Sunday, 3 May 2026

स्मरण आशा-स्वरांचे


नमस्कार. महान पार्श्वगायिका आशा भोसले यांना जाऊन आज ३ आठवडे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांनी गाऊन ठेवलेल्या काही अप्रतिम गीतांद्वारे त्यांच्या "आशा-स्वरांचे" हे स्मरण.

"त्या आल्या, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले" हे आशाताईंबद्दल म्हणणं खूप धाडसाचं ठरेल, कारण त्यांचे जीवन आणि गायिका म्हणून त्यांचा प्रवास हा काही सहजसाध्य नव्हता हे आपल्याला त्यांच्या अनेक मुलाखतींमधून माहिती झालेले आहे. 

पाचही मंगेशकर भावंडे राहणीमानामध्ये अत्यंत साधी. एखादी छानशी साधी साडी, गळ्यात आणि हातातही मोजकेच दागिने, कपाळावर ठसठशीत दिसेल असे कुंकू (आजकालच्या मुलींना कुंकू/टिकली लावायला लाज वाटते म्हणे!), डाव्या किंवा उजव्या हातात फारतर एखादा रुमाल. कशाचाच बडेजाव नाही, कुठलाही नखरा नाही किंवा वादकांकडे बघून खोटी खोटी दाद देणे नाही. 

पण एकदा का त्यांनी गाण्याकरता तोंड उघडले की त्यांचे मोठेपण जाणवते आणि आपण थक्क होतो. आपल्या गळ्यातील उत्तम गाणे हे प्रेक्षकांपर्यंत कुठलाही नखरा न करता आणि हातवारे न करताही पोचवता येते हे या पाचही भावंडांनी पुनःपुन्हा सिद्ध केले आहे.

आशाताईंनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून म्हणजे १९४३ पासून ते जवळपास २०२४ पर्यंत म्हणजे तब्बल ८१ वर्षे आपल्या गायकीचा धबधबा अखंड चालू ठेवला! त्यांनी आयुष्यात किती गाणी रेकॉर्ड केली याचा नक्की आकडा माहिती नाही. पण त्यांची आणि लताबाईंची गाणी ऐकल्यावर "निजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो" ही प्रार्थना फळास येते. आपण सर्वच जण अतिशय भाग्यवान आहोत. असो.

चला तर ऐकू या आशाताईंची १२ अप्रतिम गाणी - ६ चित्रपटातील तर ६ गैरफिल्मी. गाण्यांची निवड करणेही महाकठीण. तरी पण शक्यतो कमी ऐकली गेलेली, Live कार्यक्रमात गायलेली गाणी यात घेतली आहेत. लोकप्रिय, सतत वाजवली/ऐकली गेलेली गाणी एक-दोन अपवाद वगळता टाळली आहेत.

शद्ब-मर्यादेमुळे प्रत्येक गाणे आणि त्यातील सौन्दर्य फार विस्ताराने मांडता आलेले नाही तरीसुद्धा आपल्याला ही गाणी आवडतील अशी आशा आहे.


१) आली री मेरे नैणाँ बाण पड़ी। - गैरफिल्मी (१९७१) - रचना संत मीराबाई - संगीतकार जयदेव

मीराबाईंची ही सुंदर रचना आशा आणि लता दोघींनी वेगवेगळी रेकॉर्ड केली आहे. लताने गायलेली रचना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केली आहे. लताबाईंनी दूरदर्शनच्या स्टुडिओत येऊन गायलेली ही रचना इथे ऐका - लताबाईंनी गायलेले गाणे.

मला स्वतःला, मी कितीही लताबाईंचा भक्त असलो तरी, आशाताईंनी गायलेली ही रचना खूप जास्त आवडते. जयदेव यांनी सहजसुंदर रचना आणि संतूर व बासरी यांचा अप्रतिम वापर केला आहे. "आली री मेरे नैना" यातील "री", "मेरे" आणि "नैना" या शब्दांवर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या छोट्या छोट्या हरकती घेऊन पुन्हा समेवर येण्याची जी जादू आशाताईंनी साधली आहे ती निव्वळ कमाल आहे. तसेच प्रत्येक कडव्यांच्या शेवटच्या ३ शब्दांवर घेतलेल्या वैविध्यपूर्ण जागाही लाजवाब आहेत.


२) चैन से हमको कभी - प्राण जाए पर वचन न जाए (१९७४)  - गीतकार S. H. बिहारी - संगीतकार O. P. नय्यर

जशा लता-सी. रामचंद्र, लता-मदनमोहन, रफी-नौशाद, किशोरकुमार-S.D. बर्मन या जोड्या प्रसिद्ध आहेत आशा भोसले आणि O.P. नय्यर यांची जोडी प्रसिद्ध आहे. आशाताईंनी सर्वात जास्त गाणी ही O. P. कडे गायली असावीत. हे गीत O. P. यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा संपूर्णतः वेगळे आहे, शांत आहे. आशाताईंनी मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओत रेकॉर्ड केलेले गाणे आहे. वेदनेचे गाणे असल्याने आशाताईंनी एका जागी बसून, भावनेने ओतप्रोत भरलेले गाणे गायले आहे. ऐका तर.


३) तुमुल कोलाहल कलह में - गैरफिल्मी (१९७१) - गीतकार जयशंकर प्रसाद - संगीतकार जयदेव

आता जे गीत ऐकवणार आहे ते आहे १९७१ साली जयदेव यांनी रेकॉर्ड केलेल्या "मैं बैरागन हो गयी" या संग्रहातील. यातील सर्वच गाणी एक से एक आहेत पण या गाण्याचे स्थान त्या सर्व गाण्यांत सर्वात वरचे आहे. कवी जयशंकर प्रसाद यांनी १९३६ साली लिहिलेल्या "कामायनी" या महाकाव्यातील हे सर्वोत्कृष्ट गीत हिंदी भाषा प्रेमींना नक्की आवडेल कारण यात वापरलेली १००% शुद्ध हिंदी भाषा. मनुष्याचं मन, हृदय आणि बुद्धी यांचा आपापसातील संघर्ष आणि संवाद म्हणजे हे गीत आहे. शब्दांना अनुरूप चाल आणि आशाताईंचे भाव-विभोर करणारे गायन ही या गीताची वैशिष्ट्ये आहेत.


४) इन आँखों की मस्ती के - उमराव जान (१९८२) - गीतकार शहरयार - संगीतकार खय्याम  

आशाताईंचे हे ८०च्या दशकातील अत्यंत गाजलेले गाणे. सुंदर चाल, अप्रतिम गायन आणि पडद्यावरील रेखाचे दिसणे आणि अभिनय यांनी हे गाणे गाजले नसते तरच नवल! पण आज जे सादर करणार आहे ते चित्रपटातील गाणे नसून आशाताईंनी BBC स्टुडिओत १९८४ साली केलेलं रेकॉर्डिंग आहे. याची मजा काही औरच आहे. BBC च्या स्टुडिओत गाणं असूनसुद्धा आशाताईंनी अस्सल भारतीय पेहराव कुठलीही लाज न बाळगता केला आहे ही बाब दखल घेण्याजोगी. बाकी गाण्याविषयी काय लिहू? तुम्ही ऐकाच.


५) सलौना सा सजन है और मैं हूँ - गैरफिल्मी (१९८३) - गीतकार शबीह अब्बास - संगीतकार ग़ुलाम अली

आता सादर करत ती आहे एक ग़ज़ल. पाकिस्तानी गायक व संगीतकार ग़ुलाम अली हे आपल्या गज़ल गायनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आशाताईंबरोबर "मिराज़-ए-ग़ज़ल" नावाचा ग़ज़लांचा एक संग्रह प्रकाशित केला होता त्यातील ही गाजलेली ग़ज़ल. ग़ुलाम अलींच्या संगीताचा वेगळ्या ढंग, शैली आशाताईंनी किती सहज आत्मसात केली आहे याचे ही ग़ज़ल म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे. दूरदर्शनच्या संग्रहातील रेकॉर्डिंग आहे. सुरुवातीला दीड मिनिटे संगीतकार नौशाद यांचे निवेदन आहे. गाण्यात सतार, व्हायोलिन, सारंगी आणि तबला प्रामुख्याने वापरला आहे. 


६) जिवलगा कधी रे येशील तू - सुवासिनी (१९६१) - गीतकार ग. दि. माडगूळकर - संगीतकार सुधीर फडके

आता एक मराठी गाणे सादर करत आहे, अतिशय प्रसिद्ध आणि आजही लोकांचे आवडते! ५० आणि ६० च्या दशकात जेंव्हा लताबाई हिंदी मध्ये अत्यंत व्यस्त होत्या त्या काळात आशाताईंनी मराठीत अफाट काम करून ठेवले आहे. माझ्याकडे असलेल्या यादीमध्ये १९५१ पासून ते १९९६ पर्यंतच्या ४५ वर्षात आशाताईंनी मराठी चित्रपट आणि इतर अशी २३८ गाणी गायली आहेत. ही यादी निश्चितच अपूर्ण असावी.

या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ४ कडव्यांमध्ये ४ राग वापरले आहेत सुधीर फडके (बाबूजी) यांनी आणि प्रत्येक कडव्याचा शेवट त्या त्या रागातून पुन्हा यमन रागावर आणून केला आहे. आशाताईंची दूरदर्शन सह्याद्रीच्या स्टुडिओमधील रेकॉर्डिंग आहे हे. वादक किती अडचणीत बसले आहेत ते पहा (तसे प्रत्येक वेळी असावे असे माझे म्हणणे नाही) पण तरीसुद्धा संपूर्ण वादनात कुठेही कमी पडले नाहीत. म्हणजे पुन्हा तेच - आपले लक्ष्य आपले काम हे असले तर इतर गोष्टी गौण ठरतात. हे रेकॉर्डिंग झाल्यावर बाबूजींनी "३० वर्षांनंतरही आशाचा आवाज तसाच ताजा, टवटवीत आहे" अशी दाद दिल्याचे खुद्द आशाताईंनी एका मुलाखतीत सांगितले आहे. संगीतकार आणि गायिका दोघांची कमाल आहे. ऐकू या.


७) आगे आगे तोपैको गोला - गैरफिल्मी (१९७६) - गीतकार, संगीतकार आणि सहगायक डॅनी डेंग्झोपा

आता एक अतिशय मजेशीर नेपाळी गीत सादर करत आहे. हे गाणे नेपाळी TV वर प्रचंड गाजले आहे. त्यातही Voice of Nepal आणि Nepal Idol या कार्यक्रमांमध्ये अनेकांनी हे गाणे गायचा प्रयत्न केला आहे. महदाश्चर्य म्हणजे हे गीत लिहिलंय आणि संगीतबद्ध केलंय हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध खलनायक डॅनी डेंग्झोपा यांनी! गाण्याची चाल मनोरंजक आहे. डॅनी यांचं नृत्य, त्यांची आनंदी, उत्साहवर्धक देहबोली आणि आशाताईंचे सुंदर सादरीकरण. विशेषतः दुसऱ्या कडव्यांच्या आधी घेतलेला आलाप लाजवाब. आणि गाण्यात मधेच ते हसणं, किती नैसर्गिक आणि निष्पाप, अहाहा! तुम्हालाही गाणे आवडेल बघा.


८) साथी रे भूल न जाना मेरा प्यार - कोतवाल साहब (१९८४) - गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन

रवींद्र जैन यांनी ७० आणि ८० च्या दशकांमध्ये अनेक चित्रपटांना उत्तम संगीत दिले आहे. त्यांची बरीच गाणी खूप गाजली आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम म्हणावे असे हे गीत आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगची कहाणी अशी सांगतात की आशाताईंना काही कारणाने कुठल्याही rehearsal म्हणजे सरावसत्राला यायला जमले नाही म्हणून रवींद्र जैन अतिशय संतापले होते. रेकॉर्डिंगच्या दिवशी आशाताई स्टुडिओत आल्या, थेट रेकॉर्डिंगला माईक समोर उभ्या राहिल्या, त्या गायल्या आणि त्यांनी जिंकले, एका टेक मध्ये गाणे अंतिम झाले. ही ताकद, हे कौशल्य होते आशाताईंचे. भरत प्रताप सिन्हा (शत्रुघ्न सिन्हा) नावाचा प्रामाणिक पोलीस अधिकारी आणि त्याची बायको प्रभा (अपर्णा सेन). प्रभाच्या गतायुष्याबद्दल आपल्या नवऱ्याला कळले तर काय होईल या चिंतेत असताना चित्रपटात हे गाणे येते. 


९) शूरा मी वंदिले - मराठी नाट्यगीत - नाटक संगीत मानापमान - गीतकार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर - संगीतकार गोविंदराव टेंबे - मूळ गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर

अतिशय गाजलेले हे मराठी नाट्यगीत मूलतः मास्टर दीनानाथांनी गायले होते. नंतर ते अनेक गायकांनी गायले आहे. विशेषतः वसंतराव देशपांडे  यांनी गायलेले हे गीतही खूप प्रसिद्ध झाले. आशाताईंनी बहुदा ६० च्या दशकात त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून त्यांची बरीचशी नाट्यपदे गायली होती, त्यातीलच हे एक. या गीतातून आशाताईंची शास्त्रीय बैठक दिसते तसेच त्यांच्या आवाजाची फिरत, आलाप/ताना यावरची त्यांची हुकमत दिसते. अतिशय श्रवणीय असे हे गीत आहे. आज सादर करत आहे ते आशाताईंनी दूरदर्शनसाठी गायलेले हे गीत. साथीला पेटीवर आहेत डॉ. विद्याधर ओक. हे गीत गातानाची आशाताईंची देहबोली, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून क्षणभर लताबाईच गात आहेत का असे वाटते. 


१०) छोटासा बालमा अँखियन नींद ले गयो - रागिणी (१९५८) - गीतकार क़मर जलालाबादी - संगीतकार O. P. नय्यर

O.P. नी शास्त्रीय रागदारीवर आधारित जी गाणी संगीतबद्ध केली त्यातील हे एक अप्रतिम गाणे. आश्चर्याची बाब अशी की हे गाणे "सुकतातचि जगि या" या मा. दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेल्या प्रसिद्ध नाट्यगीतावर आधारित आहे, पण गाण्याला खास O.P. टच आहे. त्याहून आश्चर्य म्हणजे स्वतः आशाताईंनी हे नाट्यगीत १९५२ सालच्या मराठी चित्रपट "दूधभात" साठी गायले आहे ते इथे ऐकायला मिळेल - आशाताईंचे "सुकतातचि जगि  या". दुर्दैवाने YouTube वर चित्रपटाची जी आवृत्ती आहे त्यात हे गाणे नाहीये. त्यामुळे फक्त श्राव्य आवृत्ती द्यायला लागत आहे. हे गाणे खमाज थाटातील तिलंग या रागावर आधारित आहे, हेही या रचनेचे वेगळेपण आहे कारण O.P. यांची बरीचशी गाणी पिलू रागावर आधारित आहेत. आपल्या प्रियकराच्या दर्शनासाठी आसुसलेल्या प्रेयसीची वेदना O.P. यांनी त्यांच्या रचनेतून आणि आशाताईंनी त्यांच्या गायनातून आपल्यापर्यंत किती प्रभावीपणे पोचवली आहे. "छोटासा" आणि "रतियन नींद न आए" यातील "आए" या शब्दावर आशाताईंनी घेतलेल्या हरकती केवळ लाजवाब आहेत! ऐकू या.


११) फिर से आइयो बदरा बिदेसी - नमकीन (१९८२) - गीतकार गुलज़ार - संगीतकार R. D. बर्मन

गुलज़ार, R. D. बर्मन आणि आशा भोसले या त्रयींनी अनेक अप्रतिम, अफलातून गाणी आपल्याला दिलेली आहेत. त्यातीलच हे तुलनेने कमी ऐकले गेलेले पण उच्च दर्जाचे गाणे. शबाना आझमीवर चित्रित झालेले. पहाडी प्रदेशातील व्यक्तिरेखांवर चित्रपटाची कथा बेतलेली असल्याने R. D. बर्मन यांनी चाल पण त्याच धर्तीवर लावली आहे. गुलज़ार यांचे खास निवेदन या video मध्ये आहे ज्यात चित्रपटाची कथा आणि गाण्याच्या जन्माची कथा फार छान सांगितली आहे. त्यामुळे इतर काही फाफटपसारा न लावता तुम्ही थेट गाणेच ऐका. गाणे छोटे २ कडव्यांचेच आहे पण निवेदन व तिघांच्या गप्पांमुळे ते रंगले व लांबले आहे तरीही कंटाळा येत नाही, तुम्हालाही असाच अनुभव येईल.


१२) गीत कितने गा चुकी हूँ इस सुखी जग के लिये - गैरफिल्मी (१९५२) - गीतकार पं. भरत व्यास - संगीतकार - निखिल घोष

हे गीत म्हणजे एका अर्थाने आशाताईंचे आत्मकथन आहे असे मला वाटते. आणि ते सुद्धा त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात. त्यांच्या संघर्षमय जीवनाशी टक्कर देत स्वतःची गाण्याची कारकीर्द उभी करायची, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करायचे ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि आपल्या गाण्यातून समस्त लोकांना अपार आनंद देणाऱ्या आशाताईंना स्वतःसाठी किती वेळ मिळाला असेल? मग त्यांचे मन "आज रोने दो मुझे एक पल अपने लिये" असं म्हणत नसेल का? ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या गाण्याचे आशाताईंच्या आयुष्यातील स्थान महात्म्य समजेल. गाण्याच्या चालीत खास काही असेलच तर तो आहे आशाताईंचा कोवळा, तरुण आणि तरीही जीवनाचे दुःख मांडण्याची प्रगल्भता दाखवणारा आवाज. ऐकू या.



आशाताईंची मला आवडलेली ११ सोलो आणि १ द्वंद्वगीत इथे सादर केले. जोवर आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोवर संगीताच्या नभांगणात आपल्या अनमोल सुरांद्वारे लता आणि आशा कायम राहतील. त्यांचे स्वर आपल्याला सकारात्मक आणि सतत कार्यमग्न राहायची ऊर्जा देत राहतील. आपण आयुष्यभर त्यांच्या ऋणातच राहू या.

आशाताईंना विनम्र श्रद्धांजली. 🌹🙏🙏🌹




Remembering Asha Bhosale (कुछ लोकप्रिय, कुछ कम सुने हुए गाने)

 

Namaskaar. Today marks three weeks since the passing of the legendary playback singer Asha Bhosle. On this occasion, here is a tribute to her आशा-स्वर through some of the beautiful songs she left behind.

To say “she came, she saw, she conquered” about Asha Taai would be quite bold, because her life and journey as a singer were far from easy—something we’ve learned from her many interviews.

All five Mangeshkar siblings lived/are living very simple lives. A modest Saree, minimal jewellery, a prominent Kumkum Tilak on the forehead (these days many girls feel shy about wearing it!), perhaps a handkerchief in one hand—that’s all. No showiness, no affectation, no artificial gestures to impress musicians.

But the moment they start singing, their greatness became evident, leaving us spellbound. They proved time and again that true music reaches the audience without theatrics or exaggeration.

From the age of ten—starting in 1943—until nearly 2024, Asha Taai sustained an uninterrupted musical journey spanning an astonishing 81 years. The exact number of songs she recorded is unknown. But listening to her and Lata Mangeshkar feels like a divine blessing fulfilled. We are all truly fortunate.

Let’s now listen to 12 of her wonderful songs—6 from films and 6 non-film. Selecting them was extremely difficult, but these are relatively lesser-heard pieces, often from live performances rather than overplayed popular hits. Do read till the end and watch all the songs. It will perhaps make your day today.


1) “Aali Ri Mere Naina Baan Padi” (Non-film, 1971) - Lyricist Sant Meerabai - Compose Jaidev

This beautiful composition by Mirabai has been recorded separately by both Asha and Lata. The version sung by Lata was composed by Pandit Hridaynath Mangeshkar. You can listen here to the rendition that Lata recorded in the Doordarshan studio - Lata's version.

Personally, no matter how great a devotee I am of Lataji, I like Asha Taai’s rendition much more. Jaidev has created a simple yet beautiful composition, with an exquisite use of the Santoor and Flute. In “Aali Ri Mere Naina,” the delicate improvisations that Asha Taai takes on words like “ri,” “mere,” and “naina” at different points—and the way she returns to the main note—are simply magical. Likewise, the varied nuances she brings to the last three words of each verse are absolutely superb.


2) “Chain Se Humko Kabhi” – Pran Jaye Par Vachan Na Jaye - Lyricist S. H. Bihari - Composer - O. P. Nayyar

Just as the pairs of Lata–C. Ramchandra, Lata–Madan Mohan, Rafi–Naushad, and Kishore Kumar–S. D. Burman are famous, the duo of Asha Bhosle and O. P. Nayyar is equally well known. Asha Taai has probably sung the maximum number of songs for O. P. Nayyar.

This song is completely different from O. P.’s usual style—it is calm and subdued. It was recorded by Asha Taai in the Mumbai Doordarshan studio. Since it is a song of deep emotion and pain, she sang it sitting in one place, fully immersed in its feeling. Do listen.


3) “Tumul Kolahal Kalah Mein” (Non-film, 1971) - Lyricist Jaishankar Prasad - Composer Jaidev

The song I am about to present now is from the collection “Main Bairagan Ho Gayi,” recorded by Jaidev in 1971. All the songs in this collection are exceptional, but this one stands at the very top among them.

This is one of the finest compositions from the epic “Kamayani,” written in 1936 by the poet Jaishankar Prasad. Lovers of the Hindi language will especially appreciate this piece, as it is written in 100% pure Hindi.

The song represents the inner conflict and dialogue between the human mind, heart, and intellect. Its key features are the tune that perfectly complements the words and Asha Taai’s deeply emotive, soul-stirring rendition.


4) “In Aankhon Ki Masti Ke” – Umrao Jaan - Lyricist Shahrayar - Composer Khayyam

This is one of Asha Taai’s most celebrated songs from the 1980s. With its beautiful composition, outstanding singing, and Rekha’s appearance and performance on screen, it would have been surprising if this song hadn’t become so popular!

However, the version being presented today is not from the film, but a recording done by Asha Taai in the BBC studio in 1984. It has a charm of its own. Even while performing in a BBC studio, Asha Taai wore traditional Indian attire without any hesitation—something worth noting.

What more can I say about the song? You should simply listen to it.


5) “Salona Sa Sajan Hai Aur Main Hoon” (Non-film, 1983) - Lyricist Shavi Abbas - Composer Ghulam Ali

Now, I present a ghazal. The Pakistani singer and composer Ghulam Ali is renowned for his ghazal singing. He released a collection of ghazals titled “Miraaj-e-Ghazal” in collaboration with Asha Taai, and this is one of the most popular pieces from that collection.

This ghazal is an excellent example of how effortlessly Asha Taai has absorbed and adapted to Ghulam Ali’s distinctive musical style. The recording is from the Doordarshan archives. At the beginning, there is about a minute and a half of commentary by the legendary composer Naushad.

The song prominently features instruments such as the Sitar, Violin, Sarangi, and Tabla.


6) “Jivlaga Kadhi Re Yeshil Tu” – Suvasini - Lyricist G. D. Madgulkar - Composer Sudhir Phadke

Now I present a Marathi song—very famous and still loved by people today! During the 1950s and 60s, when Lataji was extremely busy in Hindi cinema, Asha Taai did an enormous amount of work in Marathi. According to a list I have, between 1951 and 1996—a span of 45 years—she sang 238 Marathi songs (including films and others). This list is certainly incomplete.

A special feature of this song is that the composer Sudhir Phadke (Babooji) has used four different Raaga across its four verses, and each verse concludes by returning to Raaga Yaman. This recording is from the Doordarshan Sahyadri studio. Just look at how cramped the musicians are seated (not that it should always be like this), yet they fall short nowhere in the performance. Once again, it shows that when one is focused on their work, everything else becomes secondary.

After this recording, Babuji reportedly remarked, “Even after 30 years, Asha’s voice remains just as fresh and vibrant,” as Asha Taai herself mentioned in an interview. It is truly a remarkable achievement by both the composer and the singer. Let’s listen.


7) “Aage Aage Topaiko Gola” (Non-film, 1976) - Lyricist, Composer and Co-Singer Danny Denzongpa

Now I present a very fun Nepali song. This song became hugely popular on Nepali television. Many contestants have also tried to sing it on shows like The Voice of Nepal and Nepal Idol.

What’s truly surprising is that this song was written and composed by the well-known Hindi film villain Danny Denzongpa! The tune is lively and engaging. Danny’s dance, his cheerful and energetic body language, and Asha Taai’s beautiful rendition all add to its charm.

Especially noteworthy is the alaap taken before the second verse—it is simply wonderful. And that spontaneous laughter in the middle of the song—so natural and innocent—absolutely delightful! I’m sure you’ll enjoy the song too.



8) “Saathi Re Bhool Na Jaana Mera Pyar” – Kotwal Saab - Lyricist and Composer Ravindra Jain

Ravindra Jain composed music for many films during the 1970s and 1980s. Several of his songs became very popular. This particular song is considered one of the best of his career.

The story behind its recording is often told like this: due to some reason, Asha Taai was unable to attend any rehearsal sessions, which made Ravindra Jain very upset. On the day of the recording, Asha Taai arrived at the studio, went straight to the microphone, and began singing. She delivered the entire song flawlessly, and it was finalized in a single take.

This was the strength and skill of Asha Taai.

The song appears in a scene involving a sincere police officer named Bharat Pratap Sinha (played by Shatrughan Sinha) and his wife Prabha (played by Aparna Sen). The song plays at a moment when Prabha is worried about what will happen if her husband learns about her past life.


9) “Shoora Mi Vandile” – Sangeet Manapman (Marathi Drama) - Lyricist Krushnaji Prabhakar Khadilkar - Composer Govindrao Tembe - Original Singer Master Deenanath Mangeshkar

This is a very famous Marathi natya-geet (theatrical song), originally sung by Master Deenanath. Later, it was performed by many singers. In particular, the version sung by Vasantrao Deshpande also became very popular.

Asha Taai likely sang many of her father’s stage compositions in the 1960s as a tribute to him, and this is one of them. This song reflects Asha Taai’s strong classical foundation, as well as her command over melodic movement, and her mastery of alaps and taans. It is an extremely pleasant and enjoyable piece to listen to.

What is being presented today is Asha Taai’s rendition of this song recorded for Doordarshan. Accompanying her on the harmonium is Dr. Vidyadhar Oak.

While watching her perform this song, her body language and expressions are so expressive that for a moment it feels as if Lataji herself is singing.


10) “Chhota Sa Balma Ankhiyan Neend Le Gayo” – Ragini (1958) - Lyricist Qamar Jalalabadi - Composer O. P. Nayyar

Among the songs that O. P. Nayyar composed based on classical ragas, this is one of the most remarkable pieces. Interestingly, this song is based on the famous Marathi natya-geet “Sukhatatichi Jagti Ya,” originally sung by Master Deenanath Mangeshkar, yet it carries O. P. Nayyar’s distinct musical touch.

Even more fascinating is the fact that Asha Taai herself had sung this very natya-geet earlier for the 1952 Marathi film “Dudh Bhaat.” You can listen to Asha Taai’s version of “Sukhatatichi Jagti Ya” here. Unfortunately, the film version is not available on YouTube, so only the audio recording can be shared.

This composition is based on Raag Tilang in the Khamaj thaat, which is another special feature of the song, as most of O. P. Nayyar’s compositions are based on Raag Pilu.

The pain of a lover longing for her beloved has been so effectively conveyed—through O. P. Nayyar’s composition and Asha Taai’s singing—that it deeply reaches the listener. The subtle improvisations Asha Taai brings, especially on words like “aaye” in phrases such as “chhota sa” and “ratiyan neend na aaye,” are simply outstanding.

Let us listen.


11) “Phir Se Aaiyo Badra Bidesi” – Namkeen (1982) - Lyricist Gulzar - Composer R. D. Burman

The trio of Gulzar, R. D. Burman, and Asha Bhosle has given us many extraordinary and unforgettable songs. This is one such relatively lesser-heard but highly refined composition among them, picturized on Shabana Azmi.

Since the film is set in a hilly region with characters rooted in that landscape, R. D. Burman has composed the tune accordingly, reflecting that atmosphere.

This video also includes Gulzar’s special narration, in which he beautifully explains the story of the film as well as the background behind the creation of the song.

So, without adding anything further, you should directly listen to the song. It consists of only two short verses, but because of the narration and the conversations among the three, it becomes more engaging and extended—yet never boring. You will likely experience the same.


12) “Geet Kitne Ga Chuki Hoon Is Sukhi Jag Ke Liye” (Non-film, 1952) - Lyricist Pt. Bharat Vyas - Composer Nikhil Ghosh

I feel this song is, in a sense, Asha Taai’s own autobiography—especially from the early phase of her career.

It was not at all easy for her to build a singing career while facing life’s struggles and simultaneously carving out a distinct identity for herself. And for someone who brought immense joy to millions through her singing, how much time would she have actually had for herself?

Perhaps her heart must have said, “Today, let me cry for a moment for myself.”

If we keep this background in mind, we can truly understand the importance this song holds in Asha Taai’s life.

If there is anything particularly special in the composition, it is Asha Taai’s voice itself—young and tender, yet already showing a mature depth in expressing the pain of life.

Let us listen.


These 11 solo songs and 1 duet showcase Asha Taai ’s extraordinary range. As long as the sun and moon exist, the voices of Lata and Asha will continue to shine in the musical sky, inspiring generations.

A humble tribute to Asha Taai . 🌹🙏