Sunday, 9 November 2014

तुम्हाला हेच हवे आहे काय?

साधारण १०-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. पुण्यातील एका नावाजलेल्या शाळेतील एका क्रीडा शिक्षकाला P. T. च्या तासाला मुलाला मारले म्हणून मुलाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून काढून टाकले. ज्या मुलाला मारले तो मुलगा खोडकर आणि उद्धट म्हणूनच शाळेत आणि त्याच्या मित्रांमध्ये प्रसिद्ध होता. शिवाय बड्या आई-बापाचा लाडका. मग काय वर्गात त्याचेच प्रस्थ. कोणीही त्याच्या विरुद्ध काही बोलायची सोय नव्हती. शिक्षकही तसे जपूनच वागायचे त्याच्याशी. P. T. च्या तासाला त्या मुलाने बरोबरच्या एका मुलाच्या कानफटात मारली होती. ते शिक्षकांनी पाहिले आणि त्यांचा संताप अनावर होऊन त्यांनी त्या मुलाला मारले. झाले, त्या मुलाने घरी जाऊन आई-वडिलांना सांगितले. लगेच दुसर्या दिवशी आई-वडील तावातावाने शाळेत भांडायला आले व तक्रार केली. चौकशीअंती त्या क्रीडा शिक्षकाला नोकरीवरून कमी करण्यात आले. या सर्व घटनेत जशी शिक्षकाची चूक होती तशी त्या विद्यार्थ्याची नव्हती का? मग विद्यार्थ्याला काय शिक्षा मिळाली? यातून इतर विद्यार्थी व पालक यांना काय संदेश शाळेने व व्यवस्थेने दिला?

आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. जर आपल्या ओळखीत कोणी शिक्षक असतील तर त्यांना विचारा की कुठल्या दडपणाखाली त्यांना विद्यार्थ्यांना हाताळावे (नव्हे सांभाळावे) लागते ते! विद्यार्थ्यांवर जरा जरी हात उगारला किंवा ओरडले व विद्यार्थ्याने तक्रार केली तर त्यांना Atrocity or Child Abuse च्या कायद्याखाली अटक होऊ शकते व नोकरी जाते ते वेगळेच. आपण दुसर्या टोकाची पण उदाहरणे ऐकतो जिथे शिक्षकांची दहशत आहे व विद्यार्थी वा पालक काहीही करत नाही आहेत. ही दोन्ही टोके चूकच. 

प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना - विशेषतः शहरातील - शिस्त लावण्याचे काम खरे तर पालकांचे आहे; पण आजकालच्या पालकांना वेळच नाही; वेळ आहे तर इच्छा नाही असे दिसते. सर्वच पालक असे आहेत असे नाही पण प्रामुख्याने हीच परिस्थिती आहे. जिथे पालकच मुलांना शिस्त लावू शकत नाहीत, त्यांच्यापुढे योग्य आदर्श ठेऊ शकत नाहीत तिथे बिचारे शिक्षक काय करणार? 

माझा मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका पालक सभेत असे सांगितले की मुला-मुलींना शाळेतले स्वच्छतागृह कसे वापरायचे याचे प्राथमिक ज्ञान सुद्धा नसते कारण घरी ते दिलेलेच नसते. त्यांनी सांगितलेली काही उदाहरणे ऐकून तिथे जमलेले आम्ही पालक नखशिखांत हादरून गेलो होतो व अंतर्मुख झालो होतो. देशातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अतिशय दयनीय अवस्थ्या ही काही फक्त स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आलेली नाही तर तुमच्या-आमच्या सारखे नाकर्ते/बेशरम नागरिकही त्याला तितकेच जबाबदार आहेत. 

कॉलेजमध्ये तर याहीपेक्षा भयानक परिस्थिती आहे. उदासीन प्राध्यापक, बेजबाबदार/स्वतःतच मग्न असणारे विद्यार्थी आणि कॉलेजचे बेपर्वा प्रशासन यामुळे एकूणच शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. परत तिथे विद्यार्थ्यांना बोलायची सोय नाही कारण तसे केले तर विद्यार्थी संघटना येउन चोप देण्याची भीती. महाविद्यालयीन विद्यार्थी दिवसभर काय करतात, कुठे जातात, कोणाच्या संगतीत असतात हे आई-वडिलांना माहितीच नसते. आणि मग अचानक एक दिवस आपल्या मुला-मुलीचे नाव रेव्ह पार्टीत आलेले बघून पालक हादरून जातात तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. 

दुसरी घटना - काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने डान्स-बार बंद करायची घोषणा केली अन काय कहर माजला विशेषतः मुंबईमध्ये. सर्व बारबाला सरकारविरुद्ध रस्त्यावर आल्या; त्यांचे नेते सरकारला कोर्टात खेचायची भाषा करु लागले; कारण काय तर बारबालांच्या आर्थिक कमाईचा स्रोत बंद झाला! महाराष्ट्रातील महिलांना या मार्गाने का जावे लागते, त्याला पर्याय काय याचा पुरेसा विचार न करता डान्स-बार चालू ठेवावेत ही मागणी कितपत योग्य आहे? प्रत्येक नागरिकाला योग्य ते काम देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे हे मान्य; पण म्हणून जो व्यवसाय नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे आणि स्त्रियांवरही अन्यायकारक आहे तो बंद करताच इथल्या "विचारवंतानी" व माध्यमांनी केलेला गहजब आपण कुठे चाललो आहोत याची चिंता करायला लावतो. 

आजकाल आजूबाजूला बघितले तर काय दिसते? जागोजागी स्वतःच्या स्वार्थासाठी नियम मोडणारा, लाच देणारा/घेणारा, बेकायदेशीर घरे बांधणारा आणि ती घरे विकत घेणारा व महापालिका ती घरे तोडायला आल्यावर त्यांच्यावर दगडफेक करणारा, बेहिशोबी अगणित पैसा गोळा करणारा, आयकर चुकवण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा सुशिक्षित / अशिक्षित समाज आणि हे सर्व करणार्यांकडे त्रयस्थपणे बघत गप्प बसणारे तुमच्या आमच्या सारखे लोक. आम्हाला काही करायला नको म्हणून मोदी-फडणवीस सारख्यांना निवडून द्यायचे आणि त्यांच्या चांगल्या/वाईट कारभाराचे वाभाडे वैशालीत बसून चहा पिताना काढायचे. मी असे म्हणत नाही की सर्वच लोक वाईट आहेत पण चांगले गप्प बसतात म्हणून वाईट लोकांचे फावते. आपल्याला हेच हवे आहे काय?

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे Kiss of Love या तथाकथित आंदोलनावरून उठलेला गदारोळ. कोचीमधल्या एका हॉटेल मध्ये एका मुलाने मुलीचे चुंबन घेतले म्हणून तिथे असलेल्या काही मंडळीनी हॉटेलची तोडफोड केली. त्याची प्रतिक्रिया म्हणून हे आंदोलन सुरु झाले; त्याला समाजातील तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यवादी लोकांनी व माध्यमांनी खतपाणी घातले व Kiss of Love च्या विरोधकांना झोडपण्यास सुरुवात केली. एखादी घटना पटली नाही म्हणून तोडफोड करणे जसे निषेधार्ह आहे तितकेच निषेधार्ह त्या घटनेचे व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समर्थन करणेही आहे. 

एका व्यक्तीने आपल्या आवडत्या व्यक्तीचे चुंबन घेणे यात वाईट काही नाही; पण हा त्या दोघांमधील वैयक्तिक विषय नाही का? वैयक्तिक संबंधाचे जाहीर प्रदर्शन करण्यामागे कुठली वृत्ती वा कारणे आहेत? आणि कोणी त्याला विरोध केला तर त्याला प्रतिगामी ठरवून अशा घटनांना उत्तेजन देणारे नेमके काय साधू इच्छितात? उद्या असेच होत राहिले तर संभोग ही सुद्धा जाहीरपणे करायची गोष्ट होईल, ती आपल्याला चालेल का? कुठल्याही समाजात नीतीमत्तेचे काही अलिखित नियम असतात; ते त्या देशाच्या, समाजाच्या तत्कालीन सामाजिक जाणिवांप्रमाणे ठरलेले असतात; त्यात बदलही होत असतात/व्हायला हवेत; पण असे करताना एकूण समाजावर विशेषतः तरुण पिढीवर त्या बदलांचा होणारा बरा/वाईट परिणाम याचा विचार करून ते बदल स्वीकारायचे असतात. 

व्यक्तिस्वातंत्र्याचे स्वैराचारात रुपांतर झाले की काय होते ते सध्याच्या अमेरिकेतील समाज जीवनाकडे बघितल्यावर लक्षात येते. नवरा-बायकोंमधील नातेसंबंध, आई-वडील आणि मुलगा/मुलगी यांच्यातील संबंध हे पूर्णतः दुरावलेले दिसतात, कुमारी-मातांच्या प्रश्नाने भयानक रूप धारण केलेले दिसते, कुटुंब नावाची संस्थाच नाहीशी झालेली दिसते. मग नैराश्याने ग्रासलेले तरुण-तरुणी आत्महत्या करतात, नवरा-बायको घटस्फोट घेतात, शाळेतील कुमारवयीन मुले गोळीबार करतात. अमेरिकेतील सुख समृद्धी अशा उधवस्त माणसांना मनःशांती देऊ शकत नाही; मग हीच माणसे भारतीय योग शिकताना दिसतात; आपण सर्व जण Times Square मधील योगासन  वर्गांची दृश्ये बघतो आणि मनोमन सुखावतो की नाही? 

पण मित्रांनो, आपल्याकडे मोठ्या शहरांमध्ये हीच परिस्थिती हळूहळू निर्माण होते आहे; गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे, अनैतिक संबंधांना जणू काही समाजमान्यता मिळत आहे कारण टी. व्ही. वरील एकही मालिका (काही सन्माननीय अपवाद वगळता) अनैतिक संबंधांशिवाय पूर्णच होत नाही, मुला-मुलींमध्ये सिगारेट, दारू सारखी व्यसने वाढीस लागत आहेत, मधूनच एखादी रेव्ह-पार्टी पकडली जाते व आपण अस्वस्थ होतो; पण कुणास ठाऊक अशा अनेक रेव्ह-पार्ट्या होत असतील, डिस्को-पबमध्ये जे प्रकार चालतात ते आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहेत; अनेक नोकरदार शुक्रवार संध्याकाळी "बसतात" आणि एखादा पिणारा नसेल तर त्याची चेष्टाही होते, अनेक सोसायट्यांमध्ये शनिवार-रविवार घरी स्वयंपाकाच होत नाही; आमच्या जवळील एका सोसायटीत तर भरल्या घरात दोन्ही वेळेस जेवणाचे डबे बाहेरून येतात व वीक-एंडला बाहेर जेवतात; मुलांनी आईच्या हाताची चव कधी बघितलेलीच नाही. 

तुम्ही याकडे कसे बघता? याचा कुठल्या तरी पातळीवर नैतिक पद्धतीने विरोध वा निषेध करता का? का तुमच्या घरापर्यंत ही कीड यायची वाट बघत आहात? तुम्हाला हेच हवे आहे काय? 

मित्रांनो, याचा जरूर विचार करा. व जिथे जिथे माध्यमे व तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यवादी व विचारवंतांकडून या प्रकारांना उत्तेजन दिले जाते तिथे तिथे  प्रतिगामी म्हणून हिणवले जाण्याची तमा न बाळगता त्याचा विरोध / निषेध करा. नाहीतर किल्ला ढासळत जाईल आणि तुम्ही फक्त प्रेक्षक असाल!

कोणीतरी म्हटले होते की देशातल्या तरुणांच्या ओठांवर कुठली गाणी आहेत त्यावरून त्या देशाचे/समाजाचे भविष्य ठरत असते! वेडेच होते ते - स्वातंत्र्यापूर्वीचे?