नमस्कार मित्रांनो. आज जवळपास ६-७ महिन्यांनंतर ब्लॉग लिहितो आहे. संगीतकार व गायक कै. सुधीर फडके यांच्या १०५व्या जयंतीनिमित्ताने (२५ जुलै) त्यांच्या हिंदी चित्रपटातील कारकिर्दीचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
सुधीर फडके उर्फ बाबूजी यांना उभा महाराष्ट्र एक थोर संगीतकार आणि गायक म्हणून तर ओळखतोच; विशेषतः गीत रामायणातील अविस्मरणीय, सुमधुर गीतांमुळे बाबूजी महाराष्ट्रातील घराघरात परिचित आहेत. असे असताना फार थोडे लोक हे जाणतात की बाबूजींनी हिंदी चित्रपटांनाही संगीत दिले होते व काही गाणी गायलीही होती! महाभारतामध्ये सव्यसाची या शब्दाचा अर्थ दोन्ही हातांनी लढू शकणारा असे आहे. बाबूजींचे मराठी आणि हिंदी संगीतातील संगीतकार आणि गायक या दोन्ही भूमिकांतून योगदान बघितले तर त्यांना "सव्यसाची" हे विशेषण सर्वार्थाने योग्य आहे. माझे वकील मित्र राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी हे विशेषण सुचवले आहे.
गुरु - पं. वामनराव पाध्ये |
साधारण १०० वर्षांपूर्वी कोल्हापूर ही संगीतप्रेमी लोकांची पंढरी होती. डफ-तुणतुण्यांच्या तालासुरात गायलेले पोवाडे, कडाडत्या ढोलकीच्या आणि रुणझुणत्या पैंजणांच्या साथीने गायलेल्या लावण्या, ऑर्गन-सारंगीने नटलेले नाट्यसंगीत आणि तंबोऱ्याच्या साथीत जमलेल्या अभिजात शास्त्रीय संगीताच्या मैफली असा हा बारमाही चाललेला सूरमहोत्सव हे कोल्हापुरातील कलाजीवनाचे वैशिष्ट्य होते. अशा हा कलानगरीत राम फडके यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी झाला. लहान वयातच रामचे संगीत शिक्षण पं. वामनराव पाध्येबुवा यांचेकडे सुरु झाले. अल्पावधीतच रामने शास्त्रीय संगीतात चांगले प्राविण्य मिळवले, इतके की गायकाने गायल्या-गायल्या लगेचच त्याचे नोटेशन राम गाऊन दाखवी.
घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे रामने गाण्याचे क्लास सुरु केले, गणेशोत्सवी मेळा काढला. याच दरम्यान कोल्हापुरातील त्यांचे मित्र न. ना. देशपांडे यांनी रामचे मूळ नाव राम बदलून ते सुधीर फडके असे ठेवले. कालांतराने सुधीर फडके बाबूजी नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे नशीब काढायला बाबूजी मुंबईला आले. तेथेही शिकवण्या, मेळ्यातील गाण्यांना चाली लावून देणे वगैरे करून चरितार्थ चालवला. त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम मिरजेत झाला (१९३१). मुंबईत आकाशवाणीवरील त्यांचा पहिला कार्यक्रम १९३७ मध्ये झाला. शिवाय त्यांनी १९३९–४१ दरम्यान खानदेश, विदर्भ, बिहार, पंजाब, राजस्थान, बंगाल अशी भ्रमंती केली. विविध प्रांतातील संगीत ऐकून त्यांचे ज्ञान समृद्ध झाले. कलकत्त्याच्या एका ध्वनिमुद्रण कंपनीमध्ये बाबूजींनी काही काळ नोकरी केली. तेथील मुक्कामी कुंदनलाल सैगल यांच्या रेकॉर्ड्सचे पारायण बाबूजींनी केले. कुंदनलाल सैगल, हिराबाई बडोदेकर आणि बालगंधर्व यांच्या गायनाची बाबूजींनी एकलव्यासारखी आराधना केली.
सुट्टीसाठी कोल्हापूरला परत आले असतानाच बाबूजी प्राणांतिक आजारी पडले, त्यामुळे कलकत्त्याची नोकरी गेली. बाबूजी कोल्हापूरला असतानाच त्यांचे मित्र माधव पातकर हे त्यांच्याकडे ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेले "दर्यावरी नाच की होडी चाले" घेऊन आले व बाबूजींना त्याला चाल लावायला सांगितली. बाबूजींनी लावलेली चाल ऐकल्यावर पातकरांना लक्षात आले की ते ही चाल गाऊ शकणार नाहीत. म्हणून त्यांनी बाबूजींना ती चाल माडगूळकर व H. M. V. कंपनीचे वसंत कामेरकर यांना ऐकवा असे सुचवले. त्या दोघांनाही ती चाल एवढी आवडली की बाबूजींनी ते गाणे H. M. V. साठी गावे असा आग्रह धरला. अशा रीतीने संगीतकार व गायक बाबूजींचा जन्म झाला. ते साल होते १९४१. अर्थात बाबूजींचे पहिले रेकॉर्ड झालेले गाणे होते "चांदाची किरणे विरली" आणि ते गायले होते गायिका पद्मा पाटणकर यांनी. या पद्मा पाटणकर म्हणजे ग. दि. माडगूळकर यांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर!
११ फेब्रुवारी १९४६ हा बाबूजींच्या आयुष्यातील सोन्याचा दिवस ठरला. कारण याच दिवशी प्रभात फिल्म कंपनीच्या साहेबामामा फत्तेलाल यांनी बाबूजींची प्रभातचे संगीत-दिग्दर्शक म्हणून निवड केली. १९४६ साली प्रदर्शित झालेला प्रभातचा "गोकुळ" हा हिंदी चित्रपट बाबूजींचा संगीत-दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ठरला! ज्यांचे संगीत क्षेत्रातील संपूर्ण आयुष्य हे पुढे मराठी चित्रपट, भावगीते आणि सुगम संगीत यात गेले, त्यांचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट हा हिंदी असावा, काय विचित्र योगायोग आहे! या चित्रपटातील "आया गोकुल में छोटासा राजा" हे सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांनी बाबुजींकडे गायलेले पहिले गीत.
१९४६ मधेच प्रदीप पिक्चर्सने बाबूजींना त्यांचा "रुक्मिणी स्वयंवर" हा चित्रपट संगीत करण्यासाठी दिला. या चित्रपटात बाबूजींच्या जोडीने संगीतकार म्हणून स्नेहल भाटकर उर्फ वासुदेव होते. ललिता देऊळकर - ज्या पुढे सौ. ललिता सुधीर फडके झाल्या - त्यांनी या चित्रपटात एकूण ४ गाणी गायली होती.
१९४७ मध्ये पुन्हा एकदा प्रभातने बाबूजींना पाचारण केले ते "आगे बढो" हा चित्रपट संगीतबद्ध करण्यासाठी. या चित्रपटासाठी प्रथमच प्रख्यात गायिका खुर्शीद ही बाबुजींकडे गायली. त्याचबरोबर मोहम्मद रफी आणि मन्ना डे यांचेही प्रत्येकी एक गाणे या चित्रपटात होते.
"आगे बढो" नंतर बाबूजींना हिंदीमध्ये बरेचसे पौराणिक चित्रपट मिळाले. उदा. "सीता स्वयंवर" (१९४८), "जय भीम", "माया बाजार" आणि "संत जनाबाई" (१९४९), "राम प्रतिज्ञा", "श्रीकृष्ण दर्शन" (१९५०). "संत जनाबाई" या १९४९ सालच्या चित्रपटात लता मंगेशकर प्रथमच बाबुजींसाठी हिंदी गाणे गायल्या "गोप सब बनमाला पूछ हरी कहाँ गये"!
१९५१ पासून मात्र बाबूजींचे संगीतकार म्हणून सर्वोत्तम हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. ते होते "मालती माधव" (१९५१), "मुरलीवाला" (१९५१), "रत्नघर" (१९५५), "सजनी" (१९५६) आणि बाबूजींच्या हिंदी चित्रपट संगीत कारकिर्दीतील सरताज ठरावा असा "भाभी की चूडीयाँ" (१९६२). यातील "रत्नघर" हा चित्रपट बाबूजींनी स्वतः निर्मित केला होता.
"पहली तारीख" (१९५४) हा चित्रपट बाबूजींच्या हिंदी कारकिर्दीतील एक अनोखा चित्रपट म्हणावा लागेल. कारण या चित्रपटात धीरगंभीर स्वभावाच्या संगीतकार बाबूजींनी एकदम विरुद्ध स्वभावाच्या दिलखुलास किशोरकुमार यांच्याकडून त्यांचे एकमेव गीत गाऊन घेतले होते. ते गाणे होते "दिन है सुहाना आज पहली तारीख है". गीतकार क़मर जलालाबादी यांनी लिहिलेले हे गीत मोठे मजेशीर आहे. चाल ऐकल्यानंतर ही चाल बाबूजींची असेल यावर आपला विश्वास बसत नाही!आजही दर महिन्याच्या एक तारखेला हे गाणे रेडिओ सिलोनवर न चुकता लागते!
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे १९४६ ते १९६२ ही बाबूजींच्या हिंदी कारकिर्दीतील महत्वाची वर्षे. ही १६ वर्षे हिंदीत काम करत असताना मराठीतही बाबूजींनी संगीतकार म्हणून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले होते. १९४६ ते १९६२ या सोळा वर्षांमध्ये बाबूजींनी एकूण १८ हिंदी आणि ४७ मराठी चित्रपटांचे संगीत केले! म्हणजे १६ वर्षात ६५ चित्रपटांना संगीत दिले, म्हणजेच सरासरी एका वर्षात चार चित्रपट! आणि हे सर्व करत असताना गायक म्हणूनही त्यांनी प्रचंड काम केले आहे. पाचशेहून अधिक गाण्यांना बाबूजींनी आपला आवाज दिला आहे!
संगीतकार आणि गायक अशा दोनही भूमिका निभावणारे अनेक संगीतकार-गायक आपल्याकडे होऊन गेले. उदा. मास्टर गुलाम हैदर, अनिल विश्वास, सी. रामचंद्र, मदनमोहन, हेमंतकुमार, सचिनदेव बर्मन, राहुलदेव बर्मन इ. यातील हेमंतकुमार यांची स्वतःच्या दिग्दर्शनाखाली गायलेली अंदाजे १५१ गाणी आणि इतर संगीत दिग्दर्शकांकडे गायलेली अंदाजे ७२ गाणी म्हणजे एकूण अंदाजे २२०-२५ गाणी सोडली तर इतर संगीतकारांची गायक म्हणून गाणी संख्येने कमी आहेत, तसेच गायक म्हणून त्यांच्या मर्यादा खूप आहेत.
बाबूजींची संगीतकार आणि गायक म्हणून कारकीर्द खाली दिलेल्या आकड्यांवरून बघितली तर संख्या आणि दर्जा या दोन्ही बाबतीत मला तरी ते संगीतकार-गायक म्हणून सर्वश्रेष्ठ वाटतात. अर्थात हेही खरे आहे की काही मोजकी हिंदी गाणी सोडली तर मराठीतील आपल्या संगीताचा दर्जा आणि वैविध्य बाबूजींना हिंदीत दाखवता आले नाही, तसेच इतर प्रतिभावान हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शकांहून दर्जेदार संगीत देता आले नाही. त्यामुळे हिंदीतील कामावर मर्यादा आल्या असाव्यात असे वाटते.
संगीतकार म्हणून बाबूजींची कारकीर्द: (सौजन्य: स्वरतीर्थ सुधीर फडके जन्मशताब्दी विशेषांक, प्रकाशक श्री नरकेसरी प्रकाशन लि. नागपूर)
गायक म्हणून बाबूजींची कारकीर्द: (सौजन्य: स्वरतीर्थ सुधीर फडके जन्मशताब्दी विशेषांक, प्रकाशक श्री नरकेसरी प्रकाशन लि. नागपूर)
बाबूजींच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे गीताच्या शेवटच्या कडव्याला लावलेली वेगळी उच्च रवातील चाल. त्यांच्या अनेक गाण्यातून हे आपल्याला जाणवते.
बाबूजींनी संगीतबद्ध केलेली काही उल्लेखनीय गाणी:
बाबूजींची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपार भक्ती होती. प्रचंड मेहनत घेऊन, अनेक अडथळे पार करून बाबूजींनी सावरकरांवर हिंदीत चित्रपट बनवला २००१ साली. त्यात फक्त १ गीत होते आणि तेही मराठी - "ने मजसी ने परत मातृभूमीला". अतिशय तळमळीने बाबूजींनी हे गीत संगीतबद्ध केले आणि गायलेही होते. या गीताची चाल पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी बनवलेल्या चालीपेक्षा पूर्णतः वेगळी; साधी, सरळ पण अतिशय भावपूर्ण आहे.
१९७२ साली आलेला "दरार" हा बाबूजींचा खऱ्या अर्थाने हिंदीतील शेवटचा चित्रपट. त्यानंतर १९८७ साली महाराष्ट्र शासनासाठी तयार करण्यात आलेल्या "शेर शिवाजी" या चित्रपटाचे पार्श्वसंगीत बाबूजींनी केले होते.
बाबूजींना त्यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत अनेक मानसन्मान मिळाले. सूरसिंगार संसद तर्फे सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून दोन वेळा गौरवण्यात आले - प्रथम १९६८ साली "भाभी की चूडीयाँ" साठी आणि नंतर १९७० साली मराठी चित्रपट "मुंबईचा जावई" साठी. त्याशिवाय २००१ साली महाराष्ट्र शासनाने प्रतिष्ठेचा समजला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार बाबूजींना दिला.अल्पशा आजाराने बाबूजींचं २० जुलै २००२ रोजी मुंबईत निधन झालं.
आज त्यांची काही गाणी खाली सादर करत आहे. जी पाहिल्यावर/ऐकल्यावर त्यांचे संगीतकार-गायक म्हणून श्रेष्ठत्व आपल्याला समजेल.
१) गोप सब बनमाला पूछ हरी कहाँ गये - संत जनाबाई (१९४९) - गायिका लता मंगेशकर - गीतकार पं. नरेंद्र शर्मा
बाबूजींनी स्वरबद्ध केलेले एक अप्रतिम हिंदी भक्तिगीत. या चालीतील सहजता आणि माधुर्य केवळ लाजवाब आहे. लताबाईंनी अतिशय समरसून गीत गायले आहे. हे लताबाईंनी बाबूजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेले पहिले हिंदी गीत. बाबूजींनी स्वरबद्ध केलेल्या एकूण १५६ गाण्यांपैकी ३२ गाणी (म्हणजे २१%) ही लताजींनी गायली आहेत.
२) प्रभात वंदना करें जागो रे हरे श्रीहरे - संत जनाबाई (१९४९) - गायक मन्ना डे आणि सहकारी - गीतकार पं. नरेंद्र शर्मा
बाबूजींच्या संगीत दिग्दर्शनात मन्ना डे यांनी एकूण ४ गाणी गायली आहेत, त्यातील हे सर्वोत्कृष्ट गाणे. हे आहे चित्रपटाचे शीर्षक गीत. पहाटेच्या प्रहरी देवाची आळवणी असल्याने चालही तितकीच प्रासादिक आहे. गाण्यातील ठहराव, मन्नादांचे धीरगंभीर सूर आणि सहकारी गायक-वादक यांची समर्थ साथ सर्व काही जुळून आले आहे या गाण्यात. "संत जनाबाई" या मूळ मराठी चित्रपटात हेच गाणे थोडेसे शब्द बदलून गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी "प्रभात समयो पातला" असे लिहिले आहे, आणि त्याला आवाज दिला होता स्वतः बाबूजींनी. दोन्हीही गाणी उत्तम आहेत, दोन्हींच्या चालीही सारख्याच आहेत फक्त लयीत फरक आहे.
३) बाँध प्रीती फूलडोर मन लेके चितचोर - मालती माधव (१९५१) - गायिका लता मंगेशकर - गीतकार पं. नरेंद्र शर्मा
या गाण्याची २ versions देत आहे. एक चित्रपटातील लताने गायलेले, तर दुसरे स्वतः संगीतकार बाबूजींनी दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात गायलेले. बाबूजी स्वतः उत्तम गायक असल्याने दुसऱ्या गायकांकडून त्यांना हवे तसेच गाऊन घेण्याचे कसब त्यांच्यात होते. दुसऱ्या अंतऱ्यात (कडव्यात) लताजींनी "कैसे सहूँ बिछोह मन में रमा है मोह" या ओळीतील "बिछोह" शब्दाची फेक आणि जागा लाजवाब घेतली आहे, कान तृप्त होतात.
Lata Mangeshkar version |
|
Sudhir Phadke version |
|
४) ज्योती कलश छलके - भाभी की चूडीयाँ (१९६२) - गायिका लता मंगेशकर - गीतकार पं. नरेंद्र शर्मा
बाबूजींचे हे आजवर अतिशय लोकप्रिय असलेले गीत (बाबूजींच्या चालींना गाणं असं म्हणणं जमतच नाही, कारण गीतात एक प्रकारची प्रासादिकता असते, सच्चेपणा असतो, तसा तो सर्वच गाण्यात असतोच असं नाही. असो, हे आपलं माझं प्रांजळ मत, कदाचित तुम्ही सहमत होणार नाही). सोज्ज्वळ मीनाकुमारीवर चित्रित झालेले. गीतात सतार आणि बासरी ही प्रमुख वाद्ये आहेत. गीताची सुरुवातच एका अप्रतिम तानेने होते. प्रत्येक अंतऱ्यातील शेवटच्या ओळीतील जागा अतिशय सुमधुर पण अवघड आहे, तरीही स्वतः बाबूजी आणि लताबाईंनी किती सहजतेने घेतली आहे ते बघा. दोन्ही versions खाली देत आहे.
Lata Mangeshkar version |
|
Sudhir Phadke version |
|
५) भज मन राम चरण सुखदाई - हिंदी भजन आणि ओ रसिया मै तो चरण तिहारी - राग दुर्गा
आपण उत्तम शास्त्रीय गायक होऊ शकलो नाही अशी खंत बाबूजींना होती; ती त्यांनी अनेक मुलाखतीतून बोलूनही दाखवली होती. पण खालील दोन गाणी त्यांचे शास्त्रीय संगीतातील प्रभुत्व दाखवून देतात. १९७० च्या दशकात बाबूजी अमेरिका दौऱ्यावर गेले असताना तेथील एका खाजगी मैफलीत गायलेले भजन, आणि मुंबई दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात त्यांनी गायलेली दुर्गा रागातील एक चीज या दोन्ही दुर्मिळ ठेवा आहेत. आपल्याला आवडतील अशी आशा आहे.
अशा या थोर संगीतकार-गायकाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
संदर्भ:
१) स्वरतीर्थ सुधीर फडके जन्मशताब्दी विशेषांक, प्रकाशक श्री नरकेसरी प्रकाशन लि. नागपूर
२) स्वरतीर्थ सुधीर फडके गौरवग्रंथ प्रथमावृत्ती जुलै १९९५ प्रकाशक शरद दांडेकर सुधीर फडके अमृतमहोत्सव समिती
३) बाबूजी - लेखक अनिल बळेल प्रकाशक स्नेहल प्रकाशन
४) Wikipedia आणि YouTube
Dhanajay .. so well written about Babuji. I think you should write on Facebook.
ReplyDelete👍 Great
ReplyDeleteNice Blog Dhananjay!! Hats off to your passion and hard work ! 👍
ReplyDeleteGreat Blog with in-depth research on Babuji ! 🙏
खूपच छान माहितीपूर्ण ब्लॉग लिहिला आहे.गाणी छान निवडली आहेत.
ReplyDeleteआयुष्याची मंगल मय ,अवीट ,गोड अशी शिदोरी तूम्ही सर्वाना देत अहात असे वाटते.अतिशय छान लेखन.सुबक मांडणी..अप्रतिम..👌🙏🙏
ReplyDeleteफारच छान झाला आहे लेख,उत्तम
ReplyDeleteप्रिय मित्र धनंजय सप्रे,
ReplyDeleteसर्वप्रथम एकत्रितपणे संकलित असा गाण्यांचा मोजका परंतु संकलित सूचीबद्ध गोषवारा या लेखात अवतरतो आणि त्यातून लेखकाची मेहनत वाचकाला समृद्ध करते यासाठी वाचकांचा प्रतिनिधी म्हणून मी लेखकाचे आभार मानतो.
महत्त्वाचा लेख परंतु माहिती संकलनापलिकडे लेखकाचे आकलन आणि आकलनापश्चात विवेचन यात आले नाही म्हणून खेद जाणवतो.
सुधीर फडके यांच्या दूरदर्शनने घेतलेल्या मुलाखती संदर्भासाठी घेतल्या असत्या तर लेखकाचे त्यावरील भाष्य वाचकाला सुधीर फडके ही चळवळ म्हणून समजून घेता आली असती.
एक निष्ठावंत स्वयंसेवक, प्रखर राष्ट्राभिमानी आणि कट्टर भाषाप्रेमी अशी सुधीर फडके यांची ओळख इथे या लेखात हरवली आहे.
सुधीर फडके यांच्या संगीतात असलेले वैविध्य त्यांच्या देशाटनाने सिद्ध झाले याचा उल्लेख हवा होता. अशा देशाटन संत नामदेव, संत रामदास, पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे पद्मश्री पद्मभूषण डॉ. एस्. एल्. भैरप्पा या दिग्गज प्रतिभावंतांनी केले म्हणूनच त्यांचे कार्य विशाल ठरले. सुधीर फडके यांच्या संगीतवाटचालीत त्यांचा देशभरातली प्रवास आणि लोकसंगीताचा अभ्यास कामी आला असे खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत म्हटले आहे.
सुस्पष्ट उच्चाराबाबत त्यांचा आग्रह मंगेशकर भावंडांना वरदान ठरला. भाषेवरील त्यांचे प्रेम आणि आग्रह यातून सिद्ध होतो.
"सुधीर फडके यांच्यातल्या गायकामुळे मला गायक म्हणून पुढे येता आले नाही", अशी खंत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत व्यक्त केली होती.
सुधीर फडके हे भारतीय संगीतक्षेत्रात विसरू न शकणारे एक नक्षत्र म्हणावे.
स्वत: संगीतकार असूनही दुसऱ्या संगीतकारांच्या हाताखाली काम करताना आपले श्रेष्ठत्व त्यांनी कधीही मिरवले नाही. दत्ताने २४ गुरु केले, माझ्या आयुष्यात अनेक गुरु मला मिळाले याचे ते ऋण मानतात.
आपल्या मुलाला अमेरिकेतली शिक्षण घेताना वाटलेल्या एकाकीपणावर संगीत आराधना हे औषध आहे हे सप्रमाण समजावून सांगितले.
असो, असे अनेक संदर्भ सुधीर फडके यांच्या चरित्राबाबत एकत्र एकवटणे तसे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आव्हान आहे. माझ्या एका प्रतिक्रियेचा देखील तेव्हढा आवाका पुरेसा असा नाही.
सुधीर फडके हा एका मोठ्या ग्रंथाचा विषय आहे, तो एका लेखात मावणारा आवाका नाही हे खरे, परंतु लेखात या सर्व पैलूंचा ओझरता का होईना उल्लेख आवश्यक ठरतो.
तरीसुद्धा सुधीर फडके या व्यासंगाचा पांग शोधण्याचा हा प्रयत्न स्तुत्य नक्कीच आहे.
या वाचनानंदासाठी पुन्हा एकवार लेखकाचे मनापासून धन्यवाद.
कळावे,
आपला स्नेही,
देवेंद्र रमेश राक्षे
२७ जुलै २०२४, स. १० वा ०८ मी.
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद देवेंद्र. 🙏
Deleteमाझ्या ब्लॉगचा प्रमुख उद्देश ही चांगली गाणी लोकांसमोर यावीत, ती लोकांनी ऐकवीत, त्यांचा आनंद घ्यावा हा असतो.
आजच्या रेडिओ, tv आणि समाजमाध्यमांच्या गोंगाटात उत्तम दर्जाचे संगीत आजच्या युवकांना आणि अनेक प्रौढांना माहितीच नाहीये. ते माहिती करून द्यावे म्हणून माझा प्रयत्न असतो. संगीतकाराची ओळख, त्यांचे इतर पैलू किंवा त्याच्या संगीताचे विश्लेषण ह्यावर मी जास्त भर देत नाही. तसंही मी शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही, फक्त कानसेन आहे, त्यामुळे या महान कलाकारांच्या कामाचे सांगीतिक विश्लेषण करण्याची माझी पात्रता नाही असे मी मानतो.
बाबूजींवर मराठीत खूप लिहिले गेले आहे, त्यांची गाणी मराठी लोकांना अनेक वर्षांपासून परिचित आहेत. माहिती नाहीये ते त्यांचे हिंदीतील काम. म्हणून ते मांडण्याचा माझा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल, देशसेवेबद्दल इ. पैलूंबद्दल मी जाणीवपूर्वक लिहिलेले नाही. असो.
बाबूजींच्या भारत भ्रमण आणि त्यामुळे समृद्ध झालेले त्यांचे संगीत यावर मी २-३ वाक्यात लिहिले आहे, ते कृपया वाचावे.
पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏
अप्रतिम लेख, बाबूजींची गाणी ऐकतच असतो पण गायक, संगीतकार म्हणून त्यांच्याबद्दलची बरीच माहिती या ब्लॉग मधून मिळाली, उत्तम संकलन, मांडणी.
ReplyDeleteधन्यवाद अविनाश जी.
Deleteप्रतिक्रिया दिलेल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. कृपया प्रतिक्रियेखाली आपले नाव लिहावे म्हणजे मला कळेल कारण सर्वच प्रतिक्रिया Anonymous नावाने येत आहेत.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद! हा लेख बाबूजींच्या कारकिर्दीची यथायोग्य माहिती देणारा आहे.
ReplyDeleteखूप सुंदर माहितीपूर्ण लेख. बाबूजींच्या सर्वार्थाने उत्तम गाण्यांची संख्या एवढी असताना अतिशय दुर्मिळ आणि गोड गाणी निवडून त्यांचे व्हिडिओ टाकणे हे अवघड काम सहज केले आहेस. त्या बद्दल धन्यवाद !!🙏🙏
ReplyDelete