Sunday, 9 November 2014

तुम्हाला हेच हवे आहे काय?

साधारण १०-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. पुण्यातील एका नावाजलेल्या शाळेतील एका क्रीडा शिक्षकाला P. T. च्या तासाला मुलाला मारले म्हणून मुलाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून काढून टाकले. ज्या मुलाला मारले तो मुलगा खोडकर आणि उद्धट म्हणूनच शाळेत आणि त्याच्या मित्रांमध्ये प्रसिद्ध होता. शिवाय बड्या आई-बापाचा लाडका. मग काय वर्गात त्याचेच प्रस्थ. कोणीही त्याच्या विरुद्ध काही बोलायची सोय नव्हती. शिक्षकही तसे जपूनच वागायचे त्याच्याशी. P. T. च्या तासाला त्या मुलाने बरोबरच्या एका मुलाच्या कानफटात मारली होती. ते शिक्षकांनी पाहिले आणि त्यांचा संताप अनावर होऊन त्यांनी त्या मुलाला मारले. झाले, त्या मुलाने घरी जाऊन आई-वडिलांना सांगितले. लगेच दुसर्या दिवशी आई-वडील तावातावाने शाळेत भांडायला आले व तक्रार केली. चौकशीअंती त्या क्रीडा शिक्षकाला नोकरीवरून कमी करण्यात आले. या सर्व घटनेत जशी शिक्षकाची चूक होती तशी त्या विद्यार्थ्याची नव्हती का? मग विद्यार्थ्याला काय शिक्षा मिळाली? यातून इतर विद्यार्थी व पालक यांना काय संदेश शाळेने व व्यवस्थेने दिला?

आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. जर आपल्या ओळखीत कोणी शिक्षक असतील तर त्यांना विचारा की कुठल्या दडपणाखाली त्यांना विद्यार्थ्यांना हाताळावे (नव्हे सांभाळावे) लागते ते! विद्यार्थ्यांवर जरा जरी हात उगारला किंवा ओरडले व विद्यार्थ्याने तक्रार केली तर त्यांना Atrocity or Child Abuse च्या कायद्याखाली अटक होऊ शकते व नोकरी जाते ते वेगळेच. आपण दुसर्या टोकाची पण उदाहरणे ऐकतो जिथे शिक्षकांची दहशत आहे व विद्यार्थी वा पालक काहीही करत नाही आहेत. ही दोन्ही टोके चूकच. 

प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना - विशेषतः शहरातील - शिस्त लावण्याचे काम खरे तर पालकांचे आहे; पण आजकालच्या पालकांना वेळच नाही; वेळ आहे तर इच्छा नाही असे दिसते. सर्वच पालक असे आहेत असे नाही पण प्रामुख्याने हीच परिस्थिती आहे. जिथे पालकच मुलांना शिस्त लावू शकत नाहीत, त्यांच्यापुढे योग्य आदर्श ठेऊ शकत नाहीत तिथे बिचारे शिक्षक काय करणार? 

माझा मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका पालक सभेत असे सांगितले की मुला-मुलींना शाळेतले स्वच्छतागृह कसे वापरायचे याचे प्राथमिक ज्ञान सुद्धा नसते कारण घरी ते दिलेलेच नसते. त्यांनी सांगितलेली काही उदाहरणे ऐकून तिथे जमलेले आम्ही पालक नखशिखांत हादरून गेलो होतो व अंतर्मुख झालो होतो. देशातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अतिशय दयनीय अवस्थ्या ही काही फक्त स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आलेली नाही तर तुमच्या-आमच्या सारखे नाकर्ते/बेशरम नागरिकही त्याला तितकेच जबाबदार आहेत. 

कॉलेजमध्ये तर याहीपेक्षा भयानक परिस्थिती आहे. उदासीन प्राध्यापक, बेजबाबदार/स्वतःतच मग्न असणारे विद्यार्थी आणि कॉलेजचे बेपर्वा प्रशासन यामुळे एकूणच शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. परत तिथे विद्यार्थ्यांना बोलायची सोय नाही कारण तसे केले तर विद्यार्थी संघटना येउन चोप देण्याची भीती. महाविद्यालयीन विद्यार्थी दिवसभर काय करतात, कुठे जातात, कोणाच्या संगतीत असतात हे आई-वडिलांना माहितीच नसते. आणि मग अचानक एक दिवस आपल्या मुला-मुलीचे नाव रेव्ह पार्टीत आलेले बघून पालक हादरून जातात तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. 

दुसरी घटना - काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने डान्स-बार बंद करायची घोषणा केली अन काय कहर माजला विशेषतः मुंबईमध्ये. सर्व बारबाला सरकारविरुद्ध रस्त्यावर आल्या; त्यांचे नेते सरकारला कोर्टात खेचायची भाषा करु लागले; कारण काय तर बारबालांच्या आर्थिक कमाईचा स्रोत बंद झाला! महाराष्ट्रातील महिलांना या मार्गाने का जावे लागते, त्याला पर्याय काय याचा पुरेसा विचार न करता डान्स-बार चालू ठेवावेत ही मागणी कितपत योग्य आहे? प्रत्येक नागरिकाला योग्य ते काम देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे हे मान्य; पण म्हणून जो व्यवसाय नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे आणि स्त्रियांवरही अन्यायकारक आहे तो बंद करताच इथल्या "विचारवंतानी" व माध्यमांनी केलेला गहजब आपण कुठे चाललो आहोत याची चिंता करायला लावतो. 

आजकाल आजूबाजूला बघितले तर काय दिसते? जागोजागी स्वतःच्या स्वार्थासाठी नियम मोडणारा, लाच देणारा/घेणारा, बेकायदेशीर घरे बांधणारा आणि ती घरे विकत घेणारा व महापालिका ती घरे तोडायला आल्यावर त्यांच्यावर दगडफेक करणारा, बेहिशोबी अगणित पैसा गोळा करणारा, आयकर चुकवण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा सुशिक्षित / अशिक्षित समाज आणि हे सर्व करणार्यांकडे त्रयस्थपणे बघत गप्प बसणारे तुमच्या आमच्या सारखे लोक. आम्हाला काही करायला नको म्हणून मोदी-फडणवीस सारख्यांना निवडून द्यायचे आणि त्यांच्या चांगल्या/वाईट कारभाराचे वाभाडे वैशालीत बसून चहा पिताना काढायचे. मी असे म्हणत नाही की सर्वच लोक वाईट आहेत पण चांगले गप्प बसतात म्हणून वाईट लोकांचे फावते. आपल्याला हेच हवे आहे काय?

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे Kiss of Love या तथाकथित आंदोलनावरून उठलेला गदारोळ. कोचीमधल्या एका हॉटेल मध्ये एका मुलाने मुलीचे चुंबन घेतले म्हणून तिथे असलेल्या काही मंडळीनी हॉटेलची तोडफोड केली. त्याची प्रतिक्रिया म्हणून हे आंदोलन सुरु झाले; त्याला समाजातील तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यवादी लोकांनी व माध्यमांनी खतपाणी घातले व Kiss of Love च्या विरोधकांना झोडपण्यास सुरुवात केली. एखादी घटना पटली नाही म्हणून तोडफोड करणे जसे निषेधार्ह आहे तितकेच निषेधार्ह त्या घटनेचे व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समर्थन करणेही आहे. 

एका व्यक्तीने आपल्या आवडत्या व्यक्तीचे चुंबन घेणे यात वाईट काही नाही; पण हा त्या दोघांमधील वैयक्तिक विषय नाही का? वैयक्तिक संबंधाचे जाहीर प्रदर्शन करण्यामागे कुठली वृत्ती वा कारणे आहेत? आणि कोणी त्याला विरोध केला तर त्याला प्रतिगामी ठरवून अशा घटनांना उत्तेजन देणारे नेमके काय साधू इच्छितात? उद्या असेच होत राहिले तर संभोग ही सुद्धा जाहीरपणे करायची गोष्ट होईल, ती आपल्याला चालेल का? कुठल्याही समाजात नीतीमत्तेचे काही अलिखित नियम असतात; ते त्या देशाच्या, समाजाच्या तत्कालीन सामाजिक जाणिवांप्रमाणे ठरलेले असतात; त्यात बदलही होत असतात/व्हायला हवेत; पण असे करताना एकूण समाजावर विशेषतः तरुण पिढीवर त्या बदलांचा होणारा बरा/वाईट परिणाम याचा विचार करून ते बदल स्वीकारायचे असतात. 

व्यक्तिस्वातंत्र्याचे स्वैराचारात रुपांतर झाले की काय होते ते सध्याच्या अमेरिकेतील समाज जीवनाकडे बघितल्यावर लक्षात येते. नवरा-बायकोंमधील नातेसंबंध, आई-वडील आणि मुलगा/मुलगी यांच्यातील संबंध हे पूर्णतः दुरावलेले दिसतात, कुमारी-मातांच्या प्रश्नाने भयानक रूप धारण केलेले दिसते, कुटुंब नावाची संस्थाच नाहीशी झालेली दिसते. मग नैराश्याने ग्रासलेले तरुण-तरुणी आत्महत्या करतात, नवरा-बायको घटस्फोट घेतात, शाळेतील कुमारवयीन मुले गोळीबार करतात. अमेरिकेतील सुख समृद्धी अशा उधवस्त माणसांना मनःशांती देऊ शकत नाही; मग हीच माणसे भारतीय योग शिकताना दिसतात; आपण सर्व जण Times Square मधील योगासन  वर्गांची दृश्ये बघतो आणि मनोमन सुखावतो की नाही? 

पण मित्रांनो, आपल्याकडे मोठ्या शहरांमध्ये हीच परिस्थिती हळूहळू निर्माण होते आहे; गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे, अनैतिक संबंधांना जणू काही समाजमान्यता मिळत आहे कारण टी. व्ही. वरील एकही मालिका (काही सन्माननीय अपवाद वगळता) अनैतिक संबंधांशिवाय पूर्णच होत नाही, मुला-मुलींमध्ये सिगारेट, दारू सारखी व्यसने वाढीस लागत आहेत, मधूनच एखादी रेव्ह-पार्टी पकडली जाते व आपण अस्वस्थ होतो; पण कुणास ठाऊक अशा अनेक रेव्ह-पार्ट्या होत असतील, डिस्को-पबमध्ये जे प्रकार चालतात ते आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहेत; अनेक नोकरदार शुक्रवार संध्याकाळी "बसतात" आणि एखादा पिणारा नसेल तर त्याची चेष्टाही होते, अनेक सोसायट्यांमध्ये शनिवार-रविवार घरी स्वयंपाकाच होत नाही; आमच्या जवळील एका सोसायटीत तर भरल्या घरात दोन्ही वेळेस जेवणाचे डबे बाहेरून येतात व वीक-एंडला बाहेर जेवतात; मुलांनी आईच्या हाताची चव कधी बघितलेलीच नाही. 

तुम्ही याकडे कसे बघता? याचा कुठल्या तरी पातळीवर नैतिक पद्धतीने विरोध वा निषेध करता का? का तुमच्या घरापर्यंत ही कीड यायची वाट बघत आहात? तुम्हाला हेच हवे आहे काय? 

मित्रांनो, याचा जरूर विचार करा. व जिथे जिथे माध्यमे व तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यवादी व विचारवंतांकडून या प्रकारांना उत्तेजन दिले जाते तिथे तिथे  प्रतिगामी म्हणून हिणवले जाण्याची तमा न बाळगता त्याचा विरोध / निषेध करा. नाहीतर किल्ला ढासळत जाईल आणि तुम्ही फक्त प्रेक्षक असाल!

कोणीतरी म्हटले होते की देशातल्या तरुणांच्या ओठांवर कुठली गाणी आहेत त्यावरून त्या देशाचे/समाजाचे भविष्य ठरत असते! वेडेच होते ते - स्वातंत्र्यापूर्वीचे?



Friday, 3 October 2014

मोदीजी - तुम्हारा चुक्याच!

[भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अनावृत्त पत्र]

==============================


प्रिय प्रधानमंत्री मोदीसाहेब, 

अहो काय हे? आमचा पुरता भ्रमनिरास केलात की हो तुम्ही! तुमची लोकसभा निवडणुकीच्या वेळची भाषणे आम्ही खूपच मन लावून ऐकायचो, विशेषतः तुमचे ते 'अच्छे दिन आयेंगे' आम्हाला भारी आवडायचे. आम्हाला वाटायचे की जसे तुमच्या पक्षात सत्तेचे कमळ फुलले तसे आमच्याही जीवनात सुख, समृद्धी, आराम आणि शांततेचे कमळ फुलेल. तुम्ही जेंव्हा "सबका साथ, सबका विकास" म्हणायचात तेंव्हा आम्हाला वाटायचे की तुम्ही सर्व विरोधकांना बरोबर घेऊन आमचा विकास करणार. परवा १५ ऑगस्टला पण तुम्ही लाल किल्यावरुन केलेल्या भाषणात "मी जनतेचा प्रधान सेवक आहे" असे म्हणालात, त्यामुळे आम्ही जाम म्हणजे जामच खूष झालो होतो. 

पण परवा २ ऑक्टोबरला तुम्ही जेंव्हा स्वच्छता अभियानाची सुरुवात केलीत तेव्हा कुठे आम्हाला कळले तुम्हाला अभिप्रेत असलेल्या "सबका साथ" मध्ये आम्ही पण आलो म्हणून; आणि आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला. तुम्ही राव आमच्या long week end ची मजाच घालवलीत, हे काही बरे नाही, अगदीच असह्य झाले म्हणून हा पत्र प्रपंच. 


कित्ती कित्ती plans केले होते आम्ही ही सुट्टी आणि थोड्याच दिवसात येणारी दिवाळीची मोठी सुट्टी enjoy करण्याचे. पण आत्ता तुम्ही जणू फर्मानच काढले आहे की प्रत्येकाने वर्षाचे १०० तास म्हणजे एका आठवड्याचे २ तास स्वच्छतेला द्यायचे म्हणून! अहो, तुम्हाला काय माहिती की आम्हाला इथे xxवायला सुद्धा वेळ नसतो. तुमचे एक बरे आहे, तुम्ही पडलात अविवाहित (कागदावर नव्हे पण प्रत्यक्षात), तुम्हाला ना बायकोचा त्रास ना मुला-बाळांचा. आमचे तसे नाही, आम्ही जरी सरकारी कर्मचारी असलो तरी ऑफिसमध्ये आमचे काम सोडून आम्ही किती महत्वाची कामे करत असतो उ. दा. लोकांचे ग्रुप्स जमवून गप्पा झोडणे, त्यांना फुकटचे सल्ले देणे - कुठे investment करायची आणि कुठे नाही, दोनाचे-चार आणि चाराचे-आठ कसे करायचे, याशिवाय ऑफिसमधल्या साहेबाची लफडी, इतरांचे आतले आणि बाहेरचे उद्योग, week end destination कुठले छान आहे, गटारीचे plans, वगैरे वगैरे. शिवाय जर एक-दोन दिवस रजा घेतली की टेबलावर अशी धूळ साठते की ती आमची आम्हालाच झटकायला लागते (आमचे चतुर्थ श्रेणीतले सफाई कर्मचारी आमच्याकडे सह्या मारून शेजारच्या दुकानात कामाला जातात). या सगळ्यात आमचे ८ तास कसे जातात कळतसुद्धा नाही. मग दमून-भागून ६/६:३० ला घरी आल्यावर बायकोच्या हातचा गरम गरम चहा पिऊन जरा शीण घालवायचा, टी. व्ही. वर बातम्या, मनोरंजनाचे कार्यक्रम बघून होईपर्यंत १० वाजतात. त्यापुढे वेळ राहिला व उत्साह वाटला तर मुलांची थोडी फार चौकशी करायची. म्हणजे किती busy routine असते बघा. तरी शनिवार-रविवार सुट्टी असते म्हणून family साठी जरा तरी वेळ देता येतो, बायको-मुलांना घेऊन कधी E-Square मध्ये सिनेमाला जा, कधी मॉल मध्ये खरेदीला जा, तर कधी एखादा week end गाडी काढून picnic ला जा, भरमसाठ कामे हो! आता सांगा या सगळ्या आवश्यक कामांमधून देशाची स्वच्छता करायला वेळ होईल का? तुमचे आपले काहीतरीच!

हे दुःख आमचेच नव्हे तर आमच्या समस्त मित्रांचेही आहे. आमचा मित्र-परिवार खूप मोठा आहे, त्यात वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनीअर, लेखापाल, व्यावसायिक, प्राध्यापक, बँकेचे कर्मचारी, IT वाले,  लेखक, पत्रकार, नाटक-सिनेमावाले, माध्यम-तज्ञ, इ. बरेच आहेत. 

आता वकिलांचेच घ्या ना, किती कष्ट करतात बिचारे होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करायला. ह्याचे वकीलपत्र घ्यावे तर दुसरा मारण्याची भीती; अशा दबावाखाली काम करण्याचे वेगळे पैसे सुद्धा मिळत नाहीत. भर उन्हाळ्यात काळा डगला घालून घामाघूम होत काम करायचे म्हणजे काय चेष्टा आहे? अशिलांचा दबाव असतो तो वेगळाच. मजबुरी का नाम वकील असे म्हणायची वेळ आली आहे. पोटासाठी काय काय करावे लागते तुम्हाला कल्पना नाही. अशा परिस्थितीतून त्यांनी कसे २ तास द्यायचे दर आठवड्याला?

आमचे एक लेखक मित्र आहेत. कधी नाटके तर कधी टी. व्ही. सिरीअल्स, कधी सिनेमा लेखन तर कधी वर्तमानपत्रातून तिरक्या रेघा मारत असतात. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांमध्येच "सं. प." असल्याने ते वरील गोष्टींव्यतिरिक्त कधीच काही करत नाहीत. त्यांचे समविचारी लेखक-पत्रकार मित्रांचे टोळकेही तसेच आहे. या लोकांना भारतात काही चांगले चालले आहे असे मुळी वाटतच नाही. यांचा बराचसा वेळ विरोधकांची उणीदुणी काढण्यात जातो. बरं, हे स्वतः काही करणार नाहीत, दुसर्याला उपदेश देणार - कधी फुले जयंतीला तर कधी आंबेडकर जयंतीला. आजकाल २० ऑगस्टला पुण्यातील बालगंधर्व पुलावर जमून निदर्शने करतात. एवढ्या सगळ्या व्यापातून तुमच्या अभियानामागची भूमिका समजून घ्यायला वेळ कुठे आहे? आणि कळली तरी मान्य कसे करणार? अशा संभ्रमावस्थेतून ते मग स्वच्छता करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. 

आमचे डॉक्टर मित्र तर already वैतागलेत! अहो आजकाल जो उठतो तो यांच्याकडे संशयाने बघतो. कोणी म्हणतो Cut Practice करतात, कोणी म्हणतो यांचे racket आहे. आजकालची परिस्थितीच अशी आहे की खाजगी practice चालतच नाही, मग कधी या हॉस्पिटलला तर कधी त्या, धावून धावून जीव दमून जातो. बर गेली ३० वर्षे practice करत आहेत, भरपूर पैसा गाठीशी आहे, म्हटले तर सर्व सुखे हात जोडून दाराशी उभी आहेत, तरी सुद्धा अजून धावपळ चालूच आहे. सकाळी ५ ते रात्री १२ असे रुटीन चालू आहे. का करतोय हे सगळे एवढा विचार करायला सुद्धा फुरसत नाही तिथे स्वच्छता अभियानाला काय डोंबल वेळ देणार हे? 

आमच्या ग्रुप मधला सर्वात तरुण म्हणजे साधारण ३५-४० वयोगटातला मित्र म्हणजे IT वाला. १८ वर्षे नोकरी करतो आहे, एव्हाना ५-६ कंपन्या बदलून झाल्या आहेत. वर्षातून किमान दोनदा तरी परदेश दौरे असतात. यांना आधीच लठ्ठ पगार, त्यात परदेश दौरा करून आले की आणखी कमाई. कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत. उच्चभ्रू वस्तीत ३-BHK घर आहे, दाराशी Honda latest model ची गाडी आहे, सुंदर संसार आहे. २ गोंडस मुले आहेत, शिवाय बायकोला पण चांगली नोकरी आहे. "हम दो हमारे दो" एवढेच यांचे जग आहे. महिन्यातून दोनदा गाडी काढायची आणि सुटायचे - कधी कोकणात तर कधी गोव्याला. तेवढाच जरा चेंज!  पण यांचा Work-Life Balance झीरो झालाय म्हणून सारखे रडत असतात. कामाच्या वेळा अतिशय odd झाल्यात, जायची वेळ सांगता येते पण परत यायची वेळ नाही; बर्याच वेळा तर घरीच काम घेऊन यावे लागते, week end ला सुद्धा घरून काम करावे लागते. तरी बरे हाताशी Smart Phone असल्याने सारखे फेसबुक, ट्विटर किंवा WhatsApp वरून नातेवाईक-मित्र यांच्या संपर्कात राहता येते नाहीतर अवघडच होते. संदीप खरे यांची "दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई" ही कविता यांच्यावरच लिहिली असावी अशी शंका येते. या अशा सदैव busy माणसांना कुठला आलाय देशासाठी वेळ? अहो ते परदेशी ग्राहकांसाठी काम करून डॉलर आणतात हीच केवढी मोठी देशभक्ती यांची! त्यांना तुम्ही स्वच्छता वगैरे करायला लावू नका बुवा. 

ते बघा, ते दिसतायत ना ते आहेत आमच्या येथील एका उच्च कॉलेजमधील तरुण-तरुणी. काय म्हणता शरीरयष्टीवरून शाळेतले वाटतात? अहो आजकाल शरीरयष्टी नाही तर Style बघायची असते. कित्ती मेहनत लागते Style develop करायला, Parlor मध्ये तासनतास बसावे लागते मनासारखी Hair Style किंवा Facial करून घ्यायला. अधून मधून सारखे मॉल मध्ये जाऊन Latest Fashion चा study करायला लागतो, नाहीतर ग्रुप मध्ये टिंगल होते ना. शिवाय आई-बाबांच्या मागे लागून latest smart phone आणि टू-व्हीलर पण घ्यावी लागते. Parents ना पटवायचे म्हणजे सर्वात difficult आहे. त्यांचे मूड्स बघायचे, ते किती बिझी आहेत याचा अंदाज घ्यायचा आणि बरोबर वेळ साधायची. हे म्हणजे काय Pizza खाण्याइतके सोपे काम आहे का? या सगळ्यातून वेळ झालाच तर कॉलेजला जायचे. एक वेळ तिकडे गेले नाही तरी चालते पण क्लास मात्र अटेंड करावाच लागतो, भरपूर पैसे भरले आहेत ना तिथे! तर या सगळ्या Up-to-date राहण्याच्या गडबडीतून या पोरांना देशाच्या स्वच्छतेसाठी वेळ कुठून मिळणार? अहो यांच्या आई-वडिलांनाच पोरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे यांची काय कथा? 

तेव्हा मोदीजी, बघा बुवा, परत एकदा विचार करा तुमच्या महत्वाकांक्षी योजनेचा. आम्ही आपले तुम्हाला घर बसल्या Risks highlight करण्याचे मोठे काम केले आहे, ही सुद्धा एक प्रकारची देशभक्तीच नाही का? :-)

आपला घरबसू देशभक्त,
आ. ग. लावे

Saturday, 20 September 2014

वसुंधरेवरील तारे - डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी

डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी
डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी
पुण्याजवळ अवघ्या ३५-४० कि.मी. वर असलेले भोर हे तालुक्याचे ठिकाण. भोरच्या बस स्थानकाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने बाजारपेठेतून भोरेश्वराच्या मंदिराकडे जाणारा रस्ता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याआधी तुमचे मन शांत करावे व तुम्हाला प्रसन्न/पवित्र वाटावे म्हणूनच जणू काही परमेश्वराने त्याच रस्त्यावर मंदिराच्या थोडे आधी डॉ. प्रभाकर जोशी यांच्या घराची व्यवस्था केली असावी, असे मला कायम वाटत आले आहे.

डॉक्टरांच्या बैठ्या घरात शिरल्या शिरल्या प्रसन्न वाटावे असेच वातावरण. बैठकीची खोली, स्वयंपाकघर आणि शेजारच्या खोलीत दवाखाना अशी घराची मांडणी. सर्वत्र अत्यंत अकृत्रिम असा साधेपणा. बैठकीच्या खोलीतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले ३ सरसंघचालक - डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस - यांचे एकत्रित चित्र हे डॉक्टरांच्या निष्ठा आणि आदर्श दर्शविते. डॉक्टरांच्या डोक्यावरची पांढरी टोपी पाहिली की साने गुरुजींचाही प्रभाव त्यांच्यावर पडला आहे हे जाणवते. 

डॉक्टरांची, ती. सौ. काकूंची (पूर्वाश्रमीच्या विमल रानडे - त्याही स्वतः डॉक्टर, Gynaecologist) आणि त्यांचा मुलगा डॉ. उदय या सर्वांची गाठ पडली की आपल्याला जणू काही सात्विकतेचा नव्याने परिचय होतो. 

गेली ३० वर्षे डॉक्टरांची ओळख समस्त भोर तालुक्याला आहे ती त्यांनी १९८३ साली भोरपासून २० कि. मी. अंतरावर असलेल्या रावडी गावात सुरु केलेल्या आणि आजतागायत अतिशय नेटाने चालवलेल्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके शाळेमुळे.

डॉक्टरांचे जन्मगाव रावडी. रायरेश्वर जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्याच्या पायथ्याशी असलेले रावडी गाव. चहुबाजूनी भात शेतीने वेढलेले निसर्गसुंदर असे रावडी गाव. तिथे शिक्षणाची काहीच सोय नसल्याने डॉक्टरांना वाई, असवली इ. मोठ्या गावांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला लागले. त्यामुळे डॉक्टरांनी लहानपणापासूनच ठरवले की आपल्याला ज्या अडचणीतून शिक्षण घ्यायला लागले ती अडचण आपल्या गावातील आणि आसपासच्या मुलांना येऊ नये म्हणून आपण गावामध्ये शाळा काढायची.

वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ठरवले की आयुष्यात काही तरी केले पाहिजे. १० वी पर्यंतचे शिक्षण वाई, असवली येथे पूर्ण केल्यानंतर ११ वी / १२ वी चे शिक्षण पुण्यात स. प. महाविद्यालयात झाले. पुण्यात असताना घरोघरी दूध घालून अभ्यास केला. स. प. महाविद्यालयात शिकत असताना डॉ. दि. ब. केरूर यांचे अर्थशास्त्र आणि पु. ग. सहस्रबुद्धे सरांचे मराठी विषयात मार्गदर्शन मिळाले. पुण्याने डॉक्टरांना खूप काही दिले त्यामुळे आजही ते पुण्याचे ऋण मान्य करतात. १२ जुलै १९६१ ला ज्या दिवशी पुण्यात पूर आला होता त्या दिवशी डॉक्टर नेहमीप्रमाणे दूध घालत असताना अप्पा बळवंत चौकात अडकून पडले होते याची आठवण अजूनही ताजी आहे. नातुबागेमध्ये एक खोली घेऊन डॉक्टर राहायचे आणि स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे. मुळात वाचनाची आवड असलेल्या डॉक्टरांना संशोधनपर आणि ऐतिहासिक लिखाण वाचायला आवडते.

नंतर वैद्यकीय शाखेत डॉक्टरांना प्रवेश मिळाला पण त्यासाठी पुणे सोडून अकोला इथे जायला लागले. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी ही त्यांची प्रथमपासूनची इच्छा होती. त्याप्रमाणे अकोला येथे ५ वर्षे वैद्यकीय शिक्षण घेतले. या काळात त्यांना आपटे व वझे या संघ कार्यकर्त्यांची खूप मदत झाली. त्यांच्यामुळे संघाच्या कार्यालयात राहायची व आपटे यांच्या खानावळीत जेवणाची मोफत सोय झाली.

डॉक्टरांचा संघाशी संपर्क त्यांच्या काकांमुळे लहानपणापासूनच आला. पुढे शिक्षणाच्या दरम्यान डॉक्टर एक वर्ष विदर्भात मूर्तिजापूर इथे संघाचे प्रचारक म्हणून गेले होते. गेली अनेक वर्षांपासून डॉक्टरांकडे भोर तालुका संघचालक जबाबदारी आहे.

सुरुवातीची शाळा
१९७० च्या सुमारास वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर परत भोरला आले व इथे वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्याच सुमारास डॉक्टरांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी "सरस्वती प्रतिष्ठान" संस्था काढली. प्रत्यक्ष शाळा सुरु व्हायला १९८३ साल उजाडावे लागले. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १०० व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून १७ फेब्रुवारी १९८३ रोजी चिखलगाव येथे २ शिक्षक आणि २० मुले यांना घेऊन शाळा सुरु झाली. १९८३ ते १९९३ ही १० वर्षे चिखलगाव येथील देवळामध्ये शाळा भरायची.

सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. विशेषतः आर्थिक बाजू. शाळेला शासकीय परवानगी तर मिळाली होती पण अनुदान मिळाले नव्हते. अशा परिस्थितीत जोशी कुटुंबियांनी स्वतःच्या खिशातील पैशातून शाळेतील शिक्षकांचे पगार व इतर खर्च भागवले. 
रावडी येथील जोशी परिवाराच्या जागेत शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
सुरुवातीच्या काळात उच्च शिक्षित असलेले श्री. रवि आचार्य सर, प्रभुदेसाई सर, नीलाताई पाठारे बाई, माधवराव देशपांडे सर असे अनेक निष्ठावान सहकारी डॉक्टरांना मिळाले. मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून हे शिक्षक मुलांबरोबर क्रिकेट खेळायचे व मग शाळा भरवायचे. २० विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेली शाळा हळू हळू वाढू लागली. मग शाळेला जागा कमी पडायला लागली म्हणून जोशी कुटुंबियांनी रावडी येथील स्वतःची २ एकर जमीन शाळेला दिली. श्री. अरुण किर्लोस्करांनी शाळेला भरघोस मदत केल्याने रावडीला शाळेची इमारत १९९३ साली उभी राहिली.

सध्याची शाळा  
पण रायरेश्वराच्या पठारावरून ५-६ कि. मी. चालून शाळेला येणार्या विद्यार्थ्यांच्या अडचणी डॉक्टरांनी ओळखल्या व त्यांच्यासाठी वसतिगृह बांधायचे ठरवले. सातारा येथील एका संस्थेने दिलेल्या मदतीमुळे वसतिगृहाची इमारत २००० साली उभी राहिली. आज या वसतीगृहात ६० मुले विनामूल्य राहतात.

शाळेचे चांगले काम पाहून अनेक लोकांनी मदत केली. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या आमदार निधीतून विज्ञान प्रयोगशाळा उभी राहिली. Cognizant Foundation ने केलेल्या मदतीमधून २००६-०७ पासून Computer Laboratory चालू झाली. शाळेत शिकलेल्या एका गरीब घरातील मुलाने वडिलांना मदत करून मिळालेल्या पैशातून शाळेला रु. १०,०००/- देणगी दिली.

आज रोजी शाळेत साधारण ४०० विद्यार्थी ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत आहेत. पूर्ण वेळ शिक्षकांची संख्याही १७ आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब घरातील मुलांना शाळा अतिशय कमी पैशात शिक्षण देते.

गेल्या ३० वर्षात शाळेतील मुलांनी उल्लेखनीय यश मिळवलेले आहे. लीना ओव्हाळ ही मुलगी शाळेतून शिकून आता शासकीय सेवेत कलेक्टर पदावर काम करत आहे. २०१३ साली गणेश हासपे वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार सभेने घेतलेल्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम आला. अनेक विद्यार्थ्यांना राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आहे. शाळेतील सर्व मुलांना भगवद्गीता म्हणता येते. या कारणास्तव २००६ साली गीता धर्म मंडळाने शाळेला आत्माराम करंडक दिला.

समाजाची सेवा करावी या भावनेबरोबरच समाजासाठी प्रचंड काम केलेल्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता भाव हा डॉक्टरांचा मोठा गुण आहे. या भावनेतूनच सुरुवातीला असलेले संस्थेचे "सरस्वती प्रतिष्ठान" हया नावाला "दधिचींना प्रणाम" हे नाव जोडले. दधिची ऋषींनी स्वतःच्या अस्थी देवांच्या चांगल्या कामासाठी दिल्या होत्या तसेच समाजातील आधुनिक दधिचींविषयी कृतज्ञता म्हणून "सरस्वती प्रतिष्ठान दधिचींना प्रणाम" असे थोडेसे मोठे व जरासे विचित्र नाव आग्रहपूर्वक संस्थेला दिले. नावात बदल करताना पुण्यातील धर्मादाय आयुक्तांनी आक्षेप घेतले; तेंव्हा दधिची कोण हे सर्व त्यांना समजावून सांगायला लागले.

मा. श्री. मोहनजी रानडे शाळेतील एका कार्यक्रमात 
याच कामाचा एक भाग म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना डॉक्टरांनी मदतीचा हात दिला आहे. मग ते प्रमोद दीक्षित जे आसाममधे काम करताना दहशतवाद्यांकडून मारले गेले त्यांच्या नावाने शाळेत लावलेले झाड असो, किंवा गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी श्री. मोहनजी रानडे यांचा शाळेत बोलावून केलेला सत्कार असो. १४ जानेवारी हा पानिपत युद्धाचा स्मरण दिवस. या दिवसाची आठवण राहावी म्हणून पेशव्यांची देवी ही मुरुड येथील दुर्गा देवी - तिला दर वर्षी १४ जानेवारीला अभिषेक चालू केला.


आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा अस्थिकलश एडनवरून शाळेत आणला 
वासुदेव बळवंत यांची आठवण म्हणून त्यांनी ज्या एडनच्या कारागृहात मरण यातना भोगून प्राण सोडले त्या ठिकाणची माती आणून तो कलश आज शाळेत ठेवला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वासुदेव बळवंतांच्या त्यागाची जाणीव कायम राहावी. पुण्यातील CID विभागात जेंव्हा त्यांचा पुतळा बसवला होता त्या वेळेस त्या विभागाकडून शाळेला आवर्जून बोलावणे आले, त्याप्रमाणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्या कार्यक्रमात "गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार" हे गीत सादर केले.

भोर येथील वनवासी कल्याण आश्रमाचे काम डॉक्टरांच्या घरात सुरु झाले. आता आश्रमाची स्वतःची जागा आहे.

डॉक्टर स्वतः अतिशय कमी बोलतात आणि त्यांना जे म्हणायचे आहे ते कृतीतून दाखवतात. उ.दा. डॉक्टरांनी भोरेश्वर मंदिरात सनई वादनाची सुरुवात १९७९ साली केली. तेंव्हापासून भोर गावाची मंगल सुरुवात सकाळी ५:३० वाजता भोरेश्वराच्या सनई वादनाने होते. तशीच सनई डॉक्टरांनी रायरेश्वर आणि वाई येथे सुरु केली. आणि आता आंबेघर येथील प्राचीन शिवकालीन मंदिरात सनई सुरु करण्याचा मानस आहे.

शाळेच्या भावी योजनांमध्ये महाविद्यालय सुरु करायचे डॉक्टरांच्या मनात आहे; आवश्यक ती परवानगी मिळाली आहे. पुरेसे शिक्षक व विद्यार्थी मिळाले तर ते सुरु होईल. तरीही डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी धीर न सोडता काम करत आहेत.

तर असे हे आपले डॉक्टर जोशी, अतिशय निगर्वी, शांत आणि कृतज्ञ स्वभावाचे डॉक्टर. वैद्यकीय व्यवसाय करून प्रचंड पैसा मिळवण्याच्या सर्व संधी झुगारून देऊन स्वतःच्या गावात वैद्यकीय सेवा देतात, गावातील मुलांसाठी शाळा चालवतात, या सर्वांमधे त्यांच्या सुविद्य पत्नीची आणि मुलाची तितकीच तोलामोलाची साथ त्यांना लाभते. आणि तरीही प्रसिद्धीचे वारेही त्यांना शिवत नाही. कुठल्याही वर्तमानपत्रात, मासिकात किंवा दूरदर्शन माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल काहीही लिहून येत नाही. ही आपल्या माध्यमांमध्ये आणि विचारवंतांमध्ये असलेली वैचारिक अस्पृश्यातच दाखवते.

भोर गावामध्ये एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे उभे असलेले डॉक्टर, वयाच्या मर्यादेमुळे हालचालींवर मर्यादा आल्या तरी विचारांवर नाही आणि त्यातूनच नवनवीन योजना सहकार्यांच्या मदतीने राबवत असतात. त्यांचे उभे जीवन हे आपल्यासारख्यांसाठी एक आदर्शच आहे. आणि म्हणूनच ते आहेत या वसुंधरेवरील तारे. त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ या.

[संपर्कासाठी पत्ता - डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी, मंगळवार पेठ, राजवाडा रस्ता, भोर ४१२ ०२६. दूरध्वनी क्र. +91 2113 222720, ई-मेल: joshibhor@yahoo.com]