Sunday, 12 March 2017

साधा माणूस - होळी विशेष


थॅंक गॉड, मी साधा माणूस आहे,
पुरोगामी विचारवंत नाही !

जे दिसते ते बघतो, कानावर पडते ते ऐकतो
खऱ्याला खरे म्हणतो, चांगल्याला चांगले
खोट्याला खोटे म्हणायची हिम्मत ठेवतो
सारासार विचार करूनच निष्कर्ष काढतो
कारण? कारण मी साधा माणूस आहे
पुरोगामी विचारवंत नाही !

मला दादरी दिसते, मालदाही दिसते
मुस्लिम भगिनींची पीडा भिडते आणि पंडितांचे अश्रूही
गोध्राही आठवते आणि मोग्याचे हत्याकांडही
कारण? कारण मी साधाच माणूस आहे
पुरोगामी विचारवंत नाही !

थॅंक गॉड, मी साध्याच महाविद्यालयात शिकतो
JNU, FTII मध्ये नाही
अभ्यासाकडे लक्ष देऊन काम-धंद्याला लागतो
७-८ वर्षे शिकत राहून दंगे-धोपे करत नाही
कारण? कारण मी साधाच माणूस आहे
पुरोगामी विचारवंत नाही !

थॅंक गॉड, मी साधा माणूस आहे, स्टार पत्रकार नाही 
जे वाटते ते बोलतो, भावते त्याचे कौतुक करतो 
अग्रलेखासारखे शब्द मागे घेत नाही
चूक कबूल करून सुधारायला कमीपणा मानत नाही 
कारण? कारण मी साधा माणूस आहे !
पुरोगामी विचारवंत नाही !

माझी देशभक्तीही साधीच आहे 
भारताच्या विजयात आनंद आहे, आणि पराजयाचे दुःख
माणुसकीचा बुरखा पांघरून मी नक्षल्यांचे समर्थन करत नाही 
की कन्हैय्याच्या नादी लागून बरबादीचे नारे देत नाही 
कारण? कारण मी साधाच माणूस आहे
पुरोगामी विचारवंत नाही !

मी सहिष्णू आहे, देशातील बहुसंख्य जनतेसारखाच
इथे जवानांवर दगडे फेकता येतात
दहशतवाद्याला सन्मानाने निरोप देतात
सोयीनुसार पुरस्कार पण वापस करता येतात
माध्यमांतून सतत असहिष्णुतेचे नारेही देता येतात
असे असूनही मी सहिष्णू आहे कारण,
हा देश "वसुधैव कुटुंबकम" वर वाढलेला आहे !

क्षमा करा, मी पुरोगामी विचारवंत नाही,
कारण, मी परिवर्तनीय आहे,
मी साधा माणूस आहे, मी साधाच राहणार आहे !

- धनंजय रघुनाथ सप्रे