Wednesday, 26 January 2022

स्वराज्य @७५ - मराठी रंगभूमी कलाकारांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

भूमिका


नमस्कार मित्रहो. आपला भारत देश स्वतंत्र होऊन येत्या १५ ऑगस्टला म्हणजे १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण होतील. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार करताना भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांचा आणि त्यांना तत्कालीन भारतीय समाजाने केलेल्या प्रतिकाराचा विचार केला पाहिजे. ग्रीक, शक, हूण, मुघल, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रजांनी आपल्या देशावर असंख्य आक्रमणे केली. इतिहासाच्या अभ्यासकांनी या विविध आक्रमणांचा अभ्यास करून 
प्रत्येक आक्रमणामागे अमर्याद सत्ताकांक्षा, धर्म/संस्कृतीचा प्रसार, आणि संपत्तीची लूट या तीनपैकी एखादा मुख्य हेतू असल्याचे दाखवून दिले आहे. तरीही, आजही दोन/अडीच हजार वर्षांनंतर येथील संस्कृती जिवंत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या-त्या वेळच्या समाजाने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष. या संघर्षाची गाथाही खूप जुनी आहे. 

२३ मे १७५७ रोजी प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा विजय झाला व बंगालमध्ये त्यांनी पाय रोवले, पण दिल्लीचे तख्त जिंकण्यासाठी मात्र इंग्रजांना १८०३ पर्यंत वाट पाहावी लागली. पुण्यातील शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवायला १८१८ साल उजाडावे लागले. १८२६ मध्ये भरतपूरला जाट झुंजले. तर १८२६ ते १८३२ या सहा वर्षांच्या काळात स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला जाहीरनामा प्रकाशित करणाऱ्या राजे उमाजी नाईकांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. "चाळीसगाव डांगण" परिसरात असाच एक लढा १८१८ ते १८३७ या काळात महादेव कोळी समाजातील लोकांनी इंग्रजांविरुद्ध लढला. पंजाब मध्ये १८४८ पर्यंत शीख इंग्रजांशी झुंजत होते. या सर्व लढ्यांचा उत्कर्षबिंदू १८५७ च्या स्वातंत्र्यसमराने गाठला. या समराचे वैशिष्ट्य म्हणजे हा काही फक्त एका प्रांतात किंवा प्रदेशात नाही तर संपूर्ण देशात लढला गेला, यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण देश/समाज इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एकत्रित झाला.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपले बलिदान दिले, पण आत्तापर्यंत आपल्याला शिकवल्या गेलेल्या इतिहासात फक्त काहीच थोर नेते व क्रांतिकारकांची नावे समोर आली आहेत. बऱ्याच लोकांचा असाही समज आहे की आपल्याला आझादी बिना-खडग बिना-ढाल मिळाली आहे. या सर्व थोर नेत्यांचे आणि क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान बहुमूल्य आहे याबद्दल वादच नाही, त्याकरिता त्यांना वंदनच आहे; पण प्रत्यक्षात भारतीय स्वातंत्र्याची कथा ही लक्षावधी भारतीयांच्या अदम्य धैर्याची, पिढ्यानपिढ्यांच्या कठोर संघर्षाची, अपरिमित त्यागाची आणि अतुलनीय शौर्याची कथा आहे. म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्या सर्व नाम-अनाम वीरांचे स्मरण करणे, त्यांच्याप्रती आपली संवेदना व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.

या उद्देशाने भारतीय विचार साधना, पुणे या संस्थेने "स्वराज्य ७५" हा उपक्रम दीड/दोन वर्षांपासून हाती घेतला. या अंतर्गत विविध क्षेत्रातील सामान्य आणि असामान्य व्यक्तींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेमके काय योगदान दिले याचा धांडोळा अनेक पुस्तके, हस्तलिखिते, स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्रे आणि इतर उपलब्ध साधने यांच्या मदतीने घेतला गेला/जात आहे. ही क्षेत्रे आहेत - १) चित्रपट, २) रंगभूमी, ३) कला, ४) साहित्य, ५) भक्ती संप्रदाय, ६) राष्ट्रीय कीर्तन, ७) महिला, ८) रा.स्व. संघ योगदान, ९) जनजाती, १०) क्रांतिकारक, ११) प्रति सरकार, १२) पत्रकार, १३) राष्ट्रीय दैनिके, १४) शिक्षण, १५) राष्ट्रीय कवी, १६) विज्ञान, १७) उद्योग आणि तंत्रज्ञान, १८) कृषी, १९) सहकार, २०) आर्थिक, २१) मुस्लिम भूमिका, २२) ख्रिश्चन भूमिका, आणि २३) कम्युनिस्ट भूमिका. या प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा मागोवा घेऊन त्यातून तयार झालेल्या लेखांच्या पुस्तिका तयार करण्यात आल्या/येणार आहेत. या पुस्तिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचे काम येत्या १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. याचबरोबर सर्व लेख इंटरनेट वर एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचीही योजना आहे. 

प्रस्तुत लेखामध्ये मराठी रंगभूमीशी संबंधित कलाकारांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हा विषय प्रामुख्याने मांडला आहे. मी या उपक्रमाशी डिसेंबर २०२१ मध्ये जोडला गेलो. मी रंगभूमी हा विषय निवडला होता. वेळेच्या मर्यादेमुळे तसेच करोनाच्या बंधनांमुळे थोड्याफार उपलब्ध संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन फक्त मराठी नाटककारांचे योगदानच तपासता आले. रंगभूमीशी संबंधित इतरही कलाकार असतात जसे की संगीतकार, अभिनेते, नेपथ्यकार, इ.; परंतु वर उल्लेख केलेल्या मर्यादांमुळे आणि यासंबंधी काहीही संदर्भग्रंथ न मिळाल्याने नाटककार सोडून इतरांचे योगदान या लेखात समाविष्ट करता आलेले नाही, त्या अर्थाने हा लेख अपूर्ण आहे. काही गोष्टींचा मी जरूर उल्लेख करू इच्छितो. प्रथम म्हणजे मी संशोधक नाही, त्यामुळे हा लेखही संशोधन नाही तर वेगवेगळ्या संदर्भग्रंथांत उपलब्ध असलेल्या माहितीचे फक्त संकलन आहे. त्या ग्रंथांची यादी लेखाच्या शेवटी दिली आहे. तसेच माझा आतेभाऊ मिलिंद सबनीस आणि मित्र निनाद जाधव यांनी दिलेल्या पुस्तकांमुळे ही सर्व माहिती बसल्या जागी मिळाली, या दोघांनी केलेल्या बहुमूल्य सूचनांमुळे लेखातील माहिती बऱ्याच प्रमाणात अचूक होऊ शकली. 

आपल्याला या लेखाचा उपयोग विषय समजून घेण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी होईल अशी आशा करतो. आपण हा लेख वेळात वेळ काढून जरूर वाचावा व आवडल्यास आपल्या मित्रमंडळींबरोबर जरूर शेअर करावा अशी आग्रहाची विनंती. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏