नमस्कार. महान पार्श्वगायिका आशा भोसले यांना जाऊन आज ३ आठवडे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांनी गाऊन ठेवलेल्या काही अप्रतिम गीतांद्वारे त्यांच्या "आशा-स्वरांचे" हे स्मरण.
"त्या आल्या, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले" हे आशाताईंबद्दल म्हणणं खूप धाडसाचं ठरेल, कारण त्यांचे जीवन आणि गायिका म्हणून त्यांचा प्रवास हा काही सहजसाध्य नव्हता हे आपल्याला त्यांच्या अनेक मुलाखतींमधून माहिती झालेले आहे.
पाचही मंगेशकर भावंडे राहणीमानामध्ये अत्यंत साधी. एखादी छानशी साधी साडी, गळ्यात आणि हातातही मोजकेच दागिने, कपाळावर ठसठशीत दिसेल असे कुंकू (आजकालच्या मुलींना कुंकू/टिकली लावायला लाज वाटते म्हणे!), डाव्या किंवा उजव्या हातात फारतर एखादा रुमाल. कशाचाच बडेजाव नाही, कुठलाही नखरा नाही किंवा वादकांकडे बघून खोटी खोटी दाद देणे नाही.
पण एकदा का त्यांनी गाण्याकरता तोंड उघडले की त्यांचे मोठेपण जाणवते आणि आपण थक्क होतो. आपल्या गळ्यातील उत्तम गाणे हे प्रेक्षकांपर्यंत कुठलाही नखरा न करता आणि हातवारे न करताही पोचवता येते हे या पाचही भावंडांनी पुनःपुन्हा सिद्ध केले आहे.
आशाताईंनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून म्हणजे १९४३ पासून ते जवळपास २०२४ पर्यंत म्हणजे तब्बल ८१ वर्षे आपल्या गायकीचा धबधबा अखंड चालू ठेवला! त्यांनी आयुष्यात किती गाणी रेकॉर्ड केली याचा नक्की आकडा माहिती नाही. पण त्यांची आणि लताबाईंची गाणी ऐकल्यावर "निजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो" ही प्रार्थना फळास येते. आपण सर्वच जण अतिशय भाग्यवान आहोत. असो.
चला तर ऐकू या आशाताईंची १२ अप्रतिम गाणी - ६ चित्रपटातील तर ६ गैरफिल्मी. गाण्यांची निवड करणेही महाकठीण. तरी पण शक्यतो कमी ऐकली गेलेली, Live कार्यक्रमात गायलेली गाणी यात घेतली आहेत. लोकप्रिय, सतत वाजवली/ऐकली गेलेली गाणी एक-दोन अपवाद वगळता टाळली आहेत.
शद्ब-मर्यादेमुळे प्रत्येक गाणे आणि त्यातील सौन्दर्य फार विस्ताराने मांडता आलेले नाही तरीसुद्धा आपल्याला ही गाणी आवडतील अशी आशा आहे.
१) आली री मेरे नैणाँ बाण पड़ी। - गैरफिल्मी (१९७१) - रचना संत मीराबाई - संगीतकार जयदेव
मीराबाईंची ही सुंदर रचना आशा आणि लता दोघींनी वेगवेगळी रेकॉर्ड केली आहे. लताने गायलेली रचना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केली आहे. लताबाईंनी दूरदर्शनच्या स्टुडिओत येऊन गायलेली ही रचना इथे ऐका - लताबाईंनी गायलेले गाणे.
मला स्वतःला, मी कितीही लताबाईंचा भक्त असलो तरी, आशाताईंनी गायलेली ही रचना खूप जास्त आवडते. जयदेव यांनी सहजसुंदर रचना आणि संतूर व बासरी यांचा अप्रतिम वापर केला आहे. "आली री मेरे नैना" यातील "री", "मेरे" आणि "नैना" या शब्दांवर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या छोट्या छोट्या हरकती घेऊन पुन्हा समेवर येण्याची जी जादू आशाताईंनी साधली आहे ती निव्वळ कमाल आहे. तसेच प्रत्येक कडव्यांच्या शेवटच्या ३ शब्दांवर घेतलेल्या वैविध्यपूर्ण जागाही लाजवाब आहेत.
२) चैन से हमको कभी - प्राण जाए पर वचन न जाए (१९७४) - गीतकार S. H. बिहारी - संगीतकार O. P. नय्यर
जशा लता-सी. रामचंद्र, लता-मदनमोहन, रफी-नौशाद, किशोरकुमार-S.D. बर्मन या जोड्या प्रसिद्ध आहेत आशा भोसले आणि O.P. नय्यर यांची जोडी प्रसिद्ध आहे. आशाताईंनी सर्वात जास्त गाणी ही O. P. कडे गायली असावीत. हे गीत O. P. यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा संपूर्णतः वेगळे आहे, शांत आहे. आशाताईंनी मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओत रेकॉर्ड केलेले गाणे आहे. वेदनेचे गाणे असल्याने आशाताईंनी एका जागी बसून, भावनेने ओतप्रोत भरलेले गाणे गायले आहे. ऐका तर.
३) तुमुल कोलाहल कलह में - गैरफिल्मी (१९७१) - गीतकार जयशंकर प्रसाद - संगीतकार जयदेव
आता जे गीत ऐकवणार आहे ते आहे १९७१ साली जयदेव यांनी रेकॉर्ड केलेल्या "मैं बैरागन हो गयी" या संग्रहातील. यातील सर्वच गाणी एक से एक आहेत पण या गाण्याचे स्थान त्या सर्व गाण्यांत सर्वात वरचे आहे. कवी जयशंकर प्रसाद यांनी १९३६ साली लिहिलेल्या "कामायनी" या महाकाव्यातील हे सर्वोत्कृष्ट गीत हिंदी भाषा प्रेमींना नक्की आवडेल कारण यात वापरलेली १००% शुद्ध हिंदी भाषा. मनुष्याचं मन, हृदय आणि बुद्धी यांचा आपापसातील संघर्ष आणि संवाद म्हणजे हे गीत आहे. शब्दांना अनुरूप चाल आणि आशाताईंचे भाव-विभोर करणारे गायन ही या गीताची वैशिष्ट्ये आहेत.
४) इन आँखों की मस्ती के - उमराव जान (१९८२) - गीतकार शहरयार - संगीतकार खय्याम
आशाताईंचे हे ८०च्या दशकातील अत्यंत गाजलेले गाणे. सुंदर चाल, अप्रतिम गायन आणि पडद्यावरील रेखाचे दिसणे आणि अभिनय यांनी हे गाणे गाजले नसते तरच नवल! पण आज जे सादर करणार आहे ते चित्रपटातील गाणे नसून आशाताईंनी BBC स्टुडिओत १९८४ साली केलेलं रेकॉर्डिंग आहे. याची मजा काही औरच आहे. BBC च्या स्टुडिओत गाणं असूनसुद्धा आशाताईंनी अस्सल भारतीय पेहराव कुठलीही लाज न बाळगता केला आहे ही बाब दखल घेण्याजोगी. बाकी गाण्याविषयी काय लिहू? तुम्ही ऐकाच.
५) सलौना सा सजन है और मैं हूँ - गैरफिल्मी (१९८३) - गीतकार शबीह अब्बास - संगीतकार ग़ुलाम अली
आता सादर करत ती आहे एक ग़ज़ल. पाकिस्तानी गायक व संगीतकार ग़ुलाम अली हे आपल्या गज़ल गायनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आशाताईंबरोबर "मिराज़-ए-ग़ज़ल" नावाचा ग़ज़लांचा एक संग्रह प्रकाशित केला होता त्यातील ही गाजलेली ग़ज़ल. ग़ुलाम अलींच्या संगीताचा वेगळ्या ढंग, शैली आशाताईंनी किती सहज आत्मसात केली आहे याचे ही ग़ज़ल म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे. दूरदर्शनच्या संग्रहातील रेकॉर्डिंग आहे. सुरुवातीला दीड मिनिटे संगीतकार नौशाद यांचे निवेदन आहे. गाण्यात सतार, व्हायोलिन, सारंगी आणि तबला प्रामुख्याने वापरला आहे.
६) जिवलगा कधी रे येशील तू - सुवासिनी (१९६१) - गीतकार ग. दि. माडगूळकर - संगीतकार सुधीर फडके
आता एक मराठी गाणे सादर करत आहे, अतिशय प्रसिद्ध आणि आजही लोकांचे आवडते! ५० आणि ६० च्या दशकात जेंव्हा लताबाई हिंदी मध्ये अत्यंत व्यस्त होत्या त्या काळात आशाताईंनी मराठीत अफाट काम करून ठेवले आहे. माझ्याकडे असलेल्या यादीमध्ये १९५१ पासून ते १९९६ पर्यंतच्या ४५ वर्षात आशाताईंनी मराठी चित्रपट आणि इतर अशी २३८ गाणी गायली आहेत. ही यादी निश्चितच अपूर्ण असावी.
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ४ कडव्यांमध्ये ४ राग वापरले आहेत सुधीर फडके (बाबूजी) यांनी आणि प्रत्येक कडव्याचा शेवट त्या त्या रागातून पुन्हा यमन रागावर आणून केला आहे. आशाताईंची दूरदर्शन सह्याद्रीच्या स्टुडिओमधील रेकॉर्डिंग आहे हे. वादक किती अडचणीत बसले आहेत ते पहा (तसे प्रत्येक वेळी असावे असे माझे म्हणणे नाही) पण तरीसुद्धा संपूर्ण वादनात कुठेही कमी पडले नाहीत. म्हणजे पुन्हा तेच - आपले लक्ष्य आपले काम हे असले तर इतर गोष्टी गौण ठरतात. हे रेकॉर्डिंग झाल्यावर बाबूजींनी "३० वर्षांनंतरही आशाचा आवाज तसाच ताजा, टवटवीत आहे" अशी दाद दिल्याचे खुद्द आशाताईंनी एका मुलाखतीत सांगितले आहे. संगीतकार आणि गायिका दोघांची कमाल आहे. ऐकू या.
७) आगे आगे तोपैको गोला - गैरफिल्मी (१९७६) - गीतकार, संगीतकार आणि सहगायक डॅनी डेंग्झोपा
आता एक अतिशय मजेशीर नेपाळी गीत सादर करत आहे. हे गाणे नेपाळी TV वर प्रचंड गाजले आहे. त्यातही Voice of Nepal आणि Nepal Idol या कार्यक्रमांमध्ये अनेकांनी हे गाणे गायचा प्रयत्न केला आहे. महदाश्चर्य म्हणजे हे गीत लिहिलंय आणि संगीतबद्ध केलंय हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध खलनायक डॅनी डेंग्झोपायांनी! गाण्याची चाल मनोरंजक आहे. डॅनी यांचं नृत्य, त्यांची आनंदी, उत्साहवर्धक देहबोली आणि आशाताईंचे सुंदर सादरीकरण. विशेषतः दुसऱ्या कडव्यांच्या आधी घेतलेला आलाप लाजवाब. आणि गाण्यात मधेच ते हसणं, किती नैसर्गिक आणि निष्पाप, अहाहा! तुम्हालाही गाणे आवडेल बघा.
८) साथी रे भूल न जाना मेरा प्यार - कोतवाल साहब (१९८४) - गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन
रवींद्र जैन यांनी ७० आणि ८० च्या दशकांमध्ये अनेक चित्रपटांना उत्तम संगीत दिले आहे. त्यांची बरीच गाणी खूप गाजली आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम म्हणावे असे हे गीत आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगची कहाणी अशी सांगतात की आशाताईंना काही कारणाने कुठल्याही rehearsal म्हणजे सरावसत्राला यायला जमले नाही म्हणून रवींद्र जैन अतिशय संतापले होते. रेकॉर्डिंगच्या दिवशी आशाताई स्टुडिओत आल्या, थेट रेकॉर्डिंगला माईक समोर उभ्या राहिल्या, त्या गायल्या आणि त्यांनी जिंकले, एका टेक मध्ये गाणे अंतिम झाले. ही ताकद, हे कौशल्य होते आशाताईंचे. भरत प्रताप सिन्हा (शत्रुघ्न सिन्हा) नावाचा प्रामाणिक पोलीस अधिकारी आणि त्याची बायको प्रभा (अपर्णा सेन). प्रभाच्या गतायुष्याबद्दल आपल्या नवऱ्याला कळले तर काय होईल या चिंतेत असताना चित्रपटात हे गाणे येते.
९) शूरा मी वंदिले - मराठी नाट्यगीत - नाटक संगीत मानापमान - गीतकार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर - संगीतकार गोविंदराव टेंबे - मूळ गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर
अतिशय गाजलेले हे मराठी नाट्यगीत मूलतः मास्टर दीनानाथांनी गायले होते. नंतर ते अनेक गायकांनी गायले आहे. विशेषतः वसंतराव देशपांडे यांनी गायलेले हे गीतही खूप प्रसिद्ध झाले. आशाताईंनी बहुदा ६० च्या दशकात त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून त्यांची बरीचशी नाट्यपदे गायली होती, त्यातीलच हे एक. या गीतातून आशाताईंची शास्त्रीय बैठक दिसते तसेच त्यांच्या आवाजाची फिरत, आलाप/ताना यावरची त्यांची हुकमत दिसते. अतिशय श्रवणीय असे हे गीत आहे. आज सादर करत आहे ते आशाताईंनी दूरदर्शनसाठी गायलेले हे गीत. साथीला पेटीवर आहेत डॉ. विद्याधर ओक. हे गीत गातानाची आशाताईंची देहबोली, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून क्षणभर लताबाईच गात आहेत का असे वाटते.
१०) छोटासा बालमा अँखियन नींद ले गयो - रागिणी (१९५८) - गीतकार क़मर जलालाबादी - संगीतकार O. P. नय्यर
O.P. नी शास्त्रीय रागदारीवर आधारित जी गाणी संगीतबद्ध केली त्यातील हे एक अप्रतिम गाणे. आश्चर्याची बाब अशी की हे गाणे "सुकतातचि जगि या" या मा. दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेल्या प्रसिद्ध नाट्यगीतावर आधारित आहे, पण गाण्याला खास O.P. टच आहे. त्याहून आश्चर्य म्हणजे स्वतः आशाताईंनी हे नाट्यगीत १९५२ सालच्या मराठी चित्रपट "दूधभात" साठी गायले आहे ते इथे ऐकायला मिळेल - आशाताईंचे "सुकतातचि जगि या". दुर्दैवाने YouTube वर चित्रपटाची जी आवृत्ती आहे त्यात हे गाणे नाहीये. त्यामुळे फक्त श्राव्य आवृत्ती द्यायला लागत आहे. हे गाणे खमाज थाटातील तिलंग या रागावर आधारित आहे, हेही या रचनेचे वेगळेपण आहे कारण O.P. यांची बरीचशी गाणी पिलू रागावर आधारित आहेत. आपल्या प्रियकराच्या दर्शनासाठी आसुसलेल्या प्रेयसीची वेदना O.P. यांनी त्यांच्या रचनेतून आणि आशाताईंनी त्यांच्या गायनातून आपल्यापर्यंत किती प्रभावीपणे पोचवली आहे. "छोटासा" आणि "रतियन नींद न आए" यातील "आए" या शब्दावर आशाताईंनी घेतलेल्या हरकती केवळ लाजवाब आहेत! ऐकू या.
११) फिर से आइयो बदरा बिदेसी - नमकीन (१९८२) - गीतकार गुलज़ार - संगीतकार R. D. बर्मन
गुलज़ार, R. D. बर्मन आणि आशा भोसले या त्रयींनी अनेक अप्रतिम, अफलातून गाणी आपल्याला दिलेली आहेत. त्यातीलच हे तुलनेने कमी ऐकले गेलेले पण उच्च दर्जाचे गाणे. शबाना आझमीवर चित्रित झालेले. पहाडी प्रदेशातील व्यक्तिरेखांवर चित्रपटाची कथा बेतलेली असल्याने R. D. बर्मन यांनी चाल पण त्याच धर्तीवर लावली आहे. गुलज़ार यांचे खास निवेदन या video मध्ये आहे ज्यात चित्रपटाची कथा आणि गाण्याच्या जन्माची कथा फार छान सांगितली आहे. त्यामुळे इतर काही फाफटपसारा न लावता तुम्ही थेट गाणेच ऐका. गाणे छोटे २ कडव्यांचेच आहे पण निवेदन व तिघांच्या गप्पांमुळे ते रंगले व लांबले आहे तरीही कंटाळा येत नाही, तुम्हालाही असाच अनुभव येईल.
१२) गीत कितने गा चुकी हूँ इस सुखी जग के लिये - गैरफिल्मी (१९५२) - गीतकार पं. भरत व्यास - संगीतकार - निखिल घोष
हे गीत म्हणजे एका अर्थाने आशाताईंचे आत्मकथन आहे असे मला वाटते. आणि ते सुद्धा त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात. त्यांच्या संघर्षमय जीवनाशी टक्कर देत स्वतःची गाण्याची कारकीर्द उभी करायची, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करायचे ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि आपल्या गाण्यातून समस्त लोकांना अपार आनंद देणाऱ्या आशाताईंना स्वतःसाठी किती वेळ मिळाला असेल? मग त्यांचे मन "आज रोने दो मुझे एक पल अपने लिये" असं म्हणत नसेल का? ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या गाण्याचे आशाताईंच्या आयुष्यातील स्थान महात्म्य समजेल. गाण्याच्या चालीत खास काही असेलच तर तो आहे आशाताईंचा कोवळा, तरुण आणि तरीही जीवनाचे दुःख मांडण्याची प्रगल्भता दाखवणारा आवाज. ऐकू या.
आशाताईंची मला आवडलेली ११ सोलो आणि १ द्वंद्वगीत इथे सादर केले. जोवर आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोवर संगीताच्या नभांगणात आपल्या अनमोल सुरांद्वारे लता आणि आशा कायम राहतील. त्यांचे स्वर आपल्याला सकारात्मक आणि सतत कार्यमग्न राहायची ऊर्जा देत राहतील. आपण आयुष्यभर त्यांच्या ऋणातच राहू या.
तुमचा आशाताईंचा व त्यांच्या गाण्याचा सखोल अभ्यास जाणवला... खूपच सुंदर सांगितीक व भावपूर्ण विश्लेषण..व आपली कलात्मक मांडणी या बद्दल अभिनंदन
मला कळलेल्या शब्दात.
*१. विरह आणि आर्तता:* हे गाणे म्हणजे विरहाची एक आर्त हाक आहे. प्रियकराच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या नायिकेची व्याकुळता गदिमांनी शब्दांतून आणि आशाताईंनी सुरांतून हुबेहूब जिवंत केली आहे.
*२. रागांची गुंफण* (तांत्रिक कसब): लेखात उल्लेख केल्याप्रमाणे यात ४ राग आहेत, पण त्या रागांचे स्वरूप (उदा. यमनचा शांतपणा) गाण्यातील 'प्रतिक्षा' आणि 'समर्पण' या भावनांना अधिक गडद करते.
*३. शब्दांचे संवादात्मक स्वरूप:* "कधी रे येशील तू" हा केवळ प्रश्न नसून त्यात एक हक्क आणि प्रेमळ आळवणी आहे. गदिमांच्या साध्या पण खोल शब्दांमुळे हे गाणे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते.
*४. ताल आणि लय:* या गाण्याची लय अत्यंत संथ आणि शांत आहे, जी मनातील अस्वस्थता आणि संथपणे सरणारा काळ (प्रतिक्षा) यांचे अचूक प्रतिनिधित्व करते.
*५. आशाताईंच्या आवाजातील लवचिकता:* शास्त्रीय रागांवर आधारित असूनही, आशाताईंनी त्यात कुठेही बोजडपणा येऊ दिला नाही. त्यांनी सुगम संगीतातील गोडवा आणि शास्त्रीय संगीतातील शिस्त यांचा सुवर्णमध्य साधला आहे.
*६. वाद्यांचा मोजका वापर:* गाण्यात वाद्यांचा पसारा कमी असून शब्दांना आणि स्वरांना जास्त महत्त्व दिले आहे, ज्यामुळे गाण्यातील भाव अधिक स्पष्टपणे जाणवतात.
*७. काळातीत आकर्षण:* १९६१ सालातील असूनही, हे गाणे आजही तरुण पिढीला तितकेच भावते, हे या गाण्यातील सार्वत्रिक भावनांचे यश आहे.
*८. चित्रपट 'सुवासिनी'चा संदर्भ:* चित्रपटाच्या कथानकात हे गाणे ज्या वळणावर येते, तिथे ते केवळ एक गाणे न राहता नायिकेच्या मनाचे प्रतिबिंब ठरते.
*९. मराठी भावसंगीताचे शिखर:* हे गाणे म्हणजे मराठी भावसंगीताचा एक 'बेंचमार्क' आहे, जिथे संगीतकार, गीतकार आणि गायिका या तिघांची प्रतिभा एकाच वेळी शिखरावर होती.
*१०. सांगितिक संस्कार:* हे गाणे ऐकणे म्हणजे संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी रागांच्या परिवर्तनाचा आणि शब्दांच्या उच्चारांचा एक मोठा धडाच आहे.
माझे आवडते गाणे..
ReplyDeleteजीवलगा....
तुमचा आशाताईंचा व त्यांच्या गाण्याचा सखोल अभ्यास जाणवला...
खूपच सुंदर सांगितीक व भावपूर्ण विश्लेषण..व आपली कलात्मक मांडणी
या बद्दल अभिनंदन
मला कळलेल्या शब्दात.
*१. विरह आणि आर्तता:*
हे गाणे म्हणजे विरहाची एक आर्त हाक आहे. प्रियकराच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या नायिकेची व्याकुळता गदिमांनी शब्दांतून आणि आशाताईंनी सुरांतून हुबेहूब जिवंत केली आहे.
*२. रागांची गुंफण*
(तांत्रिक कसब): लेखात उल्लेख केल्याप्रमाणे यात ४ राग आहेत, पण त्या रागांचे स्वरूप (उदा. यमनचा शांतपणा) गाण्यातील 'प्रतिक्षा' आणि 'समर्पण' या भावनांना अधिक गडद करते.
*३. शब्दांचे संवादात्मक स्वरूप:*
"कधी रे येशील तू" हा केवळ प्रश्न नसून त्यात एक हक्क आणि प्रेमळ आळवणी आहे. गदिमांच्या साध्या पण खोल शब्दांमुळे हे गाणे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते.
*४. ताल आणि लय:*
या गाण्याची लय अत्यंत संथ आणि शांत आहे, जी मनातील अस्वस्थता आणि संथपणे सरणारा काळ (प्रतिक्षा) यांचे अचूक प्रतिनिधित्व करते.
*५. आशाताईंच्या आवाजातील लवचिकता:*
शास्त्रीय रागांवर आधारित असूनही, आशाताईंनी त्यात कुठेही बोजडपणा येऊ दिला नाही. त्यांनी सुगम संगीतातील गोडवा आणि शास्त्रीय संगीतातील शिस्त यांचा सुवर्णमध्य साधला आहे.
*६. वाद्यांचा मोजका वापर:*
गाण्यात वाद्यांचा पसारा कमी असून शब्दांना आणि स्वरांना जास्त महत्त्व दिले आहे, ज्यामुळे गाण्यातील भाव अधिक स्पष्टपणे जाणवतात.
*७. काळातीत आकर्षण:*
१९६१ सालातील असूनही, हे गाणे आजही तरुण पिढीला तितकेच भावते, हे या गाण्यातील सार्वत्रिक भावनांचे यश आहे.
*८. चित्रपट 'सुवासिनी'चा संदर्भ:* चित्रपटाच्या कथानकात हे गाणे ज्या वळणावर येते, तिथे ते केवळ एक गाणे न राहता नायिकेच्या मनाचे प्रतिबिंब ठरते.
*९. मराठी भावसंगीताचे शिखर:*
हे गाणे म्हणजे मराठी भावसंगीताचा एक 'बेंचमार्क' आहे, जिथे संगीतकार, गीतकार आणि गायिका या तिघांची प्रतिभा एकाच वेळी शिखरावर होती.
*१०. सांगितिक संस्कार:*
हे गाणे ऐकणे म्हणजे संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी रागांच्या परिवर्तनाचा आणि शब्दांच्या उच्चारांचा एक मोठा धडाच आहे.
सुरेख , असेच लिहित राहा
ReplyDeleteस्वर्गीय आशाजी वेगवेगळ्या वेळी गाण्यांचे सादरीकरण छान दाखवले आहे
ReplyDelete