Namaskar. Thanks for being here. English version follows Marathi version below.
![]() |
| Photo Courtesy Wikipedia |
नायक विकी (विश्वजित) हा एक क्लबमध्ये गाणारा कलाकार असतो. योगायोगाने त्याची गाठ रोमाशी (बबिता) पडते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. एक दिवस रोमा विकीला नॅन्सी (हेलन) बरोबर बघते आणि तिचा गैरसमज होतो त्यामुळे ती दुःखी होऊन, दारू पिऊन पार्टीत गाणे म्हणते ते आज सादर करत असलेले गाणे "आओ हुज़ूर तुमको सितारों में ले चलूँ". कवी नूर देवासी यांचे शब्द आहेत.
प्रेमभंग झाल्यावर "आपण इतके वेडे कसे झालो होतो?" असा प्रश्न पडून नायिका स्वतःवरच चिडून उपरोधिक हसते आहे हे लक्षात घेऊन गाण्याची दमदार सुरुवात आशाजी करतात. हिंदीमध्ये फार थोडी गाणी ही हसण्याने सुरु झाली आहेत त्यातील हे एक. आणि मग सुरु होते १२ ओळींची छोटीशी बंदिश. "आरंभ-स्वर" च्या संकल्पनेत इतका मोठ्ठा आरंभ असलेले आजपर्यंतचे हे एकमेव गाणे आहे.
यात अनेक ठिकाणी आशाजींनी अतिशय सुंदर अशा हरकती / मुरक्या घेतल्या आहेत त्या लक्ष देऊन ऐका उदा. "दामन ", "ग़ैरत", "नाजूक", "फुलों से" . पहिल्या ८ ओळींमध्ये नायिकेचा स्वाभिमान दिसतो तर "क्या?" या प्रश्नानंतर येणाऱ्या ४ ओळींमधून हळवेपणा. "फिर कोई बाँवरी मुहब्बत की" पासून गाण्याचा रंग आणि राग दोन्ही बदलतात. शब्दांच्या पाठीमागून गिटार/मेंडोलिन यांचे सतत वाजणारे स्वर नायिकेच्या मनातील आंदोलने व्यतीत करतात. तसेच "आरती फिर किसी कन्हैया की" या ओळीच्या पाठीमागे बासरीचे स्वर ऐकू येतात, हे विचार संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे. अशा संगीत, शब्द आणि गायन यांच्या मिलाफातून एक सुंदर मैफल सुरु होते. यानंतर कानावर पडते ती गिटार आणि तालवाद्यांची जादू, आणि खरंच आपण कधी डोलायला लागतो ते आपले आपल्यालाच समजत नाही.
दोन्ही कडव्यांतील संगीत रचनाही अफलातून आहे. सॅक्सोफोन जबरदस्त वाजलाय. दोन ओळींनंतर आशाबाईंनी आ हा हा ओ हो हो गाताना केवळ कमाल केली आहे! आणि काय ती हुकमी उचकी!! लाजवाब.
तय होगा ज़िंदगी का सफ़र, हमसफ़र बनो
चाहत के उजले-उजले नज़ारों में ले चलूँ
दिल झूम जाए ऐसी, बहारों में ले चलूँ
आओ हुज़ूर तुमको ...।।
लिख दो किताब-ए-दिल पे कोई, ऐसी दास्तां
जिसकी मिसाल दे न सके, सातों आसमां
बाहों में बाहें डाले, हज़ारों में ले चलूँ
दिल झूम जाये ऐसी, बहारों में ले चलूँ
आओ हुज़ूर तुमको ...।।
दारू न पिता केवळ शब्दोच्चार आणि गायनातून दारू प्यायल्याचे भासवणे फक्त महान गायक/गायिकाच करू जाणे. बाई ग्रेट का आहेत हे समजते. दुर्दैवाने बबिताचा अभिनय इतका सुमार आहे की तो आशाबाईंच्या जबरदस्त गाण्याला न्याय देत नाही.
सोशल मीडियावर हे गाणे अनेक गायिकांनी गायचा प्रयत्न केला आहे. त्यातील सर्वोत्कृष्ट सादरीकरण आजची एक आघाडीची गायिका मधुरा दातार हिने एका कार्यक्रमात केले आहे. तेही सोबत audio स्वरूपात देत आहे म्हणजे दोन्हीतील साम्य आणि फरक लक्षात येईल. मूळ गाण्यातील अनेक जागा मधुराने हुबेहूब घेतल्या आहेत. अप्रतिम ठेहराव आणि समरसून गायल्याबद्दल तिचे खूप कौतुक. फक्त लता-आशा यांची शारीरिक ताकद आणि ती गाण्यात Throw च्या रूपात परावर्तित करण्याचे त्यांचे सामर्थ्य हे दुसरे कोणी करू शकत नाही याची पुन्हा एकदा जाणीव होते. असो. तर ऐका ओ.पी.-आशा जोडीचे हे अफलातून, लाजवाब गाणे.
तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आवडले तर तुमच्या संपर्कात शेअर करा. धन्यवाद.


