Friday, 22 November 2013

आपण सगळेच काचेच्या घरातील सहवासी?

लहानपणी वाचलेली एक गोष्ट काल आठवली. ४ मित्र असतात - तिघे अतिशय हुशार पण व्यवहारशून्य असतात; तर चौथा मित्र कमी हुशार पण व्यवहारचतुर असतो. चौघे जंगलातून जाताना त्यांना कोणा प्राण्याची हाडे पडलेली दिसतात. पहिला मित्र आपल्या ज्ञान-कौशल्याने ती हाडे जुळवून त्यातून सिंहाचा सांगाडा बनवतो. दुसरा मित्र त्यात मांस भरून त्यावर त्वचा निर्माण करतो. तिसरा मित्र त्यात प्राण ओतून सिंहाला जिवंत करणार असतो; पण चौथा मित्र त्यांना धोक्याची सूचना देतो. त्याकडे लक्ष न देता तिसरा मित्र त्या सांगाड्यात प्राण ओततो. तोपर्यंत चौथा मित्र पळून गेलेला असतो. सिंह जिवंत होताच उरलेल्या ३ मित्रांना खाउन टाकतो.   तात्पर्य: आपल्या ज्ञानाचा योग्य वापर केला नाही तर ते आपल्यावरच उलटू शकते. 

ही गोष्ट काल आठवण्याचे कारण म्हणजे काल घडलेल्या २ महत्वाच्या घटना - एक तहलकाचे प्रमुख श्री. तरुण तेजपाल यांच्यावर त्यांच्याच एका महिला सहकारीने केलेला लैंगिक शोषणाचा आरोप, तर दुसरी आम आदमी पक्षाच्या काही वरिष्ठ सभासदांचे झालेले स्टिंग ऑपरेशन.

तरुण तेजपाल यांनी सन २०००-२००१ मध्ये २ मोठी स्टिंग ऑपरेशन करून राजकीय आणि क्रीडा वर्तुळात मोठीच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे तत्कालीन वाजपेयी सरकार चांगलेच अडचणीत येउन २००४ च्या निवडणुकीनंतर त्यांना पायउतार व्हावे लागले होते. याचा प्रचंड फायदा तहलकाला आणि पर्यायाने तरुण तेजपालांना झाला.

२००४ मध्ये आलेल्या UPA सरकार दरबारी त्यांचे वजन तर वाढलेच शिवाय दिल्लीतील पत्रकार वर्तुळात प्रतिष्ठा वाढली. UPA सरकार धार्जिण्या विविध वृत्तवाहिन्यांवर तेजपाल व त्यांचे काही सहकारी "विचारवंत" म्हणून मत प्रदर्शन करू लागले. The Guardian आणि Newsweek यांसारख्या आंतरराष्ट्रीय मासिकांनी तेजपाल व त्यांच्या सहकारी शोमा चौधुरी यांना गौरवले. अवघ्या ७-८ वर्षात तहलकाचे रुपांतर एका मोठ्या मिडिया हाउस मध्ये झाले; इतके की गेल्या ३ वर्षांपासून ते मोठ्या शहरांमध्ये ThinkFest भरवायला लागले. आश्चर्य म्हणजे २००७ मध्ये दयानिधी मारन यांच्याविरुद्ध केलेल्या स्टिंग ऑपरेशन शिवाय एकही खळबळजनक कृती UPA सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत तहलकाने केलेली नाही, हा कदाचित योगायोग असू शकेल.

पण हाय रे दैवा, काळाची चक्रे उलटी फिरली आणि तेजपाल यांचे पाय घसरले. इतरांना उठसूट नैतिकतेचे पाठ देणारया तेजपाल यांचे स्वतःचे पाय मातीतेच आहेत हे दिसून आले. ज्या माध्यमांनी तेजपालांना मोठे केले त्याच वृत्तवाहिन्या आज त्यांना जाब विचारात आहेत, त्यांच्या चारित्र्याची चिरफाड करत आहेत. या सगळ्यात काँग्रेसची सावध प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. हे प्रकरण कुठे जाते ते नजिकच्या भविष्यकाळात दिसेलच; पण या निमित्ताने मिडीयारूपी सिंह हा मिडीयावरच उलटला आहे एवढे मात्र खरे.

दुसरी घटना - आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ सभासद - शाझिया अल्मि आणि कुमार विश्वास एका स्टिंग ऑपरेशन मध्ये कॅमेऱ्यासमोर काळे पैसे घेताना व सत्तेत आल्यावर अमुक कामे करून देऊ असे सांगताना दिसतात. केजरीवाल यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा नेता आपल्या सहकार्यांना घेऊन राजकीय व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने पक्ष स्थापन करतो. स्वच्छ चारित्र्य व नीतिमत्ता या गुणांवर पक्ष बांधणीचे स्वप्न बघतो. प्रस्थापित राजकीय पक्ष या नवीन पक्षाकडे "थांबा, थोडेच दिवसात कळेल राजकारण काय असते ते" अशा वृत्तीने बघत असतात. आणि अचानक एक दिवस श्री. अण्णा हजारे आम आदमी पक्षाने गोळा केलेल्या निधीवर प्रश्नचिन्ह उभे करतात, पक्षाचे नेते स्टिंग ऑपरेशन मध्ये सापडतात आणि मग सर्वच जण या पक्षाबद्दल, त्यांच्या हेतूंबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घ्यायला लागतात.

माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात असा प्रश्न उभा राहतो की आज कोण कोणाला स्वच्छतेचे प्रमाणपत्र द्यायला लायक आहे? जो तो एकमेकांवर आरोप करण्यात गुंतला आहे. राजकीय पक्ष आता आपल्या विरोधकांबद्दल चांगले बोलत नाहीत. दिवस-रात्र प्रत्येक पक्ष हा माझेच कसे खरे आणि विरोधक कसे खोटे / पाताळयंत्री हे सांगत असतो. आपला परस्परांवरचा विश्वास कमी झाला आहे. आपण बघतो सामान्य लोक सुद्धा स्वतःची चूक कबूल करत नाहीत, उलट दुसर्याला दोष देतात. कोणाला कायद्याची भीती राहिली नाही; स्वतःच्या स्वार्थासाठी लोक कुठल्याही थराला जात आहेत, कोणाचे तोंड भरून कौतुक सुद्धा आपण आजकाल करत नाही; अशा परिस्थितीत राजकीय पक्षांकडून काय अपेक्षा करायची?

गुन्हेगारी, अत्याचार, भ्रष्टाचार हे आजूबाजूला होत असताना तुमच्या-माझ्यासारखी पांढरपेशी माणसे एक तर गप्प राहतात अथवा परिस्थितीला शरण जातात. अशाने आपण वाईट गोष्टींना एक प्रकारे उत्तेजनच देत नाही का? स्वच्छ, चारित्र्यवान, चांगले काम करणारी असंख्य माणसे आपल्या देशात आहेत, पण तरी सज्जनशक्तीचा एकत्रित प्रभाव जाणवत नाही.

एका अर्थाने आपण सर्वच जण काचेच्या घरातील सहवासी झालो आहोत; त्यामुळे आपण वाईटाला वाईट म्हणत नाही; अन्यायाविरुद्ध कृती करत नाही, आणि ही माझ्या मते फार भयाण स्थिती आहे.

देशाला आणि प्रत्येक क्षेत्रात आज आवश्यकता आहे ती अशा नेत्याची जो आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून एक आदर्श लोकांपुढे ठेवेल. पण असा आदर्श नेता काय आकाशातून पडणार आहे का? जर बहुसंख्य समाज बदलला तर त्यातून पुढे येणारा नेता हा स्वच्छ, चारित्र्यवान, कृतीशील आणि देशाभिमानी असेल. पण त्यासाठी आपल्या प्रत्येकाला स्वतःत सकारात्मक बदल करावा लागेल आणि नुसते बोलघेवडे न राहता कृतीशील बनावे लागेल.

यासाठी काचेच्या घरातून बाहेर येणे अत्यावश्यक बनते. मग करू या सुरुवात?

Saturday, 16 November 2013

विवेकवादी आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना अनावृत्त पत्र

भूमिका: खालील लेख हा साधारण ३०-३१ ऑगस्टच्या सुमारास लिहिलेला आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची भ्याड आणि दुर्दैवी हत्या झाली; त्यानंतर बहुतांश समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी काबीज केलेल्या विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांमध्ये कोण जास्त दाभोलकरप्रेमी आहे हे दाखवण्याची जणू अहमहमिकाच लागली. या दुर्दैवी घटनेचे भांडवल करून कुठलेही पुरावे नसताना आपल्या वैचारिक विरोधकांना झोडपण्याची एकही संधी यांनी सोडली नाही. निःपक्षपातीपणाची अपेक्षा असलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून या प्रकारचे वार्तांकन हा एक प्रकारे समाजवादी दहशतवादच होता. ते पाहून मनात आलेले विचार इथे व्यक्त केले आहेत. यात दाभोलकरांच्या हत्येचे समर्थन करण्याचा जराही हेतू नाही; उलटपक्षी या भयानक घटनेचा जितका म्हणून निषेध करावा तितका तो कमीच आहे. 

खालील लेख दै. लोकसत्ता व दै. पुढारी यांना पाठवला होता. पण अपेक्षेप्रमाणे त्यांनी तो छापला नाही. निदान माझ्यातरी पाहण्यात आलेला नाही. त्यामुळे नाइलाजाने तो ब्लॉगवर टाकावा लागत आहे. जेणेकरून लोकांना सर्व संबंधितांचा पक्षपातीपणा कळावा. आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रियांचे स्वागतच असेल. धन्यवाद. 
========================================================================

सर्वप्रथम आपणा सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. आपण सर्वजण गेली अनेक वर्षे आपापल्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहात त्याबद्दल आपले खूप कौतुक व अभिनन्दन.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची झालेली हत्या ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना होती. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. त्यांच्या मारेकर्यांना आणि त्यामागील सूत्रधारांना लवकरात लवकर शोधून काढून योग्य ते शासन झाले पाहिजे ही आपणाप्रमाणेच माझीही इच्छा आहे.

त्या दिवसांपासून वेगवेगळ्या व्यासपीठांवरून/कार्यक्रमातून पुढे आलेले आपले विचारही योग्यच आहेत (उदा. विचारांची लढाई ही विचारांनीच झाली पाहिजे). परंतु ज्या विवेकवादाचा आपण आग्रह धरता तसेच विचार आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करता, तीच तत्वे आपल्यातीलच काही मंडळी वैचारिक विरोधकांना झोडपताना, स्वतःच्याच कंपूतील विरोधी विचार दडपताना कशी बाजूला ठेवली जातात याची काही उदाहरणे आपल्यासमोर ठेवतो. अशा प्रसंगांमध्ये भावनेचा आवेग हा सर्व विवेकाला वरचढ होतो याचीच साक्ष ही उदाहरणे देतात.

अगदी ताज्या उदाहरणापासून सुरुवात करू या. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. दाभोलकरांची हत्या झाली आणि दुपारी ३-४ च्या सुमारास IBN लोकमत वाहिनीवर निखिल वागळे यांनी श्याम मानव यांची मुलाखत घेताना प्रश्नातच सनातन संस्थेचे नाव घेऊन शंका व्यक्त केली. तोपर्यंत कुठलाही पुरावा त्यांच्याच काय पण पोलिसांच्याही हातात नव्हता. असे असताना एखाद्या संस्थेचे नाव निःपक्षपातीपणाची अपेक्षा असलेल्या पत्रकाराकडून कसे काय घेतले जाते? कुठे गेली होती वागळे यांची सच्ची पत्रकारिता आणि विवेकवाद? इतर मराठी वाहिन्यांनी सुद्धा कमी-अधिक प्रमाणात अतिशय एकांगी असे वार्तांकन केले व अजूनही करत आहेत.

२१ ऑगस्ट २०१३ ला संध्याकाळी पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या शोकसभेला मी हजर होतो. सभेतील बहुतांश वक्त्यांची जणू खात्रीच होती की ही हत्या हिंदुत्वावाद्यांनीच केली असेल म्हणून; अर्थात त्याही वेळी त्यांच्यापैकी कुणाकडेच कुठलाही पुरावा असण्याची शक्यता नव्हती. तरीसुद्धा वैचारिक विरोधकांची नावे घेऊन तपासाची दिशा आपल्याला हव्या त्या दिशेला वळवताना कुठे जातो विवेकवाद?

आता गतकाळातील काही उदाहरणे बघू या. १९८९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणार असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी एक समिती बनवली होती. त्या समितीचे अध्यक्षपद भूषवण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. शिवाजीराव भोसले यांनी होकार कळवला होता. त्यानंतर पुण्यातील तमाम समाजवादी मंडळीनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांना समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते; तेंव्हा कुठे गेले होते व्यक्ती आणि विचार-स्वातंत्र्य? त्यानंतरचे काही कुलगुरू उघडपणे वेगळ्या वैचारिक भूमिका घेत राहिले त्यावेळेस मात्र हे नेते गप्प राहिले कारण त्या भूमिका यांच्या विचारांच्या जवळच्या होत्या.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना (अर्थात कम्युनिस्ट सोडून) मान्य आहे असे दिसते. कोणाला त्यांचा हिंदुत्ववाद प्रिय आहे तर कोणाला विज्ञानवाद. काहीना ते साहित्यिक/कवी म्हणून मोठे वाटतात. असे असताना काँग्रेसी मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या थयथयाटानंतर सावरकरांचा नामफलक अंदमानातून काढून टाकला, तेंव्हा महाराष्ट्रातील तमाम विवेकवादी, व्यक्ती/विचार-स्वातंत्र्यवादी विचारवंतानी व पत्रकारांनी त्याला प्रखर विरोध का केला नाही? सावरकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीला त्यांच्या संसदेतील तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून संसदीय पद्धतीने आदरांजली वाहतात. या कार्यक्रमाला कोण हजर असते हे पाहिले तरी विवेकावादावर व्यक्ती/विचार विद्वेषाने कशी मात केली आहे ते दिसते.

पुण्यातून "अंतर्नाद" नावाचे मराठी साहित्याला वाहिलेले एक मासिक श्री. भानू काळे अतिशय प्रामाणिकपणे व नेटाने गेली अनेक वर्षे चालवतात. त्याची साहित्यिक मुल्ये अतिशय उच्च दर्जाची आहेत. श्री. काळे स्वतः डाव्या/समाजवादी विचारसरणीचे आहेत. "अंतर्नाद" मध्ये श्री. दिगंबर जैन एक सदर नियमित लिहायचे. काही लेखांमधे त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका मांडली/त्याचे समर्थन केले; तर त्यानंतर लगेचच त्यांचे सदर कुठलीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आले. कारण विचारले असता एक वर्षाची मुदत संपल्याने सदर बंद करण्यात आले असे सांगण्यात आले. अंकात काय छापावे याचा संपूर्ण अधिकार संपादकांचाच असतो हे मान्य करून सुद्धा असे आपल्या निदर्शनास आणून द्यावेसे वाटते की त्यानंतर आजतागायत श्री. दिगंबर जैन यांचा कुठलाच लेख "अंतर्नाद" ने छापलेला नाही. त्यामुळे यामागे दडपशाही की अन्य काही कारण ते समजले नाही.

"मिळून साऱ्याजणी" या समाजवाद्यांनीच चालवलेल्या मासिकात काही वर्षांपूर्वी त्यांच्याच संपादक मंडळातील एका लेखिकेने त्यांच्या विचारांच्या विरोधी लेख लिहीला होता. त्यानंतर अनेक समाजवाद्यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिल्या. आपल्या मासिकात हे असे विचार छापूच कसे शकतात या प्रकारच्या त्या प्रतिक्रिया होत्या. त्या बिचार्या लेखिकेचे पुढे काय झाले ते कळले नाही. 

काही वर्षांपूर्वी डॉ. लोहिया पती-पत्नी यांचा त्यांनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रा. स्व. संघाने "श्री गुरुजी पुरस्कार" देऊन सन्मान केला, तेंव्हा बोलताना सौ. लोहियांनी "संघ स्त्रियांचा सन्मान करतो" असे भावपूर्ण उद्गार काढले होते. त्यानंतर आपल्या विवेकवाद्यांनी उठवलेले काहूर खूप जणांना आठवत असेल.

पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी ओढ्यावरील रस्त्याची (कॅनाल रोड) संकल्पना अंमलात आणली गेली. त्यावेळेस श्री. अमोल पालेकर - जे परत आपल्याच कंपूतले - यांनी त्यास "शांतता भंग होईल", "कलावंतांना शांतता हवी असते" वगैरे कारणे सांगून विरोध केला होता. तसाच विरोध मंगेशकर कुटुंबियांनी पेडर रोड येथील पुलाला केला होता तेंव्हा त्यांना सर्वांनी "जनभावनेचा आदर करा", "पटत नसेल तर शहर सोडून जा" इ. सल्ले दिले होते. मग तीच भूमिका पालेकरांच्या बाबतीत का घेतली नाही?

शेवटी आपल्या कम्युनिस्ट मित्रांबद्दल लिहावेसे वाटते. कम्युनिस्टांनी विवेकवादावर बोलणे, शांततेचे सल्ले देणे हाच मुळी मोठा विरोधाभास आहे. कारण स्वतःच्या विरोधकांना जमले तर अपप्रसिद्धीने नाही तर हिंसा करून त्यांची निर्घृण हत्या करून कसे संपवायचे हे त्यांच्या बंगाल आणि केरळ मधील कृत्यांवरून अनेकवार स्पष्ट झाले आहे.

तेंव्हा कम्युनिस्टांसारख्या हिंसावादी प्रवृत्तींना आपण आपले साथी कसे काय मानता, त्यांना तुमचे व्यासपीठ कसे काय वापरू देता हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे.

वरील सर्व उदाहरणांवरून असे दिसते की आपणा सर्व कार्यकर्त्यांसाठी आपली तत्वे (विवेकवाद, व्यक्ती/विचार-स्वातंत्र्य इ.) ही "आपला तो बाब्या…" या पद्धतीने चालतात. आणखीही काही उदाहरणे देता येतील पण जागेच्या मर्यादेमुळे थांबतो. 

पुण्यात २८ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या निर्धार परिषदेत ज्या विवेकवादी समाजनिर्मितीचा आपण सर्वांनी निर्धार केलात त्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आपली तत्वे ही सर्वांनी समान पद्धतीने अंगिकारणे व त्यांचा निःपक्षपातीपणे वापर करणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. याचा आग्रह आपण सर्वजण धराल व प्रत्यक्ष कृतीतून ते दर्शनास आणून द्याल एवढीच माफक अपेक्षा. अन्यथा "मुँह में विवेकवाद, बगल में छुपा वैचारिक दहशतवाद" असेच खेदाने म्हणावे लागेल. 

धन्यवाद.


Tuesday, 5 November 2013

आरंभ

नमस्कार मित्रांनो. आज भाऊबीज. दिवाळी २०१३ रूढार्थाने आज संपते; हो, रुढार्थानेच, कारण परंपरेनुसार दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत मानली जाते. पण आजकालच्या जमान्यात शहरातील घरांमध्ये ना अंगणे उरली आहेत ना तुळशी. तेंव्हा त्या तुळशीचे लग्न लावणे तर दूरच मग पूजा तरी कोण करणार? असो. आपणा सर्वांची ही दिवाळी आनंदाची गेली असेल अशी आशा करतो.

आजच्या मंगल दिवशी माझ्या पहिल्या-वहिल्या ब्लॉगची सुरुवात करण्याचे धाडस करतो आहे. पुढे किती नेमाने चालवू शकेन याची आत्ताच खात्री देता येत नाहीये कारण मी काही सिद्धहस्त लेखक नाही; शिवाय  नियमित सकारात्मक लेखन करायला जी अभ्यासू/संशोधक वृत्ती व मानसिक बैठक लागते त्याचा माझ्यामध्ये अभाव आहे ह्याची मला जाणीव आहे. तरी पण एखादी गोष्ट नियमितपणे करायची ठरवली तर त्या गोष्टीसाठी आवश्यक ते गुण तुमच्यात हळूहळू तयार व्हायला लागतात असा माझा विश्वास आहे आणि या विश्वासावरच मी हे धाडस करत आहे. तेव्हा कृपया हे गोड मानून घ्यावे व निःसंकोचपणे तुमच्या चांगल्या/वाईट प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती.

गेले अनेक वर्षांपासून आसपास घडत असलेल्या घटना बघून/वाचून एक अस्वस्थता मनात घर करून राहिली होती; व्यक्त व्हावेसे वाटत होते. त्याची सुरुवात मित्र व नातेवाइक यांना पत्र लिहून केली. पुढे तंत्रज्ञान जसे सुधारत गेले तसे ई-मेल, मेसेज इ. मुळे पत्रलेखन हळूहळू बंद पडले. २००६ ते २००८ या कालावधीत वृत्तपत्रांना पत्रे लिहायला लागलो, त्यातील काही पत्रे छापूनही आली. पण तरीही त्या लेखनाचे स्वरूप त्या त्या घटनांपुरतेच मर्यादित राहिले.

गेली २० वर्षे ज्या संगणक क्षेत्रात मी काम करत आहे तिथे अचाट बुद्धिमत्तेची माणसे पाहिली. ज्ञान, धन व गुणसंपन्न अशा माणसांना जवळून बघता आले. आज त्यातील बरेचसे परदेशात आहेत; तर काही जणांनी मात्र स्वदेशाचा रस्ता पकडला आहे. जे इथे राहिले त्यातील बरीचशी मंडळी आपापल्या विश्वात मग्न आहेत. आसपासच्या चांगल्या / वाईट घटनांचे यांच्यावर काहीच परिणाम होताना निदान दृश्य स्वरूपात दिसत नाहीत.  अशा वेळी आपल्या मनात काय आहे ते ब्लॉगच्या माध्यमातून इतरांबरोबर शेअर करावे असे वाटले. त्यातून जर कोणाला काही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली तर माझ्या लेखनाचे सार्थक झाले असे मी समजेन.

मात्र काही सन्माननीय अपवाद आहेत जे स्वतःचे घर, नोकरी/व्यवसाय सांभाळून काही ना काही सामाजिक कार्य करीत आहेत. त्या सर्वांबद्दल मला अपार आदर वाटतो.

माझ्या या धडपडीमागची प्रेरणा मला माझे वडील - श्री. रघुनाथ बाळकृष्ण सप्रे - यांजकडून मिळाली. स्वतःचा संसार आणि नोकरी सांभाळून बाबांनी उभे आयुष्य विवेकानंद केंद्र व ज्ञानदा प्रतिष्ठान या संस्थांच्या कामासाठी वेचले. १९७८ साली पुण्यात जेंव्हा इंग्रजी माध्यमाची आणि उत्तम शिक्षण देणारी शाळा म्हणजे कॉन्व्हेंट असा प्रचलित समज होता, त्या काळात पुण्यातील कर्वेनगर परिसरातील नवसह्याद्री सोसायटीमध्ये संपूर्ण भारतीय पद्धतीवर आधारित शिक्षण देणारी इंग्रजी माध्यमाची शाळा समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलांसाठी ज्ञानदातर्फे सुरु करण्यात बाबांचा सिंहाचा वाटा होता. आज त्या परिसरातील ज्ञानदा ही एक उत्तम शाळा गणली जाते. बाबांच्या तळमळीचा मी एक साक्षीदार होतो; कदाचित त्यातूनच माझ्यात सामाजिक कामाची प्रेरणा जागृत झाली असावी. त्यामुळे माझे हे पहिले-वहिले लेखन बाबांना अर्पण करतो आणि थांबतो.

पुढील ब्लॉग घेऊन लवकरच आपल्या भेटीला येईन. तोपर्यंत, तुमच्या शुभेच्छांची नितांत गरज आहे, धन्यवाद.

- धनंजय सप्रे