Saturday, 20 September 2014

वसुंधरेवरील तारे - डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी

डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी
डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी
पुण्याजवळ अवघ्या ३५-४० कि.मी. वर असलेले भोर हे तालुक्याचे ठिकाण. भोरच्या बस स्थानकाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने बाजारपेठेतून भोरेश्वराच्या मंदिराकडे जाणारा रस्ता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याआधी तुमचे मन शांत करावे व तुम्हाला प्रसन्न/पवित्र वाटावे म्हणूनच जणू काही परमेश्वराने त्याच रस्त्यावर मंदिराच्या थोडे आधी डॉ. प्रभाकर जोशी यांच्या घराची व्यवस्था केली असावी, असे मला कायम वाटत आले आहे.

डॉक्टरांच्या बैठ्या घरात शिरल्या शिरल्या प्रसन्न वाटावे असेच वातावरण. बैठकीची खोली, स्वयंपाकघर आणि शेजारच्या खोलीत दवाखाना अशी घराची मांडणी. सर्वत्र अत्यंत अकृत्रिम असा साधेपणा. बैठकीच्या खोलीतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले ३ सरसंघचालक - डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस - यांचे एकत्रित चित्र हे डॉक्टरांच्या निष्ठा आणि आदर्श दर्शविते. डॉक्टरांच्या डोक्यावरची पांढरी टोपी पाहिली की साने गुरुजींचाही प्रभाव त्यांच्यावर पडला आहे हे जाणवते. 

डॉक्टरांची, ती. सौ. काकूंची (पूर्वाश्रमीच्या विमल रानडे - त्याही स्वतः डॉक्टर, Gynaecologist) आणि त्यांचा मुलगा डॉ. उदय या सर्वांची गाठ पडली की आपल्याला जणू काही सात्विकतेचा नव्याने परिचय होतो. 

गेली ३० वर्षे डॉक्टरांची ओळख समस्त भोर तालुक्याला आहे ती त्यांनी १९८३ साली भोरपासून २० कि. मी. अंतरावर असलेल्या रावडी गावात सुरु केलेल्या आणि आजतागायत अतिशय नेटाने चालवलेल्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके शाळेमुळे.

डॉक्टरांचे जन्मगाव रावडी. रायरेश्वर जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्याच्या पायथ्याशी असलेले रावडी गाव. चहुबाजूनी भात शेतीने वेढलेले निसर्गसुंदर असे रावडी गाव. तिथे शिक्षणाची काहीच सोय नसल्याने डॉक्टरांना वाई, असवली इ. मोठ्या गावांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला लागले. त्यामुळे डॉक्टरांनी लहानपणापासूनच ठरवले की आपल्याला ज्या अडचणीतून शिक्षण घ्यायला लागले ती अडचण आपल्या गावातील आणि आसपासच्या मुलांना येऊ नये म्हणून आपण गावामध्ये शाळा काढायची.

वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ठरवले की आयुष्यात काही तरी केले पाहिजे. १० वी पर्यंतचे शिक्षण वाई, असवली येथे पूर्ण केल्यानंतर ११ वी / १२ वी चे शिक्षण पुण्यात स. प. महाविद्यालयात झाले. पुण्यात असताना घरोघरी दूध घालून अभ्यास केला. स. प. महाविद्यालयात शिकत असताना डॉ. दि. ब. केरूर यांचे अर्थशास्त्र आणि पु. ग. सहस्रबुद्धे सरांचे मराठी विषयात मार्गदर्शन मिळाले. पुण्याने डॉक्टरांना खूप काही दिले त्यामुळे आजही ते पुण्याचे ऋण मान्य करतात. १२ जुलै १९६१ ला ज्या दिवशी पुण्यात पूर आला होता त्या दिवशी डॉक्टर नेहमीप्रमाणे दूध घालत असताना अप्पा बळवंत चौकात अडकून पडले होते याची आठवण अजूनही ताजी आहे. नातुबागेमध्ये एक खोली घेऊन डॉक्टर राहायचे आणि स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे. मुळात वाचनाची आवड असलेल्या डॉक्टरांना संशोधनपर आणि ऐतिहासिक लिखाण वाचायला आवडते.

नंतर वैद्यकीय शाखेत डॉक्टरांना प्रवेश मिळाला पण त्यासाठी पुणे सोडून अकोला इथे जायला लागले. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी ही त्यांची प्रथमपासूनची इच्छा होती. त्याप्रमाणे अकोला येथे ५ वर्षे वैद्यकीय शिक्षण घेतले. या काळात त्यांना आपटे व वझे या संघ कार्यकर्त्यांची खूप मदत झाली. त्यांच्यामुळे संघाच्या कार्यालयात राहायची व आपटे यांच्या खानावळीत जेवणाची मोफत सोय झाली.

डॉक्टरांचा संघाशी संपर्क त्यांच्या काकांमुळे लहानपणापासूनच आला. पुढे शिक्षणाच्या दरम्यान डॉक्टर एक वर्ष विदर्भात मूर्तिजापूर इथे संघाचे प्रचारक म्हणून गेले होते. गेली अनेक वर्षांपासून डॉक्टरांकडे भोर तालुका संघचालक जबाबदारी आहे.

सुरुवातीची शाळा
१९७० च्या सुमारास वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर परत भोरला आले व इथे वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्याच सुमारास डॉक्टरांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी "सरस्वती प्रतिष्ठान" संस्था काढली. प्रत्यक्ष शाळा सुरु व्हायला १९८३ साल उजाडावे लागले. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १०० व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून १७ फेब्रुवारी १९८३ रोजी चिखलगाव येथे २ शिक्षक आणि २० मुले यांना घेऊन शाळा सुरु झाली. १९८३ ते १९९३ ही १० वर्षे चिखलगाव येथील देवळामध्ये शाळा भरायची.

सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. विशेषतः आर्थिक बाजू. शाळेला शासकीय परवानगी तर मिळाली होती पण अनुदान मिळाले नव्हते. अशा परिस्थितीत जोशी कुटुंबियांनी स्वतःच्या खिशातील पैशातून शाळेतील शिक्षकांचे पगार व इतर खर्च भागवले. 
रावडी येथील जोशी परिवाराच्या जागेत शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
सुरुवातीच्या काळात उच्च शिक्षित असलेले श्री. रवि आचार्य सर, प्रभुदेसाई सर, नीलाताई पाठारे बाई, माधवराव देशपांडे सर असे अनेक निष्ठावान सहकारी डॉक्टरांना मिळाले. मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून हे शिक्षक मुलांबरोबर क्रिकेट खेळायचे व मग शाळा भरवायचे. २० विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेली शाळा हळू हळू वाढू लागली. मग शाळेला जागा कमी पडायला लागली म्हणून जोशी कुटुंबियांनी रावडी येथील स्वतःची २ एकर जमीन शाळेला दिली. श्री. अरुण किर्लोस्करांनी शाळेला भरघोस मदत केल्याने रावडीला शाळेची इमारत १९९३ साली उभी राहिली.

सध्याची शाळा  
पण रायरेश्वराच्या पठारावरून ५-६ कि. मी. चालून शाळेला येणार्या विद्यार्थ्यांच्या अडचणी डॉक्टरांनी ओळखल्या व त्यांच्यासाठी वसतिगृह बांधायचे ठरवले. सातारा येथील एका संस्थेने दिलेल्या मदतीमुळे वसतिगृहाची इमारत २००० साली उभी राहिली. आज या वसतीगृहात ६० मुले विनामूल्य राहतात.

शाळेचे चांगले काम पाहून अनेक लोकांनी मदत केली. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या आमदार निधीतून विज्ञान प्रयोगशाळा उभी राहिली. Cognizant Foundation ने केलेल्या मदतीमधून २००६-०७ पासून Computer Laboratory चालू झाली. शाळेत शिकलेल्या एका गरीब घरातील मुलाने वडिलांना मदत करून मिळालेल्या पैशातून शाळेला रु. १०,०००/- देणगी दिली.

आज रोजी शाळेत साधारण ४०० विद्यार्थी ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत आहेत. पूर्ण वेळ शिक्षकांची संख्याही १७ आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब घरातील मुलांना शाळा अतिशय कमी पैशात शिक्षण देते.

गेल्या ३० वर्षात शाळेतील मुलांनी उल्लेखनीय यश मिळवलेले आहे. लीना ओव्हाळ ही मुलगी शाळेतून शिकून आता शासकीय सेवेत कलेक्टर पदावर काम करत आहे. २०१३ साली गणेश हासपे वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार सभेने घेतलेल्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम आला. अनेक विद्यार्थ्यांना राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आहे. शाळेतील सर्व मुलांना भगवद्गीता म्हणता येते. या कारणास्तव २००६ साली गीता धर्म मंडळाने शाळेला आत्माराम करंडक दिला.

समाजाची सेवा करावी या भावनेबरोबरच समाजासाठी प्रचंड काम केलेल्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता भाव हा डॉक्टरांचा मोठा गुण आहे. या भावनेतूनच सुरुवातीला असलेले संस्थेचे "सरस्वती प्रतिष्ठान" हया नावाला "दधिचींना प्रणाम" हे नाव जोडले. दधिची ऋषींनी स्वतःच्या अस्थी देवांच्या चांगल्या कामासाठी दिल्या होत्या तसेच समाजातील आधुनिक दधिचींविषयी कृतज्ञता म्हणून "सरस्वती प्रतिष्ठान दधिचींना प्रणाम" असे थोडेसे मोठे व जरासे विचित्र नाव आग्रहपूर्वक संस्थेला दिले. नावात बदल करताना पुण्यातील धर्मादाय आयुक्तांनी आक्षेप घेतले; तेंव्हा दधिची कोण हे सर्व त्यांना समजावून सांगायला लागले.

मा. श्री. मोहनजी रानडे शाळेतील एका कार्यक्रमात 
याच कामाचा एक भाग म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना डॉक्टरांनी मदतीचा हात दिला आहे. मग ते प्रमोद दीक्षित जे आसाममधे काम करताना दहशतवाद्यांकडून मारले गेले त्यांच्या नावाने शाळेत लावलेले झाड असो, किंवा गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी श्री. मोहनजी रानडे यांचा शाळेत बोलावून केलेला सत्कार असो. १४ जानेवारी हा पानिपत युद्धाचा स्मरण दिवस. या दिवसाची आठवण राहावी म्हणून पेशव्यांची देवी ही मुरुड येथील दुर्गा देवी - तिला दर वर्षी १४ जानेवारीला अभिषेक चालू केला.


आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा अस्थिकलश एडनवरून शाळेत आणला 
वासुदेव बळवंत यांची आठवण म्हणून त्यांनी ज्या एडनच्या कारागृहात मरण यातना भोगून प्राण सोडले त्या ठिकाणची माती आणून तो कलश आज शाळेत ठेवला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वासुदेव बळवंतांच्या त्यागाची जाणीव कायम राहावी. पुण्यातील CID विभागात जेंव्हा त्यांचा पुतळा बसवला होता त्या वेळेस त्या विभागाकडून शाळेला आवर्जून बोलावणे आले, त्याप्रमाणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्या कार्यक्रमात "गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार" हे गीत सादर केले.

भोर येथील वनवासी कल्याण आश्रमाचे काम डॉक्टरांच्या घरात सुरु झाले. आता आश्रमाची स्वतःची जागा आहे.

डॉक्टर स्वतः अतिशय कमी बोलतात आणि त्यांना जे म्हणायचे आहे ते कृतीतून दाखवतात. उ.दा. डॉक्टरांनी भोरेश्वर मंदिरात सनई वादनाची सुरुवात १९७९ साली केली. तेंव्हापासून भोर गावाची मंगल सुरुवात सकाळी ५:३० वाजता भोरेश्वराच्या सनई वादनाने होते. तशीच सनई डॉक्टरांनी रायरेश्वर आणि वाई येथे सुरु केली. आणि आता आंबेघर येथील प्राचीन शिवकालीन मंदिरात सनई सुरु करण्याचा मानस आहे.

शाळेच्या भावी योजनांमध्ये महाविद्यालय सुरु करायचे डॉक्टरांच्या मनात आहे; आवश्यक ती परवानगी मिळाली आहे. पुरेसे शिक्षक व विद्यार्थी मिळाले तर ते सुरु होईल. तरीही डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी धीर न सोडता काम करत आहेत.

तर असे हे आपले डॉक्टर जोशी, अतिशय निगर्वी, शांत आणि कृतज्ञ स्वभावाचे डॉक्टर. वैद्यकीय व्यवसाय करून प्रचंड पैसा मिळवण्याच्या सर्व संधी झुगारून देऊन स्वतःच्या गावात वैद्यकीय सेवा देतात, गावातील मुलांसाठी शाळा चालवतात, या सर्वांमधे त्यांच्या सुविद्य पत्नीची आणि मुलाची तितकीच तोलामोलाची साथ त्यांना लाभते. आणि तरीही प्रसिद्धीचे वारेही त्यांना शिवत नाही. कुठल्याही वर्तमानपत्रात, मासिकात किंवा दूरदर्शन माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल काहीही लिहून येत नाही. ही आपल्या माध्यमांमध्ये आणि विचारवंतांमध्ये असलेली वैचारिक अस्पृश्यातच दाखवते.

भोर गावामध्ये एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे उभे असलेले डॉक्टर, वयाच्या मर्यादेमुळे हालचालींवर मर्यादा आल्या तरी विचारांवर नाही आणि त्यातूनच नवनवीन योजना सहकार्यांच्या मदतीने राबवत असतात. त्यांचे उभे जीवन हे आपल्यासारख्यांसाठी एक आदर्शच आहे. आणि म्हणूनच ते आहेत या वसुंधरेवरील तारे. त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ या.

[संपर्कासाठी पत्ता - डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी, मंगळवार पेठ, राजवाडा रस्ता, भोर ४१२ ०२६. दूरध्वनी क्र. +91 2113 222720, ई-मेल: joshibhor@yahoo.com]

3 comments:

  1. धनंजय,
    जोशी सरांच्या निस्पृह कार्याची आणि जिद्दीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद . त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.
    -समीर आगाशे

    ReplyDelete
  2. धन्यवाद समीर.

    ReplyDelete
  3. छान उत्तम कार्य. भोर आमचे गाव आहे. होईल तेवढी मदत निश्चित करून.

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.