गणपती बाप्पा मोरया!
दरवर्षीप्रमाणे
यंदाही अनेक घरांमध्ये एव्हाना बाप्पा आले असतील आणि त्यांची प्राणप्रतिष्ठाही
मोठ्या थाटात झाली असेल. जन्माष्टमी पासून सुरु झालेले सणांचे पर्व हे आणखी काही
महिने म्हणजे दिवाळी संपेपर्यंत चालेल.
यातील बरेचसे सण हे
गेले कित्येक वर्षांपासून सार्वजनिक स्वरूपात साजरे होतात. विशेषतः दहीहंडी, गणेशोत्सव
आणि नवरात्र हे तर फार मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरीत्या साजरे केले जातात. गेल्या
१५-२० किंवा कदाचित जास्तच वर्षांपासून या सार्वजनिक उत्सवांना अतिशय बाजारी
स्वरूप आले आहे हे कुठलाही सुजाण माणूस मान्य करेल. या उत्सवांच्या निमित्ताने
काही वाईट प्रवृत्तीही यात मोठ्या प्रमाणात सामील झाल्या आहेत हे नाकारता येणार
नाही. उत्सवांच्या काळात अनेक नागरिकांना प्रचंड अडचणी व मनस्ताप सहन करावा लागतो.
वाहतुकीचा वाढलेला ताण, हवेच्या व आवाजाच्या प्रदूषणाने गाठलेली अत्त्युच्च पातळी,
त्याबरोबर येणारे असंख्य आजार हे सर्व भोगल्यावर याचसाठी केला होता का अट्टाहास
असे म्हणायची वेळ येते.
आमचे काही मित्र व
स्नेही अत्यंत संतापून आपापल्या Facebook अथवा Whatsapp वर अतिशय तिखट प्रतिक्रिया देतात. या प्रतिक्रियांचा एकूण
सूर हा “हे सार्वजनिक उत्सव बंद झाले पाहिजेत” किंवा “टिळक, गणेशोत्सव सार्वजनिक
करून तुम्ही फार मोठी चूक केलीत ज्याची फळे आता आम्हाला भोगायला लागत आहेत” असा
असतो. ज्यावेळी टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली त्यावेळेला
त्यांना कल्पनाही नसेल की १०० वर्षांनी या उत्सवाचे स्वरूप कसे असेल. आणि म्हणून
आपण आजच्या चष्म्यातून १०० वर्षांपूर्वीच्या टिळकांच्या त्या योजनेस चूक कसे काय
ठरवू शकतो.
हाच न्याय तुम्ही Facebook अथवा Whatsapp च्या निर्मात्यांना
लावाल काय? कारण एकूणच सोशल मिडीयाने भारतामध्ये विशेषतः शहरी भागांमध्ये शाळकरी
मुला-मुलींपासून ते आजोबा-आजींपर्यंत जो हलकल्लोळ माजवला आहे, ज्याने असंख्य
प्रश्न आजच्या पालकांपुढे उभे केले आहेत ते बघता आपण या नवीन तंत्रज्ञानाला दोष
देऊ का?
प्रत्येक नव-निर्मितीच्या
मूळ उद्देशाला हरताळ फासणारे आपणच असतो हे आपण कधी मान्य करणार? मग मूळ उद्देश सफल
व्हावा म्हणून आपण स्वतः काय प्रयत्न करतो? आजही आजूबाजूस बघितले तर अनेक मंडळांचे
गणेशोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे होताना आपणाला दिसतील. ज्ञान-प्रबोधिनी, ‘स्व’-रूपवर्धिनी,
रमणबाग शाळा आणि काही संस्था यांची ढोल-ताशा पथके, लेझीम पथके, संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी
सुरु केलेल्या श्री गणेशापुढच्या भव्य रांगोळ्या, विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये
होणारे चांगले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यातून फुलत/घडत जाणारी सुसंस्कारीत
पिढी आपल्याला दिसत नाही का? या सर्वांमध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग किती असतो? आपण
नुसतेच System वर टीका करणार का ती बदलण्यासाठी / चांगली होण्यासाठी स्वतः काही प्रयत्न करणार
हा कळीचा मुद्दा आहे.
विशेषतः समाजामध्ये
ज्यांना काही स्थान आहे, ज्यांनी काही नाव कमावलेले आहे अशा व्यक्तींकडून तर अशा
सकारात्मक सहभागाची अथवा त्याच्या सकारात्मक प्रसिद्धीची अपेक्षा आहे.
“विवेकाचा जागर” या
नावाखाली समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढा देणारे उत्सवाच्या या सकारात्मक
बाजू तेवढ्याच जोमाने का मांडत नाहीत? का फक्त एकाच धर्माच्या वाईट बाजू सतत
समाजासमोर मांडायच्या आणि कुठल्या तरी चमत्कारांनी “संत” पद देण्याच्या पद्धतीला
मात्र जराही विरोध करायचा नाही – यातला “विवेकवादी” दुटप्पीपणा कोण उघडकीस आणणार?
आम्ही शिकले-सवरलेले
लोक निदान एवढे तरी करू शकतो का? आपल्या प्रत्येक सणामागे जशी परंपरा आहे, जशी
सामाजिक कारणे आहेत, तसेच विज्ञानही दडलेले आहे. मग दिवाळीला अमुक एक पदार्थच का
खायचे, संक्रांतीला तिळगुळ का वाटतात, होळी/रंगपंचमी ही नेहमी उन्हाळ्याच्या आधीच
का साजरी करतात किंवा आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा चातुर्मास का
पाळावा या सर्वांमागचे विज्ञान समजून घेण्याची कास आपण कधी धरणार? हे सर्व पुढच्या
पिढीला कधी समजून सांगणार? का नुसतेच जुने ते सर्व प्रतिगामी म्हणत दुटप्पी
पुरोगाम्याची री ओढणार?
आमचे एक स्नेही
श्री. उदयन इंदुरकर गेल्या काही वर्षांपासून “एक होतं देऊळ” नावाचा कार्यक्रम सादर
करतात. हा कार्यक्रम कुठल्याही धार्मिक आधारांवर नाही तर पूर्णतः शास्त्रीय
दृष्टीकोनातून सादर होतो. पुरातन देऊळ कसे बांधले गेले त्यामागचे स्थापत्यशास्त्र
काय होते, मूर्ती ठराविक पद्धतीने घडवण्यामागील त्यावेळच्या स्थापत्यशास्त्री व
शिल्पकारांचा काय विचार होता इ. सर्व विषयांची शास्त्रीय पद्धतीने मांडणी श्री.
इंदुरकर करतात. सर्व सुशिक्षित नागरिकांनी हा कार्यक्रम जरूर पहावा व जमले तर आपल्या
प्राचीन संस्कृतीचा योग्य तो अभिमान बाळगावा व इतरांसही सांगावा.
तेंव्हा मित्रांनो कृपया
विचार करा, झोपेतून जागे व्हा आणि करते व्हा, नुसते नाक मुरडणे नको. काहीतरी भरीव
कार्य आपापल्या सोयीनुसार करा पण जरूर करा. गेली ७० वर्षे झोपलेला निद्रिस्त समाज,
गेले २० वर्षे स्वतःतच मग्न झालेला समाज, आपल्या आणि कुटुंबाच्या पलीकडे न बघणारा
समाज जर जागा आणि कर्ता झाला तर परिवर्तनाची फळे दिसायला वेळ लागणार नाही.
उपनिषदातला एक श्लोक
जो स्वामी विवेकांदांनी लोकप्रिय केला त्याची यानिमित्ताने आठवण होते आहे. तो
श्लोक असा आहे :
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत, क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यद्दुर्गम पथ: तत् कवयो वदन्ति |
अर्थात
Arise! Awake! Approach the great and learn.
Like the sharp edge of a razor is that path, so the wise say−hard to tread
and difficult to cross.