Friday, 28 February 2020

अप्रूपाचे अप्रूप

लेखाचे शीर्षक बघून चक्रावलात का? पण थोडे थांबा! कारण लेख वाचताना शीर्षकामागचा अर्थ कळेल. :-)

जे मराठी माध्यमात शिकलेले नाहीत त्यांच्यासाठी - "अप्रूप" या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.  उ. दा.  दुर्मिळ, दुर्लभ, अप्राप्य, नवल, अपूर्वाई, कौतुक वगैरे वगैरे, यालाच इंग्रजीत rare, novel, scarce, unusual इ. म्हणतात.

यातील "अपूर्वाई" हा शब्द जरा अधिक ओळखीचा वाटेल कारण त्या नावाचे पु. लं. चे प्रवासवर्णनाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे.

तसे पाहता माणसांना अनेक गोष्टींची अपूर्वाई असते. फार फार पूर्वी जेंव्हा प्रकाशाचा शोध लागला तेंव्हा दोन दगड एकमेकांवर आपटून होणाऱ्या ठिणगीतून पेटवलेल्या जाळाने होणाऱ्या उजेडाचे लोकांना अप्रूप होते.
तेव्हापासून प्रकाशाचा प्रवास हा लाकूड जाळून, मेणबत्ती पेटवून ते एडिसनने बल्बचा शोध लावला त्या प्रत्येक वेळी लोकांना त्या गोष्टींचे अप्रूपच वाटत होते.

पण फार प्राचीन काळात न जाता गेल्या ७०-८० वर्षात डोकावू या. १९४७ साली जेंव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा कित्येक लोकांकडे रेडिओ नव्हते. त्यामुळे १९५५ साली आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर रविवारी live प्रसारित होणाऱ्या गीत रामायणाचे कित्येकांना अप्रूप होते. कितीतरी लोक गीत रामायण ऐकण्यासाठी हॉटेलातजाऊन तेथील रेडिओवर गाणे ऐकायचे. त्यावेळी असे म्हणतात की हॉटेलातील रेडिओचे इतके अप्रूप होते की लोकं चार आणे देऊन हॉटेलात जाऊन त्यांना आवडणाऱ्या गाण्यांची फर्माईश करायचे. पुण्यात लकडी पुलाजवळचे इराणी हॉटेल (जे आजही तिथेच आहे) आणि लकी रेस्टॉरंट (आज जिथे डेक्कन मॉल आहे तिथे) अशा काही मोजक्या हॉटेलात पैसे देऊन गाणे ऐकण्याची सुविधा मिळायची.

माझे आई-वडील दोघेही सातारचे, घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे रोजच्या जेवणात भाजी-भाकरीच असायची. गोडधोड आणि पोळी फक्त सणासुदीलाच असायचे. त्यामुळे त्याचे केवढे अप्रूप होते त्यांना त्या वेळी.

माझ्या लहानपणी म्हणजे साधारण १९७० आणि १९८० च्या दशकात आम्हाला असेच TV चे अप्रूप होते. दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघताना आम्ही भारावून जायचो. दर शनिवारी संध्याकाळी मराठी आणि रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपट दाखवला जायचा. त्यावेळच्या वृत्तपत्रांत संपूर्ण वर्षभराची म्हणजे ५२ आठवडे दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी छापली जायची. आम्ही राहत असलेल्या इमारतीत फक्त एक-दोघांकडेच TV असल्याने त्यांच्याकडे समस्त बालगोपाळांची गर्दी व्हायची. "पेडगावचे शहाणे" चित्रपट असाच TV समोर फरशीवर बसून बघितल्याचे आठवते.


१९८० पासून दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने दाखवायला सुरुवात झाली. सकाळी ९:४५ वाजलेपासून दूरदर्शनवर दिसणाऱ्या मुंग्या (पांढरे-काळे ठिपके) बघत कधी एकदा १० वाजतायत आणि गावस्कर बॅटिंगला येतोय असे होऊन जायचे. नंतर १९८० ची विम्बल्डन मधील बोर्ग-मॅकेन्रो यांची अंतिम मॅच, १९८२ चे एशियाड त्यावेळी आलेला रंगीत TV , १९८३ चा भारताने जिंकलेला विश्वचषक, १९८६ चा मॅराडोनाच्या अर्जेंटिनाने जिंकलेला फुटबॉल विश्वचषक हे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने बघितल्याचे आठवतात.


दूरदर्शनवरच्या सर्वच कार्यक्रमांची आम्हाला अपूर्वाई असायची मग तो गजरा असो, साप्ताहिकी असो, चित्रहार असो, सुरभी किंवा ऐसा भी होता है सारखे माहितीपर कार्यक्रम असोत, फूल खिले है गुलशन गुलशन सारखा कार्यक्रम असो, नाटके असोत, पु.लं.चे कार्यक्रम असोत की गाण्याचे कार्यक्रम असोत. या सर्व कार्यक्रमांचा रतीब नसल्याने ते बघण्याची उत्सुकता असायची आणि भरपूर आनंद मिळायचा.

साभार: http://sawaigandharvabhimsenmahotsav.com/Gallery

त्याकाळात पुण्यात संगीत विषयक कार्यक्रमांची रेलचेल नसायची. एक सवाई गंधर्व महोत्सव डिसेंबर मध्ये व्हायचा. याव्यतिरिक्त अधून मधून संगीताचे कार्यक्रम असायचे. त्यामुळे मोठमोठ्या कलाकारांना बघणे/ऐकणे हे तसे दुर्मिळच होते. अनूप जलोटा, गुलाम अली यांचे कार्यक्रम बहुदा कॅम्प मधेच व्हायचे, लता मंगेशकर, आशा भोसले यांचे कार्यक्रम पुणे शहरात व्हायचे. आम्ही संगीतप्रेमी मित्र या कार्यक्रमांना आवर्जून जायचो. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
तीच गोष्ट साहित्यविषयक कार्यक्रमांची. मे महिन्यात होणाऱ्या मॅजेस्टिक गप्पा आणि वसंत व्याख्यानमाला यांची रसिक मंडळी वर्षभर वाट बघत असायची. बाबासाहेब पुरंदरे यांच्या छत्रपती शिवाजीवरील व्याख्यानमाला तसेच शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर यांची भाषणे हे सुद्धा हृदयाच्या जवळचे कार्यक्रम. पुण्यात साहित्य संमेलन असले की चंगळच असायची. अधूनमधून प्रसिद्ध साहित्यिक/कवी यांच्या मुलाखतीचे कार्यक्रम असायचे. या सर्व कार्यक्रमांनी आमचे बालपण आणि तरुणपण समृद्ध केले.


चित्रपट, नाटके ही सुद्धा वर्षातून ५-६ वेळाच बघितली जायची, त्यामुळे गणेशोत्सवात रीळ लावून रस्त्यावरील पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचे आम्हाला अप्रूप असायचे, व कोण आनंद मिळायचा त्यातून! फारसे Promotion न करताही चित्रपटगृहात गर्दी व्हायची आणि अनेक आठवडे/महिने चित्रपट चालायचे कारण चित्रपट घरात आले नव्हते!

टेलीफोनचेही तसेच. साधारण १९८५ नंतर हळूहळू लोकांकडे टेलीफोन यायला सुरुवात झाली. साध्या लोकल फोनचेही कोण कौतुक असायचे. परदेशात फोन करण्यासाठी टेलिफोन कंपनीकडे बुकिंग करायला लागायचे, तो महागही असायचा.

१९९० नंतर भारतात जसे तंत्रज्ञान विकसित होत गेले, तसे आधी संगणक आले, मग पेजर, मग साधे मोबाईल अंदाजे २००४-५ चे सुमारास आले. त्याचबरोबर १९९२ पासून दूरदर्शनचे जाळेही विस्तारले, त्याला स्पर्धा म्हणून खाजगी वाहिन्या सुरु झाल्या, सुरुवातीला ५-१० वाहिन्याच होत्या, त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांचा दर्जा खूप सरस होता. हळूहळू आपल्याला २४*७ वाहिन्यांची सवय झाली. आणि आता तर काय इंटरनेटमुळे आणि वाहिन्यांमुळे २४*७ करमणूक आपल्या बेडरूममध्येच आली आहे.

गेल्या २०-२५ वर्षांमध्ये आपले जीवनमान प्रचंड बदलले आहे. पूर्वी असलेली एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. प्रत्येकाचे स्वतःचे घर झाले. नवरा-बायको दोघेही नोकरी करू लागले, त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवणे भाग पडले. घरी कामाला मोलकरणी आल्या. प्रत्येक घरात TV आला, फोन आला, फ्रीज आला, वॉशिंग मशीन आले, Music Systems आल्या, Broadband आले, Smart Phones आले, Online TV Games आल्या, विविध Gadgets आली. कित्येक घरात कार आली. निदान शहरात तरी या सर्व सुख-सुविधा अनेक घरातून आल्या. २००० नंतर जन्मलेली मुले जन्मापासूनच ह्या गोष्टी पाहतच मोठी झाली. एकूण जीवन अतिशय गतिमान झाले. त्यामुळे कित्येक घरात बाहेरून डबा येणे सुरु झाले. आणि वीक-एन्ड म्हणून बाहेर हॉटेलात जेवणे सुरु झाले. Buy 1 Get 1 Free सारख्या योजनांमुळे गरजेपेक्षा जास्त खरेदी होऊ लागली. सगळेच कसे सहज, न मागता आणि मनात आले की मिळू लागले, म्हणतात ना Everything at a Finger tip तसे झाले, त्यामुळे त्याची किंमत कळेनाशी झाली. 

शहरात मोठे मोठे मॉल्स उभे राहिले, सर्व वस्तू कुठेही आणि केंव्हाही मिळू लागल्या. दिवाळीचा फराळ जो माझ्या लहानपणी दिवाळीतच आणि तो सुद्धा आईने केलेला मिळायचा तो आता वर्षभर कुठल्याही दुकानात मिळतो. पूर्वी सुट्टीच्या दिवशी घरी केली जाणारे इडली-वडा सांबार आता जागोजागी असलेल्या हॉटेलात मिळते.  Netflix, Amazon यासारख्या कंपन्यांनी करमणूक घरात आणून ठेवली. सर्व काही आयते मिळू लागले आणि ते सुद्धा मनात आले की. त्यामुळे दुर्दैवाने आज कुठल्याच गोष्टीचे अप्रूप राहिले नाही (अपवाद इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा त्यातील नवनवीन तंत्रज्ञानामुळे). गेल्या १०-२० वर्षात जन्मलेल्या मुला-मुलींना आईच्या हातच्या जेवणाचा आनंद काय असतो माहिती नाही, एखाद्या गोष्टीची वाट बघण्यातील आनंद आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर झालेला आनंद याला ते मुकले आहेत. मराठी नाटकातील आणि मराठी पुस्तकातील आनंद माहिती नाही, त्यांना त्याचे काही दुःख आहे असेही दिसत नाही. Globalization मुळे सर्व जग इतके जवळ आले आहे की आता परदेशात जाण्याचेही अप्रूप राहिले नाही. Whatsapp, Duo, Skype, विविध Messengers यामुळे परदेशातील व्यक्तींशी सहज आणि म्हटले तर रोजही बोलता येते ते सुद्धा त्यांना प्रत्यक्ष पाहत असताना, एका अर्थाने हे चांगलेच आहे पण त्याचा बरेच वेळा अतिरेक होतो. 

सारांश काय, तर आज तुम्हा-आम्हाला अप्रूपाचेच अप्रूप आहे. एखादी गोष्ट न मिळण्यामागची हुरहूर आणि ती मिळाल्यानंतरचा आनंद हा आता दुर्लभ झाला आहे. जोपर्यंत आपण उपलब्ध असलेल्या सुखसुविधांचा मर्यादित उपभोग घेत नाही, तोपर्यंत आपण अतिरेकाच्याच वाटेवर वाटचाल करत राहणार. हे सर्व कुठे जाणार याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. तो होईल आणि त्यानंतर योग्य ती Corrective Action आपण घेऊ अशी आशा करू या. त्यासाठी शुभेच्छा.














Saturday, 1 February 2020

अनमोल रतन (Precious Jewels) - 8 : Brilliant Jaidev!

Friends,

I am extremely happy to present the Eighth song of the series Anmol Ratan. This time it is a gem from late Jaidev. 6th Jaunary was his Death anniversary, hence thought it would be more appropriate to remember him through his great compositions.


English version of the blog is at the end of the Marathi version below

Song #8: Aapki yaad aati rahi raatbhar

Film         : Gaman (1978)
Director : Muzaffar Ali
Cast     : Farooq Sheikh, Smita Patil, Jalal Aga, Geeta Siddharth 


Lyrics          : Makhdum Mohiuddin

Composer : Jaidev 

Singer         : Chhaya Ganguly

दरवर्षीप्रमाणेच यंदाही ३ ऑगस्ट आणि ६ जानेवारी हे दोन दिवस आले आणि गेले; पण १९५०-६० च्या दशकातील हिंदी चित्रपट संगीतकार जयदेव वर्मा यांची आठवण किती जणांना झाली असेल? नाही म्हणायला रेडिओ सिलोनने मात्र आवर्जून त्यांची गाणी लावली होती!

संगीतकार जयदेव
संपूर्ण कारकिर्दीत जयदेवनी एकूण ४२ चित्रपटांना संगीत दिले (संदर्भ - Wikipedia). त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९५२ साली आलेल्या "आँधीया" या चित्रपटात संगीतकार अली अकबर खान यांचे सहाय्यक म्हणून झाली. १९५८ साली प्रदर्शित झालेले "चलती का नाम गाडी" आणि "लाजवंती" (संगीतकार सचिनदेव बर्मन) या दोन्ही चित्रपटांत जयदेवच सचिनदांचे सहायक होते.

जयदेवजींनी स्वतंत्रपणे संगीत दिलेला पहिला चित्रपट १९५५ सालचा जोरू का भाई - जो आज कुणाला आठवतही नसेल. पण १९६१ साली आलेल्या नवकेतन फिल्म्सच्या "हम दोनो" या चित्रपटाची जयदेव यांनी संगीतबद्ध केलेली गाणी प्रचंड गाजली; आणि जयदेव यांची एक प्रतिभावान संगीतकार म्हणून जगाला ओळख झाली. त्यातील "अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं" हे गाणे आणि इतर गाणी आजही ताजीतवानी आहेत.

६ जानेवारी १९८७ रोजी जयदेव यांचे निधन झाल्यानंतर प्रसिद्ध चित्रपट संगीत समीक्षक राजू भारतन यांनी "चंदेरी" या पाक्षिकात त्यांच्यावर एक मृत्युलेख लिहिला होता. त्यात त्यांनी जयदेव यांच्याविषयी खालील आठवण सांगितली होती:

"हम दोनो" चे संगीत गाजल्यानंतर नवकेतन फिल्म्सचे मालक देव आनंद आणि विजय आनंद हे दोघेही जयदेव यांच्यावर इतके खुश झाले की त्यांच्या पुढील सर्व फिल्म्सचे संगीत हे सचिनदेव बर्मन आणि जयदेव हे आलटून पालटून करणार असे त्यांनी जाहीर केले. १९६१ च्या "हम दोनो" नंतर १९६३ मध्ये आला "तेरे घर के सामने" आणि वरील करारानुसार त्याचे संगीत करण्याची जबाबदारी सचिनदेव बर्मन यांना दिली गेली. तो चित्रपटही त्याच्या गाण्यांमुळे गाजला. पुढे १९६४ मध्ये नवकेतनने "गाईड" चित्रपटाची घोषणा केली. करारानुसार हा चित्रपट जयदेव यांना मिळायला हवा होता; पण बर्मन यांनी देव आनंद आणि विजय आनंद यांच्यावर दबाव टाकून "गाईड चित्रपट मला दिला नाही तर तुमचे पुढील कुठलेही चित्रपट मी करणार नाही" अशी धमकी दिली. त्यामुळे "गाईड" चित्रपट हा शेवटी सचिनदेव बर्मन यांना मिळाला; त्यांनी त्याचे सोने केले हे निश्चित, पण एका उत्तम चित्रकथेला तितकेच उत्तम संगीत द्यायची (आणि ते देण्याची कुवत असलेल्या) जयदेव यांची संधी मात्र हुकली. ही सल जयदेव यांच्या मनात शेवटपर्यंत राहिली.

पुढे १९८१ साली अजून एकदा नशिबाने जयदेव यांची साथ दिली नाही. १९७९ साली आलेल्या "गमन"ची गाणी प्रचंड गाजल्यामुळे दिग्दर्शक मुझफ्फर अलीने त्याच्या पुढच्या महत्वाकांक्षी चित्रपट "उमराव जान" चे संगीत जयदेव यांना करायला सांगितले. जवळपास ८ गाणी जयदेव यांनी संगीतबद्धही केली. पण नंतर काय चक्र फिरली कुणास ठाऊक, पण मुझफ्फर अलीने सर्वच्या सर्व गाणी खय्याम यांना दिली. खय्याम यांनी अप्रतिम संगीत दिले. राजू भारतन म्हणतात की त्यांनी जयदेव यांनी संगीत दिलेली "उमराव जान" ची गाणी स्वतः ऐकली होती; आणि खय्यामच्या गाण्यांपेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे संगीत जयदेव यांनी दिले होते, पण दुर्दैवाने ती गाणी चित्रपटात घेतली नाहीत आणि सिनेसंगीताचे रसिक एका अत्त्युच्च आनंदाला मुकले. असो.


तरीही जयदेव त्यांचे काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत राहिले. "किनारे किनारे" (१९६३), "मुझे जीने दो" (१९६३), "रेश्मा और शेरा" (१९७१), "प्रेम पर्वत" (१९७३), "आलाप" (१९७७), "घरोंदा" (१९७७), "दूरियां" (१९७९) आणि "गमन" (१९७९) अशा चित्रपटांना एकाहून एक सरस असे संगीत जवळपास १८-२० वर्षे ते देत राहिले. त्यांचा शेवटचा गाजलेला चित्रपट म्हणजे "अनकही" (१९८५), यामध्ये त्यांनी चक्क पं. भीमसेन जोशी यांच्याकडून दोन गाणी गाऊन घेतली ("रघुवर तुमको मेरी लाज" आणि "ठुमक ठुमक पग")!!

त्यांची अत्यंत गाजलेली गाणी खालीलप्रमाणे: (Click on the links below to watch the songs)

१) मै जिंदगी का साथ निभाता चला गया - मोहम्मद रफी - हम दोनो (१९६१)
२) हर आंस अश्क्बार है - लता - किनारे किनारे (१९६३)
     हे गाणे गाजलेले नाही; पण उत्कृष्ट संगीत; लताच्या २५ सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये मी या गाण्याचा समावेश नक्की करेन
३) देख ली तेरी खुदाई - तलत महमूद - किनारे किनारे (१९६३)
४) रात भी है कुछ भीगी भीगी - लता मंगेशकर - मुझे जीने दो (१९६३)
      एका वेश्येच्या तोंडी हे गाणे असूनही जयदेवचे अप्रतिम संगीत आणि लताचे स्वर हे खानदानी आदब राखतात हे त्याचे वैशिष्ट्य
५) तू चंदा मैं चांदनी - लता मंगेशकर - रेश्मा और शेरा (१९७१)
६) ये दिल और उनकी निगाहों के साये - लता मंगेशकर - प्रेम पर्वत (१९७३)
७) कोई गाता मैं सो जाता - येसूदास - आलाप (१९७७)
     अमिताभची हटके भूमिका; पण रसिकांना न आवडलेली. या चित्रपटात एकूण ११ गाणी होती ती सुद्धा १९७७ साली!
८) एक अकेला इस शहर में - भूपिंदर सिंग - घरोंदा (१९७७)
९) दो दिवाने शहर में - भूपिंदर सिंग आणि रुना लैला - घरोंदा (१९७७)
१०) तुम्हे हो ना हो मुझको तो इतना - रुना लैला - घरोंदा (१९७७)
११) ज़िन्दगी मेरे घर आना - भूपिंदर सिंग आणि अनुराधा पौडवाल - दूरियां (१९७९)
१२) सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है - सुरेश वाडकर - गमन (१९७९)
१३) अजीब सानेहा मुझ पर गुजर गया यारों - हरिहरन - गमन (१९७९)
        हे गाणे ऐकल्यावर जयदेव यांच्याच "कभी खुद पे कभी हालात पे रोना आया" या गाण्याची आठवण येते

जयदेव यांचा स्वतःच्या सामर्थ्यावर एवढा विश्वास होता की त्यांनी अनेक नवीन गायकांना आपल्या चित्रपटातून गाण्याची संधी देण्याचे धाडस केले. त्यातले काही जण पुढे चित्रपट गायक म्हणून खूप यशस्वी ठरले. उ. दा. सुरेश वाडकर (गमन), हरिहरन (गमन), रुना लैला (घरोंदा), भूपिंदर सिंग (घरोंदा, दूरियां)

या गुणी संगीतकाराला सर्वोत्कृष्ट संगीताकरता एकूण ३ राष्ट्रीय पारितोषिके मिळाली - "रेश्मा और शेरा" (१९७१), "गमन" (१९७९) आणि "अनकही" (१९८५).

वरील सर्व गाणी ही जयदेव यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. पण आज मी त्यांचे एक वेगळेच गाणे सादर करणार आहे जे मला फार आवडते. ते आहे "गमन" चित्रपटातले छाया गांगुली यांनी गायलेले "आपकी याद आती रही रातभर".

चित्रपटाबद्दल फारसे बोलण्यासारखे काही नाही. गुलाम रसूल (फारुख शेख) उत्तर प्रदेशातील कोटवारा गावातील एक रहिवासी. पत्नी खैरून (स्मिता पाटील) आणि आई यांच्याबरोबर अत्यंत हलाखीत दिवस काढत असतो. त्याचा मित्र लल्लू (जलाल आगा) हा मुंबईत टॅक्सी चालवून पोट भरत असतो, त्यामुळे त्याची परिस्थिती ही गाववाल्यांपेक्षा बरी असते. गावातील परिस्थितीला कंटाळून गुलाम मुंबईला पैसे कमावण्याकरता येतो. लल्लू त्याला मदत करतो. मुंबईत आल्यावर गुलाम सुरुवातीला मिळेल ती कामे करून पैसे साठवायला लागतो. थोडे दिवसांनी लल्लू त्याला टॅक्सी चालवायला शिकवतो. टॅक्सी चालवत असताना त्याला मुंबईच्या भीषण परिस्थितीची जाणीव होती, सर्वत्र दिसणारी गरिबी, अस्वच्छता, स्वार्थी माणसे, श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी या सर्व बाबी गुलामला अस्वस्थ करून सोडतात. पुरेसे पैसे साठवून गावाकडे जाऊन यायचे गुलाम ठरवत असतो. इकडे गावामध्ये खैरून गुलामची वाट बघत असते. इथेच सुरु होते एक सुंदर गाणे "आपकी याद आती रही रातभर".

छाया गांगुली
गाण्याची सुरुवात बासरीच्या एका अप्रतिम तुकड्याने होते. संपूर्ण मुखड्यात आणि पहिल्या २ कडव्यांमध्ये पाठीमागे वाजणारे स्वर-वाद्य वगळता एकही वाद्य वाजत नाही, ऐकू येतो तो छाया गांगुलींचा घनगंभीर दर्दभरा आवाज. (आजकालच्या Reality Shows मध्ये Solo Round without music असते ना तसा)

पहिली दोन कडवी (अंतरे) ही गावाकडे असलेल्या गुलामची वाट पाहणाऱ्या खैरुनवर चित्रित झाली आहेत. त्यामुळे जयदेवनी इथे कमीत कमी वाद्ये वापरली असावीत. दोन कडव्यांच्या मधे बासरी आणि सरोद यांचा सुरेल वापर केला आहे.

तिसऱ्या कडव्यापासून गावाकडचे दृश्य बदलून मुंबईत येते; हा बदल जयदेव यांनी सरोदच्या जोडीला तालवाद्य वापरून समर्थपणे दाखवला आहे.

चारही कडवी तुमच्या काळजाचा ठाव घेतात. त्यामुळे गाणे संपल्यानंतरही त्याचा प्रभाव तुमच्यावर राहतो. ही आहे संगीतकार आणि गायिका यांची कमाल!

दिग्दर्शक मुझफ्फर अली चित्रपटातून नुसते प्रश्न मांडतो; त्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न बिलकुल करत नाही. त्यामुळे चित्रपट पाहून झाल्यानंतरही आपल्याला कथा आठवत नाही, तर आठवतात ती त्यातील सुंदर गाणी. जयदेव यांच्या संगीतामुळे हा चित्रपट थोडाफार सुसह्य झाला आहे.

या चित्रपटासाठी जयदेव यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार तर छाया गांगुली यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार १९७९ साली मिळाला.

गाण्याचे २ videos खाली देत आहे - एक मूळ चित्रपटातील, आणि दुसरा छाया गांगुली यांनी दूरदर्शनवरील आरोही या कार्यक्रमात गायलेल्या गाण्याचा. मला स्वतःला दूरदर्शनवरील गाणे आवडते; अत्यंत कमी वादक, अप्रतिम बासरी आणि सारंगी (यांना आपण दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमात लाजवाब साथ करताना कितीतरी वेळा पाहिले आहे, दुर्दैवाने आजच्यासारखे त्यावेळेस साथीदारांना ग्लॅमर लाभले नव्हते) आणि छाया गांगुलींचा साधेपणा (सादगी), गाण्याची तयारी त्यामुळे हे गाणे उठून दिसते.

दोन्ही जरूर पहा, आणि आनंद घ्या गाण्याचा, संगीताचा आणि मनोमन सलाम करा जयदेव यांना.

तुमच्या सूचना/प्रतिक्रिया जरूर पोस्ट करा. धन्यवाद.

आपकी याद आती रही रात भर
चश्म-ए-नम मुस्कुराती रही रात भर
आपकी याद आती रही

रात भर दर्द की शम्मा जलती रही
गम की लौ थरथराती रही रात भर
आपकी याद...

बांसुरी की सुरीली सुहानी सदा
याद बन बनके आती रही रात भर
चश्म-ए-नम...

याद की चाँद दिल में उतरती रही
चाँदनी जगमगाती रही रात भर
आपकी याद...

कोई दीवाना गलियों में फिरता रहा
कोई आवाज़ आती रही रात भर
चश्म-ए-नम...




Like every year, 3rd August and 6th January came and passed. No one unfortunately remembered Jaidev - a music composer of high calibre - who was born and died respectively on these dates, except for Radio Ceylon who broadcasts Jaidev's songs every year on these two days!


Jaidev Verma composed music for around 42 films out of which 1 was a Nepali film (Ref. Wikipedia). He began his career in the Hindi film industry in 1952 with the film Aandhiyaan by assisting its music director and famous Sarod maestro Ali Akbar Khan. Jaidev also assisted S. D. Burman in two of his films viz. Chalati ka naam gaadi (1958) and Lajwanti (1958).

However, his big break came in 1961 when the film 'Hum Dono' for which Jaidev composed music was a great hit and all of its songs became super popular. Even today, people remember songs like 'Abhi naa jaao chhodkar', 'Main zindagi kaa saath nibhataa chala gayaa', etc. With 'Hum Dono', the Hindi film industry witnessed the genius of Jaidev.

From 1961 till 1987 Jaidev composed music for many films and many of his compositions are remembered even today. However, as they say, the luck matters a lot in the film industry, but it was not so with Jaidev as he missed two great opportunities. Following story was narrated by well known film critic Raju Bharatan way back in 1987 after the death of Jaidev:

After the success of 'Hum Dono', the owners of Navketan Films - Dev and Vijay Anand - were extremely happy with Jaidev and promised him to award every alternate movie that they would produce. So it was Jaidev and S. D. Burman who started composing for Navketan alternately.

After 'Hum Dono', came 'Tere Ghar ke Samane' in 1963 and as per the formula, the music responsibility went to S. D. Burman and he did a great job. In 1964, Navketan announced the beginning of their ambitious film 'Guide'. Hearing this and the story, S. D. Burman knew that it would be a blockbuster film and did not want to lose the opportunity to compose it; however as per the formula, it was Jaidev's turn. So apparently S. D. Burman pressurised Dev and Vijay Anand to award him the film by threatening not to work with them again if they did not oblige. And thus he got the film and did every justice to its songs. However it took away a golden opportunity from Jaidev to prove his worth.

It happened with Jaidev yet again in 1981 when director Muzaffar Ali changed the music composer of 'Umrao Jaan' from Jaidev to Khayyam, after Jaidev had composed 8 songs. Raju Bharatan went on to say that he had no words to describe the greatness of Jaidev's compositions of 'Umrao Jaan' songs. But again Jaidev was deprived of a well deserved opportunity after the great success of 'Gaman' directed by Muzaffar Ali.

In spite of such bitter experiences, Jaidev continued to work with extreme sincerity and dedication and gave us films like 'Kinare Kinare' (1963), 'Muze Jeene Do' (1963), 'Reshma Aur Shera' (1971), 'Prem Parvat' (1973), 'Aalaap' (1977), 'Gharonda' (1977), 'Dooriyaan' (1979), 'Gaman' (1979) and 'Ankahi' (1984). In 'Ankahi' he managed to get none other than the maestro Pt. Bhimsen Joshi to sing two songs. ('Raghuvar tumko meri laaj' and 'Thumak thumak pag')

Some of Jaidev's master pieces are as follows: (Click on the links below to watch the songs)

१) मै जिंदगी का साथ निभाता चला गया - मोहम्मद रफी - हम दोनो (१९६१)
२) हर आंस अश्क्बार है - लता - किनारे किनारे (१९६३)
     This song is not as popular as others; however I would rate this song in the Top 25 songs sang by Lata Mangeshkar
३) देख ली तेरी खुदाई - तलत महमूद - किनारे किनारे (१९६३)
४) रात भी है कुछ भीगी भीगी - लता मंगेशकर - मुझे जीने दो (१९६३)
      This song is pictured on a Courtesan; however at no point either the lyrics, composition or singing looks cheap item song
५) तू चंदा मैं चांदनी - लता मंगेशकर - रेश्मा और शेरा (१९७१)
६) ये दिल और उनकी निगाहों के साये - लता मंगेशकर - प्रेम पर्वत (१९७३)
७) कोई गाता मैं सो जाता - येसूदास - आलाप (१९७७)
     This movie had Amitabh Bachchan in a different role; contained 11 songs, can you believe this to happen in a 1977 film?
८) एक अकेला इस शहर में - भूपिंदर सिंग - घरोंदा (१९७७)
९) दो दिवाने शहर में - भूपिंदर सिंग आणि रुना लैला - घरोंदा (१९७७)
१०) तुम्हे हो ना हो मुझको तो इतना - रुना लैला - घरोंदा (१९७७)
११) ज़िन्दगी मेरे घर आना - भूपिंदर सिंग आणि अनुराधा पौडवाल - दूरियां (१९७९)
१२) सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है - सुरेश वाडकर - गमन (१९७९)
१३) अजीब सानेहा मुझ पर गुजर गया यारों - हरिहरन - गमन (१९७९)
        This composition would remind you of Jaidev's another famous song 'Kabhi khud pe kabhi haalaat pe ronaa aayaa'

Jaidev's genius lies in the fact that he never hesitated to introduce new singers. E.g. Suresh Wadkar (Gaman), Hariharan (Gaman), Runa Laila (Gharonda), Bhupinder Singh (Dooriyan).

Thankfully, Jaidev's work was acknowledged at the national level when he won the National Award for the Best Music Composer for 3 of his films - 'Reshma Aur Shera' (1971), 'Gaman' (1979) and 'Ankahi' (1984).

Today, I have presented a different song composed by Jaidev from his film 'Gaman'. The singer is Chhaya Ganguly.

'Gaman' as a movie does not force you to remember it except for its songs composed by Jaidev. The movie is about Ghulam Rasul (Farooq Sheikh) - a common man from a small village in Uttar Pradesh. He lives there with his wife Khairun (Smita Patil) and his mother. The family is extremely poor and hardly manage to feed themselves. Ghulam's friend Lallu (Jalal Aga) is a Taxi Driver in Mumbai (then Bombay) and earns more than what his village-mates would even dream of. Upon Lallu's suggestion, Ghulam leaves his place for Mumbai and starts doing some work randomly. He learns to drive taxi at a later stage and starts earning little bit of money. In the process, he gets to see real plight of people living in Mumbai. Khairun continues to remember Ghulam and waits and hopes that he would return one day. Thus starts a beautiful song 'Aap ki yaad aati rahi raatbhar'.

The song starts with a soothing piece of Flute and entire Mukhada is sung without any background music (reminding us of the Solo rounds in today's reality shows). The first two Antaras are pictured on Smita Patil on the village background and hence Jaidev has not used any rhythm, but relied solely on Sarod and Flute. From the third Antara, the focus shifts to Mumbai on Ghulam, and to depict the fast life of Mumbai, the rhythm instruments kick in.

Chhaya Ganguly has sung this song with utmost simplicity and voice control; so much so that the songs leaves a long lasting impression upon you. She won the Best Female Singer award in 1979 at the national level for this particular song.

Given above are 2 videos - one from the film itself; and the other one from the Doordarshan program 'Aarohi' featured on Jaidev wherein you will see Chhaya Ganguly herself presenting the song.

Hats off to both Jaidev and Chhaya Ganguly for giving us this treasure!

Please do listen in and post your comments/suggestions. 

Thank you and appreciate your time to read it this far! :-)

Friday, 6 December 2019

अनमोल रतन (Precious Jewels) - 6 : Twin Magic by Pandit Ravishankar


Image Courtesy: time.com
Friends,

I am extremely happy to present the sixth song of the series Anmol Ratan. This time it is what I call the Twin Magic by none other than the great musician of yesteryear late Pandit Ravishankar. 11th December is his Death anniversary, hence thought it would be more appropriate to remember him on this day through his great compositions.

English version of the blog is at the end of the Marathi version below

Song #6: Kaise din beete kaise beetin ratiyaan
Song #7: Haaye re woh din kyon na aaye


Film         : Anuradha (1960)
Director   : Hrishikesh Mukherjee
Cast         : Balraj Sahni, Leela Naidu, Abhi Bhattacharya, 
                  Naseer Hussain 

Lyrics       : Shailendra

Composer : Pandit Ravishankar 

Singer       : Lata Mangeshkar


आपल्या हिंदी चित्रपट संगीताला संगीतकारांची एक वैभवशाली परंपरा आहे. १९३२ मध्ये आलेल्या पहिल्या "आलम आरा" या बोलपटाला संगीत दिलेली संगीतकार जोडी फिरोजशाह मिस्त्री आणि बी. इराणी, नंतर आलेले गोविंदराव टेंबे, आर. सी. बोराल, पंकज मलिक, अनिल विश्वास यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या रहमान यांच्यापर्यंत हिंदी चित्रपट संगीतकारांची एक मोठी यादीच तयार होईल.

पण मूलतः शास्त्रीय संगीत प्रांतातील असलेले पण हिंदी चित्रपटांना संगीत दिलेले असे मात्र मोजकेच सापडतील उ. दा. उस्ताद अली अकबर खान (सतार), पन्नालाल घोष (बासरी), शिव-हरी (पं. शिवकुमार शर्मा (संतूर) आणि पं. हरिप्रसाद चौरासिया (बासरी)), उस्ताद झाकीर हुसेन (तबला). या मान्यवरांच्या यादीत एक महत्वाचे नाव म्हणजे प्रख्यात सतारवादक पंडित रविशंकर! 

पं. रविशंकर यांनी मोजक्याच बंगाली, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांना संगीत दिले. त्यातले "पाथेर पांचाली", The World of Apu, Parash Pathar, "अपराजितो", Gandhi हे बंगाली आणि इंग्रजी चित्रपट तर "धरती के लाल", "अनुराधा", "मीरा", "नीचा नगर" आणि "काबुलीवाला" हे हिंदी चित्रपट त्यातील संगीताने खूप गाजले.



पण हिंदी चित्रसृष्टीला रविशंकर यांची संगीतकार म्हणून दखल घ्यावी लागली ते "अनुराधा" या १९६० साली आलेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटातील संगीताने. या चित्रपटात रविशंकरांनी त्यांच्या सतारीवरील प्रभुत्वाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. त्याचबरोबर व्हायोलिन, बासरी आणि सारंगी यांच्या मधुर स्वरांचे नियोजन प्रत्येक गाण्यामध्ये अचूक ठिकाणी करून त्या गाण्याची मधुरता कैक पटीने वाढवली.



Leela Naidu
Photo courtesy thedailystar.net
बलराज साहनी आणि लीला नायडू (मधुबालानंतरचा त्या काळातील पडद्यावरचा सर्वात सुंदर चेहरा - हे आपले माझे मत बरं का!) यांच्या अप्रतिम अभिनयाने या चित्रपटाने एक वेगळीच उंची गाठली. 

चित्रपटाची सुरुवातच मुळी "सांवरे सांवरे" या गाण्याने होते. या शिवाय "जाने कैसे सपनों में खो गयी आखियां", "कैसे दिन बीते", "समा अलबेला दिन है मिलन के", " सुन मेरे लाल" आणि "हाए रे वो दिन क्यों न आये" अशी एकाहून एक सुंदर गाणी या चित्रपटात आहेत.

लताची Top 10 गाणी निवडायची झाली तर त्यात मी "कैसे दिन बीते" आणि "हाए रे वो दिन क्यों न आये" या २ गाण्यांचा समावेश नक्की करेन.


"अनुराधा" ही एका स्त्रीची गोष्ट आहे. अनुराधा राय (लीला नायडू) ही श्रीमंत बापाची मुलगी स्वतः एक उत्तम गायिका आणि नर्तिका असते. रेडिओवर तिचे गाण्याचे कार्यक्रम होत असतात. संगीत तिचा श्वास असतो. योगायोगाने तिची गाठ डॉ. निर्मल चौधरी (बलराज साहनी) या आदर्शवादी डॉक्टरशी पडते. दोघे प्रेमात पडतात व कालांतराने लग्न करायचे ठरवतात. डॉ. निर्मलने अनुराधाला त्याच्या खडतर व्यवसायाची कल्पना दिलेली असते. या दरम्यान अनुराधाचे वडील तिचे लग्न लंडनहून नुकत्याच परतलेल्या दीपकशी (अभि भट्टाचार्य) करायचे योजत असतात. पण अनुराधा वडिलांना न जुमानता डॉ. निर्मलशी लग्न करते. दोघांना एक मुलगीही - राणू - होते. त्यानंतर अनुराधा संसार आणि मुलीचे संगोपन यात स्वतःला इतकी झोकून देते की स्वतःच्या आवडीनिवडीही बाजूला ठेवते. ती एकेकाळी गायिका असते हे सुद्धा ती विसरते. दुसरीकडे डॉ. निर्मल दिवसरात्र गरिबांची सेवा करण्यात मश्गुल राहतो, त्याला कामापुढे बायको, संसार, मुलगी काही दिसत नाही. परिणामतः अनुराधाचे जीवन खूप एकाकी होते.


पुढे अपघातानेच एक दिवस दीपक हा डॉ. निर्मलचा रुग्ण म्हणून अनुराधाच्या घरी येतो. त्याला अनुराधाची मनःस्थिती कळून येते. तो अनुराधाला तिच्यात दडलेल्या गायिकेची आठवण करून देतो. तिला एखादे तरी गाणे म्हणून दाखवण्याची विनंती करतो. अनुराधा तिच्या मनाची व्यथा गाण्यातून मांडते आणि मग सुरु होते एक अप्रतिम गाणे - कैसे दिन बीते!  

रविशंकरांनी यांनी जयजयवंती रागात बांधलेल्या या गाण्यात कमाल केली आहे. गाण्याची सुरुवातच मुळी "हाए" शब्दावरील लताने घेतलेल्या सुंदर कोमल मुरकीने होते. त्यानंतर 00:002 पासून ते 00:16 पर्यंत व्हायोलिनच्या तुकड्यातून दीपक - जो अनुराधाचे गाणे अनेक वर्षांनंतर ऐकण्यात उत्सुक असतो - त्याची उत्सुकता काय छान दाखवली आहे पहा. सुरुवातीच्या दोन "हाए" मध्ये वाजणारी सारंगी व नंतर आलेला छोटासा बासरीचा तुकडा अनुराधाची वेदना प्रकट करतात. आणि नंतर मग संपूर्ण गाण्यातून प्रतीत होते ती फक्त एका विवाहितेची अगतिकता. मुखडा आणि प्रत्येक अंतऱ्याच्या शेवटी "पिया जाने ना" लताने जसं म्हटलंय त्याला तोड नाही, लताच्या स्वरातील व्याकुळता अनुराधेची वेदना अधिकच ठळकपणे दाखवते. शैलेंद्र यांनी हे गीत असं काही लिहिलंय की जणू तेच अनुराधाचे जीवन स्वतः जगलेत! 

संपूर्ण चित्रपटात आणि या गाण्यात सुद्धा दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांची हातोटी जागोजागी दिसते. विशेषतः कॅमेऱ्याचे अँगल्स आणि Light Effects ज्या तऱ्हेने या गाण्यात दिसतात ते केवळ लाजवाब! 
उ. दा. अनुराधा आणि डॉ. निर्मल किंवा दीपक यांचे गाण्यातील एकाच फ्रेम मधले दृश्य, डॉ. निर्मल त्याच्या अभ्यासात  नेहमीप्रमाणे गढून गेलाय, आणि अनुराधा हताशपणे त्याकडे बघते आहे.
दुसऱ्या कडव्याच्या सुरुवातीला "रुत मतवाली आ के चली जाये" ही ओळ गाताना अनुराधाचे प्रतिबिंब तिच्याच तरुणपणाच्या फोटोसमोर दाखवले आहे; जणू काही तरुणपणाची स्वप्ने बघता बघता हातातून निसटून गेली हे दर्शविण्यासाठी. १९६० च्या दशकात चित्रपटांचे तंत्रज्ञान फार पुढारलेले नसतानाही असे दृश्य निर्माण करण्याचे कसाब त्या संकलकाचे.  

शेवटच्या कडव्यात "बरखा ना भाए, बदरा ना सोहे" या ओळीतील "सोहे" वर लताने जो अप्रतिम तार स्वर लावला आहे त्याला तोड नाही. गाण्याचा शेवटही वेगळ्याच पद्धतीने गायलेल्या "पिया जाने ना" ने होतो.

शैलेंद्र यांचे शब्द, लीला नायडू, बलराज साहनी आणि अभि भट्टाचार्य यांचा अभिनय, रविशंकरांचे अप्रतिम संगीत आणि या सर्वांना न्याय देणारा लताचा आवाज, सर्वच अनुभवण्यासारखे. अवश्य ऐका आणि आनंद घ्या!


अनुराधाच्या मनातील व्यथा "कैसे दिन बीते" या गीतातून तिच्याच तोंडून ऐकल्यानंतर दीपकला अनुराधाच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तिने स्वतःमधील गाणे मारले आहे हे त्याला कळून चुकते. त्याला खूप वाईट वाटते. तो तिला परत गाणे सुरु करण्याचा सल्ला देतो, पण अनुराधा ऐकत नाही. "जागे हुए को होश में लाना आसान नहीं" हे कळल्यावर दीपक अनुराधाचे घर सोडायचे ठरवतो. या दरम्यान अनुराधा-डॉ. निर्मल यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. अनुराधा निर्मलला त्याची आठवण करून देते, तो तिला रात्री ८ वाजता येऊन वाढदिवस साजरा करण्याचे आश्वासन देतो. आनंदलेली अनुराधा रात्रभर डॉ. निर्मलची वाट बघते, पण निर्मल एका रुग्णाच्या सेवेत अडकल्यामुळे येऊ शकत नाही. तो सकाळी उशिराने घरी परततो, तोपर्यंत अनुराधा संतापलेली असते. तिच्या संयमाची, डॉ. निर्मल कधीतरी तिच्याकडे लक्ष द्यायला लागेल या आशेची परिसीमा झालेली असते. अनुराधा आता मात्र डॉ. निर्मलचे घर सोडून वडिलांकडे परत जायचा निर्णय घेते व डॉ. निर्मलला तो निर्णय सांगते. अर्थात, निर्मल दुःखी होतो पण तो काही करू शकत नसतो. 


दरम्यान शहरातून एक प्रसिद्ध डॉक्टर कर्नल त्रिवेदी आणि त्यांचे मित्र हिरालाल वर्मा हे डॉ. निर्मलला भेटतात व त्याच दिवशी संध्याकाळी निर्मलच्या घरी जेवायचा कार्यक्रम ठरवतात. त्यामुळे निर्मल अनुराधाला १ दिवस थांबून दुसरे दिवशी जायची विनंती करतो. संध्याकाळी कर्नल त्रिवेदी जेवायला डॉ. निर्मलाच्या घरी येतात. आल्याआल्याचं त्यांना अनुराधाचा तरुणपणाचा फोटो व तिने मिळवलेली बक्षिसे दिसतात.  टेबलावर ठेवलेल्या रुद्रवीणेवर आणि पुस्तकांवर साठलेली धूळ दिसते. आणि त्यांना सर्व गोष्टींचे आकलन होते. डॉ. निर्मल अनुराधाची ओळख करून देतो. कर्नल त्रिवेदी तिला गाणे गायची विनंती करतात. मग सुरु होते आणखी एक अप्रतिम गीत "हाए रे वो दिन क्यों न आये"


या गाण्यातही कॅमेऱ्याचे अँगल्स, प्रकाश योजना यावर दिग्दर्शकाची छाप दिसते. हे गीत रविशंकरांनी राग जनसंमोहिनी मध्ये बांधलेलं आहे. व्हायोलीन, बासरी, सतार आणि सारंगी यांनी गाणं सजवलं आहे. लताचे आवाजावरचे कमालीचे नियंत्रण आणि ते राखतानाच अनुराधाच्या वेदना आवाजातून समर्थपणे व्यक्त करणे हा या गाण्याचा प्लस पॉईंट आहे. "जा जा के रितू लौट आए" ही ओळ ऐकताना या दोन्ही गोष्टी ठळकपणे जाणवतात. याच ओळींनंतर येणारा बासरीचा तुकडा तर केवळ लाजवाब! प्रत्येक वेळी ही ओळ ऐकताना आपण एक प्रेक्षक म्हणून अनुराधाच्या भावनांशी तादात्म होऊन जातो आणि टचकन डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. "झिलमिल वो तारे कहाँ गये सारे" किंवा "सूनी मेरी बीना संगीत बिना" या दोन्ही ओळींच्या उत्कर्षबिंदूवर लताने जो काळीज पिळवटून टाकणारा स्वर लावला आहे त्याने आपण अचंभित होऊन जातो! संपूर्ण गाण्यात डॉ. निर्मल उद्या अनुराधा सोडून जाणार म्हणून अतिशय काळजीत दिसतात, बलराज साहनी यांनी आपल्या संयमित अभिनयाने ही व्यक्तिरेखा अतिशय ताकदीने उभी केली आहे. 



गाणे संपले तरी आपल्यावर त्याचा ठसा बराच काळ राहतो यातच या गाण्याचे यश सामावलेले आहे. असा हा अप्रतिम संगीत, अभिनय, दिग्दर्शन आणि गायकीने नटलेला "अनुराधा". एकदा तरी अवश्य वेळ काढून बघा आणि ही कलाकृती निर्माण करणाऱ्यांना धन्यवाद द्या, एवढे कराच, मित्रांनो!

=============================================================================
"Anuradha" is a 1960 film of a young woman Anuradha (Leela Naidu) who gets married to an idealistic Dr. Nirmal Chaudhari (Balraj Sahani) who has pledged to serve the poor. Anuradha's father had decided to get her married to a London-returned young boy - Deepak (Abhi Bhattacharya); however Anuradha - deeply in love with Dr. Nirmal - rejects her father's proposal, runs away and gets married with Dr. Nirmal.

Both Dr. Nirmal and Anuradha have a lovely daughter - Renu. However, Anuradha finds Dr. Nirmal always caring more for his patients and does not pay any attention to his family. As years pass by, Anuradha starts feeling more and more lonely. She had sacrificed her singing and other hobbies. After she once again meets Deepak accidentally. he tries to pursue Anuradha to start singing again and not neglect her singing talent. He requests her to sing a song, Anuradha obliges by singing "Kaise Din Beete" - a wonderful composition in Jayjaywanti raag by Pt. Ravishankar. Shailendra's poetry perfectly portray Anuradha's feelings. Use of Flute, Sitar, Violin and Sarangi play an important role in enhancing the sweetness of the song. Lata's voice is at its best, only to be experienced. 

Hrishikesh Mukherjee as the Director of the movie has used camera angles and light effects extremely intelligently to capture the agony of Anuradha. The magic of cameraman and editor is at the fore during the rendition of line "Rut matwali aa ke chali jaaye" when Anuradha's past and present photographs are shown in one frame to depict the lost opportunity for Anuradha. 

As the movie progresses, we see Anuradha feeling frustrated with the situation and her helplessness. And when Dr. Nirmal does not return home to celebrate their wedding anniversary, after promising Anuradha, she gets extremely angry and decides to leave the house forever and go back to her father's place to restart her singing career. Colonel Trivedi - a well known Doctor from the city - and his friend visit their house on one evening for the dinner. When Colonel Trivedi sees young Anuradha's photograph with trophies and then goes on to see the Rudraveena and books not being used for years, he realises Anuradha's plight. He requests Anuradha to sing a song for him and there starts another gem of a song "Haaye re woh din kyon naa aaye". This song has been composed in Raag Janasammohini and like the earlier song, has excellent use of Sarangi, Flute and Sitar. Lata's voice control in "Jaa jaa ke ritu laut aaye" and amazing rendition of "Zilmil woh taare kahan gaye saare" or "Suni meri beena sangeet bina" in high pitch is simply awesome and is perhaps the USP of the song! 


Lata Mangeshkar - Pandit Ravishankar
This song has a long lasting impact even after it is over. Hats off to the entire team for giving us such gem of songs in one movie. Unfortunately, Pt. Ravishankar and Lata did not work much together and the audience perhaps lost what would have been a heavenly music.



For English readers, here are the two links, which will give you a very thorough review of the film.

https://anuradhawarrier.blogspot.com/2017/10/anuradha-1960.html
https://madhulikaliddle.com/2009/09/05/anuradha-1960/

For now, enjoy the songs - videos embedded in the Marathi version above. Hope you would like it. Do post your comments.

Thank you!