी दहशतवादच होता. ते पाहून मनात आलेले विचार इथे व्यक्त केले आहेत. यात दाभोलकरांच्या हत्येचे समर्थन करण्याचा जराही हेतू नाही; उलटपक्षी या भयानक घटनेचा जितका म्हणून निषेध करावा तितका तो कमीच आहे. 

खालील लेख दै. लोकसत्ता व दै. पुढारी यांना पाठवला होता. पण अपेक्षेप्रमाणे त्यांनी तो छापला नाही. निदान माझ्यातरी पाहण्यात आलेला नाही. त्यामुळे नाइलाजाने तो ब्लॉगवर टाकावा लागत आहे. जेणेकरून लोकांना सर्व संबंधितांचा पक्षपातीपणा कळावा. आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रियांचे स्वागतच असेल. धन्यवाद. 
========================================================================

सर्वप्रथम आपणा सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. आपण सर्वजण गेली अनेक वर्षे आपापल्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहात त्याबद्दल आपले खूप कौतुक व अभिनन्दन.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची झालेली हत्या ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना होती. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. त्यांच्या मारेकर्यांना आणि त्यामागील सूत्रधारांना लवकरात लवकर शोधून काढून योग्य ते शासन झाले पाहिजे ही आपणाप्रमाणेच माझीही इच्छा आहे.

त्या दिवसांपासून वेगवेगळ्या व्यासपीठांवरून/कार्यक्रमातून पुढे आलेले आपले विचारही योग्यच आहेत (उदा. विचारांची लढाई ही विचारांनीच झाली पाहिजे). परंतु ज्या विवेकवादाचा आपण आग्रह धरता तसेच विचार आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करता, तीच तत्वे आपल्यातीलच काही मंडळी वैचारिक विरोधकांना झोडपताना, स्वतःच्याच कंपूतील विरोधी विचार दडपताना कशी बाजूला ठेवली जातात याची काही उदाहरणे आपल्यासमोर ठेवतो. अशा प्रसंगांमध्ये भावनेचा आवेग हा सर्व विवेकाला वरचढ होतो याचीच साक्ष ही उदाहरणे देतात.

अगदी ताज्या उदाहरणापासून सुरुवात करू या. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. दाभोलकरांची हत्या झाली आणि दुपारी ३-४ च्या सुमारास IBN लोकमत वाहिनीवर निखिल वागळे यांनी श्याम मानव यांची मुलाखत घेताना प्रश्नातच सनातन संस्थेचे नाव घेऊन शंका व्यक्त केली. तोपर्यंत कुठलाही पुरावा त्यांच्याच काय पण पोलिसांच्याही हातात नव्हता. असे असताना एखाद्या संस्थेचे नाव निःपक्षपातीपणाची अपेक्षा असलेल्या पत्रकाराकडून कसे काय घेतले जाते? कुठे गेली होती वागळे यांची सच्ची पत्रकारिता आणि विवेकवाद? इतर मराठी वाहिन्यांनी सुद्धा कमी-अधिक प्रमाणात अतिशय एकांगी असे वार्तांकन केले व अजूनही करत आहेत.

२१ ऑगस्ट २०१३ ला संध्याकाळी पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या शोकसभेला मी हजर होतो. सभेतील बहुतांश वक्त्यांची जणू खात्रीच होती की ही हत्या हिंदुत्वावाद्यांनीच केली असेल म्हणून; अर्थात त्याही वेळी त्यांच्यापैकी कुणाकडेच कुठलाही पुरावा असण्याची शक्यता नव्हती. तरीसुद्धा वैचारिक विरोधकांची नावे घेऊन तपासाची दिशा आपल्याला हव्या त्या दिशेला वळवताना कुठे जातो विवेकवाद?

आता गतकाळातील काही उदाहरणे बघू या. १९८९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणार असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी एक समिती बनवली होती. त्या समितीचे अध्यक्षपद भूषवण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. शिवाजीराव भोसले यांनी होकार कळवला होता. त्यानंतर पुण्यातील तमाम समाजवादी मंडळीनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांना समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते; तेंव्हा कुठे गेले होते व्यक्ती आणि विचार-स्वातंत्र्य? त्यानंतरचे काही कुलगुरू उघडपणे वेगळ्या वैचारिक भूमिका घेत राहिले त्यावेळेस मात्र हे नेते गप्प राहिले कारण त्या भूमिका यांच्या विचारांच्या जवळच्या होत्या.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना (अर्थात कम्युनिस्ट सोडून) मान्य आहे असे दिसते. कोणाला त्यांचा हिंदुत्ववाद प्रिय आहे तर कोणाला विज्ञानवाद. काहीना ते साहित्यिक/कवी म्हणून मोठे वाटतात. असे असताना काँग्रेसी मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या थयथयाटानंतर सावरकरांचा नामफलक अंदमानातून काढून टाकला, तेंव्हा महाराष्ट्रातील तमाम विवेकवादी, व्यक्ती/विचार-स्वातंत्र्यवादी विचारवंतानी व पत्रकारांनी त्याला प्रखर विरोध का केला नाही? सावरकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीला त्यांच्या संसदेतील तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून संसदीय पद्धतीने आदरांजली वाहतात. या कार्यक्रमाला कोण हजर असते हे पाहिले तरी विवेकावादावर व्यक्ती/विचार विद्वेषाने कशी मात केली आहे ते दिसते.

पुण्यातून "अंतर्नाद" नावाचे मराठी साहित्याला वाहिलेले एक मासिक श्री. भानू काळे अतिशय प्रामाणिकपणे व नेटाने गेली अनेक वर्षे चालवतात. त्याची साहित्यिक मुल्ये अतिशय उच्च दर्जाची आहेत. श्री. काळे स्वतः डाव्या/समाजवादी विचारसरणीचे आहेत. "अंतर्नाद" मध्ये श्री. दिगंबर जैन एक सदर नियमित लिहायचे. काही लेखांमधे त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका मांडली/त्याचे समर्थन केले; तर त्यानंतर लगेचच त्यांचे सदर कुठलीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आले. कारण विचारले असता एक वर्षाची मुदत संपल्याने सदर बंद करण्यात आले असे सांगण्यात आले. अंकात काय छापावे याचा संपूर्ण अधिकार संपादकांचाच असतो हे मान्य करून सुद्धा असे आपल्या निदर्शनास आणून द्यावेसे वाटते की त्यानंतर आजतागायत श्री. दिगंबर जैन यांचा कुठलाच लेख "अंतर्नाद" ने छापलेला नाही. त्यामुळे यामागे दडपशाही की अन्य काही कारण ते समजले नाही.

"मिळून साऱ्याजणी" या समाजवाद्यांनीच चालवलेल्या मासिकात काही वर्षांपूर्वी त्यांच्याच संपादक मंडळातील एका लेखिकेने त्यांच्या विचारांच्या विरोधी लेख लिहीला होता. त्यानंतर अनेक समाजवाद्यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिल्या. आपल्या मासिकात हे असे विचार छापूच कसे शकतात या प्रकारच्या त्या प्रतिक्रिया होत्या. त्या बिचार्या लेखिकेचे पुढे काय झाले ते कळले नाही. 

काही वर्षांपूर्वी डॉ. लोहिया पती-पत्नी यांचा त्यांनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रा. स्व. संघाने "श्री गुरुजी पुरस्कार" देऊन सन्मान केला, तेंव्हा बोलताना सौ. लोहियांनी "संघ स्त्रियांचा सन्मान करतो" असे भावपूर्ण उद्गार काढले होते. त्यानंतर आपल्या विवेकवाद्यांनी उठवलेले काहूर खूप जणांना आठवत असेल.

पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी ओढ्यावरील रस्त्याची (कॅनाल रोड) संकल्पना अंमलात आणली गेली. त्यावेळेस श्री. अमोल पालेकर - जे परत आपल्याच कंपूतले - यांनी त्यास "शांतता भंग होईल", "कलावंतांना शांतता हवी असते" वगैरे कारणे सांगून विरोध केला होता. तसाच विरोध मंगेशकर कुटुंबियांनी पेडर रोड येथील पुलाला केला होता तेंव्हा त्यांना सर्वांनी "जनभावनेचा आदर करा", "पटत नसेल तर शहर सोडून जा" इ. सल्ले दिले होते. मग तीच भूमिका पालेकरांच्या बाबतीत का घेतली नाही?

शेवटी आपल्या कम्युनिस्ट मित्रांबद्दल लिहावेसे वाटते. कम्युनिस्टांनी विवेकवादावर बोलणे, शांततेचे सल्ले देणे हाच मुळी मोठा विरोधाभास आहे. कारण स्वतःच्या विरोधकांना जमले तर अपप्रसिद्धीने नाही तर हिंसा करून त्यांची निर्घृण हत्या करून कसे संपवायचे हे त्यांच्या बंगाल आणि केरळ मधील कृत्यांवरून अनेकवार स्पष्ट झाले आहे.

तेंव्हा कम्युनिस्टांसारख्या हिंसावादी प्रवृत्तींना आपण आपले साथी कसे काय मानता, त्यांना तुमचे व्यासपीठ कसे काय वापरू देता हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे.

वरील सर्व उदाहरणांवरून असे दिसते की आपणा सर्व कार्यकर्त्यांसाठी आपली तत्वे (विवेकवाद, व्यक्ती/विचार-स्वातंत्र्य इ.) ही "आपला तो बाब्या…" या पद्धतीने चालतात. आणखीही काही उदाहरणे देता येतील पण जागेच्या मर्यादेमुळे थांबतो. 

पुण्यात २८ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या निर्धार परिषदेत ज्या विवेकवादी समाजनिर्मितीचा आपण सर्वांनी निर्धार केलात त्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आपली तत्वे ही सर्वांनी समान पद्धतीने अंगिकारणे व त्यांचा निःपक्षपातीपणे वापर करणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. याचा आग्रह आपण सर्वजण धराल व प्रत्यक्ष कृतीतून ते दर्शनास आणून द्याल एवढीच माफक अपेक्षा. अन्यथा "मुँह में विवेकवाद, बगल में छुपा वैचारिक दहशतवाद" असेच खेदाने म्हणावे लागेल. 

धन्यवाद.


3 comments:

  1. नावच 'धनंजय' असल्यामुळे हिंदू विजीगिषु वृत्ती तुमच्यात दिसते !! लढत रहा, लढत राहा !!

    ReplyDelete
  2. parkhad and chati mokle karnare lekhan

    ReplyDelete
  3. परखड परंतु तरीही संयमीत लेखन.
    छान !

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.